Sunday, September 27, 2015

कोण कुठला भाऊ तोरसेकर? (पुर्वार्ध)१० ऑगस्ट रोजी माझ्या ‘जागता पहारा’ ब्लॉगने दहा लाखाचा पल्ला ओलांडला आणि पुढल्या ४३ दिवसात २२ सप्टेंबर रोजी आणखी दोन लाखाची त्यात भर पडून बारा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. नेमके सांगायचे तर पंचवीस महिन्यात इतकी झेप झाली. पण त्यात मागच्या सात-आठ महिन्यात ब्लॉगचे वाचक कमालीचे वाढत चालले आहेत. पण त्याच दरम्यान अकस्मात काही विपरीत प्रतिक्रीया व अस्वस्थ आत्मे सतावू लागल्यासारखे अंगावर येऊ लागले. म्हणून त्यावर सविस्तर लिहायचा विचार केला.

मागले काही दिवस एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली, की अनेक तथाकथित पुरोगामी, सेक्युलर सोशल माध्यमातून माझ्यावर व्यक्तीगत हल्ला करू लागले आहेत. त्यातही अनेक पत्रकार व मोठ्या माध्यमातील भुरट्यांचा समावेश आहे. खेरीज त्यांचे सहप्रवासी म्हणजे त्यांच्यातले अन्य टोळीबाजही समाविष्ट आहेत. अशा लोकांनी अकस्मात माझ्याविरुद्ध आघाडी उघडल्यासारखे हल्ले कशाला सुरू करावेत, याचे कोडे मला पडलेले आहे किंवा होते. कारण माझ्या लिखाणातून ज्या भूमिका वा मुद्दे मी मांडत असतो, त्यात नवे असे काहीच नाही. मागल्या तीन दशकात सातत्याने मी हेच करत आलेलो आहे. ते म्हणजे जे काही प्रचलित व प्रस्थापित माध्यमातून प्रसिद्ध होत असते, किंवा टाहो फ़ोडून सांगितले जात असते, त्याची उलटतपासणी करणे. त्यात लपवल्या गेलेल्या दुसर्‍या बाजूवर प्रकाश टाकणे, इतकीच माझी भूमिका राहिली आहे. मग विषय शिवसेना, भाजपा, संघ वा हिंदूत्वाचा असो, किंवा मोदी-ठाकरेंचा विषय असो. त्याविषयी जेव्हा काहूर माजवले जाते, तेव्हा त्यामध्ये सराईतपणे जी माहिती वा तपशील दडवलेला असतो, त्याला समोर आणायचे काम मी अगत्याने केलेले आहे. अर्थात माझ्या हाताशी साधने म्हणाल तर काहीच नाहीत.

आजकालच्या बहुतांश माध्यमांनी तथाकथित पुरोगामी मुखवटे चढवले असल्याने आणि त्यातूनच खोटेपणा चालला असल्याने, तिथेच त्याविषयी प्रतिवाद शक्यच नाही. किंबहूना मी तसेच लिहीतो वा बोलतो, म्हणून या प्रस्थापित माध्यमातला मी एकमेव बहिष्कृत पत्रकार आहे. सहाजिकच जो कोणी माझी मते व लिखाण छापायला तयार असेल, तिथे मी लिहीतो. मात्र मला जे मांडायचे आहे, त्याबाबतीत मी अजिबात तडजोड करत नाही. म्हणून मग भाऊला बहिष्कृत केला, की त्याच्या भूमिका जगापुढे जाण्याचीच शक्यता संपून जाते. तेवढी सज्जता अशा सेक्युलर लोकांनी केली असल्याने, त्यांना माझ्या लिखाणाची कधी दखल घेण्य़ाची गरज भासली नाही. किंवा त्याचा प्रतिवादही करायचे प्रयोजन उरलेले नव्हते. महाराष्ट्रात जी मराठी माध्यमे आहेत, त्याचाच लाचार असलेल्या वाचकाला मग दुसरी बाजू समजण्याचा धोकाच उरलेला नव्हता. सहाजिकच भाऊने कितीही आटापिटा करून वेगळे मुद्दे उपस्थित केल्याने, कोणा सेक्युलर पत्रकार बुद्धीमंताला त्याची फ़िकीर नव्हती. हे जे कोणी सेक्युलर शहाणे आहेत, त्यांचाच सर्वत्र बोलबाला होता. कारण माध्यमे त्यांच्या कब्जात होती आणि माझ्यापाशी असलेल्या दुर्बळ छपाई साधनांनी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचणे मलाही अशक्य होते. मग अशा खोटारड्यांनी मारलेल्या थापाच विद्वत्ता म्हणून लोकांच्या गळी मारल्या जात असल्यास नवल नव्हते.

अर्थात हाती पडणारे वर्तमानपत्र किंवा पुस्तकासहीत वाहिन्यांवरील पोपटपंची, लोकांना मान्य होती किंवा पटत होती, असे अजिबात नाही. सामान्य माणुस कितीही अडाणी असला तरी त्याच्यापाशी सारासार बुद्धी असते आणि सूर्याला चंद्र म्हणून त्याच्या गळी मारता येत नाही. म्हणूनच वाचकाच्याही मनात शेकडो शंका होत्या. पण त्याचे उत्तर वा खुलासे त्याला मिळत नव्हते. अशा खोटारडेपणाची लक्तरे मी भले काढत असलो, तरी खेड्यापाड्यापर्यंत, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यापर्यंत जाऊन पोहोचण्याचे कुठलेही साधन माझ्यापाशी नव्हते. पण तशी दुसरी बाजू ऐकायला मिळाली वा कोणी दाखवली, तर सामान्य वाचकाला ती हवीच होती. पण प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रातील अशा ढुढ्ढाचार्यांच्या विरोधात काही छापायची हिंमत कोणी करायची? कुठलाही छोटा संपादक वा व्यावसायिक संपादक तेवढी हिंमत करूच शकत नव्हता. ज्याला एकाचवेळी अशा मठाधीशांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन त्यांच्यातच नांदायचे आहे, त्याच्यासाठी भाऊच्या बंडखोरीला प्रसिद्धी देणे अशक्यप्राय होते. २००९ च्या सुमारास तशी हिंमत एका माणसाने दाखवली आणि सुदैवाने तो बुद्धीमान संपादक-मालक नव्हता. मात्र वॄत्तपत्र खपले पाहिजे आणि वाचकाने विकत घेतले पहिजे, अशी ज्याची अढळ श्रद्धा आहे, असा तो माणुस होता मुरलीधर शिंगोटे.

दिर्घकाळ अथक मेहनत घेऊन त्यांनी ‘पुण्यनगरी’ हे दैनिक महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात नेलेले होते. पैशाच्या थैल्या व काळापैसा ओतून पुरोगामी थोतांड रद्दीच्या भावात लोकांना विकून लाखोचे खप मिरवणार्‍यांना या एका विक्रेता संपादकाने खरे आव्हान उभे केले. काही कारणास्तव जिथे ‘पुण्यनगरी’ची पहिली आवृत्ती काढली, त्या पुण्यात तिचा जम बसवता आलेला नव्हता. म्हणून त्यांनी माझ्या मदतीची मागणी केली. अर्थात शिंगोटे माझा स्वभाव ओळखून असल्याने त्यांना माझ्या अटी मान्य कराव्या लागल्या. मला हवे ते आणि माझ्या भूमिकेनुसारच मी लिहीणार असल्याचे, त्यांना आधीच बजावून सांगितले होते. त्यांनी ते मान्य केले. पेपर खपला पाहिजे इतकीच त्यांची अट होती. अर्थात त्यांच्या चालू असलेल्या वृत्तपत्राचे कुठलेही स्वरूप मी बदलाणार नव्हतो, की त्यात ढवळाढवळ करणार नव्हतो. माझा दैनंदिन लेख ‘पुण्यनगरी’ छापायचा इतकेच ठरले होते. त्यात कुठला विषय असेल वा कसा मांडलेला असेल, त्याविषयी हस्तक्षेप होणार नव्हता. त्यामुळे मी २००९ सालात पुण्याच्या आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ असे दैनंदिन सदर सुरू केले. माझ्या स्वभाव व भूमिकेनुसार त्यात परखड सडेतोड लिखाण करताना आपोआप प्रस्थापित माध्यमे व नावाजलेल्या संपादकांचे वाभडे मी काढू लागलो.

पहिले काही दिवस पुण्याच्या आवृत्तीत प्रसिद्ध होणारा माझा दैनंदिन लेख हळुहळू ‘पुण्यनगरी’च्या अन्य जिल्हा आवृत्तीमध्येही प्रकाशित होऊ लागला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळू लागला. त्यात माझा मोबाईल नंबर छापलेला असल्याने प्रतिसाद थेट फ़ोनवरूनच मिळू लागला. पण त्याचे एक खास वैशिष्ट्य होते. ह्या खेड्यापाड्यात पसरलेल्या मराठी वाचकासाठी ‘उलटतपासणी’ हा सुखद धक्का होता. ज्यांच्या विद्वत्तेविषयी वाचकाच्या मनात शेकडो शंका होत्या आणि त्या सेक्युलर खोटेपणावर राग होता, त्याला ‘उलटतपासणी’तून दिलासा मिळू लागला होता. आमच्या मनातले लिहीता, खुपच सडेतोड, अशा प्रतिक्रिया होत्याच. पण हा कोण भाऊ तोरसेकर अकस्मात उपटला आणि सगळ्या संपादकांना थेट भादरू लागला; असा अचंबाही वाचकांच्या प्रतिक्रियेमध्ये होता. मी मागली चार दशके पत्रकार असल्याचे या नव्याने भेटणार्‍या वाचकाला अजिबात नव्हते. आणि असा कोणी अकस्मात भंपक बुद्धीवाद्यांना झोडपू लागल्याचा आनंद त्या वाचकाला लपवता येत नव्हता. बघता बघता ‘पुण्यनगरी’च्या प्रत्येक जिल्हा आवृत्तीमध्ये ‘उलटतपासणी’ अपरिहार्य होऊन गेली आणि त्यातून भाऊ तोरसेकरला प्रथमच महाराष्ट्रातला वाचक ओळखू लागला. त्यामुळे प्रथमच मोकाट सेक्युलर माध्यमांच्या भंपकपणा व खोटारडेपणाला जाहिर सवाल केले जाऊ लागले. त्यात जे कोणी वागळे, केतकर वा अन्य संपादक लोकांची दिशाभूल करत होते, त्याला खुलेआम आव्हान मिळत असल्याने वाचक कमालीचा सुखावला होता. मजेची गोष्ट म्हणजे सुखवस्तु व उच्चभ्रू वर्गामध्ये शिंगोटे यांच्या ‘पुण्यनगरी’ दैनिकाला फ़ारशी मान्यता नव्हती. पण ‘उलटतपासणी’ने तसाही वाचक त्याकडे ओढला जाऊ लागला. अगदी काही कॉलेज विद्यार्थीही वाचक म्हणून मला फ़ोन करून बोलायचे. त्यातल्याच काहींनी मला इंटरनेटवर लिहीण्याचा आग्रह अनेकदा केला. पण दोन इंजिनियरींगचे विद्यार्थी कमालीचे हट्टी निघाले. त्यांनी पत्ता घेऊन थेट घरी येऊन मला हे तंत्रच शिकवले.

गेल्या साडेचार दशकात नेहमी शाईच्या पेनने लिहायची सवय आणि तेही एकहाती विषय लिहून पुर्ण करण्याचा स्वभाव. त्यामुळे संगणाकवर टाईप करताना जो संथपणा अनुभवाला येईल, तितक्या गतीने आपण लिहू शकणार नाही, असा माझा विपरीत आत्मविश्वास होता. म्हणून त्या मुलांना मी नकार देत होतो. पण त्यांचा आग्रहही मला तितकाच महत्वाचा वाटला. त्यांचे मत असे होते, की छापलेला लेख स्कॅन करून मित्रांना पाठवायला खुप कटकटी आहेत, उलट इंटरनेटवर ब्लॉग स्वरूपात लेख टाकला तर जगात कुठूनही वाचला जाईल आणि लाखो लोकांना ते वाचायची संधी मिळू शकेल. तेवढेच नाही, ज्याला आवडला, तो आणखी आपल्या मित्रांपर्यंत पुढे पाठवू शकेल. म्हणून थोडे कष्ट व सराव करून मी इंटरनेटचे माध्यम वापरलेच पाहिजे. दोन दिवस त्या मुलांनी ठाण मांडून मला या गोष्टी शिकवल्या. तसा मी संगणक आधीपासून वापरत होतो आणि हाताशी लॅपटॉपही होता. पण मराठीत थेट टाईप करण्याचा विचारही कधी मनाला शिवला नाही. या मुलांनी ब्लॉग व फ़ेसबुकशी ओळख करून दिली आणि बरहा पॅड डाऊनलोड करून सोप्या मराठी टायपींगचे प्रशिक्षण दिले. पुढले सहासात दिवस मोकळा वेळ मिळाला, मग टायपींगचा सराव केला. तोपर्यंत थेट लेख टाईप करायचे धाडस काही मला झाले नाही. कारण जितक्या गतीने डोक्यात विचार चालू असतो, तितक्या गतीने लेखनाचा स्वभाव. चारदोन ओळी वा वाक्ये खरडून कुथत बसणे मला जमत नाही. म्हणूनच वेगाने टाईप करणे साधण्यापर्यंत हातानेच लेख लिहायचे आणि सहासात तास अखंड टायपींगचा सराव करत राहिलो. पंधरा दिवसांनी मला नेहमीच्या दीडपट वेळात लेख लिहू शकतो, असा आत्मविश्वास आला. तोपर्यंत त्या मुलांनी सुचवले तसे चारसात ओळींचे-वाक्यांचे काहीबाही लिहून फ़ेसबुकवर टाकत होतो. मात्र ब्लॉग म्हणजे संपुर्ण लांबीचा लेख लिहून ब्लॉग चालवणे शक्य झालेले नव्हते. रोजचे लेखनाचे काम संपले, मग हा सराव चालू राहिला. त्यानंतरच ‘पुण्यनगरी’ची उलटतपासणी व अन्य वृत्तपत्रिय लिखाणासाठी टायपींग सुरू केले. एकदा ते साधले, तेव्हाच ‘उलटतपासणी’ हा ब्लॉग रितसर सुरू झाला. २०१२ च्या पुर्वार्धात फ़ेब्रुवारी अखेरीस ‘पुण्यनगरी’चा लेख ‘उलटतपासणी’ या ब्लॉगवर नित्यनेमाने टाकू लागलो. फ़ेसबुकमार्फ़त त्याचा प्रसारही सुरू झाला. एका बाजूला फ़ेसबुक मित्रयादी वाढत होती आणि त्यावर लेखाचा दुवा टाकल्याने ब्लॉगची लोकप्रियता वाढत गेली. (क्रमश:)

31 comments:

 1. Bhau tumhala Shubhechcha......!!!

  ReplyDelete
 2. मला तुमचे लेखन आवडते.लिहित चला मी वाचेन. आपले खूप अभिनंदन आणि धन्यवाद वाचनाचा आनंद देण्याबद्दल

  ReplyDelete
 3. भाउ, तुमचे वाचक तुमचे ऋणी राहतील. सदैव.

  ReplyDelete
 4. ज्यांनी लोकांना तुमचे लिखाण उपलब्ध करून देण्यात मोठे योगदान दिले त्या श्री. मुरलीधर शिंगोटे यांचे आभार मानायला हवेत. कारण आजही जो सामान्य माणूस महत्वाचा आहे तो वृत्तपत्रच वाचतो. तो जास्त महत्वाचा आहे. मात्र या दोन मुलांची ही नावे द्यावीत येथे, आम्हाला हे इतके उत्तम मर्मभेदी लेख वाचायला मिळतात ते त्यांच्यामुळे, त्यांचीही नावे द्या. भाऊ आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत.

  ReplyDelete
 5. भाऊ मस्त लिहिता तुम्ही. मी तुमचे लेख गेलं वर्षभर तरी नियमित वाचत आहे.
  त्या दोन मुलांच्या हट्टामुलेच आज तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलात. सहसा जसं वय वाढतं तसं नवीन काही शिकण्याची उमेद निघून जाते. पण तुम्ही जिद्दीने इंटरनेट वर लिहिल्याचा सराव केलात हे विशेष आहे. हा नवा पैलू आज आमच्यापर्यंत पोहोचला. म्हणजे खरं पुरोगामित्व कशाला म्हणतात ते आपल्या कृतीतून दाखवून दिलत.

  नेहरूवाद नावाची बौद्धिक दिवाळखोरीची जी चळवळ गेली काही वर्ष सुरु आहे त्यामुळे खूप उबग आला होता. त्याविरोधात तुम्ही लिहिल्याच धाडस केलत ते बर झालं.

  तुम्हाला पुढील वाटचालींसाठी खूप शुभेच्छा

  ReplyDelete
 6. भाऊ, मी आपले ब्लॉग्स मागील दोन वर्षांपासून वाचतो अहे. या टिपिकल सेक्युलर भंपकबाजी मध्ये आपले ब्लॉग्स म्हणजे एक सुद्खद धक्का होता. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही नरेंद्र मोदींचे भक्त व्हायचा मोह जाणीवपूर्वक टाळला आहे. आपल्या पुढील वाटचालीसाठी आपणास अनेक शुभेच्छा

  ReplyDelete
 7. अभिनंदन आणि धन्यवाद, Pl carry on .....

  ReplyDelete
 8. आपला वाचक वर्ग वाढत चाललेला पाहूनच त्यांच्यात पोटदुखी निर्माण झाली आहे. अशा वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे उत्तम.
  कधी कोणी आडवा आला तर आम्हाला सांगा. त्याला आम्ही आडवे पाडू. पण तुम्ही लिहित जा भाऊ! आपल्याशिवाय निपक्ष भुमिका आजकाल कोणाकडूनही अपेक्षित नाही. म्हणूनच आपल्यासारख्या पत्रकाराची आम्हाला गरज आहे.

  ReplyDelete
 9. Dear Bhau...hya lekhavar pratikriyaa kaay lihu?...Garjeche naahi. Fakta ekach vinanti...LIHIT RAHA...AAMCHYASARKHE VACHAK VACHTEELACH...PAN VAACHAK divendivas vadhateelach. Subhechha. K R Vaishampayan

  ReplyDelete
 10. नेहरूवाद नावाची बौद्धिक दिवाळखोरीची जी चळवळ गेली काही वर्ष सुरु आहे त्यामुळे खूप उबग आला होता. त्याविरोधात तुम्ही लिहिल्याच धाडस केलत ते बर झालं.

  ReplyDelete
 11. भाऊ आपले दै पुण्यनगरीतील लेख आम्ही वाचले आहेत व तेव्हा पासून आपल्या ब्लोगचे आम्ही नियमित वाचक आहोत अनेक वेळा अनेक आपल्या ब्लोगच्या लिंक आम्ही शेअर हि करतो खरच आजच्या ओसाड वाळवंटी जगात आपल्या सारख्या मृगजळाची गरज आहे आपण असेच लिहित राहा आपल्याला अनेक शुभेच्छा.............

  ReplyDelete
 12. Keep on writing sir.. You speak the truth. Thanks a lot for sharing your views and enlightening us.. Congrats..

  ReplyDelete
 13. भाऊ
  शुभेच्छा। असेच लिहित रहा
  फत्तेसिंहगायकवाड

  ReplyDelete
 14. लगे रहो भाऊ… आपले लेख एक वेगळी दिशा दाखवतात आणि सध्याच्या पेड मिडीयाच्या काळात बातम्यांच्या वादळात भरकटलेल्या आमच्या सारख्या होड्यांना अशा लाईट हाउस ची खूप गरज आहे.

  ReplyDelete
 15. भाऊ ! उत्तम काम हाती घेतले आहेत आणि ते व्यक्त करण्याची असामान्य प्रतिभा पण तुमच्यापाशी आहे. हे लिखाण असेच चालू ठेवा हीच माझी व माझ्या जगभर पसरलेल्या मित्रांची विनंती. धन्यवाद व मन:पूर्वक शुभेच्छा !

  ReplyDelete
 16. bhau, most of the readers like your thout provokimg blogs, you write our mind, ketkar,wagle are polutants in journalism, wish you long life!

  ReplyDelete
 17. मी किशोर वयापासून राष्ट्रसेवादलाचा कार्यकर्ता. परंतु ८०च्या दशकाच्या उत्तरार्धात सेवादल आणि सर्वच समाजवादी चळवळीचा ताबा जातीयवादी आणि छद्म-निधर्मीवादी (Pseudo-secular) प्रवृत्तीनी घेतला. मी सेवादलात बहिष्कृत ठरलो. फेसबुक आणि अन्य सोशल मिडीयाने माझ्या विचारांना मोकळीक दिली.

  ReplyDelete
 18. भाऊ, मी अगदी सुरुवातीपासून तुमचा ब्लॉग follow केलेला आहे. नमो बद्दल च तुमच सुरुवातीच analysis अगदी परफेक्ट होत आणि तेव्हा खरच इतर माध्यम त्याची अजिबात दखल घेत नव्हते . असो, असेच लिहित रहा.बुरखे फाड़त रहा...!!
  आणि ज्या दोन इंजीनियरिंग च्या मुलांनी तुमच्या मागे लागूंन तुम्हाला ब्लॉग साठी प्रवृत्त केले त्यांना आभार ..त्यांची नावे जाहिर करा जमल तर... all the best !!

  ReplyDelete
 19. भाऊ आपले लिखाण मला व माझ्या घरच्यांना आवडते. कृपया असेच आपले लिखाण चालू ठेवावे.

  ReplyDelete
 20. म्हणजे वृत्तपत्रातील लिखाण वृत्तपत्रविहीन इंटरनेट वर आल्यामुळे वाचकवर्ग वाढला.
  आता पुढची पायरी म्हणजे तुमच्या लेखांच इंग्रजीत भाषांतर होणं. म्हणजे जगभरातली थोतांड उघडी पाडता येतील.
  तुमच्या सौदी अरेबियाला मानवाधिकार प्रमुख घोषित केलेल्या लेखाचं इंग्रजी भाषांतर होणं गरजेचं आहे भाऊ.

  ReplyDelete
 21. भाऊ; सर्वप्रथम तुमचे हार्दिक अभिनंदन. 10 लाख वाचन संख्या ही एक पायरी आहे. असा अख्खा गड चढायचा आहे.
  मी आपला ब्लॉग गेले 2-3 महिन्यातच वाचला. पण ज्या विषयावर तुम्ही लिहिताय तो न संपणारा विषय आहे. त्यामुळे उशीर काय आणि लवकर काय !! सारखे च.
  असा च एक english ब्लॉग आहे; mediacrooks.com हा .
  तो ब्लॉग लिहिणारे श्री. रवी नारायणन यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आणि त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आला आहे; तसा च आपल्यालाही भेटायचा योग यावा ही इच्छा.
  भाऊ; आपण जे काम हाती घेतले आहे बाजारु पत्रकारांना उघडे करण्याचे ते अतिशय महत्वाचे आहे. या लोकांनी सर्वसामान्य प्रेक्षकांच्या डोळ्यात धूळ फेक च केली आहे. यांचे agenda driven reporting आणि यांची मते ( opinions ) लादली आहेत. आता पण लोक जागृत होत आहेत; यांचे पितळ उघडे पडत आहे. तसे च यांना पोसणारे पण उघडे पडत आहेत. या लोकांची "अक्कल" कुठे आणि किती आहे ह्याचे रोज नवनवे पुरावे ही च लोक पुढे आणत आहेत. आणि हे presstitutes त्यांना ना लाज; ना शरम.
  तरीही भाऊ; तुम्ही लिहितच रहा. आमचे विचार च आपल्या लिखाणातून समोर उमटले की बरे वाटते.
  आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  ReplyDelete
 22. Why did u left 'Marmik' the best Weekly in Marathi.I would like to know story behind it.

  ReplyDelete
 23. <>

  मी कुठल्याही विचारसरणीला किंवा माझी बुद्धी कोठल्याही भूमिकेच्या दावणीला बांधलेली नाही. पण मी तुमचा ब्लॉग वाचणे आता बंद करणार आहे. कारण तुम्ही सध्या मात्र एका प्रतिगामी विचारसरणीला बांधलेले आहात.

  आपल्यासारखा मराठी माध्यमातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, तार्किक, बुद्धिमान, व्यासंगी, अभ्यासू पत्रकार, तसेच कोणी एके काळचे समाजवादी, पुरोगामी विचारसरणीची व्यक्ती गेली काही वर्षे सातत्याने कशाही पद्धतीने, कोठल्या तरी तार्किकतेने संघीय विचारसरणींची, मोदींची, कडव्या हिंदुत्ववादी सारख्या लोकांची भलामण करत आहे.

  त्यामुळे मी आपणासारख्या ज्येष्ठ, मार्गदर्शक मित्रांना माझ्या मित्र यादीतून सन्मानपूर्वक निवृत्त करीत आहे. क्षमस्व......

  ReplyDelete
 24. भाऊ! आपण आपले विचार ज्या निर्भीडपणे मांडता त्याचा नवीन पिढीवर निश्चित पगडा बसत चालला आहे. आपण राजकारण्यांच्या दांभिक पणावर नेमके बोट ठेवता व त्यांचा पर्दा-फाश करता हे नवीन पिढीस रुचू लागले आहे. आपण असेच लिहित रहावे त्यामुळे आपण घेतलेला 'वसा' पुढे चालवण्यास अनेकांना स्फुर्ती मिळेल.

  ReplyDelete
 25. धन्यवाद भाऊ

  ReplyDelete
 26. भाऊ! आपण आपले विचार ज्या निर्भीडपणे मांडता त्याचा नवीन पिढीवर निश्चित पगडा बसत चालला आहे. आपण राजकारण्यांच्या दांभिक पणावर नेमके बोट ठेवता व त्यांचा पर्दा-फाश करता हे नवीन पिढीस रुचू लागले आहे. आपण असेच लिहित रहावे त्यामुळे आपण घेतलेला 'वसा' पुढे चालवण्यास अनेकांना स्फुर्ती मिळेल

  ReplyDelete
 27. प्रिय भाऊ,

  माझ्या घरात झुरळ झालेत म्हणून काल रात्री केमिकल चा जरा फवारा केला मी....जसं केमिकल मारायला सुरवात केली तशी सगळी झुरळ जाम पळायला लागली...उलटी झालेली पाय झाडायला लागली....
  मला असा वाटत. तुम्ही लिहिता म्हणून काही झुरळांची अशीच अवस्था झाली असेल का हो भाऊ ?

  विनोद बाजूला पण भाऊ तुम्ही खरच लिहित राहा...
  तुम्ही लिहून आम्हाला मार्गदर्शन करताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...!

  ReplyDelete
 28. उलटतपासणी वाचण्यासाठीच मी पुण्य नगरी घ्यायचो तेव्हा. ..
  लातूर मराठवाड्याकडील काही मुस्लिम तरुणांनी फोन करून आपल्याशी वाद घातल्याचे तर काहींनी आपण योग्य लिहिले असल्याचे बोलल्याचे आपण सांगितले होते. .. तुम्ही नव्या पिढीशी मागील पिढीचा दुवा जोडता.. सदिच्छा ☺

  ReplyDelete
 29. आदरणीय सरांच्या लिखाणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  ReplyDelete