Wednesday, September 30, 2015

कौरवांची कथा आणि पांडवांची गोष्टसत्य आणि कथा यात कुठला फ़रक असतो? तर सत्य हे जसेच्या तसे आपल्या समोर येत असते. कथा कितीही सत्य सांगणारी असली, तरी सत्याचा काहीतरी अपलाप त्यात होतच असतो. कारण कथेतले सत्य हे सांगणार्‍याला समजले वा भासले तिथपर्यंत मर्यादित रहाते. कारण समोर दिसले अनुभवले, त्यात जे त्याच्या बुद्धीला भिडलेले भावलेले असेल, तेच कथाकार रंगवून सांगत असतो. मग त्यात अनेक गोष्टी तो अतिरंजित करतो, तर काही भाग दडपून टाकतो. कारण त्याला ज्यात सत्याचा भास झालेला असतो, तोच परिणाम ऐकणार्‍या वाचणार्‍याच्या मनावर व्हावा; अशी त्याची अपेक्षा असते. सहाजिकच ज्यामुळे असा परिणाम वा प्रभाव कमी होऊ शकेल अशी शंका असते, तेवढा भाग कथाकार झाकतो, लपवतो किंवा चुकीच्या पद्धतीने सादर करत असतो. ही जगाची रीत आहे. त्यात आजचे असे नवे काही नाही. जगातल्या कुठल्याही मानवी पुराणकथा वा अनुभवांचे कथन बघितले, तर अशीच प्रचिती येईल. जी पात्रे असतात वा प्रसंग असतात, त्यातले नायक खलनायक कथाकारांनी आधीच निश्चीत केलेले असतात. सहाजिकच नायकांच्या भोवती सहानुभूती निर्माण व्हावी व खलनायकाच्या विषयी क्षोभ-संताप उत्पन्न व्हावा, अशाच रितीने कथेची मांडणी केली जात असते. मग तेच सत्य वा वास्तविक घटना थेट उलट्या टोकाच्या प्रतिक्रीया उमटवत असतात. पण एक बाजू त्याला सत्य मानत-समजत असते व त्यासाठी आग्रही असते, तर दुसरी बाजू त्याला धडधडीत खोटारडेपणा म्हणून नाकारत असते. इथून मग युक्तीवादाचे साम्राज्य सुरू होते. एकदा युक्तीवाद सुरू झाला, मग क्रमाक्रमाने वास्तव आणि सत्य मागे पडत जातात आणि कल्पनांच्या विश्वात मानवी मन गटांगळ्या खाऊ लागते. सहाजिकच कथाकथन करणारे अधिक आवेशात युक्तीवाद उभे करून बुडणार्‍याला आपणच वाचवू असा आव आणू लागतात.

सध्या नेहरू, नेताजी, शास्त्रीजी, नथूराम वा सावरकर अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तीमत्वांच्या बाजूने व विरुद्ध असेच आखाडे रंगलेले आहेत. त्यातल्या विविध कथा कादंबर्‍या ऐकल्या वाचल्या तर मजा वाटते. एका कथेतला खलनायक दुसर्‍या कथेतला साधूसंत सत्वशील नायक असल्याचे दावे वाचायला मिळतात आणि नेमके त्याच्याच उलटी बाजू दुसर्‍या कथाप्रसंगातून समोर ठासून मांडली जात असते. बहुतांश बाबतीत प्रसंग-पुरावे वा साक्षीदार सारखेच असतात. पण त्यांचा आधार घेऊन केलेले युक्तीवाद मात्र थक्क करून टाकणारे परस्परविरोधी असतात. नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला हे कालपर्यंतचे ठाम सत्य होते आणि त्याविषयी शंका घेणे निव्वळ पाप होते. नेहरूंची बदनामी करण्याचे कारस्थान होते. पण ममता बानर्जींनी गुप्त कागदपत्रे समोर आणली आणि नेताजींचा अपघातात मृत्यू झालेलाच नव्हता असे निष्पन्न झाले. मग मुळच्या कथाकारांचा पवित्रा कसा सहजगत्या बदलला? नेताजी हयात असल्याचे लपवून प्रत्यक्षात त्यांना युद्धकैदी म्हणून पेश करण्याच्या संकटातून नेहरूंनी वाचवले. पण इथे सहा दशके खोटारडेपणा झाला त्याचे काय? नेहरू वा अन्य कोणी सामान्य जनतेची दिशाभूल करत होते, त्याबद्दल मौन धारण केले जाते. कथाकार यातूनच यशस्वी होत असतो. त्याला जे तुमच्या माथी मारायचे असते आणि जे मनात भरवून द्यायचे असते, त्यानुसार तो सत्य, पुरावे व साक्षिदाराचे कथन यांची ‘कलात्मक’ मोडतोड करत असतो. त्यात कपोलकल्पित गोष्टी घुसडून तुमच्या प्रतिक्रीया जोखुन मांडणी करीत असतो. त्याला कलात्मक मांडणी म्हटले जाते. अर्थातच ही आजची बाब नाही, शेकडो पिढ्या व अनेक शतके मानवी मनाशी असाच खेळ चालला आहे. मग आजचे सत्य उद्याची कथा होते आणि कालची कथा आजची दंतकथा होऊन जाते. पुराणकथा होऊन जाते.

रामायणात रामाच्या आवाजात लक्ष्मणाला हाका मारल्या जातात. तेव्हा सुरक्षेसाठी त्याने पर्णकुटीच्या भोवती एक रेखा आखलेली असते. सीतेने ती लक्ष्मणरेषा ओलांडू नये असा दंडक असतो. मजा कशी आहे बघा. त्या दंडकाचे पालन गोसाव्याच्या रुपात आलेला रावण पाळतो. कुठल्याही रामायणात रावणाने लक्ष्मणरेषा ओलांडल्याचे वाचायला मिळणार नाही. तर सीतेने ती मर्यादा ओलांडल्याचेच ऐकायला मिळेल. म्हणजे नियमाचे उल्लंघन सीतेने केले होते. त्यातून पुढले रामायण घडले. पण इथे आधीपासून सीता ही नायिका ठरलेली आहे आणि रावण खलनायक निश्चीत झालेला आहे. तेव्हा त्याने नियमाचे पालन केले असूनही त्याचा नुसता ओझरता उल्लेख केला जातो. पण मर्यादा ओलांडल्यावर जे काही परिणाम होतात, त्याची भयानकता इतकी अफ़ाट रंगवली जाते, की सीतेच्या मर्यादाभंगाकडे ऐकणार्‍या वाचणार्‍याचे दुर्लक्ष झालेच पाहिजे. त्याला कलात्मकता म्हणतात. खलनायक असूनही रावण मर्यादा पाळतो आणि नायिका असूनही सीता मर्यादाभंग करते, हे त्यातले सत्य आहे. पण ते कधी नेमके बोट ठेवून समजावण्याचा प्रयत्न झाला आहे काय? युधिष्ठीराने आपली पत्नी द्रौपदी पणाला लावली आणि तिची प्रथम विटंबना केली. पत्नी ही जुगारी पणाला लावण्याची वस्तु नव्हे. तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी ज्या पतीवर आहे; तोच तिला पणाला लावतो. त्याचा उल्लेख ओझरता आणि पुढे भर दरबारात दु:शासन वस्त्रहरणाचा प्रयत्न करतो, त्याची रंगतदार वर्णने कशासाठी होतात? युधिष्ठीराच्या मूळ गुन्ह्यावरून लक्ष विचलित करण्यासाठीच ना? त्याला कलात्मकता म्हणतात. ही जगातल्या सर्व पुराणकथांपासून इतिहास व वास्तव बातमीदारीपर्यंत आपल्या अनुभवास येत असते. जीवंत वा काल्पनिक पात्रांना माणसांना कथाकार बातमीदार आपल्या हेतू व इच्छेनुसार खेळवत असतो.

कम्युनिस्ट आमदार कृष्णा देसाई किती रंगवून सांगितला जातो? तितका रमेश मोरे, विठ्ठल चव्हाण, प्रेमकुमार शर्मा वा रामदास नायक अशा भाजपा सेनेच्या आमदारांच्या हत्येचे कथानक सांगितले जाणार नाही. सनातनच्या भयकथा रंगवणारे कधी नक्षलवादी हिंसाचाराविषयी तपशीलवार बोलणार नाहीत. ही एक कला आहे. त्यात जनमानसाशी खेळ होत असतो आणि तो कित्येक शतकांपासून चालू आहे. कधी त्याला पुराणकथा म्हणतात, किर्तन प्रवचन म्हणतात, कधी सेमिनार परिसंवाद म्हणतात. त्यातून जनमानसाला एका ठराविक दिशेने घेऊन जाण्याचा, प्रभावित करण्याचा प्रयास असतो. मग त्या लढाईत ज्यांचा आवाज मोठा असतो वा ज्यांच्यामागे राजसत्ता उभी असते, त्यांची कथा सत्यकथा म्हणून ठासून सांगितली जात असते वा स्विकारण्याची सक्ती असते. ज्याचा आवाज मोठा असतो त्याचे सत्य प्रस्थापित झाले, असा दावाही केला जातो. पण सत्य कधीच प्रस्थापित होत नाही आज ज्यांचा आवाज मोठा असतो त्यांचा आवाज कधीतरी क्षीण होतो आणि कालचा दुबळा आवाज प्रभावी होऊन कालपर्यंत असत्य ठरलेले आज सत्य ठरू लागते. ज्याचा आवाज लोकांपर्यंत जातो किंवा ज्याची दहशत मोठी, त्याच्याकडे तेव्हाचे सत्य झुकत असते. मग त्यातले कालचे शिरजोर आज आपल्यावर अन्याय होत असल्याचे दावे करू लागतात, तर कालपर्यंत अन्यायाने चिरडले गेलो म्हणणारे, आज शिरजोरी करू लागतात. दोघेही एकाच माळेचे मणी वा एकाच कुरू कुळातले कौरव असतात. कथेला कलाटणी जशी मिळेल, तसे त्यातले जिंकलेले दिसतात, त्यांना तेवढ्या काळासाठी पांडव म्हणायचे असते. कुठल्याही कौरवाला तेच मुद्दे व पुरावे घेऊन युक्तीवादाने पांडव ठरवणे व सिद्ध करून दाखवणे ही कलात्मकता असते. त्याच कलाविष्काराला संस्कृती म्हणून मान्यता असते आणि त्यामुळे माणुस सुसंस्कृत होत असतो.

14 comments:

 1. हेच वास्तव आहे फक्त काळानुसार कलाकार बदलतात.मुळ दोष, चुक ,अपराध नगन्य आहे फक्त तुम्ही पटकथेचे नायक किंवा नायिका हवेत. भन्नाट विश्लेषण भाऊ. त्या पाकीस्तानात जर ईतिहासाचे पुस्तक आसेल(आसेल म्हनुन शंकाच आहे)तर त्यात काय लिहीले आसेल पप्पुच्या आजोबां बाबत .
  विनंती आहे पन वाचायला खुप आवडेल.

  ReplyDelete
 2. महाभारत, रामायण या महाकाव्यांची महती यातच की यांत सगळी "माणसे" म्हणूनच दाखविली आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने गोष्ट दाखवून लोकांना योग्य शिक्षण मिळते. तुमचे विवेचन यांच्या रचनाकारांची प्रतिभा व या रचनांची कालातीतता सिद्ध करते.

  ReplyDelete
 3. रावण होणे तरी कुठे सोपे आहे. .......

  रावणामध्ये अहंकार होता,
  तसा पश्चात्तापही होता.
  वासना होती, तसा संयमही होता.
  सीतेच्या अपहरणाची ताकद होती,
  तसेच सहमतीविना परस्त्रीला स्पर्श न करण्याचा संकल्पही होता.
  सीता जिवंत....... मिळाली ही रामाची ताकद होती,
  पण
  सीता पवित्र मिळाली ही रावणाची मर्यादा होती।।।।


  - नाना पाटेकर..

  ReplyDelete
 4. भाऊराव,

  गंमत बघा आता द्रौपदीने अगदी नेमका प्रश्न विचारला होता. की मला पणाला लावणारा युधिष्ठीर कोण? या प्रश्नाचा मथितार्थ असा की जर तो तिचा पती असेल तर त्याने पत्नीला स्वतंत्रपणे पणाला लावलेलं दिसतंय. म्हणजेच द्रौपदी हे स्वतंत्र अस्तित्व आहे. याचाच दुसरा अर्थ असा की युधिष्ठीर स्वत: दास झाल्यावर स्वतंत्र अस्तित्वाच्या द्रौपदीला पणाला लावू शकत नाही.

  द्रौपदीचा या युक्तिवाद कोणी किती गांभीर्याने घेतला गेला ते सांगायला नकोच. हातात सत्ता असेल तो कसलाही सारासार विचार न करता मुजोरपणा करतो. जिसकी लाठी उसकी भैस. शेवटी मांडी आणि छाती फुटून केल्या कर्माची फळं भोगावी लागतात. तशीच वेळ काँग्रेसवर येऊ घातलीये.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 5. रावण आणि सीतेचा दाखला प्रचलित कथांपेक्षा वेगळा रंगवला आहे...

  ReplyDelete
 6. रावण मर्यादा ओलांडू शकला नाही त्याला लक्षण रेषा ओलांडता आली नाही. सीतेच्या इस्चेविरुध तो तिच्यावर बळजबरी पण करू शकला नाही कारण त्यांस शाप होता कि तसे करेल. युधीस्ठीराच्या बाबतीतल्या आपल्या विद्नांशी सहमत आहे ! त्याने तद्दन मूर्ख पणा केला

  ReplyDelete
  Replies
  1. Correct. The writer completely misses the point here, and made the same mistake that todays kathakar are making. To make his point, Bhau twisted the Ramayana story or did not really understood it.

   Delete
 7. सीतेने लक्ष्मनरेषा ओलांडली कारण रावणाने तिला "माई भिक्षांदेही" असा आवाज दिलता आणि ऋषींचे रुप धारण केले होते म्हणजेच त्याने स्वतःची ओळख लपवली आणि हेतु्पण आज हि राजकारणी मंडळी काही वेगळे करत नाही आणि जनता सीतामाई सारखे फसत आहे

  ReplyDelete
  Replies
  1. लक्ष्मण रेखा पार करण्याची ताकद रावणामध्ये नव्हती. खरेतर रावणाने खोटारडेपणा करून आधीच सभ्यतेची मर्यादा ओलांडली होती, पण इतर कथाकारांप्रमाणे भाऊ पण आपला मुद्दा मांडायला इथे चूक करत आहेत.

   Delete
 8. आजचे सत्य उद्याची कथा होते आणि कालची कथा आजची दंतकथा होऊन जाते. पुराणकथा होऊन जाते.या मूळेच आपण आज बदनाम होत आहोत,प्राचीन हिंदू धर्मशास्त्रे काळाच्या ओगात नाहीसे झाली त्याची जागा पुराणांनी घेतली आणि आपण खरा सनातन धर्माची व्याखा आजही शोधतोय.

  ReplyDelete
 9. भाऊ, सीतेचं उदाहरण देऊन आपण पण तीच चूक करत आहेत जे आजचे इतर कथाकार करत आहेत. चालायचंच कारण शेवटी कथा या कथाच दुसऱ्यांच्या किंवा तुमच्या...

  ReplyDelete
 10. सुरुवात मारीचाच्या मायावी छळ कपटाने झालेली असते ना पण

  ReplyDelete