Thursday, September 24, 2015

प्रतिमांची आणि प्रतिकांची लढाईNever Interfere With an Enemy While He’s in the Process of Destroying Himself    - Napoleon Bonaparte

ही उक्ती इतिहासात गाजलेला फ़्रेन्च सेनापती नेपोलियन बोनापार्ट याच्या नावाने सांगितली जाते. खरेच तो तसे कधी बोलला किंवा नाही, ते इतिहास संशोधक अभ्यासकच सांगू शकतील. पण त्यामुळे त्या उक्तीमधला बोध बदलत नाही. तुमचा शत्रू आत्महत्येच्या वा आत्मघाताच्या तयारीत असेल, तर त्यात हस्तक्षेप करू नका, असे नेपोलियन कशासाठी म्हणतो? तर तुम्हाला त्याच्या विरोधात जिंकायचे असते. म्हणजे शत्रूला संपवायचे असते आणि तेच काम तो शत्रू स्वत:च करत असेल, तर त्याला तसे करू देणे, तुमच्याच फ़ायद्याचे असते. कारण कसलेली कष्ट न घेता तुम्ही युद्ध जिंकू शकणार असता. हा त्यातला बोध आहे. पण आत्महत्या करणारा तुमचा शत्रू नसेल, तर त्याला रोखणे व त्यापासून परावृत्त करणे गैर नाही. मागल्या दोनतीन वर्षात मी नेमके तेच करण्याचा प्रयत्न केला असता, माझ्यावर भाजपाचा हस्तक वा भाट म्हणून आरोप करण्याची पुरोगामी वा कॉग्रेसी व नेहरूवाद्यांची स्पर्धा लागली होती. आपले होणारे वा होत असलेले नुकसान बघून कोणी आपल्याला सावध करतोय, त्यालाच शत्रू ठरवण्य़ाच्या अशा प्रवृत्तीने आज त्यांच्यावर अतिशय दुर्दैवी प्रसंग ओढवलेला आहे. कारण आपल्याच बेताल व बेभान अतिरेकातून या लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या सत्तेचा व यशाचा मार्ग प्रशस्त करून दिला. आणि इतका दारूण पराभव झाल्यानंतरही त्याची कारणे शोधून चुका सुधारण्यापेक्षा अधिकच मुर्खपणा चालविला आहे. अर्थात त्यामुळे माझे काही बिघडलेले नाही की मोदी भाजपाचे काही नासलेले नाही. उलट प्रतिदिन त्यांचे काम सोपेच होते आहे. तीन वर्षापुर्वी मोदींच्या राजकारणाची सुक्ष्म मिमांसा मी आरंभली होती आणि तेव्हापासून लेखनातून मोदी हा भाजपाला सत्ता मिळवून देणाराच नेता नव्हेतर नेहरू विचारांना संपवणारा आक्रमक सत्ताधीश असेल, असा इशारा मी दिलेला होता.

अशावेळी समोरचा इशारा नावडता असला तरी त्याचा विचार करण्यात काही गैर नसते. कारण नजरचुकीने एखादा धोका आपण पत्करत असलो, तर त्यातून सावरून घेण्याची ती अपुर्व संधी असते. भाजपाच्या दिल्लीतील मरगळलेल्या नेतृत्वाकडून आपल्याला आव्हान शिल्लक उरलेले नाही, याची सोनियांना इतकी खात्री होती, की त्यांनी नेमक्या त्याच कालखंडात पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार राहुल गांधींकडे सोपवले. त्यात गैर काही नव्हते. कारण माध्यमातल्या सेक्युलर नेहरूवाद्यांपासून थेट पुरोगामी राजकारणात कोणालाही मोदी नावाचे आव्हान समोर येण्याची अपेक्षाही नव्हती. कारण याच शहाण्यांनी गुजरात दंगलीचे अवडंबर माजवून मोदींना पुर्ण बदनाम केले होते. मात्र त्याच अतिरेकी बदनामीतून मोदींना देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवलेही होते. शिवाय मोदीही राज्यातला नेता असून अखिल भारतीय पुरोगामी टिकेला एकहाती तोंड देत होते. त्यामुळे मोदी हा देशव्यापी पर्याय उभा रहात गेला, जो भाजपाने निर्माण केला नव्हता, तर पुरोगाम्यांनी आपल्या मुर्ख अतिरेकातून उभा केला होता. पण खोटा आत्मविश्वास किती घातक असतो? जो मोदी आपणच पर्याय म्हणून उभा करून दिलाय, तोच भाजपाने राष्ट्रीय नेता म्हणून समोर ठेवावा, असे थेट आव्हान तमाम पुरोगामी भाजपाला देत होते. मात्र वैफ़ल्यग्रस्त भाजपा नेतृत्वही त्यासाठी बिचकत होते. अशा वेळी मोदी हा पर्याय म्हणून आला, मग हा माणूस केवळ सत्ता पादाक्रांत करणार नाही, तर देशात प्रस्थापित असलेल्या आठ दशकांच्या नेहरूवादाची पाळेमुळे खणून काढील, असा इशारा मी याच सदरातून दिलेला होता. तो नुसता सत्तेला धोका नव्हता, तर नेहरूवादाला धोका होता, असे स्वच्छ शब्दात मी प्रतिपादन केले होते. ज्याचे वास्तव आज अनुभवास येते आहे. तेव्हा माझ्या इशार्‍याची गंभीर दखल घेऊन पावले उचलली असती, तर आज नेहरूवाद्यांची वा पुरोगाम्यांची इतकी तारांबळ उडाली नसती.

पण संकटाची शक्यता दाखवणारा किंवा इशारा देणाराच शत्रू ठरवला, मग आत्मघाताला पर्याय नसतो. आपण बारा वर्षे अखंड बदनाम केलेला नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाचा उमेदवार झाला तर भाजपा संपलाच! या आंधळ्या विश्वासाने पुरोगाम्यांचा घात केला. कारण मोदी व्यक्तीगत कारणाने लोकप्रिय नव्हते, तर नेहरूवादाच्या अतिरेकाला उबगलेल्या लोकांसाठी मोदी पर्याय बनत चालले होते. दुर्दैव असे होते, की अगदी सहा वर्षासाठी भाजपाची सत्ता आली तेव्हा किंवा त्याच्याही आधी दोनदा जनता परिवाराच्या हाती सत्ता आली तेव्हा, लोकांना नेहरूवादापासून मुक्ती मिळू शकली नव्हती. १९६७ पासून लोकांनी कॉग्रेसपासून देश मुक्त करण्याचा प्रयत्न चालविला होता. पण ज्यांना हाताशी धरले त्यांनी निकालानंतर फ़क्त नेहरूवादाला पुनरुज्जीवित करण्याचाच घातकी पवित्रा घेतला. अगदी वाजपेयी सहा वर्षे पंतप्रधान होते, त्यांनीही कधी नेहरूवादी व्यवस्थेला धक्का लावण्याचे धाडस केले नव्हते. ते साहस नरेंद्र मोदी करू शकतो, याच भावनेतून जनमानस मोदींकडे वळत गेले. त्याचा धोका निव्वळ कॉग्रेसची सत्ता जाणे किंवा पुरोगाम्यांचा पाडाव इतकाच नव्हता. तो एका निवडणूकीपुरता धोका नव्हता. स्वातंत्र्यपुर्व काळापासून नेहरूंनी घातलेला राजकीय पाया खोदून काढू शकेल, असा हा धोका होता. जसजसे मतदानाचे दिवस जवळ येते गेले, तसतसे जाणत्या नेहरूवाद्यांना ते संकट जाणवू लागले आणि मग एक एक नेहरूवादी बुद्धीमंत आपली तटस्थता सोडून राजकीय मैदानात उतरत गेला. अमर्त्य सेन, अनंतमुर्ति, गिरीश कर्नाड वा तत्सम बहुतांश जाणत्यांना तो धोका जाणवला आणि जयराम रमेश यांच्यासारख्याने तसे बोलूनही दाखवले. तर त्यांची मुस्कटदाबी करण्यात धन्यता मानली गेली. मोदी नुसते पंतप्रधान होणार नाहीत, तर पाऊण शतकापासून इथे उभी असलेली नेहरूवादी व्यवस्था जमिनदोस्त करतील, हे माझे भाकित उशिरा अनेकांच्या डोक्यात शिरू लागले. पण तेव्हा उशीर झाला होता आणि तथाकथित पुरोगामी मंडळी बेभान होऊन अधिकच अतिरेक करून मोदींचे हात बळकट करत गेली.

असो, आता त्याचे परिणाम दिसत आहेत. पण हा अतिरेक तेव्हा दोनतीन वर्षापुर्वी थांबला असता, तर नरेंद्र मोदी नावाचा गुजरातचा मुख्यमंत्री देशासमोर एक नेतृत्व पर्याय म्हणून आणलाच गेला नसता, की नेहरूवादाला आव्हान उभे राहिलेच नसते. सत्ता येणे-जाणे निवडणूकीचा खेळ आहे. पण मोदी हे एका निवडणूकीपुरते आव्हान नाही व नव्हते. ते स्वातंत्र्योत्तर काळात प्रस्थापित केलेल्या व झालेल्या नेहरूवादी संकल्पनेला धक्का देणारे आव्हान होते. ते ओळखून मुळात मोदी भाजपाचे उमेदवार होऊ नयेत आणि सहज हाताळता येऊ शकेल असे सुषमा वा अडवाणी हे उमेदवार होण्याचे डावपेच पुरोगाम्यांनी खेळले असते, तर मोदी नावाचा धोका पत्करण्याची वेळ आली नसती. मोदी विरोधातील अतिरेक तीनचार वर्षापुर्वी थांबवून जनमानसात मोदींची राष्ट्रीय प्रतिमा उभारण्याचे काम पुरोगाम्यांनी इतक्या धडाडीने केले नसते, तर मतदानाने भले पुरोगाम्यांची सत्ता गेली असती. पण भाजपाच्या अन्य नेत्याकडून नेहरूवादाला इतके निर्णायक आव्हान नक्की उभे राहिले नसते. सात दशकात नेहरूवादाने देशापुढले कुठले गहन प्रश्न सोडवले नव्हते, तरी तीच नेहरूभक्ती वा आरती करत बसलेल्यांना कंटाळून परिवर्तन घडवायला उत्सुक असलेल्या जनतेला मोदी नावाचा आयता पर्याय ज्यांनी पुरवला, त्यांनीच मग नेहरूवादाची कबर खणली. हा मुर्खपणा करणार्‍यांना मोदींनी कधीच रोखण्याचा प्रयास केला नाही, तर वेळोवेळी प्रोत्साहन अगत्याने दिले व अशा अप-प्रचारकांच्या हाती कोलितही दिलेले होते. थोडक्यात नेहरूवादी पुरोगामी आत्महत्येला धावत सुटलेले असताना, मोदींनी त्यांना रोखले नाही, तर सतत प्रोत्साहन दिले. आज आपण बघत आहोत, ते त्याचे परिणाम! राहुल सोनियांनी त्याला हातभार लावला असेल, पण आत्मघात करून घेतला आहे, तो पुरोगामी व नेहरूवादी अशा लोकांनी; स्वेच्छेने, राजीखुशीने व अक्कलहुशारीने!

पुरवणी वाचन >>>>>
ज्यांना उत्सुकता असेल त्यांनी दोन वर्षापुर्वी ब्लॉगवर अजून असलेला (शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३ रोजीचा) नेहरूवादाला इशारा देणारा लेख वाचायला हरकत नाही.

http://panchanaama.blogspot.in/2013/10/blog-post_5.html

9 comments:

 1. पण झाले ते चांगलेच झाले असे वाटते. फक्त या माणसाने भारताला महिन्यातून निदान २ दिवसाची भेट नियमितपणे द्यावी आणि १०% कामे तरी गरिबांची करावी, कोन्ग्रेस आणि त्यांची टोळी २०१९ लाही वर येऊ शकणार नाही. आणि लॉंग रन मध्ये तेही देशहिताचेच होईल. फक्त यांना देशात रहाणे कुणीतरी कंपल्सरी केले पाहिजे हे नक्की !

  ReplyDelete
  Replies
  1. Mr belsare PM MODI kahi ayyashi karayala nahi jat

   Delete
 2. Nice. Very true. But a man like him were needed very badly to end Congress Regime, which were so long in India; spreading castisum or deviding people religion wise. That's my view & opinion.

  ReplyDelete
  Replies
  1. शेखर आणि श्रीनिवास !
   अंतर्राष्ट्रीय राजकारण हा गरीबसून करायचा पार्टटाईम धंदा नव्हे.
   अन्यथा आपण रणांगणात जिंकतो व वाटाघाटित टेबलवर घालवतो.
   २) नेहरुवाद पुर्णपणे हद्दपार करायचा तर सगळ्याचा एकत्रित परिणाम साधावा लागेल.
   घरातून घालवून दिलेली पाल सुध्दा परत येते.
   हा ब्लॉग कळण्यासाठी इतकी किमान समज आवश्यक आहे. अन्यथा. . इकडुन तिकडे गेले वाले.

   Delete
  2. आजच्या लोकप्रभा मधील एक पाऊल ठाम पुढे हा विनायक परबांचा लेख वाचा।

   Delete
 3. बरोबर आहे भाऊ. मी तुमचा ब्लॉग गेलं वर्षभर तरी अगदी दररोज वाचत आहे.
  पुरोगामी लोक / मकॉलेपुत्र ह्यांचा अजेंडा आता हळूहळू स्वछ कळू लागला आहे. आणि लोकं २०१४ नंतर त्याला फसत नसल्याचं सुद्धा दिसत आहे.
  मोदी नेहरूवादाची पाळमुळ खणून काढतील ह्यात काही शंकाच नाही. २०१४ च्या निकालानंतर बडोदे येथे झालेल्या भाषणात त्यांनी तसं स्पष्ट केलंच आहे

  ReplyDelete
 4. हो उद्योगधंदे अन पण शेतकर्याकडे बघा. खाजगी उद्योग आणणे म्हणजे मजूर निर्माण करणे होय.तुम्ही रघुराम राजनच्या ईश्यार्याकडे दुर्लक्ष करू नका.

  ReplyDelete
 5. खरे तर माझ्यासारखी तरुण पिढी या खोट्या पुरोगाम्यांना आता चांगलीच ओळखू लागली आहे ....यांना एका विशिष्ठ लोकांचा फारच उबला असतो ....आणि मोदिनी या पुरोगाम्यांना भिक न घालता फक्त विकासाच्या मुद्दा घेऊन निवडणुका लढवल्या...आजपर्यंत कोणत्या कॉंग्रेस नेत्याने असे केले होते ..

  ReplyDelete