Sunday, August 30, 2015

आपण गुन्हेगारांना असे अभय देतो?
बळी पडलेल्याचे आप्तस्वकीय गुन्हेगाराला कसे अनवधानाने वा अतिशहाणपणा करून महत्वाची मदत करतात, त्याला हातभार लावतात, त्याचा सज्जड पुरावाच शिना बोराचा प्रियकर राहुल मुखर्जी याने सादर केला आहे. याक्षणी जी माहिती समोर आली आहे, त्यानुसार इंद्राणी मुखर्जी हिने आपला गुन्हा जवळपास कबुल केला आहे. तिचा दुसरा पती खन्ना यानेही त्यात आपला सहभाग असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळेच शिनाचा भाऊ मिखाईल बोरा व प्रियकर राहुल मुखर्जी यांच्यावर खुनाचा आरोप कोणी करू शकणार नाही. पण शिनाची हत्या झाल्याचे रहस्य सव्वा तीन वर्षे उलगडले नाही, त्याला हेच दोघे सर्वाधिक जबाबदार आहेत हे मात्र नाकारता येणार नाही. कारण इंद्राणीने जे खोटेपणाचे जाळे विणले होते, त्याला याच दोघांचे मौन किंवा लपवाछपवी मोठा हातभार लावून गेली आहे. मात्र इतकी वर्षे पोलिस काय करीत होते, असा सवाल विचारला जातो. कारण ‘आम्ही सारे’ तत्वानुसार कुठलाही गुन्हा घडला तर त्याचा शोध पोलिसांनी घ्यायचा असतो आणि त्यात बाकी कुणाचीच काही जबाबदारी नसते. शक्य ती व आवश्यक मदत मोकळेपणाने तपासकामात पोलिसांना देणे, हे सामान्य नागरिकाच कर्तव्य असते आणि त्यापैकी कुठली माहिती निर्णायक ठरते वा नाही, याची अक्कल त्या नागरिकांनी वा आप्तस्वकीयांनी वापरण्याचे कारण नसते. अतिशय किरकोळ वाटतील अशा गोष्टी तपासात किती निर्णायक असतात, त्याचा दाखलाच शिना बोरा तपासाने समोर आणला आहे. कुठल्याही कायदेभिरू नागरिकासाठी हा तपास उत्तम पाठ ठरावा, असे हे प्रकरण आहे. म्हणूनच किळसवाणे असले तरी त्याचा उहापोह आवश्यक आहे. जी माहिती आता बाहेर आली आहे, त्यात मिखाईल व राहुल यांचा हलगर्जीपणा कसा इंद्राणीच्या गुन्ह्यावर दिर्घकाळ पडदा टाकू शकला, त्याचा खुलासा यातून होतो.

यातील शिनाचा भाऊ मिखाईल म्हणतो, की त्याच वेळी इंद्राणीने आपल्याला ठार मारले असते. पण संशय आल्याने आपण निसटलो. आईने आपल्याला वरळी येथील घरी आणुन ठेवले होते आणि दुसर्‍या पतीच्या मदतीने गुंगीचा पदार्थ पाजला होता. म्हणून तो काही तास गुंगीत होता. त्याच दरम्यान खन्ना व इंद्राणी शिनाला आणायला गेलेले होते. शुद्ध आली तेव्हा जीवाच्या भयाने आपण पळ काढला व आसामला निघून गेलो, असे मिखाईलने पोलिसांना सांगितल्याचे प्रसिद्ध झाले आहे. किंबहूना तेव्हाच शिनाला मारण्यात आल्याची त्याची शंका त्याने कुणालाही बोलून दाखवली नाही. कशासाठी तो गप्प राहिला? तीन वर्षे गेल्यावर आता मिखाईल हे बोलतो आहे. निदान शिनाचा प्रियकर राहुल याला तरी मिखाईलने ही माहिती वा शंका कथन करण्यात कुठली अडचण होती? कारण शिनाचा शोध घेण्याचा प्रयास राहुल मुखर्जी करीत होता. शिना बेपत्ता झाल्यावर अल्पावधीतच राहुलने खार पोलिस ठाण्यात त्याची तक्रार दिली होती. पण खरेच शिना बेपत्ता असल्याचे पोलिसांना पटावे, असा कुठलाही पुरावा राहुल देवू शकला नव्हता. म्हणूनच मग पोलिसांनी त्याबाबतीत हलगर्जीपणा केला. पण त्याला मुळात मिखाईल जबाबदार ठरत नाही काय? त्याने २४ एप्रिलचा आपला अनुभव व शंका राहुलला सांगितली, असती तरी राहुलने ती पोलिसांना सांगून तक्रारीचा पाठपुरावा करायला भाग पाडले असते. पण मिखाईल गप्प राहिला आणि राहुल एकटा पडला. मात्र राहुलने प्रयास सोडलेले नव्हते. कारण खार पोलिस ठाण्यात दाद लागत नाही, म्हणून त्याने इंद्राणीचे निवासस्थान असलेल्या वरळी पोलिस ठाण्यातही शिनाच्या बेपत्ता होण्याची तक्रार तेव्हाच केली होती. पण त्याचाही उपयोग झाला नाही. कारण वरळी पोलिसांना थातूरमातूर उत्तर देवून इंद्राणी प्रकरण दाबू शकली. हे मिखाईलचे पापच नाही काय?पण प्रश्न तिथे संपत नाही, की राहुलचे वागणे जबाबदार ठरत नाही. वरळी पोलिसांनी इंद्राणीच्या घरी जाऊन चौकशी केली, तेव्हा तिने शिना अमेरिकेला उच्चशिक्षण घ्यायला गेल्याचे सांगून तपासावर बोळा फ़िरवला होता. त्यावर पोलिसांनी कुठल्याही पुराव्याशिवाय शंका घेण्याचे कारण उरत नव्हते. आणि त्या चौकशीनंतर पोलिसांनी राहुलला तेच उत्तर देवून विषय संपवला होता. मग शिनाने नाते संपवल्याचे राहुलला संदेशही पाठवले आणि त्यानेही शिना अमेरिकेला गेल्याचे गृहीत धरले. शिनाचा शोध घ्यायची त्याची इच्छा मरून गेली. इथपर्यंत गोष्ट ठिक आहे. पण नंतर काही दिवसांनी त्याच्या रहात्या फ़्लॅटमध्ये त्याला शिनाचा पासपोर्ट मिळाला. त्याचा अर्थ शिना कुठेही परदेशी गेलेली नाही, याचा तो सज्जड पुरावाच होता. त्याचाच आणखी एक अर्थ असा होता, की घरी चौकशीला आलेल्या वरळी पोलिसांना इंद्राणीने दिलेले उत्तर चक्क खोटारडेपणा होता. हे वरळी पोलिसांना कसे कळणार? त्यांना पासपोर्ट दाखवून राहुलने सांगितले तर कळणार ना? पण शिनाला आपल्याशी संबंध तोडायचे आहेत असे एक गृहीत धरून राहुल गप्प बसला आणि बेपत्ता शिना बोरा हे प्रकरण धुळ खात पडले. मिखाईलचे मौन आणि राहुलचे गृहीत ह्या दोन गोष्टी त्यांच्यासाठी किरकोळ असतील. पण चौकशी व पोलिस तपासात त्यांना निर्णायक महत्व होते. कारण बेपत्ता शिनाच्या बाबतीत इंद्राणीने चालवलेला खोटारडेपणा त्यातून सिद्ध होऊ शकत होता. पासपोर्ट हाती असता तर शिना कुठल्या मार्गाने परदेशी वा अमेरिकेत शिकायला गेली, असा बिनतोड सवाल वरळी पोलिस पुन्हा जाऊन इंद्राणीला विचारू शकले असते आणि मग तिची बोबडी वळली असती. तिला शिनाचा ठावठिकाणा पोलिसांना द्यावा लागला असता किंवा गुन्हा कबुल करावा लागला असता. यापैकी काहीच झाले नाही, कारण मिखाईल व राहुल या दोघांनी पोलिसांना संपुर्ण माहिती देण्याची टाळाटाळ केली.

शिनाचा खुन झाला आणि तिच्या आईने अन्य कुणाच्या मदतीने खुन केला, हे निष्पन्न झाल्यावर आता जी माहिती आज अनेकजण पोलिसांना देत आहेत वा समोर आणत आहेत; त्यापैकी कोणी जरी हे काम तीन वर्षापुर्वी केले असते, तर शिनाच्या खुनाला वाचा फ़ुटायला इतका अवधी लागला नसता. सावध नागरिक म्हणून जे कर्तव्य असते त्यात कसूर करणार्‍यांनी पोलिसांवर दोषारोप करण्यात कुठला पुरूषार्थ? १) शिनाने आपल्या नोकरीचा तडकाफ़डकी व्यक्तीगत येऊन न दिलेला वा अन्य कुणामार्फ़त पाठवलेला राजिनामा, एक मोठी मान्यवर कंपनी निमूट स्विकारते. त्याविषयी कुठला चौकसपणा दाखवित नाही. २) रहात्या जागेचा भाडेकरार तसाच अन्य कुणामार्फ़त इमेल पाठवून शिना रद्द करते आणि तो घरमालक त्याविषयी काही चौकसपणा दाखवत नाही. ३) आपल्या जीवावर बेतलेले गुंगीचे पेय व त्यातून निसटल्याची भयकथा मिखाईल इतकी वर्षे गिळून गप्प बसतो. ४) शिनाचा पासपोर्ट हाती लागलेला असतानाही राहुल त्याबद्दल पोलिसांकडे जाऊन इंद्राणीला खोटारडी ठरवण्याविषयी उदास कशाला रहातो? यापैकी कोणाचीच गुन्ह्याच्या तपासासाठी काहीच जबाबदारी नाही काय? जाणिवपुर्वक, भयापोटी वा निव्वळ अनवधानाने हे लोक गप्प बसले असतील, तरीही व्यवहारात त्यांनीच इंद्राणीला एक भयंकर खुन पचवायला हातभार लावलेला नाही काय? अनेक गुन्ह्यात वा दाभोळकर पानसरे खुनाच्या बाबतीत असे दुवे नक्की असू शकतात, जे अजून पोलिसांना देण्यात हयगय झालेली असू शकते. याही प्रकरणात श्याम राय हा ड्रायव्हर भलत्याच प्रकरणात पकडला गेला आणि शिनाच्या हत्येविषयी बोलून गेला. त्यातून तपास सुरू झाला म्हणून खरे निर्णायक पुरावे समोर येत आहेत. पण तेच पोलिसांना आधी देण्यात हयगय झाली नसती, तर इंद्राणी एव्हाना शिक्षेच्या प्रतिक्षेत तरी दिसली असती. दोष पोलिसांच्या माथी मारण्याची फ़ॅशन अनेक गुन्हेगारांना कसे अभय देत असते, त्याचा हा नमूना आहे. म्हणूनच नवा तपशील येईल तसे त्याचे विवेचन करणे भाग आहे. त्यातून जबाबदार नागरिक घडवण्याच्या कामाला हातभार लागत असतो.

No comments:

Post a Comment