Wednesday, September 16, 2015

आपण बसलोय बाबरीचा मातम करीत



शुक्रवार हा मुस्लिम जगतामधला पवित्र दिवस मानला जातो. अन्य केव्हा शक्य नसले तरी ‘जुम्मे की नमाज’ म्हणजे शुक्रवारची अल्लाहची प्रार्थना महत्वाची मानली जाते. त्यात पुन्हा तुम्ही इस्लामच्या पुण्यभूमीत व पवित्र काबा मशिदीत असाल, तर त्यासारखे पुण्य नाही. अशा सौदी अरेबियात वसलेल्या मक्केच्या प्रमुख मशिदीत गेल्या शुक्रवारी भीषण अपघात होऊन शंभराहून अधिक भाविक मुस्लिमांचा बळी गेला. तिथे जे ऐतिहासिक मशिदीचे नुतनीकरण चालू आहे, त्याचे बांधकाम करणारी क्रेन कोसळून झालेल्या अपघातात या भाविकांचा बळी गेला आहे. ते काम सौदीतील सर्वात मोठा बांधकाम मक्तेदार असलेली बिनलादेन कंपनीच ते काम करीत होती आणि तिच्याच क्रेनखाली सापडून या भाविकांचा बळी गेला आहे. त्याबद्दल शोक प्रकट केल्यावर तिथल्या राजांनी अपघाताची चौकशी करायचे जाहिर केले आहे. ती चौकशी झाल्यावर सत्य लोकांपुढे मांडले जाईल, असेही आश्वासन दिले आहे. शिवाय लौकरच सुरू व्हायच्या हाजयात्रेत अशा अपघातामुळे कुठली बाधा येणार नसल्याची ग्वाही सुद्धा सत्ताधीशांनी दिली आहे. प्रेषित महंमदाच्या काळापासून असलेली ही प्रमुख मशिद मागल्या अनेक वर्षापासून विस्तारत नुतनीकरणाचे काम चालू आहे. अर्थात तिथल्या बहुतेक नव्या व नुतनीकरणाचे काम एकाच कंपनीला मिळते आणि हेही काम त्याच कंपनीकडे आहे. बिनलादेन कंपनी म्हणजे जगप्रसिद्ध जिहादी घातपाती ओसामाच्या कुटुंबाची कंपनी होय. किंबहूना याच कामांमुळे ओसामाच्या हाती अब्जावधी रुपये येऊ शकले. येमेन येथून सौदी अरेबियात विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात स्थलांतरीत झालेल्या ओसामाच्या पित्याने राजघराण्याची मर्जी संपादन करून बांधकाम व्यवसायात प्रवेश केला व त्याला अपुर्व श्रीमंती प्राप्त झाली. त्याचीच कंपनी बिनलादेन कंपनी म्हणून ओळखली जाते.

हाजयात्रेच्या वेळी एकाच वेळी तिथे वीस लाख भाविकांना प्रर्थना करत यावी, यासाठी हे विस्तार कार्य चालू आहे. त्यासाठी आसपासच्या अनेक जुन्या ऐतिहासिक वास्तू जमिनदोस्त करून विस्तार केला जात आहे. त्यासाठी जी अवजड साधने व यंत्रे तिथे उभी केली आहेत, त्यापैकीच एक उंच क्रेन कोसळून हा अपघात झाला. सुदैवाने मुख्य मशिदीच्या भागाला कुठलीही हानी पोहोचलेली नाही. पण अनेकांनी अशा विस्तार कामे व त्यासाठी अवजड यंत्रणा मुख्य मशिदीच्या ऐतिहासिक परिसरात आणण्याविषयी आक्षेप घेतले होते. पण सत्तधीश राजघराण्याने त्यांना धुप घातली नव्हतीअ. असे किरकोळ अपघात तिथे अधूनमधून झालेले आहेत. त्याबद्दल कुठे वाच्यता केली जात नाही. पण दुर्घटनेच्या वेळी तिथे अनेक भाविक होते आणि त्यापैकी अनेकांनी कॅमेराने चित्रण केल्यामुळे बातमीचा गवगवा झाला. अनेकांनी ती चित्रे सोशल माध्यमात प्रसारीत केली. सहाजिकच बातमी बाहेर आली. त्यात अनेक देशातील मुस्लिम भाविकांचा बळी पडला असून, त्यात काही भारतीय मुस्लिमांचाही समावेश आहे. काही भाविकांनी शोक व्यक्त करण्यापेक्षा पवित्र जागी मृत्यू आल्याने तीच अल्लाहची इच्छा असल्याचे मतप्रदर्शन केले. बिनलादेन कंपनीच्या एका अभियंत्यानेही ही अल्लाहचीच इच्छा असल्याचे स्पष्टीकरण दिले. मात्र तरीही चौकशी होणार आहे. कुठल्याही यंत्रणा कितीही सज्ज व निर्दोष असल्या तरी अपघातातून हमखास सुरक्षा देता येत नसते. म्हणूनच यासाठी राज्यकर्ते वा कंपनीला दोष देता येणार नाही. पण मुद्दा त्याही पलिकडला आहे. जगभरच्या मुस्लिमांसाठी मक्केची ही मशिद व एकूण ते शहर पवित्र आहे, त्यात इस्लामचा व प्रेषिताचा इतिहास रुजलेला व पोसलेला आहे. म्हणूनच त्या शहराला व तिथल्या प्रत्येक वास्तुला धार्मिक तितकेच ऐतिहासिक महत्व आहे. त्याची बुज किती राखली जाते आहे?

१९९२ सालाच्या अखेरीस भारतात बाबरी रामजन्मभूमी वाद विकोपाला गेलेला होता. त्यानंतर हिंदूंच्या जमावाने बाबरीचा जुना ढाचा पाडला अशी तक्रार आहे. त्यावरून काहुर माजवण्यात आले. आजही त्याविषयीचा खटला कोर्टात चालू आहे. जणू इस्लामच्या इतिहासातील ही सर्वात महत्वाची मशिद होती, अशीच कथा रंगवून सांगण्याचा प्रयत्न होत असतो. इतकी मोठी व ऐतिहासिक मशिद पाडली गेल्याने भारताचा ऐतिहासिक वारसा कसा पुसला गेला म्हणून ऊर बडवला जातो. पण खरोखरीच बाबरी मशिदीला तितके धार्मिक वा ऐतिहासिक महत्व होते किंवा आहे काय? असेल तर ते मक्केतील अन्य इमारतींपेक्षा ते मोठे आहे काय? नसेल तर बाबरीसाठी रडणारे आता मक्केतील पाडापाडीविषयी मौनव्रत कशाला धारण करून बसले आहेत? कारण मक्केत हा अपघात ज्यामुळे झाला त्या नुतनीकरण व विस्तारकार्यात प्रेषित महंमदाशी संबंधित अनेक इमारती व वास्तु जमिनदोस्त करण्यात आल्या आहेत व केल्या जात आहेत. पण त्याविषयी सार्वत्रिक मौन कशाला? आताही हा अपघात झाल्यावर इर्फ़ान अल अलावी यांनी तीच तक्रार केली आहे. अलावी हे कोणी आलतुफ़ालतू गृहस्थ नाहीत. मक्केतच त्यांनी इस्लामी ऐतिहासिक वारसा फ़ौडेशन स्थापन केले असून तिथल्या पाडापाडीला त्यांचा कडवा विरोध आहे. हाजयात्रा व यात्रेतून मिळणारे उत्पन्न यासाठी प्रेषिताशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक मक्केचा चेहरामोहरा बदलला जातोय, असा त्यांचा आक्षेप आहे. जणू महंमदाशी संबंधित कुठल्याही खाणाखुणा मक्केत राहू नयेत, असाच त्याचा विस्तार व नुतनीकरण चालू आहे, असाही अलावी यांचा आरोप आहे. पण त्यांना विचारतो कोण? धडाक्यात मक्केत नव्या भव्य इमारती उभ्या रहात आहेत आणि त्यात प्रेषिताची ‘ओळख’ ठरणार्‍या वास्तुंचेही नामोनिशाण पुसून टाकले जात आहे.

जर इस्लामची पुण्यभूमी असलेल्या मक्केत प्रेषिताचा स्पर्श झालेल्या वास्तूही नष्ट केल्या जात असतील, तर त्याच्यापुढे अयोध्येतील बाबरीची काय मजाल? बाबरी पाडली म्हणून रडणार्‍यांना बाबराचे प्रेम अधिक आहे, की प्रेषित व इस्लामच्या पुण्यभूमीविषयी आस्था अधिक आहे? बाबरीसाठीचे प्रेम खरे असेल, तर त्यांनी मक्केत चालले आहे त्या ऐतिहासिक व धार्मिक वारश्याच्या नासधुशीबद्दल कल्लोळ कशाला करू नये? दुसरीकडे ज्या पुरोगाम्यांना अयोध्येतील बाबरीच्या ऐतिहासिक वारश्याचा विध्वंस भयानक वाटतो, त्यांचेही इस्लामप्रेम किती दिखावू आहे, त्याची साक्ष मिळते. कारण त्यापैकीही कोणी अलावींच्या सूरात सूर मिसळून मक्केतील प्रेषितकालीन इतिहासाचा विध्वंस थांबवायला कंबर कसताना दिसत नाही. याचा अर्थ कसा लावायचा? बाबरीचे नाव निघाले तरी रडारड सुरू करणारे भारतीय मुस्लिम नेते व पुरोगामी मक्केतील विध्वंसाविषयी मौन असतात. कारण त्यांना धर्माशी कर्तव्य नाही की इतिहासाशी देणेघेणे नाही. त्यांना धर्म वा कुठल्याही बाबतीत राजकारण करायला निमीत्त हवे असते. इर्फ़ान अल अलावी यांची गोष्ट तशी नाही, हा माणूस जितका धर्मनिष्ठ आहे तितकाच तो इतिहासाचाही भक्त आहे. म्हणून ऐतिहासिक मक्केचे मानवी इतिहास म्हणून जतन व्हावे, असा एकाकी संघर्ष करतो आहे. म्हणून तर आता या अपघातानंतर त्याने पुन्हा एकदा मक्केच्या ऐतिहासिक वारश्याचा विषय पुढे आणला आहे. कारण मागल्या काही वर्षात सौदी राजे व सत्ता, मक्केसह मदिनेतील खुद्द प्रेषिताशी संबंधित बहुतांश वास्तु जमिनदोस्त करून मोकळे झाले आहेत आणि निव्वळ यात्रेकरूंच्या सोयीचे नाव सांगून त्यातून मिळणार्‍या उत्पन्नासाठी इस्लामचा इतिहासही पुसून टाकत आहेत. पण त्याबद्दल बोलायचे कोणी? भारतात तर मुस्लिम संघटनांना तिकडे बघायला वेळ नाही आणि त्यांना कोणी त्यात विचारतही नाही. पुरोगाम्यांना तर इस्लाम फ़क्त हिंदूत्ववाद्यांना मारायच्या छडीसारखा वापरायचा असतो.

1 comment:

  1. भाऊ, बाबरीबद्दल गळे काढणार्यांना चोख उत्तर!

    ReplyDelete