Monday, September 7, 2015

निर्वासित नव्हे, मानवाधिकाराची समस्या



सध्या पश्चिम आशियामध्ये जी मोठी भयंकर मानवी समस्या उभी राहिली म्हणून जगभर गवगवा चालला आहे, त्याच्या बातम्या बघून ४५ वर्षे मागे भारताच्या पुर्व सीमेवरील घटनांचे स्मरण झाले. १९७१ सालात पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणूका झाल्या. लष्करशहा जनरल याह्याखान यांनी त्या घेतल्या आणि तेव्हा आजचा बांगला देश, पुर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जात होता. तिथली लोकसंख्या पश्चिम पाकिस्तानपेक्षा अधिक होती आणि संसदेतही पुर्व पाकिस्तानच्या अवामी लीग पक्षाला स्पष्ट बहूमत मिळाले होते. पण पंजाबी वर्चस्वाखाली चाललेल्या पाकिस्तानी कारभाराला ते मान्य होणे शक्य नव्हते. म्हणूनच मग तडजोडीची बोलणी सुरू झाली. अवामी लीगचे नेते शेख मुजीबूर रहमान यांनी उपपंतप्रधान व्हावे आणि त्यांच्या निम्मे जागाही न जिंकलेल्या पिपल्स पार्टीचे नेते झुल्फ़ीकार अली भुत्तो यांना पंतप्रधान म्हणून मान्य करावे; असा याह्यांचा आग्रह होता. तो मान्य झाला नाही आणि रातोरात गाफ़ील मुजीबूरना उचलून थेट पश्चिम पाकिस्तानात आणले गेले. पूर्व पाकिस्तानात अवामी लीग नेत्यांची धरपकड सुरू झाली. अनेकजण भूमीगत झाले, तर पुर्व पाकिस्तानी असलेल्या सैनिकांनी पाकविरोधात बंड पुकारले. परिणामी तिथे स्थायिक असलेल्या पाक सेनापती लेप्टनंट नियाझी यांनी नागरिकांवरच बेछूट हल्ले सुरू केले. त्यातून हजारो व लाखोच्या संख्येने बांगला नागरिक घरदार सोडून भारताच्या सीमेकडे पळत सुटले. काही महिन्यातच भारतीय सीमेवर एक कोटीहून अधिक निर्वासितांचा जमावडा तयार झाला आणि त्यांची सोय लावणे भारताला अशक्य होऊ लागले. माणूसकीच्या नात्याने असहाय माणसांना मदत करताना भारताच्या नाकी दम येऊ लागला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यासाठी जगाची मदत मागितली व त्यात हस्तक्षेप करण्याचीही मागणी केली होती.

दिवसेदिवस फ़ुगत चाललेल्या निर्वासित संख्येने भारतावर खर्चाचा व प्रशासकीय बोजा वाढत होता. त्यात जगाचे लक्ष वेधून मोठ्या देशांना समस्या समजावण्याचे काम मग इंदिराजींनी जयप्रकाश नारायण यांच्यावर सोपवले होते. काही महिने भारत सरकारचे प्रतिनिधी शांतीदूत म्हणून जयप्रकाश जागतिक नेत्यांना भेटून भारतावर बोजा वाढत असल्याचे व हस्तक्षेप करायला सुचवण्याचे काम करीत फ़िरले. पण तेव्हा आजच्यासारखे मानवाधिकाराचे थोतांड सुरू झालेले नव्हते. म्हणूनच कुठल्याही मोठ्या वा पुढारलेल्या देशाने त्यात हस्तक्षेप करायचे वा भारताला मदतीचा हात द्यायचे नाकारले होते. शिवाय तो पाकिस्तानचा अंतर्गत मामला असल्याचेही शहाणपण सांगितले जात होते. पण त्याचा बोजा भारताला असह्य होत चालला होता. म्हणूनच मग एका बाजूला त्या मानवी समस्येवर आणि मायदेशाच्या बोजावर कठोर उपाय योजण्याचे धाडस इंदिरा गांधी यांना करावे लागले होते. त्यांनी पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असलेल्या या पेचातून मार्ग काढताना पुर्व पाकिस्तानातील अवामी लीगच्या बंडखोर भूमीगत सरकारला मान्यता देवून टाकली आणि त्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला. आज आपण ज्याला १९७१चे भारत-पाक युद्ध असे संबोधतो, तो असा प्रत्यक्षात भारतीय सीमेवर डोईजड झालेला निर्वासितांचा प्रश्न होता. तेव्हाची पुर्व सीमेवरची परिस्थिती नेमकी आजच्या सिरिया, जॉर्डन, तुर्की या देशांच्या सीमेसारखीच होती. मात्र त्यातली फ़क्त निर्वासित समस्या आपल्याला रंगवून सांगितली जात आहे. पण त्यातला राजकीय अमानुषतेचा विषय चलाखीने झाकून ठेवला जात आहे. त्यावर इंदिराजींनी योजलेला अक्सीर इलाजही सांगितला जात नाही. तोच उपाय बड्या देशांनी व आसपासच्या अरबी-मुस्लिम देशांनी योजला तर विनाविलंब सिरीयन निर्वासितांचा विषय निकालात निघाला असता, अजून निघू शकतो.

इसिस म्हणून जो धुमाकुळ मागल्या दोन वर्षात सिरीया इराकच्या सशस्त्र मुजोर लोकांनी केला आहे, त्यातून ही स्थिती आलेली आहे. त्यातल्या सिरीयन राज्यकर्ता बशिर असद याला सतावणार्‍या बंडखोरांना बळ देण्यासाठी आधी पाश्चात्य देशांनी बंडखोरांना मदत केली आणि त्याला उत्तर देताना असदनेही विध्वंसाचा मार्ग पत्करला. पण पाश्चात्य हस्तक्षेपाने असद ढिला पडला आणि इसिस शिरजोर होत गेली. आता इसिसला आवरणे पाश्चात्यांनाही अवघड झाले आहे. त्यातून ही मानवी समस्या उभी राहिली आहे. एकतर तेव्हाच असदला ‘अंतर्गत’ मामला म्हणून इसिसच्या बंडखोरांचा चिरडून काढण्याची मुभा द्यायला हवी होती. माणुसकीच्या नावाखाली पाश्चात्यांनी त्यात नाक खुपसण्याचे कारण नव्हते. कारण कितीही हुकूमशहा असला तरी असद हा निदान राज्यकर्ता होता. इसिससारखी खुनी दरोडेखोरांची झुंड नव्हती. असद ढिला पडला आणि आता इसिसचे दरोडेखोर आसपासच्या अन्य देशातही धुमाकुळ घालू लागले आहेत. इराक, अफ़गाण, लिबिया, इजिप्त अशा कुठल्याही भागात ते मोकाट घुसतात आणि रक्तपात घडवून आणतात. अर्थात त्यापासून सौदी व अन्य आखाती देश सुखरूप आहेत, हा योगायोग नाही. त्यांना धक्का लागत नाही कारण त्यांच्याच रसदीवर इसिस लढते आहे. कारण यात ज्यांना उध्वस्त केले जाते आहे ते मुस्लिम असा शिक्का मारून संपणारा विषय नाही. त्यातले बहुतांश शिया मुस्लिम आहेत. शियांना नामशेष करण्यासाठी सौदी व अन्य आखाती सुन्नी राज्यकर्ते इसिसला रसद पुरवत आहेत. म्हणूनच मग त्यातला कुठलाही हल्ला सौदीप्रणित आखाती आघाडी असलेल्या श्रीमंत देशांना लागत नाही, पण अन्य देशांना त्याची झळ लागते आहे. आणि म्हणूनच चाळीस लाख सिरीयन मुस्लिम निर्वासित झालेले व युरोपकडे पळत सुटलेले असले, तरी त्यातला कोणी आखाती श्रीमंत सुन्नी देशांकडे वळलेला नाही.



युरोपातील काफ़ीर व सैतान मानल्या जाणार्‍या ख्रिश्चन राष्ट्रांनी या निर्वासितांना आपल्यात सामावुन घ्यावे असे दडपण आणले जात आहे आणि त्याही देशातल्या मानवाधिकार संस्थांनी त्यासाठी जोर लावला आहे. जगातले श्रीमंत खनीज तेलाचे पैसेवाले असलेल्या या अरब मुस्लिम पाच देशांनी मिळून निवासितांच्या पुनर्वसनाची कुठलीही जबाबदारी घ्यायचे साफ़ नाकारले आहे आणि छावण्यांमध्ये पडलेल्या मुस्लिम निर्वासितांसाठी त्यांनी एकूण दिलेली देणगी ब्रिटनच्या निधीपेक्षा कमी आहे. अमेरिकेने तर सौदी, कुवेत, ओमान, दुबई वा कतार यांच्या चौपटीने निधी दिला आहे. कशी गंमत आहे बघा. मुस्लिम जगाचे नेतृत्व करणारे म्हणून हेच देश पुढे असतात. पण जेव्हा चाळिस लाख मुस्लिम निर्वासित व दिड कोटी मुस्लिमांच्या जगण्यामरण्याचा प्रश्न भेडसावत आहे; तेव्हा कायद्यावर बोट ठेवून त्यातल्या एकालाही आखाती देशात स्विकारण्यास याच देशांनी नकार दिलेला आहे. कारण १९५१ सालात जो जिनिव्हा करार मानवी स्थलांतरण व पुनर्वसन संबंधात झाला आहे, त्याला याच अरबी देशांनी मान्यता दिलेली नाही. म्हणूनच अरबी वंशाचे व मुस्लिम धर्माचे असूनही त्या अर्धा कोटी मुस्लिमांचे हाल आखाती देश कोरड्या डोळ्यांनी बघत बसले आहेत. मात्र तेच लोक गाझा वा पॅलेस्टाईन इथल्या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी कायम राष्ट्रसंघात गळा काढत असतात. ही अरबी व मुस्लिम जगतातील वस्तुस्थिती आहे. मुस्लिमच मुस्लिमाचा जीवावर उठला आहे आणि त्याच मरणार्‍या वा निर्वासित होणार्‍या मुस्लिमाला बिगर मुस्लिमांनी वाचवले पाहिजे, असा आग्रह आहे. याला मानवता म्हणतात. मग ती बांगला विरुद्ध पंजाबी मुस्लिमाची असो, किंवा सुन्नी विरुद्ध शिया मुस्लिमाची असो. ते एकमेकांचे गळे कापणार, रक्तपात करणार आणि तुम्ही बाकीचे जे कोणी माणूसकीला बांधलेले आहात, त्यांनी त्याचा बोजा उचलावा असा हट्ट आहे.

2 comments:

  1. Correct bhau..chalu day ....Some day back I got news in Lokmat one of the leader says over request for accept all people who left their country for saving their life and family .."We are not ready to accept all off them as many country facing issues with Muslim" community.

    ReplyDelete
  2. ekdam barobar bhau.... hyawar sagle purogami tond band karun gappa bastil... hya arab deshanna prashna kon vicharnar ata ?? apalya deshachi daare hya arab deshanni band keli ani baki lokanna ughadayala sangtat....bagha hyachi manavata....
    apale sikular tar kuthalya bilat lapun baslet....

    ReplyDelete