Sunday, September 6, 2015

तोतया पुरोगाम्यांची खर्‍या पुरोगाम्यांना दहशत



"Nothing in the world is more dangerous than sincere ignorance and conscientious stupidity." - Martin Luther King Jr. (1929-1968)

चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. शेषराव मोरे हे आता पुरोगामी हल्ल्याचे लक्ष्य झाले तर नवल नाही. अर्थात त्याला हल्ला म्हणायचा नसतो, तर टिका म्हणायची असते. मात्र तशीच टिका लेबल लागलेल्या प्रतिगाम्याने कुणा पुरोगाम्यावर केली म्हणजे त्याला हल्ला म्हणायचे असते. शब्द व त्यांचे अर्थ आजकाल असे सोयीनुसार बदलत असतात. तुम्ही कोणत्या गोटातले त्यावर तुमच्या बोलण्याचा व कृतीचा अर्थ लावला जात असतो आणि त्याला हेतूही चिकटवला जात असतो. शेषराव मोरे यांनी ज्या अर्थाने आपले मत व्यक्त केले आहे आणि त्यासाठी जे शब्द वापरले आहेत, त्याचा आशय स्पष्ट आहे. मराठी भाषेच्या प्रांतामध्ये वैचारिक क्षेत्र आज सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या मुठभर मक्तेदारांनी ओलिस ठेवले आहे. फ़क्त महाराष्ट्रातच कशाला अवघ्या देशाची तीच अवस्था वेगळी नाही. या मुठभरांनी पुर्वीच्या धर्ममार्तंडांप्रमाणे समाजातील प्रतिष्ठेची मान्यता आपल्या हाती राखून ठेवली आहे. काही वर्षापुर्वी मानसिंग नावाची एक जगप्रसिद्ध शास्त्रीय नर्तिका कुठल्याशा समारंभात सहभागी झाली, तर तिला तथाकथित कलावंत मुखंडांनी त्याबद्दल जाब विचारला होता. कारण तो कार्यक्रम योजणार्‍यांचा संघाशी संबंध होता. याचा अर्थ काय? संघाशी संबंध असणे हे कलाबाह्य असू शकते काय? पण त्यातलेच अनेकजण खुलेआम नेहरू वा कॉग्रेसी राजकारणाशी संबंधित असतानाही ‘फ़क्त’ कलावंत ठरवले जातात. शेषरावांना त्याच दहशतवादाचा निर्देश करायचा होता. कारण त्यात आणि तालिबानी खाप पंचायतीमध्ये फ़रक नसतो. तुम्ही त्या पंचायतीचे आदेश झुगारलेत वा त्यांनी आखून दिलेली लक्ष्मणरेषा ओलांडली, मग तुम्हाला भले इजा होणार नाही, पण तुम्ही सार्वजनिकरित्या बहिष्कृत केले जाता. शेषरावांचा रोख त्याच दिशेने आहे. पण इथे त्याच्यासह मूळ दहशतवादही समजून घ्यायला हरकत नाही.

अमूक एक बाब वा कृती आम्हाला मान्य नाही वा आमच्या पठडीत बसणारी नाही, म्हणून ती बहिष्कृत करण्याची वृत्ती हाच दहशतवाद असतो. त्याच्या दडपणाखाली आलात, मग तो अधिकाधिक हिंसक बनत जातो. आधी नुसता बहिष्कार असतो आणि पुढे अशा लोकांना सक्तीने व शक्तीने निकालात काढले जात असते. तालिबानी वृत्तीचा उदय अशाच असहिष्णुतेतून होत असतो. त्याचे तालिबानीकरण झाले मग त्याला दहशतवाद असे नाव दिले जाते. पण सुरूवात शेषराव म्हणतात तिथून होत असते. आपल्याला न पटणार्‍या वा अमान्य असलेल्या कृती वा गोष्टीला बहिष्कृत करण्यापासून ही दहशत सुरू होत असते. मागल्या काही दिवसात त्याची अत्यंत ठळकपणे प्रचिती येत आहे. अमुक एका जागी कोणाची मोदी सरकारने नेमणूक केली, मग त्याला आक्षेप घेण्याचा सपाटा काय सांगतो? पुण्याच्या फ़िल्म इन्स्टीट्यूट वा प्रसारभारतीचे संचालक मंडळ यात म्हणे संघाशी संबंधित लोकांचीच वर्णी लावली. मग कोणा नक्षलवाद्याची वा माओवाद्याची वर्णी लावली पाहिजे काय? सोनियांनी युपीए सरकारला मार्गदर्शक म्हणून जे राष्ट्रीय सल्लागार मंडळ निर्माण केले होते, त्यात कुठल्या संघ संबंधित सेवाभावी संस्थेच्या व्यक्तीची नेमणूक केली होती काय? मग तेव्हा अमूक कोणी माओवाद्यांशी वा पुरोगाम्यांशीच संबंधित आहे, असा ओरडा कशाला झाला नव्हता? ज्याचे सरकार त्याच्याच पठडीतले लोक नेमले जाणार ना? पण सरकार कुठलेही येवो आणि सत्तांतर कुणाचेही येवो, निर्णयसत्ता पुरोगामी मुखंडांच्याच हाती असली पाहिजे. कुठल्याही कामाचा शुभारंभ वा पायाभरणी आमच्याच मंत्राचे उच्चार करून झाली पाहिजे, असा हट्ट करायचा. आणि त्याला जुमानले नाही मग शिव्याशाप सुरू करायचे. ही दहशत नाही तर काय? आजकालच्या इंग्रजाळलेल्या भाषेत त्याला इमोशनल ब्लॅकमेल म्हणतात, त्यातलाच हा प्रकार असतो. शेषरावांनी त्यावरच नेमके बोट ठेवले आहे.

त्यांनी दहशतवाद म्हणजे हिंसक अर्थाने शब्द वापरलेला नाही. हिंदू या शब्दाशी जवळचे काहीही बोलले, तर आपल्याला प्रतिगामी बहिष्कृत ठरवले जाण्याचा भयगंड अशा अर्थाने शेषरावांनी शब्दयोजना केलेली आहे. ती तक्रार करणार्‍यांना उमजलेली नाही असे अजिबात नाही. पण जाणूनबुजून त्याचा विपर्यास करायचा. दुर्दैव असे, की अशाच विपर्यासाने मागल्या दहाबारा वर्षात त्याची दहशत ओसरत गेली आहे. ‘लांडगा आला रे आला’ अशी पुरोगामी दहशतीची दुर्दशा होऊन गेली आहे. कुठल्याही गोष्ट वा बाबतीत पुरोगामीत्वाचा इतका पोरखेळ करण्यात आला, की लोकांना आता पुरोगामी नसण्यात धन्यता वाटू लागली आहे. अन्य काहीही असलो तरी चालेल, पण आपल्यावर पुरोगामीत्वाचा शिक्का नको, अशी मानसिकता मागल्या लोकसभा निवडणूकीत मोदींना प्रचंड यश देवून गेली. त्याला वास्तविक पुरोगामीत्व किंवा सेक्युलर विचारसरणीचे अपयश म्हणता येणार नाही. तो पुरोगामीत्वाच्या तोतयेगिरीचा परिणाम आहे. ब्राह्मणविरोधी जातिय विषारी प्रचार करून समाजात विसंवाद पेरण्याला प्रोत्साहन देण्य़ाचेही समर्थन जेव्हा होऊ लागले, तशा वागण्यातून पुरोगामीत्व म्हणजे तोतयेगिरी आहे याचे भान सामान्य माणसाला येत गेले. त्याचेच राजकीय सामाजिक प्रतिबिंब जनमानसात दिसते आहे. पुरोगामी बुद्धीजिवी आणि सामान्य जनता यांच्यात कुठलाही ताळमेळ उरलेला नाही. या लोकांची सामान्य माणसाशी असलेली नाळ पुर्णपणे तुटलेली आहे. तरीही फ़ेरविचार करून चुका सुधारण्याची बुद्धी त्यांना होताना दिसत नाही. मेलेले पोर पोटाशी घट्ट धरून त्याला दूध पाजू बघणार्‍या माकडीणीच्या केविलवाण्या कृतीप्रमाणे हे तथाकथित पुरोगामी आजही तोच खेळ करीत आहेत. ज्याची दहशत संपलेली आहे, अशी दहशत घालण्याच्या त्या उद्योगाकडे शेषरावांनी बोट दाखवून खरे तर अशा दहशतीखालील खर्‍या पुरोगाम्यांना शहाणे करण्याचा प्रयास केला आहे. पण उपयोग काय?

मध्यंतरी बाबासाहेब पुरंदरे यांना सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला, त्यावरून काहुर माजवले गेले. त्यातून तर ही मंडळी पुरती उघडीच पडली. त्यांचे पुरोगामी नव्हेतर जातियवादी चेहरेच समोर आले. खरे तर त्यातूनही शिकता आले असते. पण शिकेल व शहाणा होईल त्याला आजकाल पुरोगामी म्हणता येत नाही. कारण आता खर्‍या अर्थाने पुरोगामी विचारांवर प्रामाणिक विचार करणार्‍यांचाही कब्जा राहिलेला नाही. ठराविक जातिय व धर्मांध शक्तींनी पुरोगामी व्यासपीठ काबीज केले असून, त्यांच्या तालावर माकडाप्रमाणे पुरोगामी म्हणवणारे अगतिक होऊन नाचत असतात. ज्याप्रकारे त्यांनी जीतेंद्र आव्हाड यांच्यानंतर भूषण पुरस्काराला विरोध करणारा केविलवाणा पवित्रा घेतला, त्यातून त्यांच्यावर तोतया पुरोगाम्यांनी बसवलेली दहशत स्पष्टपणे समोर आली. शेषरावांशी आमचे एकाच बाबतीत दुमत वा भिन्न मत आहे. पुरोगामी दहशत ही आता इतरांना वाटेनाशी झाली आहे आणि सामान्य माणसाने त्याची प्रचिती मतदानातून दाखवली आहेच. मात्र तीच तोतया पुरोगामीत्वाची दहशत खर्‍याखुर्‍या प्रामाणिक पुरोगामी लोकांवर कायम आहे. कारण आता कोणालाच पुरोगामी असण्याची गरज वाटेनाशी झाली आहे. पण ज्यांना आपला चेहरा पुरोगामी राखण्याची हौस आहे, असे लोक त्या दहशतीखाली आहेत. आपण सत्य बोललो आणि विवेकी वागलो, तर आपली पुरोगामीत्वाची बिरूदावली हिरावून घेतली जाईल, अशा भयाने ज्यांना पछाडले आहे. त्यांना अशा दहशतीखालून बाहेर काढण्याची गरज आहे. सच्चे पुरोगामी आहेत, त्यांना तोतया पुरोगाम्यांची दहशत इतकी भेडसावते आहे, की त्यांना ब्रिगेड वा जिहादी धर्मांधांच्या दडपणाखाली केविलवाण्या कसरती कराव्या लागत आहेत. म्हणूनच शेषरावांनी तोतया पुरोगाम्यांची दहशत असा शब्द वापरायला हवा होता. कदाचित त्यातून मुठभर तरी पुरोगाम्यांना सत्य बोलायचे धाडस मिळू शकले असते.

No comments:

Post a Comment