Wednesday, October 28, 2015

गॅलिलीओ विज्ञाननिष्ठ नव्हता हे नशीब!तुमच्या माझ्यासारख्यांच्या जगाचे एक नशीब असे की गॅलिलीओ याच्यासारखे बहुतांश वैज्ञानिक व शास्त्रज्ञ संशोधक हे कधीच विज्ञाननिष्ठ नव्हते, तर अंधश्रद्ध असावेत. अन्यथा त्यांनी आपले संशोधन कार्य सोडून तेव्हाच्या जगाला व त्यातल्या धर्ममार्तंडांना पुरोगामी बनवण्याचा ध्यास घेतला असता आणि पुढले बहुमोलाचे संशोधन होऊच शकले नसते. कारण तेव्हा तर आजच्यापेक्षा धर्मश्रद्धा कडव्या व पक्क्या होत्या. कुणाची धर्माच्या विरोधात बोलायची बिशाद नव्हती. कारण धर्म आणि सत्ता एकत्र नांदत होते. पर्यायाने धर्माचे तत्वज्ञान हीच विचारसरणी असायची आणि धर्माचे प्रमाणपत्र मिळवून सत्ताधीश कुठलीही मनमानी करायला मोकळा होता. धर्मसत्तेच्या पाठीशी राजकीय सत्ता ठामपणे उभी असल्याने धर्माच्या तत्वज्ञानाला आव्हान म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण होते. अशा वेळी धर्माने जगाचे जे आकलन केले व सांगितलेले असायचे, तेच अंतिम सत्य होते. त्यानुसार पृथ्वी सपाट होती आणि चंद्र-सूर्य तिच्याभोवती फ़िरायचे. उगवायचे आणि मावळायचे. गॅलिलीओने दुर्बिणीतून ग्रहतार्‍यांचा अभ्यास सुरू केला आणि पृथ्वी हे विश्वाचे केंद्र नसून सूर्याभोवती फ़िरणारा पृथ्वी हा एक ग्रहमालेतील गोळा असल्याचे शोधून काढले. पण ते सत्य तिथला धर्मग्रंथ बालबलच्या कथेशी जुळत नव्हते. सहाजिकच गॅलिलीओने धर्मालाच आव्हान दिलेले होते. त्याला विनाविलंब धर्मसत्तेने पाचारण केले आणि जाब विचारला. त्यांची समजूत घालताना गॅलिलीओ वैफ़ल्यग्रस्त झाला आणि त्याने हार मान्य केली. आपण मुर्खपणा केल्याचे मान्य करून त्याने धर्ममार्तंडांची माफ़ी मागितली. पण त्याने आपले संशोधन थांबवले नाही आणि त्याच्या संशोधनात धर्माने कुठली आडकाठी आणली नाही. पर्यायाने जगाला नवनव्या सत्यांचा साक्षात्कार घडू शकला. आपले हे केवढे मोठे भाग्यच नाही काय?

समजा गॅलिलीओ संशोधन थांबवून त्या धर्ममार्तंडांशी वाद घालत बसला असता, तर त्यांचीच समजूत घालण्यात त्याचे उर्वरीत आयुष्य खर्ची पडले असते. त्याला पुढले संशोधन करण्यासाठी वेळच मिळाला नसता. शिवाय तशी वेळ येण्य़ाचीही शक्यता कमीच होती. धर्मातले पाखंड अमान्य करण्यासाठी दोषी ठरवून त्याला फ़ाशीच दिले गेले असते. तर पुढल्या संशोधनाचा प्रश्नच आला नसता. त्याची जाणिव झाल्यानेच गॅलिलीओने त्या धर्ममार्तंडांना समजावण्यापेक्षा त्यांचा मुर्खपणाच शहाणपणा असल्याचे मान्य करून टाकले. त्यामुळे ते मुर्ख खुश झाले व त्यांनी या संशोधकाला त्याचे काम करायला मोकळे सोडून दिले. यातला गॅलिलीओचा शहाणपणा समजून घेतला पाहिजे. ज्यांना समजूनच घ्यायचे नसते, त्यांना समजावण्यात अर्थ नसतो. आपले पुर्वज त्यालाच पालथ्या घड्यावर पाणी असे म्हणत आले. पोप वा त्याच्या धर्मसभेला वैज्ञानिक सत्य समजून घ्यायचे नव्हते, मग ते समजावण्यात काय अर्थ होता? तेव्हा त्यांच्या मुर्खपणाला मान्यता देऊन त्यांना समाधानी करण्याचा मार्ग गॅलिलीओने पत्करला. हे तेव्हा त्याच्यासाठी लाभाचे होते. पण आज आपल्यासाठी किती लाभदायक ठरले, ते आपण अनुभवत आहोत. मग त्या अर्थाने गॅलिलीओला अंधश्रद्धच म्हणायला नको काय? कारण त्याने आपलेच संशोधन नाकारून धर्ममार्तंडांना खुश करायला त्यांचे गैरसमज विज्ञान असल्याचे मान्य करून टाकले होते. कारण त्याला एक वैश्विक सत्य नेमके ठाऊक होते. जेव्हा विज्ञानाचे लाभ दिसू लागतात व अनुभवास येतात, तेव्हा सर्वसामान्य माणूस विज्ञानाचे अनुकरण करतोच. एकदा बहुसंख्य लोक विज्ञान स्विकारू लागले, मग त्यांच्यापुढे धर्माचा मस्तवालपणा टिकून रहात नाही. आपण लावत असलेल्या शोधांमुळे आपोआप धर्माची महती कमी होणार व जगाला विज्ञान स्विकारावे लागणार, याचा आत्मविश्वासच त्या संशोधकाला ‘पुरोगामी’ व्हायला उपयुक्त झाला.

आता आजच्या युगात येऊन आपण विज्ञाननिष्ठ लोकांच्या चळवळी व संघटना बघितल्या, तर ते कमालीचे विज्ञाननिष्ठ असतात आणि त्यांच्यापुढे गॅलिलीओही पक्का अंधश्रद्ध वाटावा. मध्यंतरी दाभोळकर यांच्या हत्येचा शोध घेणार्‍या पोलिस अधिकार्‍याने प्लॅन्चेटची मदत घेण्याचा प्रयत्न केल्यावरून काहुर माजले होते. इथपर्यंत ठिक होते. पण त्याच बाबतीत परदेशात काही पोलिस अधिकारी अशाप्रकारेही गुन्ह्यांचा शोध घेतात, असे विजय भटकर या शास्त्रज्ञाने बोलताच त्याच्यावर आपले महान विज्ञाननिष्ठ तुटून पडले. थोडक्यात काय विज्ञानाची पुस्तके वाचून कुठलाही शोध न लावलेले हे विज्ञाननिष्ठ खर्‍या वैज्ञानिकालाही मुर्ख ठरवू शकतात. जसे त्याकाळी पोपच्या धर्मसत्तेने गॅलिलीओला मुर्ख ठरवले होते. भटकर यांनीही बहुधा गॅलिलीओचे अनुकरण केले. कारण धर्ममार्तंड असोत की आधुनिक भारतीय विज्ञाननिष्ठ असोत, त्यांना कोणी सत्य समजावू शकत नाही. कारण ते सर्वज्ञ असतात. भटकर हे असे एकमेव शास्त्रज्ञ वा संशोधक नाहीत. इस्रो ही भारतीय अवकाश संशोधन संस्था आहे. तिथून विविध उपग्रह व अग्निबाण अवकाशात सोडले जात असतात. मंगळयान वा चांद्रयानाच्या मोहिमा आखून राबवण्यापर्यत झेप त्यांनी घेतली आहे. पण त्यांनाही चक्क अंधश्रद्ध ठरवण्यापर्यंत आपल्या विज्ञाननिष्ठांनी मजल मारली आहे. त्यातले काहीजण मोहिमेच्या आधी वा नंतर भक्तीभावाने तिरूपतीच्या दर्शनाला गेल्यामुळे त्यांच्या वैज्ञानिक कुवतीला नालायक ठरवण्याचा पराक्रम आपल्या अंधश्रद्धा निर्मूलकांनी केला आहे. सुदैवाने हे शास्त्रज्ञही पोपपेक्षा गॅलिलीओचे अनुयायी निघाले. त्यांनी अशा भारतीय विज्ञाननिष्ठांच्या नादी लागण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपले काम चालू ठेवले आहे. कारण या पोपनिष्ठ विज्ञाननिष्ठांना काही समजावणे मानवी कुवतीच्या पलिकडली गोष्ट आहे आणि देवालाही ते अशक्य आहे. कारण त्यांना देवाचेही अस्तित्वही मान्य नाही.

पण अशा विज्ञाननिष्ठांना पोपचे अनुयायी म्हणावे की पोपचा दुष्मन सेन्ट मार्टिन ल्युथरचे अनुयायी म्हणावे, असाही प्रश्न पडतो. कारण त्यांचे वर्तन ल्युथरच्या शिकवणीनुसार असते. तो म्हणायचा, की ‘खुद्द स्वर्गातून देवदूत जरी खाली पृथ्वीतलावर अवतरले आणि आपल्या पवित्र धर्मग्रंथाच्या विरोधात काही सांगू लागले, तरी त्यावर विश्वास ठेवू नये. त्यांचे शब्द ऐकायला लागू नयेत म्हणून कान घट्ट बंद करून घ्यावेत. आपली निष्ठा इतकी भक्कम असली पाहिजे. आपल्याला समजले व सांगण्यात आले आहे, त्याच्यापेक्षा अधिक काही समजून घेण्याची गरज नाही.’ तमाम अंधश्रद्धा निर्मूलक व विज्ञाननिष्ठांचा पवित्रा त्यापेक्षा वेगळा दिसणार नाही. मग सांगणारा विजय भटकर यांच्यासारखा सुपर कॉम्प्युटर निर्माण करणारा अस्सल भारतीय शास्त्रज्ञ असो, किंवा अवकाश मोहिमा राबवणारे प्रतिभावान वैज्ञानिक असोत. त्यांनाही अंधश्रद्ध ठरवायला ही मंडळी मागेपुढे बघत नाहीत. याला म्हणतात निष्ठा! खरे विज्ञान व शास्त्रज्ञही त्यांच्यापुढे टिकू शकत नाहीत. अशी मंडळी विज्ञानाला वा विज्ञानाधिष्ठीत जीवनाला पुढे घेऊन जात नाहीत. मात्र नवनवे संभ्रम निर्माण करू शकतात. प्रश्न विचारण्यात त्यांना उत्साह असतो. पण प्रश्न सोडवण्याची अथवा उत्तरे शोधण्याची त्यांना गरज वाटत नाही. म्हणून तर गॅलिलीओही त्यांना घाबरून असतो. कारण असे लोक नैतिक अधीसत्ता गाजवून लोकांच्या मनात पापपुण्याच्या श्रद्धा रुजवतात आणि मग त्यावर धर्ममार्तंड बनून राज्य करत असतात. सामान्य माणसाच्या मनातला अपराधगंड ही त्यांची खरी शक्ती असते. चिकित्सेला ते पारखे असतात. जगातल्या बहुतांश शास्त्रज्ञांनी व वैज्ञानिकांनी नेहमीच अशा लोकांपासून दूर राहून आपले कार्य पुढे नेले आहे. म्हणून आज जगाला इतकी मोठी भरारी मारता आली आहे. म्हणून म्हटले गॅलिलीओ वैज्ञानिक असला तरी विज्ञाननिष्ठ नव्हता, हे अवघ्या मानव जातीचे नशीब!

3 comments:

  1. यालाच उलटी सुलटी हजामत असे मराठीत म्हणतात

    ReplyDelete
  2. वैज्ञानिकांपेक्षा विज्ञाननिष्ठ।

    ReplyDelete