Tuesday, September 1, 2015

कॉम्रेड गोविंद पानसरे समजून घेताना

                           File Photo of Former Vice-Chancellor of Hampi University, M M Kalburgi who was shot dead at his Kalyan Nagar residence by unidentified gunmen, in Dharwad on Sunday. Credit: PTI

‘आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’ - कॉ. गोविंद पानसरे

आपण जेव्हा कुठल्याही इंटरनेट साईटवर जातो तेव्हा तिथे असलेली माहिती आपण बघत असतो. आपलाच संगणक ती माहिती दाखवत असला तरी ती माहिती आपल्या संगणकात साठवलेली वा आपलीच नसते. दिसतो तो निव्वळ आभास असतो. सदरहू माहिती दूर कुठल्या तरी वेगळ्या सर्व्हर संगणकावर असते आणि इंटरनेट जोडणीमुळे आपल्या संगणकावर आभास म्हणून दिसत असते. जोडणी तुटली वा निकामी झाली, मग तो आभास क्षणात बेपत्ता होतो. अशा जोडण्यांनी जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात जोडलेला मोठ्या अद्ययावत संगणकात साठवलेली माहिती, चित्रे वा चित्रणे आपण घरबसल्या बघू शकत असतो. टॅब वा स्मार्ट फ़ोनवरही आपल्याला हे सर्व दिसू शकते. त्यालाच नेटवर्क म्हणतात. जिथे आपल्या हातातला फ़ोन वा समोरचा संगणक त्या अन्य कुठल्या संगणकाचा दुय्यम सहाय्यक असल्यासारखा राबत असतो. काय दिसावे किंवा काय असावे याबाबत आपल्या हातातल्या यंत्राला कुठले स्थान नसते की अधिकार नसतो. पण जे काही समोर दिसते तो आपला ब्लॉग वा फ़ेसबुकची ‘आपली भिंत’ म्हणून आपण किती मालकी हक्काच्या थाटात बोलत असतो? आपली भिंत म्हणायला समोर असतेच काय? नुसता आभास! इतर कुणाच्या मालकीच्या यंत्रणेने उभा केलेला व त्याच्याच इच्छेनुसार वेळोवेळी त्यात होणार्‍या बदलासह तो निव्वळ आभास असतो. तरी आपण मात्र याला ब्लॉक केले वा त्याची रिक्वेस्ट नाकारली, असे किती आढ्यतेने बोलतो ना? त्यातला अभिनिवेश कसा असतो? आपण आपले राजे वा ती भिंत, ती साईट आपले साम्राज्य असल्याचा आभास आपण जगत असतो. त्या खोटेपणाच्या आपण किती आहारी गेलोय, त्याचा अंदाज यावा म्हणून हे सांगितले. ज्यात आपल्याला कुठलाही खराखुरा निर्णय सुद्धा घ्यायची मोकळीक नसते. त्या समोरच्या संगणक वा स्मार्ट फ़ोनपेक्षा आपण तरी किती स्वतंत्र असतो बुद्धीने?

नेटवर्क ही अशी बाब आहे जिथे तुम्हाला आपले स्वातंत्र्य गहाण ठेवावेच लागते अन्यथा तिथे तुम्हाला प्रवेशच मिळू शकणार नाही. यातली आपली गुलामी वा अगतिक अवस्था समजून घेतली, तर कॉम्रेड गोविंद पानसरे काय शिकवतात, ते लक्षात येऊ शकेल. ‘आपल्याच धडावर आपलेच डोके’ असे पानसरे म्हणतात. पण आपली साईट वा आपलीच भिंत असे म्हणताना आपला संगणक तरी तितका स्वतंत्र असतो काय? तो नुसता आज्ञांचा वाहक व ताबेदार असतो. त्याला नेटवर्कमध्ये कुठले स्वातंत्र्य नसते की त्याचा मालक असलेल्या आपल्याला त्यातले कुठले निर्णय घेता येत नाहीत. समविचारी म्हणून एकदा कुठल्याही गटात, पक्षात वा संघटना गोटात दाखल झाले, मग वेगळी अवस्था नसते. तिथे जे नेटवर्क हाताळणारे ‘मेंदू’ सर्व्हर म्हणून काम करत असतात, त्यांच्या आज्ञेनुसारच तुमचा मेंदू चालू शकत असतो. तुमच्या मेंदूला स्वतंत्र विचार करायची मुभा उरत नाही. तर विवेकाची गोष्ट दूर राहिली. कुठलीही घटना घडली वा माहिती समोर आली, तर विविध गटात वा गोटात विभागलेले लोक म्हणूनच सारखेच व्यक्त होतात. त्यांच्यात एकप्रकारचे साम्य साधर्म्य आढळून येते. लक्ष्मणानंद यांची निर्घृण हत्या हा विषय इथे मी मांडला म्हटल्यावर विनाविलंब त्यात हिंदूत्वाविषयी आत्मियता असलेल्यांना जवळीक वाटली आणि ती सेक्युलरांना चपराक वाटली. तर त्याच्या नेमके उलट सेक्युलर पुरोगाम्यांना त्यातला कट्टर हिंदूत्ववाद दिसला. पण जी पोस्ट आहे, त्यात माध्यमांनी व बुद्धीमंतांनी लोकांसमोर विषय मांडताना केलेला भेदभाव बघायची इच्छा कोणालाच झाली नाही. कारण बहुतेकांचे मेंदू कुठल्या तरी नेटवर्कशी जोडून घेतले गेले आहेत. मग तटस्थपणे कलबुर्गी, पानसरे वा लक्ष्मणानंद यांच्या हत्येकडे माणूस म्हणून बघताच येत नाही. तर आपापल्या नेटवर्क व सॉफ़्टवेअरने जो अर्थ लावून दिला आहे, त्यानुसारच बघावे लागते.

याचा साधासरळ अर्थ आपण मेंदू न वापरताच जे काही परस्पर कोणी आपल्यावर लादतो, त्याला आपण आपला विचार वा विवेकी भूमिका मानलेले आहे. त्यामधली सत्यासत्यता तपासण्याची आपली उपजत इच्छाच मरून गेलेली आहे. कलबुर्गींच्या हत्येसाठी क्षणार्धात हिंदूत्ववाद्यांना दोषी धरणे, ही तशा नेटवर्कची सक्ती असते. त्या सॉफ़्टवेअरने तुमच्या पुढे अन्य पर्याय ठेवलेला नसतो. असे झाले मग दुसरी बाजूही तितकीच आवेशात प्रतिवाद करायला उतरते. ही दुसरी बाजू पुरावा मागू लागते. यापैकी कुणाला एक माणुस हकनाक मारला गेलाय, याची तसूभर फ़िकीर वा वेदना दिसुन येत नाही. मारला गेलाय तो एक माणूस होता आणि त्यालाही वेदना संवेदना होत्या, याविषयी आपण किती बधीर झालोत, त्याची कृतीशील साक्ष द्यायलाच आपण हिरीरीने पुढे येतो. त्यातले बुद्धीवाद युक्तीवाद किती भावनाशून्य झालेत, त्याचेही भान कुणाला उरलेले नाही. उधमपूरला ओलिसांनी पकडून दिला, तो नविद नावाचा जिहादी जितक्या निरभ्रपणे हिंदूंना मारायला मजा येते असे म्हणाला, तितकेच आपणही संवेदनाहीन झालेलो नाही काय? काही क्षण वा तासापुर्वी तुमच्या आमच्यासारखा जीवंत असलेला हाडामासाचा माणूस हकनाक मारला गेला याची कुणालाच पर्वा दिसत नाही. आपापले मुद्दे, आक्षेप व आरोप पुढे न्यायला आणखी एक साधन मिळाल्याचा विकृत आनंद आपण किती सहजगत्या उपभोगतो? तेव्हा ‘आपल्या धडावर आपलेच डोके’ म्हणजे स्वतंत्रपणे विचार करू शकणारा विवेकी मेंदु शिल्लक उरलेला असतो काय? पानसरे यांचे विचार म्हणून कंठशोष करणार्‍यांना तरी पानसरे यांचे विचार कोणते, याचे कितीसे भान असते? विरोधात बोलणार्‍यांची अवस्था तरी किती भिन्न आहे? जितक्या सहजपणे इसिसचे कृष्णवस्त्रधारी कुणाचा गळा कापून टाकतात, तितक्या सहजतेने आपण अन्य कुणाच्या भावनांचा मुडदा पाडत नाही काय?

तंत्रज्ञानाच्या आहारी जाताना आपणच आपल्यातली माणुसकी किती बधीर करून बसलोय, त्याचा हा पुरावा नाही काय? मानव प्राण्याला जी उपजत बुद्धी मिळाली आहे, त्यातूनच विचार व बुद्धीवाद उदयास आलेला आहे. माणूस म्हणून ज्या भावनांचा गुंता असतो, त्यातून उलगडणार्‍या नाते व व्यवहार संबंधातून विविध वैचारिक भूमिका विकसित झाल्या आहेत. पण त्याच्या आहारी जाताना आपण त्याचा पाया असलेल्या माणुसपणालाच पारखे होत चाललो आहोत. ज्या बुद्धीचा माज व मस्ती आपल्याला चढलेली आहे, तिचाच वापर करायचेही भान आपल्याला उरले नाही आणि पर्यायाने विवेकाचा त्यात बळी पडला आहे. एकमेकांना पाशवीवृत्तीने शत्रू लेखण्याचा आवेश इतका शिरजोर झाला आहे, की आपण पशूलाही लाजवील इतके पशूवत होत गेलो आहोत. मात्र तोंडाने विवेक व विचाराची पोपटपंची करत असतो. नेटवर्कच्या जमान्यात माणुसपण हरवून बसलो आहोत. कुणाच्या धडावर कुणाचे डोके आहे त्याचाही थांगपत्ता लागत नाही, अशी अवस्था आहे. विचार मारता येत नाही असे बोलतो, पण त्या विचारांसाठी मुक्त-स्वतंत्र बुद्धी असायला हवी त्याचीही आठवण आपल्याला उरलेली नाही. नुसती छोट्या पडद्यावर दिसणारी फ़ेसबुकची भिंत वा कुठली वेबसाईटच आभासी उरलेली नाही. आपले जीवनच आभासी होऊन गेले आहे. त्यातल्या भावना, वेदना, विचार व विवेकही भासमात्र होऊन गेला आहे. दिसायला ‘आपल्या धडावर आपलेच डोके’ नक्की आहे, पण त्यातला मेंदू आपल्याच विचारांनी व विवेकाने चालतो किंवा नाही, याची शंका यावी अशी एकूण सोशल नेटवर्किंगने आपली अवस्था करून टाकली आहे. जे बोलतो, सांगतो ते आपल्याला तरी किती उमगले आहे, याची शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. अशा अवस्थेत अन्य कोणी विचार मारायची गरज कुठे उरते? इतरांचे सोडा, आपणच आपल्या विचारशक्तीचे मारेकरी झालोत.

2 comments:

  1. Kay rao Bhau, pansare samjun ghyala aalo hoto, tumhi kay sanganak server birver laun par dahi kela dokyacha. Nav fakt pansare yancha vichar tech bursatlele sorryy purogami

    ReplyDelete
  2. mala tr asa watat hoto ki mi kuthalya company chya training centre mdhe baslo aahe ka te....

    ReplyDelete