Friday, October 2, 2015

काश्मिर गमावण्याला घाबरलाय पाक?



जानेवारीतली गोष्ट आहे. मुंबईतल्या एका समारंभात बोलताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एक गंभीर विधान केले होते. ते नवे असल्याने बोलताना गडबडले असे अनेकांना वाटले होते. पण पर्रीकरांच्या विधानातला सूचक इशारा समजून घेण्याची कोणाला गरज वाटली नव्हती. तशी पुढे आणखी काही गंभीर विधाने पर्रीकरांनी केली किंवा इतरही महत्वाच्या व्यक्तींनी केली. अशा विचित्र वाटणार्‍या विधान वक्तव्यातून परस्पर कुणाला तरी संदेश-संकेत दिले जात असतात. ते सामान्य विचार करणार्‍यांसाठी नसतात, तर धोरणात्मक विचार करणार्‍यांसाठी असतात. उदाहरणार्थ जानेवारीत पर्रीकर ‘डीप असेट’ या विषयावर बोलले होते. भारताच्या दोघा माजी पंतप्रधानांनी आपले डीप असेट उघडे पाडले, असे त्यांचे विधान कुठल्या माजी पंतप्रधानविषयी होते, यावरून कल्लोळ झाला. पण तसे डीप असेट असते तर आपण खुप मोठी भेदक सुरक्षा करू शकलो असतो, या पर्रीकरांच्या पुढील विधानाची गंभीर दखल घेतली गेली नाही. त्याचा अर्थ असा होता, की पुर्वीच्या कुणा दोन पंतप्रधानांनी भारताचे महत्वाचे हस्तक व हेर गमावले, म्हणून शत्रूला शिरजोर होणे शक्य झाले. पण आता आपण पुन्हा आपले हस्तक निर्माण करू व त्यांचा शत्रूच्याच प्रदेशात वापर करू; अशी ती धमकी होती. त्याची चुणूक मग भारताच्या सागरी हद्दीत घुसलेल्या एका पाक नौकेवरील स्फ़ोटा्तून बघायला मिळाली होती. पुढे पर्रीकरांनी आणखी एक असे गंभीर विधान केले होते. पाकिस्तान दहशतवादाचा अवलंब करीत असेल, तर आम्हीही काट्याने काटा काढण्याची निती अवलंबू. त्याचा अर्थ दोन जिहादी गटात झुंज लावून देणे असा होतो, तसाच पाकिस्तानी नितीच सुरक्षेच्या बाबतीत उलटवू; असाही होतो. ज्यांना त्याचा पुरावा हवा असेल, त्यांनी आता इतके महिने उलटल्यानंतर अकस्मात व्याप्त काश्मिरात उफ़ाळलेला असंतोष बघावा.

जेव्हा न्युयॉर्कमध्ये राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर पाकचे पंतप्रधान कास्मिरचे रडगाणे गात होते, तेव्हा इथे पाकव्याप्त काश्मिरात हजारो लोक अनेक शहरात रस्त्यावर येऊन आम्हाला भारतात जायचे आहे म्हणून घोषणा देत होते. अशी निदर्शने उत्स्फ़ुर्त असल्याचे भासवले जात असते. जसे अनेक भारतीय पत्रकार पाकमैत्रीच्या गप्पा मारत असतात. ते अजिबात उत्स्फ़ुर्त वक्तव्य नसते. त्यांचा बोलविता धनी तिकडे पाकिस्तानात बसलेला असतो. इथे श्रीनगरमध्ये पाकचे झेंडे फ़डकावणारेही उत्स्फ़ुर्त पाकप्रेमाने असे उद्योग करीत नाहीत. त्यांच्या भोवतालची गर्दी कदाचित उत्स्फ़ुर्त भासणारी असते. पण प्रासंगिक भावनांचे भांडवल करून इथले पाक हस्तक अशी नाटके घडवून आणत असतात. हे नाटक पाकिस्तान इथे भारतीय हद्दीत घडवू शकत असेल, तर भारताला तशाच नाटकाचे प्रयोग पाकिस्तानात करता येणार नाहीत काय? ते करू शकणार्‍यांना ‘डीप असेट’ म्हणतात. घडवून आणणारे स्थानिक असतात, पण त्यांचा बोलविता धनी परदेशी वा शत्रू राष्ट्रात बसलेला असतो. पाकव्याप्त काश्म्रिरातील निदर्शनांसाठी स्थानिक असंतोषाचे भांडवल नक्कीच करण्यात आलेले आहे. पण त्यामागे भारताचा हात नाही, असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. पाक सरकार तसा खुला आरोप करते आणि भारत सरकार त्याचा ठामपणे इन्कार करते. पण त्यात तथ्य नाही. मात्र असे आजवर होत नव्हते आणि आताच अकस्मात ह्या घटना घडू लागल्या आहेत. तेव्हा त्याचे धागेदोरे आपल्याला संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी जानेवारीत दिलेल्या संकेतातून मिळू शकतात. मात्र त्याचे पुरावे देता येणार नाहीत. कारण अशा हस्तक वा असेटचा कुठला पुरावा साक्षिदार ठेवला जात नसतो. पण काळजीपूर्वक धागेदोरे तपासले, तर याची सुरूवात पर्रीकरांनी बोलण्यापुर्वीच झाली होती, हे लक्षात येऊ शकते. वर्षभरापुर्वीची एक बातमी त्याचा संकेत देते.

(अंजुमने मिन्हाज ए रसुल समाजसेवी संस्थेचे मौलाना सय्यद अत्तार दहलवी)



साधारण वर्षभरापुर्वी अवघा काश्मिर त्सुनामी आल्यासारखा बुडाला होता. तेव्हा हिरवे वा पाकिस्तानचे झेंडे फ़डकावणारे शेपटी घालून भारतीय सैन्याने वाचवावे, म्हणून धाय मोकलून रडत होते. अगदी ज्यांना पाकिस्तानात जाण्याची खाज आहे, असे हुर्रीयतवाले किंवा फ़ुटीरवादी संघटनांचे नेतेही अगतिक होऊन भारतीय सेना मदतीला येण्याची प्रार्थना करीत होते. त्याच काळात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिकडे धाव घेतली आणि बचाव कार्याचा स्वत: आढावा घेतला होता. तिथे दोन आठवडे मुक्काम ठोकून गृहसचिवांना थेट देखरेख करायला लावले होते. तेवढ्यावर न थांबता मोदींनी पाकव्याप्त काश्मिरातही भारतीय सेनेला बचावकार्यासाठी धाडण्याची तयारी दर्शवली होती. कारण तिथे तर पुरग्रस्त काश्मिरीचे हाल कुत्राही खात नव्हता. थोडा पाण्याचा भर ओसरल्यानंतर व्याप्त काश्मिरातील एक मौलाना सय्यद अत्तार दहलवी भारतीय काश्मिरात आले होते. अंजुमने मिन्हाज ए रसुल नावाची समाजसेवी संस्था ते व्याप्त काश्मिरात चालवतात. इथले भारतीय सेनेचे मदतकार्य बघून ते इतके भारावले, की व्याप्त काश्मिरी भारतात सहभागी व्हायला एकमताने तयार होतील, असे जाहिर विधान त्यांनी तेव्हा म्हणजे गेल्या नोव्हेंबरमध्ये केले होते. त्यांच्या त्या व अन्य विधानातून पाकव्याप्त काश्मिरी कसा व किती वैफ़ल्यग्रस्त आहे, त्याचा सुगावा लागला होता. तिथून मग पुढे काय करायचे असते, त्याचे मुद्दे वेगळे सांगण्याची गरज नाही. पुरग्रस्त व्याप्त काश्मिरींच्या वेदना ताज्या असताना हेच मौलाना दहलवी माघारी गेल्यावर तिथे काय बोलले असतील? त्यातून तिथल्या पुरग्रस्तांना आपण कुठल्या नरकात पडलोय, त्याची जाणिव निर्माण होणे स्वाभाविक नाही काय? भारतीय हद्दीतल्या काश्मिरींसाठी भारत सरकार सर्व मदत करते आहे आणि आपल्यालाही मदत द्यायला राजी आहे. पण पाक सरकारने मोडता घातला तर ते काश्मिरी कसा विचार करतील?

सुरूवात तिथून झालेली असू शकते. विनाविलंब भारतातील काश्मिरींना मिळालेली मदत आणि पाकव्याप्त काश्मिरीकडे पाक सरकारने केलेले दुर्लक्ष, हा कळीचा मुद्दा आहे. याच ठिणगीच्या आगीत तेल ओतले, तर तिथे भडका उडणारच ना? असे काम तिथे शत्रू राष्टाचे हस्तक करू शकतात. पाकिस्तान जर भारताला शत्रू समजत असेल तर हे हस्तक कोणाचे असू शकतात? इथल्या फ़ुटीरवाद्यांना पाकचे राजदूत भेटतात व फ़ुस लावतात. तर भारताने तसाच प्रयोग उलटा करण्यात काय गैर आहे? दहा महिन्यांनी त्याचाच आगडोंब उसळला नसेल, असे कोणी खात्रीपुर्वक सांगू शकतो काय? नोव्हेंबर २०१४ ते सप्टेंबर २०१५ हा काळ थोडा नाही. प्रत्येक लढाई बंदूकीने लढवली जाते असे नाही. अनेकदा नुसते डावपेचही खतरनाक परिणाम घडवून आणू शकतात. भारतातल्या फ़ुटीरवाद्यांना पाकिस्तान काट्यासारखा वापरत असेल, तर काट्याने काटा म्हणजे व्याप्त काश्मिरातील पाकविरोधी घटक असू शकतात ना? पर्रीकर काय म्हणतात, त्याचा अर्थ लावायचा तर मुझफ़्फ़राबाद, कोटली अशा पाकव्याप्त काश्मिरातील ताज्या घडामोडींकडे बारकाईने बघावे लागेल. जुन्या नव्या अनेक लहानसहान दुर्लक्षित बातम्यांचे संदर्भ जोडावे लागतील. उठसुट पाकचे जुनेनवे सेनाधिकारी अण्वस्त्रांच्या उपयोगाची धमकी देण्यापर्यंत आक्रस्ताळी भाषा कशाला बोलतात, त्याचाही आढावा घ्यावा लागेल. सर्वात शेवटचे हत्यार सर्वात आधी वापरण्याची धमकी, हे भितीचे लक्षण असते. कारण आता पाकिस्तान नुसता युद्धाला घाबरलेला नाही, तर व्याप्त काश्मिर मोकळा करून ताब्यात घेण्याची कारवाई भारतीय सेना करील, अशा भितीने पाकिस्तानला पछाडले आहे. म्हणून घाईगर्दीने चार महिन्यापुर्वी व्याप्त काश्मिरात प्रथमच मतदान घेण्यात आले आणि आता तिथे हजारो लोक रस्त्त्यावर उतरून भारतात सहभागी व्हायच्या घोषणा देऊ लागल्यावर, थेट लष्कराला पाचारण करून मोर्च्यावर अत्याचार करावे लागले आहेत. भारतातल्या काश्मिरींवर सैनिकी कारवाई होते म्हणून आजवर आक्रोश करणार्‍या पाकिस्तानला, व्याप्त काश्मिरात मुजाहिदीन व तोयबा तैनात असताना, सैनिकी बळ वापरणे भाग पडले, यातच दिड वर्षातला फ़रक लक्षात येतो. पर्रीकरांच्या विधानाचे तथ्य स्पष्ट होऊ लागते.

5 comments:

  1. असुनही वापरात नसल्यामुळे पडुन राहिलेली सुविधा नव्या सुनेनं वापरणं सुरु केलंय! now life will be easier !

    ReplyDelete
  2. Bhau ... Mast ekdum ... Abhyaspurn... Apratim.... Keep it up

    ReplyDelete
  3. ''These are trying times, and Pakistan just has to power through. There is no conciliation forthcoming from the BJP govt.The BJP might hopefully lose it's power soon,and maybe we can start again with a more level headed govt" These are the words from today's editorial article (3 Oct) ' The Indian Terror' in Pakistan's national daily ' The nation'.

    ReplyDelete
  4. Bhau Ekdam Chan manatly tumhi sangitle

    ReplyDelete