Monday, October 26, 2015

छोड आये हम वो गलिया!मानवी आयुष्यात व जगण्यात काही मुक्काम असे असतात, जे मैलाचे दगड मानले जातात. जसे भौगोलीक व्यवहारात मैलाचे दगड असतात, तसेच साहित्य संस्कृती वा सभ्यतेच्या, श्रद्धांच्या वाटचालीतही मैलाचे दगड असतात. ज्यांच्याकडे बघून लोक अर्थ लावत असतात. त्यात भेसळ झाली, मग जगण्याचा पाया ठिसूळ होऊन जातो. मुंबई कशाला म्हणतात किंवा मैल-किलो यांचे एक प्रमाणबद्ध माप असते. त्यात कमीजास्त होऊ लागले, की त्यांचे अर्थ लावणे सामान्य माणसाला अवघड होऊन जाते. किलोमिटर्स वा किलोग्राम ही वजने मापे असली, तरी साधारण नजरेने वा उचलण्यानेही लोकांना त्याचे अंदाज बांधता येत असतात. म्हणूनच जगताना प्रत्येक वेळी कोणी मोजपट्टी वा तराजू घेऊन तपासण्याच्या फ़ंदात पडत नाही. लांबीरुंदी वा वजन अनुभवानेही कळते. त्यात किंचित थोडीफ़ार तफ़ावत असल्याने बिघडत नाही. हे समजण्याइतका सामान्य माणूस व्यवहारी असतो. तसे नसते तर कुठल्याही दुकानात वा बाजारात कोट्यवधी व्यवहार रोजच्या रोज होऊच शकले नसते. प्रत्येक जागी तोळामासा इंच सेन्टीमिटर मोजत हुज्जती होत राहिल्या असत्या. पण तसे सहसा होत नाही. कारण किंचित कुठे फ़ेरफ़ार वा तफ़ावत असू शकते आणि त्यामुळे फ़ारसे बिघडत नाही. इतकी जाण सामान्य माणसाला असते. पण गणिती माणूस असला तर त्याचे व्यवहारी जगात झगडे होतात आणि त्याला व्यवहार उरकणे अशक्य होऊन जाते. तो सतत तक्रार करत रहातो. अशावेळी त्याला समजूतदार बनवणे, हे समाजातील जाणत्यांचे काम असते. ज्याला आपण मुंबई वा दिल्ली असे संबोधतो, त्या प्रचंड भूप्रदेशातील त्या शब्दांनी व्यक्त होणारा भूप्रदेश नेमका कुठला, त्यावर बोट ठेवता येत नाही. म्हणूनच तसा कोणी हट्ट करील तर तर्कबुद्धीने त्याचा दावा खरा असला, तरी लोक त्याच्याकडे कोणत्या नजरेने बघतील?

आमची अवस्था आज काहीशी अशीच झाली आहे. प्रामुख्याने गुलजार या साहित्यिक कलाकाराने जे मतप्रदर्शन कालपरवा व्यक्त केले, त्यामुळे आजवरच्या त्यांच्याविषयी असलेल्या श्रद्धेला मोठाच धक्का बसला. गेल्या काही दिवसात अनेक साहित्यिक वा लेखकांनी सन्मान परतीचा खेळ सुरू केला त्याचे फ़ारसे काही वाटले नव्हते. पण गुलजार यांच्या सर्जनतेविषयी शंका घेता येत नाही. अशा प्रतिभावंतानेही पुरस्कृतांच्या रांगेत जाऊन बसावे, याची खंत वाटली. त्याचेही कारण आहे. ज्या अनुभवातून हा सर्जनशील कलावंत लेखक गेलेला आहे, त्याची पुसटशीही कल्पना अन्य पुरस्कृत लेखकांना कधी आलेली नसेल. आज अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी चालू आहे आणि संहिष्णुतेचा संकोच होतो आहे असे इतरांनी म्हणणे समजू शकते. कारण त्यांना त्यातला काही अनुभवच आलेला नाही. पण गुलजार यांचे तसे नाही. त्यांनी आणिबाणीच्या झळा सोसलेल्या आहेत. जो अन्याय झाला, त्याबद्दल बोलायचीही त्यांना हिंमत झाली नाही, अशा अनुभवातून गेलेला हा कलावंत, त्याकडे साफ़ पाठ फ़िरवून असे कधी झालेच नव्हते ही भाषा बोलतो, तेव्हा मनाला खरेच वेदना होतात. ‘आंधी’ हा गुलजार यांचा दिग्दर्शित केलेला पहिला अजरामर सिनेमा आहे. त्यातली नायिका राजकीय पात्र वा तिची वेशभूषा इंदिरा गांधींसारखी होती. तेवढ्याच कारणास्तव आणिबाणीच्या आरंभीच तो चित्रपट दाखवण्यावर प्रतिबंध घातला गेला होता. आपल्या कलाजीवनातील पहिला अविष्कार असा कुठलेही कारण न देता मुस्कटदाबी करून दडपला गेला असताना, त्याचा दाहक अनुभव गुलजार यांना आलेला नाही, असे कोणी म्हणू शकेल काय? की त्याच्यापेक्षा आजचा अनुभव दाहक भयानक आहे, असा दावा करता येईल काय? आज असंहिष्णूतेचा येणारा अनुभव प्रथमच घेत असल्याचे गुलजार यांचे कथन म्हणूनच चकीत करणारे आहे.

त्याचे दोन अर्थ होतात. आणिबाणीत ज्या मुस्काटदाबीने गुलजार यांना वेदना बोलायचीही हिंमत होऊ शकली नव्हती, तो अनुभव सुसह्य होता किंवा लोकशाहीसाठी योग्य होता. उलट आज पंतप्रधान वा सरकारच्या निंदानालस्तीचे दालन खुले असतानाही कलावंताला जाचक अनुभवातून जावे लागते आहे, असे गुलजार यांना म्हणायचे असावे. त्यांना असे अनुभव येत असतील, तर मग त्यांच्या आणि सामान्य माणसाच्या अनुभवामध्ये जमिन अस्मानाचा फ़रक आहे. कारण ते अन्यालाला न्याय म्हणत असून कल्पनेतील भितीने भयग्रस्त झालेले आहेत. आणिबाणीचीही गोष्ट बाजूला ठेवा. दोन दशकापुर्वी गुलजार यांनीच ‘माचिस’ नावाचा चित्रपट बनवला होता. ज्यात खलिस्तानी दहशतवादाचे कथानक होते. तेव्हाची परिस्थिती सुसह्य होती काय? कुणाही नेत्याची, धर्मगुरूची वा लेखक संपादकाची दिवसाढवळ्या हत्या व्हायची. पंजाब केसरीचे संपादक वा संत लोंगोवाल ते इंदिरा गांधी अशी लागोपाठ हत्याकांडे झालेली होती. नुसत्या संशयावरून दिल्लीतच पाच हजार शिखांचे हत्याकांड झालेले होते. त्या सर्व अनुभवाविषयी गुलजार यांना जे काही वाटले, त्यावर त्यांनी ‘माचिस’ चित्रपटाचे कथानक बेतलेले व रंगवलेले होते. पण त्यावेळी कधीही व कुठेही त्यांनी समाजात असहिष्णूता फ़ोफ़ावत असल्याची तक्रार केल्याचे कुणाच्या वाचनात वा ऐकीवात नाही. मग साहित्य अकादमीच्या सन्मानाने विभूषित झालेल्यांची हत्या म्हणजेच सहिष्णूता संपत असल्याचा कुठला मापदंड आहे? असेल तर तेही गुलजार यांनी याचवेळी स्पष्ट करायला हवे होते. नसेल तर मग त्यांना भयभीत करणारी असंहिष्णूता व सामान्य माणसाच्या आयुष्यातील प्रत्यक्ष अनुभवाला येणारी संहिष्णूता, यांच्या व्याख्येतच काही मुलभूत फ़रक पडतात. आजवरची गुलजार यासारख्यांची संवेदनशीलता सामान्य माणसाच्या अनुभवाशी जवळून निगडित होती. आज तसे का वाटू नये?

‘माचिस’ चित्रपटाचे कथानक रंगवताना गुलजार असे कुठल्याच एका बाजूला झुकलेले नव्हते. जितक्या ठामपणे त्यांनी सरकारी दडपशाही व पोलिसी अत्याचारावर रोख ठेवला होता, तितक्याच तटस्थपणे त्यांनी खलिस्तानी दहशतवादाकडे झुकलेल्यांच्या मानसिक अवस्थेचा वेध घेतला होता. एकामेकात गुंतलेल्या त्या बेबनावाचे सुयोग्य विश्लेषण करणारे कथानक गुंफ़लेले होते. आज त्याच्याही जवळपास जाण्याइतकी स्थिती नसताना गुलजार यांचा तोल गेलेला जाणवतो. आपल्या त्या तटस्थपणे मांडणी करण्याच्या गुणाला गुलजार पारखे झालेत काय? त्यांच्याच त्या ‘माचिस’ चित्रपटातले दहशतवादाच्या आहारी गेलेल्या तरूणांना पुर्वस्मृतींनी व्याकुळ करणार्‍या एका गीताची आठवण इथे झाल्याशिवाय रहात नाही. ‘छोड आये हम वोह गलिया!’ ते तरूण जीवावर उदार होऊन सत्तेशी बंडखोरी करत हिंसा माजवत असतात आणि त्यांना पुर्वायुष्यातल्या सुनहर्‍या आठवणीही व्याकुळ करत असतात. आपण त्या सुंदर आयुष्यातून कुठे कसे भरकटत आलो, त्याच्या वेदना व्यक्त करणारे इतके सुंदर काव्य रचणार्‍या गुलजार यांनी साहित्य अकादमीच्या पुरस्कार वापसीच्या निमीत्ताने व्यक्त केलेले मत वा घेतलेली भूमिका, म्हणूनच व्याकुळ करणारी आहे. आपल्या त्या सृजनशील, तटस्थ व राजकारणबाह्य परिसरातून गुलजारही कुठे भरकटले, असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. आजवरचे त्यांच्या सृजनशील मनाला अनुभवातून व्यक्त व्हायला भाग पाडणारे मन, गुलजारना सोडून कुठे पोहोचले आहे? वास्तवाला कल्पनेच्या मुशीत घालून एक अप्रतिम कलाकृती घडवणारा शिल्पकार कुठे बाजारू मुर्ती घडवणार्‍यांच्या रांगेत येऊन उभा राहिला? याची वेदना गुलजार यांच्या खर्‍या चहात्यांना व्यथित केल्याशिवाय रहाणार नाही. कारण आज जी स्थिती आहे. त्यापेक्षा भयंकर अनुभवातून गुलजार व्यक्तीगतरित्या गेलेले आहेत. अनुभवाला झुगारणारा त्यांचा मापदंड म्हणूनच कलेला शरमिंदा करणारा आहे.

6 comments:

 1. कोणाला आपले मत व्यक्त करण्याचा हक्कच नाही की काय? देश वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असताना गुलजार यांनी त्यावेळी काहीच मतप्रदर्शन केले नव्हते असे का ग्ृहित धरले आहे? त्यामुळे गुलजार यांच्यासारख्या संवेदनशील व्यक्तिला जे वाटले ते समजुन घेता आले तर ठीक, पण तसे नाही करता आले तर तो तुमचा दोष, त्यांचा नव्हे. मात्र यावरून त्यांच्यावर टीका करणे तर साफ चूक.

  ReplyDelete
 2. सहमत!!
  प्रतिभावंतदेखिल सदासर्वकाळ योग्य भूमिका घेतात असे नाही.
  त्यांच्या व्यक्तिगत समज अपसमज,धारणा व असुसंगत भूमीका असणं हे मानवी लक्षण!!
  त्याकडे आदरभाव व आपुलकी न दुखावता दुर्लक्ष करणेच रास्त!

  ReplyDelete
 3. Kay baat hain Bhau.Very true analysis.

  ReplyDelete
 4. गुलझार यांना मायोपिया की अल्झायमर ?
  इतकी टोकाची असहिष्णुता कधीच अनुभवली नव्हती (२५ ऑक्टोबर ) ही बातमी वाचली . गुलझार उर्फ संपूर्ण सिंग कालरा यांनी सध्याच्या सामाजिक वातावरणावर बोट ठेवताना हे विधान केले आहे. पुढे ते असेही म्हणतात की व्यक्तीला नाव विचारण्या आधी त्याचा धर्म विचारला जात आहे . गुलझार आज ८१ वर्षाचे आहेत त्यांच्या वयाच्या ४१ व्या वर्षी त्यांच्या आंधी सिनेमाला प्रदर्शित होऊन दिलं नव्हतं ती सहिष्णुता होती ??
  त्यांच्या वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांच्याच समाजातील शीख बांधवांचे दिल्लीत झालेले अमानुष हत्या कांड त्यांना आठवत नाही ? ती सहिष्णुता होती का ? दिल्लीतील रस्त्यारस्त्यावर दाढी आणि पगडी पाहून झालेला रक्तपात हा जात धर्म विचारण्याचा च प्रकार नव्हता का ?
  आपला राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी काही लेखकांना फशी पाडून पुरस्कार परत करायला लावणाऱ्या षडयंत्राला अशा संवेदनशील कवीने बळी पडता काम नये. आम्हा रसिकांना आता प्रश्न असा पडला आहे की आमच्या लाडक्या कवीला फक्त ठराविक दिसणारा मायोपिया झाला आहे की विस्मरण रोगाने त्यांना ग्रासले आहे?
  गेट वेल सून गुलझार जी !

  ReplyDelete
 5. भाऊ यांच्यावर कॉंग्रेसने त्यांचा नेत्यांनी आणि पाकिस्थानी सरकारने कितीही मुस्कटदाबी केली तरी त्यांना चंद्राप्रमाणे शीतल वाटणारच यांच्या मनात आणि पोटात जातीयवाद भरला आहे तो कोण काढणार यांना भाजपचे हिंदुत्वादी सरकार आले आहे याचेच दुख आहे याला कितीही जालीम औषध दिले तरी काहीही फरक पडणार नाही

  ReplyDelete
 6. ना किसी धर्म के साथ , ना किसी धर्म के खिलाफ ,
  सच्चे हिन्दुस्तानी की आवाज दुनिया में बुलंद होने का गर्व महसूस करता हूँ //

  स्वच्छ भारत अभियान , निर्मल गंगा , जनधन और अन्त्योदय से ,
  हर एक गरीब की आवाज बुलंद होने का गर्व महसुस करता हूँ //

  पड़ोसियोंकी ईट का जवाब पथ्थर से और गोली का जवाब गोलेसे देनेवाली ,
  छप्पन इंच की छाती होने का गर्व महसूस करता हूँ //

  ना किसी ने मेरी जाती पूंछी , ना किसी ने धर्म,
  वसुधैव कुटुम्बकम पर श्रद्धा रखनेवाली जीवन पद्धति का हिस्सा होने का गर्व महसूस करता हूँ //

  साठ साल तक पुरस्कारोंसे दबा पडा अपना आवाज बुलंद करनेकी आजादी,
  साहित्यकारोंको आज मिली इसका भी गर्व महसूस करता हूँ ///

  मिलिंद कुलकर्णी.
  ९८२२०२०९७४

  ReplyDelete