Wednesday, August 26, 2015

अंनिस ठाऊक नसलेला खरा दाभोळकर



एखाद्या अडाण्याला वा अशिक्षिताला जे समजावणे शक्य व सोपे असते, तितके बुद्धीमान असल्याच्या भ्रमात वावरणार्‍यांना समजावणे अशक्य असते. कारण अशी माणसे आपल्या अज्ञान वा निर्बुद्धतेलाच कुशाग्र बुद्धी समजून जगत असतात. मग त्यातून त्यांची ठाम मते व पुर्वाग्रह इतके पक्के झालेले असतात, की त्यांना साधा व्यवहारही उमजत नाही. उदाहरणार्थ पोलिस कुठल्याही गुन्ह्याचा शोध लावून गुन्हेगाराला तपासण्याला बांधील असतात. किंबहूना त्यासाठीच पोलिस खात्याची निर्मिती झाली आहे. पण म्हणून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे वा जे अन्यायग्रस्त व्यक्तीचे निकटवर्तिय आहेत, त्यांची काहीच जबाबदारी नसते काय? त्यांनी आपल्या परीने गुन्ह्याचा शोध घ्यायचाच नाही, असा काही नियम वा संकेत आहे काय? मग अशा पिडीताच्या आप्तस्वकीयांचे काम काय असते? पोलिसांच्या नावाने बोटे मोडत फ़िरणे व सरकारच्या नावाने शंख करण्याला त्यांचे कर्तव्य मानले जाते काय? तसे असेल तर कोणी आजारी असेल वा अपघातात सापडला असेल तर त्याच्यावर उपचार करणे हे डॉक्टरचे कर्तव्य आहे आणि तो पेशाच मुळात रुग्णाची वा जखमीच्या उपचारासाठी उदयास आलेला आहे. अशा वेळी अन्य कोणी काहीच करायचे नसते का? म्हणजे अपघात होतो तिथे जखमीच्या वेदना यातना बघत बसायच्या आणि पोलिसांच्या नावाने शंख करायचा एवढेच काम बाकीच्या समाजाने करायचे असते काय? सामाजिक कर्तव्य कशाला म्हणतात? असे कुठे काही घडले मग पोलिस वा डॉक्टरची प्रतिक्षा न करता धावत मदतीला जाणारे सर्वात नालायक नागरिक असेच म्हणायला हवे ना? दाभोळकर पानसरे यांच्या हत्याकांडानंतर त्यांच्या अनुयायांनी मांडलेल्या नाकर्त्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह लावल्यानंतर मिळालेल्या प्रतिक्रिया फ़क्त अविवेकी निर्बुद्धतेचीच साक्ष देणार्‍या आहेत.

खुन वा गुन्ह्याचा शोध घेण्यासाठी आप्तस्वकीयांनी वा निकटवर्तियांनी प्रयत्न करणे, अशा अनुयायांना गैरलागू वाटते. याचा अर्थ काय लावायचा? उद्या त्यांच्या घरात वा शेजारी कुठे आगीचा भडका उडाला, तर हे लोक काय करतील? आग विझवण्याचे काम अग्नीशमन दलाचे आहे आणि त्यासाठीच त्याची नेमणूक झालेली असल्याने असे दाभोळकर-पानसरे अनुयायी नक्कीच अग्नीशमन दलाची प्रतिक्षा करत शांत बसून रहातील. मग आगीने त्यांची राखरांगोळी केली तरी बेहत्तर. कारण अग्नीशमन हे त्यांचे कामच नाही ना? ज्याचे काम आहे त्याने करावे. आपण जळून राखरांगोळी होणार असलो तरी काय फ़रक पडतो ना? याला म्हणतात बुद्दीचे अजीर्ण. यापैकी कोणी दाभोळकर वा पानसरे यांच्या हत्येच्या प्रसंगी तिथे हजर नव्हते, पण असते तरी काडीचा फ़रक पडला नसता. कारण त्याने बळी पडणार्‍याला वाचवण्याचा कुठला प्रयत्न नक्कीच केला नसता. कारण त्यांच्या लेखी अशा खुनात वा हिंसेत हस्तक्षेप करण्याचे काम पोलिसाचे असते. ते पोलिसानेच करायला हवे. आणि त्यात पोलिस नाकर्ते ठरले आणि परिणामी दाभोळकर यांची हत्या झाली तरी बेहत्तर. आपण उद्या पोलिसांना जबाबदार धरू, त्यांचा निषेध करू. बाकी आपण काहीही करण्याची गरज नाही. सरकारच्या व अन्य प्रशासन यंत्रणेच्या नावाने शंख करणे वा कुणाच्या तरी डोक्यावर खपर फ़ोडणे इतकेच बुद्धीमंत, विवेकवादी म्हणून आपले कर्तव्य आहे. आज जे कोणी पोलिसांच्या नावे शंख करीत आहेत आणि ‘आम्ही सारे’ नावाचे नाटक करीत आहेत, त्यातले एकदोघे जरी दाभोळकर पानसरे यांच्या समवेत त्या प्रसंगी असते, तर त्यांनी हल्लेखोरांना रोखायचा वा पकडण्याचा अजिबात प्रयास केला नसता, हे नक्की. यालाच ‘मध्यमवर्गिय शहाणपणा’ म्हणतात. जो चेंबूरच्या नासिरूद्दीन मन्सुरीपाशी नसतो आणि ‘आम्ही सारे’चा प्रयोग रंगवणार्‍यात ठासून भरलेला असतो.

दाभोळकर पानसरे यांचे मारेकरी व गुन्हेगार शोधून काढणे पोलिसांचे काम आहे, तसेच त्यांची हत्या होऊ नये हे देखील सरकारचेच कर्तव्य होते व आहे. पण प्रत्येक क्षणी प्रत्येक जागी सरकार हजर असू शकत नाही. जसे चेंबूरच्या त्या दुकानात पोलिस वा सरकार हजर नव्हते, पण नासिरूद्दीन मन्सुरी मात्र हजर होता. दुकानदाराला कोणी गुंड धमकावत आला आणि त्याने थेट तलवारीने हल्ला केला. अशावेळी तिथे ‘मध्यवर्गिय शहाणपणा’ अंगात मुरलेले विवेकवादी तिथे असते, तर त्यांनी पिडीत दुकनदाराला वाचवायला हस्तक्षेप करण्यापेक्षा आपला जीव वाचवायला पळ काढला असता किंवा दडी मारली असती. त्यात दुकानदार मारला गेल्यावर मात्र कॅमेरासमोर येऊन सरकारच्या नाकर्तेपणा व पोलिसांचा हलगर्जीपणावर व्याख्यान दिले असते. पण बिचारा नासिरुद्दीन मन्सुरी तितका बुद्धीमंत वा विवेकवादी नव्हता. म्हणूनच त्याने धाडस करून मारेकर्‍यावर चाल केली आणि त्याच्या हातातल्या धारदार तलवारीलाच रोखले. त्यासाठी आपला जीव धोक्यात घातला. कोण कुठला एक दुकानदार त्याला वाचवण्यासाठी पोलिस यंत्रणा ‘सज्ज’ असताना मन्सुरीने केला त्याला आगावूपणा म्हणायचे की दिशाभूल म्हणायचे? की हा मन्सुरी पोलिसांच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालत होता? ‘आम्ही सारे’ नाटकाचे तत्वज्ञान व युक्तीवाद मान्य करायचा तर नासिरुद्दीन मन्सुरीने जे काही केले तो आगावूपणा ठरतो. कारण ते पोलिसांचे काम होते. जसे दाभोळकर पानसरे यांच्या हत्येनंतर त्यांचे मारेकरी शोधून काढणे हे पोलिसांचे काम आहे आणि त्यात कुठलीही मदत वा प्रयत्न करणे बाकीच्यांचे काम नाही. नागरिकाचे कर्तव्य पोलिसांच्या नावाने शिमगा करणे आणि गुन्हा घडत असताना नुसता तमाशा बघणे, याला विवेकवाद म्हणत असावेत. सामान्य माणसाच्या बाबतीत त्याला माणुसकी म्हणतात. जी नासिरुद्दीन मन्सुरी करू शकला.

याचे कारणही समजून घ्यावे लागेल. कोण हा नासिरुद्दीन मन्सुरी? त्याने कधी पानसरे वा दाभोळकरांचे नावही ऐकलेले नसेल. पण तो वागला मात्र अस्सल पानसरे दाभोळकरी शैलीत. अंधश्रद्धा वा तत्सम गोष्टीत ज्यांचे शोषण होते त्यातले किती बळी न्याय मागायला दाभोळकरांकडे आलेले होते? आणि आले असतील तर दाभोळकर यांनी त्यात पडायचे कारणच काय? ते काम फ़सवणूक या सदराखाली पोलिसांचे होते. गुन्हेगारांना उघडे पाडणे व त्यातली फ़सवणूक कोर्टात सिद्ध करणे याच्याशी दाभोळकरांचा काय संबंध होता? पण त्यांनी त्यात नाक खुपसले. कारण माणुसकीने विवेकाने त्यांना शांत बसू दिले नाही. पोलिसांचे काम म्हणून पळ काढून नुसतेच पोलिसांच्या नावाने गळा काढण्याला दाभोळकर शैली म्हणत नाहीत. तर अन्याय शोषणाचा बोभाटा करून त्याचे साक्षीपुरावे समोर आणून पोलिसांना कारवाईला भाग पाडण्याला दाभोळकर म्हणतात. हे नासिरुद्दीन मन्सुरीला दाभोळकर न भेटताच उमजले व त्याने योग्य क्षणी तशी कृती करून दाखवली. पण ‘आम्ही सारे दाभोळकर’ असे फ़लक झळकवणार्‍यांना अजून दाभोळकर म्हणजे काय त्याचा आशय विषय देखील उमजलेला नाही. याला खरी अंधश्रद्धा म्हणतात. ज्यात आशयाचा बळी देवून नुसत्या प्रतिकांचे उदात्तीकरण व थोतांड निर्माण केले जाते. न्यायासाठी हस्तक्षेप करण्याचा धोका पत्करण्याला जे तयार असतात, त्यांना दाभोळकर माहिती असण्याची गरज नसते, की ‘आम्ही सारे’ म्हणून मिरवण्याची गरज नसते. पण जे निव्वळ पाखंडवादी असतात त्यांना मात्र अशी नाटके देखावे करावे लागतात. ज्यांना दाभोळकर पानसरे यांचे मारेकरी शोधण्यासाठी आपले कर्तव्यच नाही असे वाटते, त्यांना सामान्य समाजातील अन्यायासाठी काही करण्याची इच्छा तरी कशी असेल? सगळा निव्वळ ‘मध्यमवर्गिय साळसूद शहाणपणा’ असतो आणि कसोटीच्या प्रसंगी तो षंढपणात परावर्तित होऊन खुद्द पानसरे व दाभोळकरांनाही वाचवू शकत नसतो. त्याचे विवेचन सत्यघटनेच्या संदर्भानेच पुढल्या लेखात करू.

4 comments:

  1. आपल्या तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट या न्यायाने माझी ती श्रद्धा इतरांची ती अंधश्रद्धा! माझी श्रद्धा ही समाजाला हानिकारक नाही म्हणून ती अंधश्रद्धा ठरत नाही. श्रद्धा ही आत्मिक बळ देते. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. या पद्धतीची मांडणीही समाजात होताना दिसते.
    परंतु तसे पाहिले तर श्रद्धा ही मुळातच अंध असते. त्या मुळे अंधश्रद्धा म्हणजे पिवळा पितांबर म्हटल्या सारखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. तसेच चिकित्सेशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचे नाकारणे ही पण एक श्रद्धाच! विश्वास हा पुराव्यावर आधारलेला असतो. त्यामुळे त्याची चिकित्सा होउ शकते. श्रद्धेची चिकित्सा होत नाही. उधृत अस्मादिकांचे ’यंदा कर्तव्य आहे?’ मनोगत
    अंधश्रद्धा निर्मूलन समिती मधे अंधश्रद्धांची कीव करता कामा नये. त्या ऐवजी त्यांना समजून घेतले पाहिजे. आपला लढा अंधश्रद्धाविरोधी आहे अंधश्रद्ध व्यक्तिविरोधी नाही. अशी शिकवण असते.ज्या समाजात आपल्याला वावरायचे आहे त्यांचे प्रबोधन करताना त्यांना तुम्ही आपले वाटला पाहिजेत.तर ते तुमचे ऐकतील अशी भुमिका त्यामागे असते. दाभोलकर हे कार्यकर्त्यांसमोर सातत्याने मांडायचे. प्रत्यक्षात कार्यकर्ते तसे वागतातच असे नाही हा भाग आहेच.
    बरेच तर्ककर्कश विवेकवादी ज्यांचा पिंड साधारण अ‍ॅकॅडमिस्ट स्वरुपाचा असतो ते लोक समाजात मिसळून काम करणार्‍या अ‍ॅक्टिव्हिस्ट लोकांपासून स्वतःला वेगळे वा उच्च समजतात. त्यांना समाजातले इतर लोक वा हे अ‍ॅक्टीव्हिस्ट हस्तिदंती मनोर्‍यातील विद्वान असे संबोधतात.हे विद्वान समाजापासून फटकून राहतात. आपल्या पेक्षा वेगळा विचार करणारे लोक हे सगळे अंधश्रद्ध अर्थात कीव करण्याच्या लायकीचे अशी त्यांची समजूत असते. कोणाही माणसाला आपली कीव केलेली सहसा आवडत नाही. त्यामधे त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मग ते लोक ही असाल तुम्ही शहाणे. तुमची विद्वत्ता तुमच्यापाशी अशी भुमिका घेताना दिसतात. हे विद्वान लोक आयुष्याच्या उत्तरार्धात एकटे पडत जातात अथवा स्वतःला बदलतात असे दिसून येते.
    दाभोलकरांच्या या भुमिकेमुळे चळवळीला सहानुभुतीदार वर्ग मोठ्या प्रमाणात निर्माण झाला.अंनिसच्या या भुमिकेला काही बुद्धीदांडगे नास्तिक तुम्ही लेचीपेची भुमिका घेता असे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे म्हणायचे. लागूंना काही चळवळ चालवायची नव्हती त्यामुळे ते परमेश्वराला रिटायर करा सारखी भुमिका घेउ शकत होते. दाभोलकरांना समाजाला बरोबर घेउन चळवळ चालवायची असल्याने काही समन्वयात्मक तडजोड घेणे हे कमी पणाचे वाटत नव्हते. किंबहुना अशी भुमिका घेतली नाही तर समाज आपल्या बरोबर येणार नाही हे त्यांना माहित होते.काही लोक असेही म्हणतात कि दाभोलकर-लागू वादसंवाद हे प्रकरण तु मारल्यासारखे कर मी लागल्यासारखे करतो असे काहीसे होते. समजा हे नौटंकी जरी मानले तरी त्यातून प्रबोधक व प्रबोधन घडत होते हे नाकारता येणार नाही
    (माझ्या अन्यत्र लिखाणावरुन कॊपी पेस्ट केले आहे) तूर्तास इतकेच.

    ReplyDelete
  2. खुनाचा तपास करणे हे पोलिसांचे काम आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य करणे हे काम हमीद व मुक्ता तसेच अंनिसच्या अन्य पदाधिकार्‍यांनी केलेले आहे. विवेकी चळवळीत काम करणार्‍या लोकांनी शौर्य दाखवून तपासही डेटिक्टिव बनून करावा हे अजब लॊजिक वाटते. विवेकी मर्यादेत राहून शक्य ते काम करत राहावे ही भूमिका अवहेलनेस पात्र कशी काय? हे ही समजले नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. इथे हमीद आणि मुक्ता डिटेक्टीव सारखे वागतच होते. दाभोलकर हत्येनंतर सरळ सरळ सनातन संस्था व तिच्याशी संबंधित लोकांवर आरोप करून , तेच गुन्हेगार असल्याचा शोध लावणाऱ्याला डिटेक्टीवच म्हंटले पाहिजे. दुसरे काय म्हणणार ???? आणि मुर्खासारखे आरोप करून पोलिसांना त्यांचे कामही नीट करू दिले नाही. पानसरे हत्येनंतर ही तसलेच आरोप झाले. डोंबलाचा विवेक, बिनहिशोबी पैसा , त्याचे व्यवहार यातून हत्या होतात. आणि त्यांचा आधार घेवून हे नास्तिक लोक हिंदुत्ववादी संघटनांच्या मागे पोलिसी त्रास लावतात.

      Delete
    2. I agree with your logic but ANIS and its supporters shouldnt have blamed it onto Sanatan straight away. That was a media trial. The ones who want to take higher moral ground cannot start blame game. After this proves that they are humans and are fallible. So why this fuss?

      Delete