Thursday, August 6, 2015

कुबेर अमेरिकन मंत्र्यांची खाती सुद्धा बदलतात

‘लोकसत्ता’ अर्थात कुबेर टाईम्स (भाग तिसरा)



कुठल्याही लोकप्रिय दैनिकाचा संपादक वा एखादा अभिनेता कलावंत याचे चहाते असतात आणि त्यातले काहीजण भक्तीला लागल्याने तारतम्य विसरून बसलेले असतात. त्यात बहुतांश असेही असतात, ज्यांच्या मूळ व्यक्तीगत आवडीनिवडीला प्रतिसाद मिळणारे लेखन वा वक्तव्य त्यांना भावणारे असल्याने असे नामवंत त्यांचे आवडते झालेले असतात. मग ते लोक कुठलेही मुद्दे वा वास्तव तपासण्याची फ़िकीर करत नाहीत आणि आंधळेपणाने आपल्या लाडक्याचे समर्थन करत असतात लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर त्याला अपवाद नाहीत. निखील वागळेच्या मुर्खपणाचे समर्थन करणारे असतील, तर कुबेरांचे असायला काय हरकत आहे? तेव्हा अशा लोकांना कुबेरांच्या चुका किंवा खोटेपणा दाखवलेला रुचणे शक्य नसते. मग अशा लोकांनी माझ्यावर कसलाही पुरावा न देता द्वेषाचा आरोप केला तर नवल कुठले? कुबेरांच्या ३० जुलैच्या अग्रलेखातले जे दोष मी दाखवले, त्याचा कुठलाही प्रतिवाद कोणी केला नाही. पण कुबेर महान असल्याचा दावा मात्र केला आहे. त्यापैकी एकाने घेतलेला आक्षेप महत्वाचा वाटतो म्हणून त्याचे स्पष्टीकरण देणे कर्तव्य वाटले. मी आधीच कुबेरांचे फ़ारसे लेखन वाचलेले नाही याची कबुली दिली आहे. आणि एका अग्रलेखावरून मी त्यांची परिक्षा कशी करू शकतो, असा त्या कुबेरभक्ताचा सवाल आहे. मात्र त्यांचा आक्षेप माझा पहिला लेख प्रसिद्ध होण्याआधी त्यांच्याच देवाने म्हणजे कुबेर यांनी खोडून काढायची तसदी घेतली. ३१ जुलै रोजीच्या ‘निरुपयोगी सुस्कारा’ या अग्रलेखातून कुबेर यांनी आणखी एक अभूतपुर्व शोध लावून स्वत:च्या अज्ञानाची जाहिरात करून टाकली. त्या लेखात ते म्हणतात, ‘पुढे अमेरिकेतच सत्ताबदल झाला आणि गृहमंत्रिपद मॅडेलिन अलब्राइट यांच्यासारख्या खमक्या महिलेकडे गेल्यामुळे तालिबान्यांचे प्रस्थ कमी होऊ लागले.’

कुबेर हे अरबी व तेल उत्पादक देशांच्या राजकारण व अर्थकारणाचे जाणकार म्हणून ओळखले जातात आणि तिथे गुंतलेल्या अमेरिकन नेतृत्वाच्या बारीकसारीक गोष्टी त्यांच्या इतक्या अन्य कुणा मराठी पत्रकाराला कळत नाहीत असे गृहीत आहे. अशा व्यक्तीला पंधरा वर्षापुर्वी अमेरिकेचा अध्यक्ष कोण होता आणि त्याच्या सरकारचे प्रमुख मंत्री कोण होते त्याची माहिती नसेल का? किंबहूना अमेरिकेन प्रशासनातले मुख्य पदाधिकारी माहित नसून तेलाचे जागतिक राजकारण कोणी लिहूच शकणार नाही. पण तेही दुय्यम! कुठल्याही देशाचा अंतर्गत सुरक्षा बघणारा गृहमंत्री असतो आणि परदेशी संबंध संभाळणार्‍याला परराष्ट्रमंत्री म्हणतात, हे महाविद्यालयीन विद्यार्थीही सांगू शकेल. किंबहूना कुठल्याही देशाचा गृहमंत्री परदेशी भानगडीत नाक खुपसू शकत नाही, इतके तरी संपादक पदापर्यंत पोहोचलेल्या पत्रकाराला माहिती असायलाच हवे. याकुबच्या पित्याने कराचीत थोरला मुलगा टायगर याला कसे चोपले, इतका तपशील छातीठोक लिहीणार्‍याला गृहमंत्री व परराष्ट्रमंत्री यातला फ़रक कळत नाही? मेडेलीन अलब्राईट या क्लिन्टन सरकारमध्ये गृहमंत्री असल्याचा त्यांनी केलेला उपरोक्त दावा कुबेरांच्या जाणतेपणाचा पुरावा आहे की अज्ञानाचा दाखला आहे? कारण अलब्राईट या क्लिन्टन सरकारच्या परराष्ट्रमंत्री होत्या. त्या खमक्या होत्या यात शंका नाही. पण कितीही खमक्या असल्या म्हणून गृहमंत्री असताना त्या परराष्ट्र संबंधात ढवळाढवळ करू शकत नव्हत्या. म्हणूनच अफ़गाण व तालिबान ह्यांच्या भानगडीत त्यांनी हस्तक्षेप केला. याचा अर्थ त्या परराष्ट्रमंत्री असाव्यात इतकाही अंदाज कुबेरांना बांधता येऊ नये? म्हणजेच त्यांचा याकुबला निरागस निष्पाप मुलगा ठरवण्याचा उद्योग जितका पोरकट होता, तितकीच त्यांच्या नित्यनेमाने प्रसिद्ध होणार्‍या अग्रलेखात बालीश विधाने असणार याची खात्री देता येते.

रा. स्व. संघाच्या मुखपत्राने लिहीलेल्या लेखाची झाडाझडती घेताना त्यातले अज्ञान शोधणार्‍याने आपले ज्ञान पाजळताना काळजी घ्यायला नको काय? मग विषय अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्याचा असो किंवा याकुबच्या साक्षिदारीचा असो. ‘शोकांत उन्माद’ या अग्रलेखात कुबेर लिहीतात, ‘दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन यांना आपण न्यायालयांत हजर करू शकलो नाही.’ कोर्टात त्यांना हजर करणे म्हणजे काय? ते आसपासच्या कुठल्या जेलमध्ये आहेत आणि ठरलेल्या तारखेला त्यांना गाडीमध्ये टाकून न्यायाधीशासमोर हजर करणे असते काय? हे दोन्ही आरोपी पळून गेलेले आहेत आणि त्यांना परदेशातून इथे आणणे म्हणजे दुसर्‍या वर्तमानपत्रातला कोणी चांगला पत्रकार वार्ताहर उचलून आणणे आहे काय? एका देशातून पळालेला आरोपी दुसर्‍या देशात आश्रय घेतो, तेव्हा त्याला इथे आणून कोर्टापुढे हजर करण्याला कुबेर गंमत समजतात काय? आणि ते शक्य होत नसेल तर ते सरकार अशक्त असते, सिद्धांत कुठून आला? न्युयॉर्कचे जुळे मनोरे उडवून देणारा ओसामा बिन लादेन अफ़गाणिस्तानात होता, त्याला अमेरिका त्यांच्या कोर्टात हजर करू शकली होती काय? पुढे तो पाकिस्तानात लपल्याच्या बातम्या होत्या, पण अमेरिका त्याला ताब्यात घेऊ शकली नाही. मग कुबेर अमेरिकेला अशक्त सरकार म्हणणार काय? सशक्त व अशक्त या शब्दांच्या त्यांच्या व्याख्या काय आहेत? इथे घातपात वा गुन्हा करून गुपचुप पळूण जाणे म्हणजे सशक्त आणि कायद्याने अडचणी उभ्या केल्याने त्यांना पकडू शकत नाही, ते सरकार अशक्त? कुठल्या बुद्धीचे हे तर्कशास्त्र आहे? यांच्या बुद्धीनुसार मग इसिसचा अल बगदादी, तालिबानांचा शेख मुल्ला उमर, वा तोयबाचा म्होरक्या सईद हफ़ीज हे मोठे शूर व सशक्त लोक असले पाहिजेत आणि त्यांना हातही लावू शकत नाहीत, म्हणून कायद्याचे विविध देशातील अधिकृत राज्यकर्ते अशक्त असले पहिजेत ना?

कुबेरांच्या तर्कानुसार जायचे तर मग आपल्याला हवे असलेले गुन्हेगार दुसर्‍या देशात आश्रय घेतलेले असतील, तर त्यांना ताब्यात घेण्यासाठी सरळ त्या देशात सैन्य घुसवून युद्धाचा धोका पत्करणारा सशक्त व शूर असला पाहिजे. आणि कायद्यानुसार आरोपींना आणायचा प्रयत्न करणारा, संसदीय तत्वाचे पालन करणारा अशक्तच असला पाहिजे. काठमांडूहून भारतीय प्रवासी विमान कंदाहारला पळवून नेणारा शूर व सशक्त आणि त्यांच्या मागणीला भिक घालून चार अतिरेकी सोडवणारे वाजपेयी सरकार अशक्त असले पाहिजे. पण त्यावेळी कुबेर पंतप्रधान असते, तर त्यांनी कुठल्या सशक्तपणाची कृती केली असती? कंदाहारवर हल्ला चढवून ओलिसांना ठार मरायला सोडून द्यायला हवे होते काय? अग्रलेख लिहीण्याइतके असे निर्णय घेणे सोपे असते, अशी या संपादकाची समजूत आहे काय? अन्य कुणाच्या मुखपत्रातली भाषा बालीश कशी याची टिकाटिप्पणी करताना आपण किती बालीश युक्तीवाद करतोय, याचे भान कुबेरांनी ठेवले आहे काय? सशक्त अशक्त असले शब्द वापरताना त्यांचे नेमके अर्थ तरी कुबेरांना कळतात काय? अकरा बॉम्बस्फ़ोटाचे साहित्य व नियोजन यशस्वीरित्या पार पाडून आपले संपुर्ण कुटुंब सुखरूप दुबईला घेऊन जाणारा याकुब मेमन अशक्त असतो का? आणि त्याच्याही आधी एक दिवस परदेशी फ़रारी झालेला टायगर सशक्त असतो? टायगर सुत्रधार आणि प्रत्यक्ष घातपात अंमलात आणणारा याकुब अशक्त? आणि त्याच्यावर रितसर आरोप ठेवून त्याला बचावाची संपुर्ण संधी देवून दोषी ठरवणारे सरकार व कोर्ट अशक्त. काय आणि कसला हा खुळचटपाणा आहे? बलात्कार करणारा पकडला गेल्यावर अशक्तच असतो पोलिस व सरकारी यंत्रणेसमोर. म्हणून कुबेरांना तोही अशक्ताने आणखी एका अशक्तावर घेतलेला सूड वाटत असेल ना? हा अग्रलेख म्हणजे निव्वळ अशक्त मेंदूचा चमत्कार आहे. (अपुर्ण)

1 comment:

  1. Yes.. that's true.. Kuber he shahane asavet pn te ati-shahane aahet he te swarach asha lekhantun sidhha karat asatat... aapan pravaha pexa vegle aahot he dakhavnyasathi te ase lihit asavet va tyasathi vattel te tark odhun-tanun jodat asavet.. shabd-chhal dusare kay..

    ReplyDelete