Saturday, October 31, 2015

मोठ्यांच्या कपाळी ‘छोटा’गेल्या दोन आठवड्यापासून देशात सहिष्णूता अकस्मात संपल्याचा साक्षात्कार अनेकांना होऊ लागला आणि मग विविध साहित्यिकांनी आपापले सन्मान परत देण्याचा सपाटा लावला होता. अर्थातच माध्यमातून रोजच्या रोज पुरस्कार वापसीच्या बातम्या झळकत होत्या. सामान्य माणसाला भले त्यात रस नसेल. पण माध्यमांना व तथाकथित पुरोगामी पत्रकारांना त्यातच रस होता. म्हणून त्याच त्या बातम्यांचा रतीब नित्यनेमाने घातला जात होता. त्यावरच मग कंटाळवाणे संपादकीय लेखही खरडले जात होते. हा प्रकार इतका अभिरुचीहीन झाला होता, की त्यातून बाहेर पडण्याची संधी पत्रकारांनाही हवीच होती. पण त्यांनाही सुटका मिळत नव्हती. कारण हे नाटकच मुळी माध्यमांनी सुरू केलेले होते. त्यामुळेच रोज कुणी नवा पुरस्कृत साहित्यिक शोधून जुन्याच नाटकाचा नवा प्रयोग रंगवला जात होता. आपणच रंगवलेल्या नाटकाचा प्रयोग बंद करणेही शक्य नसल्याने नाईलाजाने तो चालवावा लागत होता. अशावेळी अकस्मात गुलजार यांच्यासारखा नावाजलेला कलावंत त्यांच्या मदतीला धावून आला आणि शिळ्या कढीला ऊत आणण्याची सज्जता रविवारी चालू होती. इतक्यात भूकंप झाला! म्हणजे भूकंप वायव्य आशियात झाला, पण त्याचा सर्वात मोठा हादरा आग्नेय आशियात बसला. त्याचे नाव छोटा राजन! कारण ज्या दिवशी सकाळी भूकंपाच्या बातम्या येऊ लागल्या, त्याच दुपारी इंडिनेशियात छोटा राजनला अटक झाल्याची बातमी येऊन ठेपली आणि वायव्य आशियातील भूकंपाचेही धक्के सौम्य होऊन गेले. मंगळवारी देशभरच्या सर्व माध्यमांची मुखपृष्ठे राजनने व्यापली आणि सोमवारी संध्याकाळी वाहिन्यांचा सगळा वेळ राजननेच खाल्ला. इतक्या दोन दणकेबाज बातम्या आल्यावर ‘पुरस्कृत’ बातम्यांना जागा कुठे शिल्लक उरणार ना? मग पंधरा दिवस रंगलेला पुरस्कार परतीचा नाट्यप्रयोग अकस्मात रद्दबातल झाला.

मागल्या रविवारी याच स्तंभात मी पाकिस्तानात दडी मारून बसलेल्या दाऊदचा काटा काढण्याचा भारतीय हेरखात्याचा डाव असेल अशी शक्यता व्यक्त केली होती. तेव्हा दाऊदचा हाडवैरी छोटा राजनविषयी कुठे बातमी नव्हती. त्याचा आणि राजनच्या अटकेचा काही संबंध आहे काय? असूही शकतो! म्हणजे राजनविषयीची बातमी धक्कादायक आहे तितकीच अस्पष्ट आहे. ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार त्याला इंडिनेशियातील पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे. राजन ऑस्ट्रेलिया सोडून दहा दिवसांपुर्वीच इंडिनेशियात आलेला असेल, तर त्याला विमानतळावर कसा पकडला? त्याने दहा दिवस विमानतळावर मुक्काम केला होता काय? त्याच दरम्यान परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग इंडिनेशियात होते, असेही आता उघड झालेले आहे. म्हणूनच सगळा तपशील गोंधळात पाडणारा आहे. त्यामुळेच संगनमताने राजनला भारतात आणले जात आहे, असाही आरोप झाला आहे. त्यात तथ्य जरूर आहे. पण कोणाशी कोणा़चे कसले संगनमत, ह्याचा खुलासा त्या बातम्यांमध्ये सापडत नाही. आजवर छोटा राजनचा वापर भारतीय हेरखात्याने अनेकदा केल्याचे आता लपून राहिलेले नाही. म्हणूनच वाढत्या वयात त्याला सुरक्षा बहाल करण्यासाठी मायदेशी आणले गे,ले असाही आरोप आहे. तो चुकीचा म्हणता येणार नाही. पण या एका बातमीने देशातील असंहिष्णूतेचे वातावरण एकदम निवळले असावे, असे नक्की म्हणता येईल. कारण छोटा राजन पोलिसांच्या जाळ्यात आल्यापासून त्या असंहिष्णूतेविषयी माध्यमात अकस्मात मौन धारण करण्यात आले आहे. कोणीच संहिष्णूता वा पुरस्कार परतीचा विषय बोलेनासा झाला आहे. देशासमोर केवळ छोटा राजन हीच एक मोठी बाब होऊन राहिली आहे. राजनचे काय होणार आणि त्याला भारतात कधी आणणार, त्याचाच बोलबाला सुरू झाला आहे.

किती चमत्कारीक अनुभव आहे ना? देशातले भले भले साहित्यिक कलावंत संहिष्णूता गमावल्याने व अराजक येत असल्याने कमालीचे विचलीत झालेले होते. त्यापासून एक कुख्यात गुन्हेगाराने देशाची मुक्तता केलेली आहे. निदान माध्यमातल्या शहाण्यांना देशातल्या संहिष्णुतेपेक्षा राजनची कहाणी मोलाची वाटू लागली आहे. त्याच्यापुढे साहित्यिकांचे सन्मान वा भिती दुय्यम होऊन गेली आहे. अन्यथा राजनची किरकोळ बात्मी देवून प्रत्येक माध्यम वा पत्रकार तेच पुरस्कार परतीचे चराट चघळत बसला नसता काय? असंहिष्णूतेचा उभा केलेला आभास आणि खरी बातमी यातला फ़रक इथे आपल्याला कळू शकतो. जेव्हा गदारोळ माजवायला काहीच नसते, तेव्हा मग अशा कृत्रिम गोष्टींचा बागुलबुवा केला जात असतो. पण खरोखरच मोठी बातमी येते, तेव्हा अशा खोट्या बातम्याचा मुखवटा गळून पडत असतो. छोटा राजनच्या अटकेने नेमके तेच केले आहे. भारतीय माध्यमांच्या पुरस्कार परतीची हवाच काढून घेतली आहे. आता राजनचे वादळ शांत होईल तेव्हा नव्याने त्यात हवा भरावी लागेल. कारण दरम्यान लोक व वाचक पुरस्कार परतीचे नाटक विसरून गेलेले असतील. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की तेव्हा नव्याने पुरस्कार परतीचे नाटक रंगवावे लागेल. म्हणजे असे की आजवर ज्यांनी पुरस्कार परत केले, त्यांना आता परत करायला काही हाताशी नाही. म्हणजेच ज्यांनी अजून पुरस्कार सन्मान परत केलेले नाहीत, असे मान्यवर शोधून त्यांना आखाड्यात आणावे लागणार आहे. याचे कारण असे, की मुळात सहिष्णुता व या पुरस्कार परतीचा कुठलाही वास्तविक संबंध नाही. हा सगळा बनाबनाया राजकीय देखावा होता. त्यातली हवा संपली, की फ़ुगा नव्याने फ़ुगवणे भाग आहे ना? कुठल्याही आंदोलनाची हीच तर मोठी अडचाण असते. त्यात भरलेली हवा संपण्यापुर्वी त्यात यश संपादन करावे लागते.

आंदोलनकर्ते आणि सत्ता यांच्यातली लढाई मुळातच विषम असते. एकदा आंदोलनाच्या आखाड्यात उडी घेतली, की कुस्ती जिंकूनच थांबायचे असते. त्यात दम घ्यायला विश्रांती घेता येत नाही. कारण त्यातला आवेश संपला की निवेशही संपल्यात जमा असतो. मुंबईच्या गिरणी कामगारांचा संप किती आवेशात सुरू झाला होता? त्यातून वेळीच तडजो्ड निघाली असती तर मर्यादित यश तरी वाट्याला आले असते. पण नुसताच आवेश दाखवण्यात नेते रंगले आणि आजपर्यंत तो संप कोणी मागे घेतलेला नाही. गिरण्या राहिलेल्या नाहीत की गिरणी कामगारही शिल्लक उरलेला नाही. न्यायाची गोष्ट सोडून द्या, साध्या भरपाईचेही कुठले चिन्ह दृष्टीपथात नाही. याची कधीही कारणमिमांसा झालेली नाही. लढे व आंदोलनात टिकून रहाण्याची सामान्य माणसाची क्षमता तोकडी असते आणि त्याच मर्यादेत लढे आवरावे लागतात. मालक किंवा सत्ताधीशाची गोष्ट वेगळी असते. लढे जितके लांबतील, तितका त्यातला आवेश ओसरत जातो आणि मग कालचे लढवय्ये आजचे अगतिक होऊन जातात. आक्रमकता टिकवून संघर्ष चालवणे ही युद्धकला असते. समोरच्याला जेरीस आणण्यावर युद्ध जिंकता येत असते. पुरस्कार परतीचे नाटक वा असंहिष्णूतेचा दावा मुळातच फ़ारसा खरा नाही, म्हणून त्या निमीत्ताने दाखवलेला आवेश फ़ारकाळ टिकणारा नव्हता. त्याचे भान राखूनच खेळी खेळण्याची गरज होती. पहिली बाब म्हणजे ज्या संहिष्णूतेचा बोलबाला मागले दोन आठवडे झाला, त्याचा कुठलाही अनुभव सामान्य जनतेच्या वाट्याला आलेला नाही. उलट जेव्हा तीच सामान्य जनता अराजकाच्या भयाने रस्त्यावर आलेली होती, तेव्हा यापैकी कुणाही साहित्यिकाला त्याची झळही लागली नव्हती. निर्भयाकांड किंवा अण्णांच्या आंदोलनाच्या निमीत्ताने लक्षावधी लोक आपले सुरक्षित घर सोडून रस्त्यावर आले. पोलिस अंगावर घालून तेव्हाच्या सत्ताधीशांनी लोकांना पळवून लावले होते. यापैकी कोणी पुरस्कृत मान्यवर तेव्हा विचलीत झाला नाही. इतकी या लोकांची सामान्य जनता व वास्तवाशी नाळ तुटलेली आहे. त्याच्या तुलनेत आज खुप सुरक्षित परिस्थिती लोक अनुभवत आहेत. म्हणून पुरस्कार परतीविषयी सामान्य जनता पुर्णपणे अलिप्त आहे.

अलिकडे तथाकथित पुरोगामी लढे व आंदोलने ही जनतेची राहिलेली नाहीत, तर माध्यमातील लुटूपुटूची लढाई झालेली आहे. तिचा वास्तवातील जगाशी संबंधच उरलेला नाही. उदाहरणार्थ सुधींद्र कुलकर्णी यांनी ‘पिपल टू पिपल कनेक्ट’ अशा शब्दप्रयोग केला होता. त्यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याचा निषेध करणार्‍या जाणत्यांनीही नेमक्या त्याच शब्दाचा वापर केला. मग आता तेच लोक कशावर कल्लोळ माजवत आहेत? दोन देशातल्या सामान्य माणसात संपर्क हवा, असा आग्रह धरायचा आणि तेव्हाच एकाच देशातील विभिन्न समाज घटकात ‘पिपल टू पिपल कनेक्ट’ नाही म्हणून टाहो फ़ोडायचा? किती विचित्र दावे आहेत ना? ज्यांना देशातील भिन्न धर्मिय समाज घटकात परस्पर विश्वास उरलेला नाही म्हणून पुरस्कार परत करायची इच्छा होते, तेच परदेशातील जनतेशी इथल्या जनतेशी नाते असावे असाही आग्रह धरतात. आधी त्यासाठी निदान आपल्याच देशातील विविध घटकात संबंध गुण्यागोविंदाचे असायला नकोत का? ते नसतील तर भारत पाक यांच्या जनतेचे मनोमिलन कसे होणार? देशातील समाज घटकात सौहार्द नसेल, तर इतके दिवस ही थोर मंडळी काय करत होती? कुलकर्णी वा तत्सम लोकांना पाकिस्तानी जनतेच्या भावना कळतात आणि मायदेशातील जनतेच्या भावना उमजत नाहीत. असे लोक कोणाशी कसला कनेक्ट करू शकतील? कुठल्याही बाजूने वा घटनाक्रमाशी वास्तव ताडून बघितले, तर एकूण नुसता देखावा व आभास असल्याचे जाणवते. निव्वळ माध्यमातून उडवलेले बुडबुडे! पुरस्कार परती असो किंवा संहिष्णूतेच विषय असो, निव्वळ भंपकबाजी चालू होती. त्यात बातमीमूल्य नव्हते की तथ्य नव्हते. म्हणूनच लोकांच्या काळजाला त्यातून हात घातला गेला नाही की लोकांना अशा बातम्या भावल्या नाहीत. साहित्यिक त्यात एकाकी व अलिप्त पडत गेले. माध्यमाचाही मुखवटा फ़ाटला.

हाच तमाशा मागल्या सहा महिन्यापासून पुण्याच्या फ़िल्म इंस्टीट्युटच्या बाबतीत रंगवला गेला होता. पुढे त्यातली मजा संपली आणि आता माध्यमातूनही बातम्या येईनाशा झाल्या. पुरस्कार परतीच्या निमीत्ताने रंगलेल्या तमाश्यात कोणी फ़िल्म इंस्टीट्युटचा उल्लेखही केला नाही, यातच त्या नाटकाचा पोरखेळ लक्षात येऊ शकतो. आता छोटा राजनच्या अटकेच्या बातमीने पुरस्कार परतीचे नाटक ओस पडले आहे. पुढले निदान पंधरा दिवस तरी राजनला भारतात आणणे शक्य नाही. कारण त्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यातच तितका काळ जाणार आहे. पण म्हणून राजनचा विषय मागे पडू शकत नाही. कारण या प्रकरणातील गुंतागुंत इतकी चमत्कारिक आहे, की रोजच्या रोज त्यावर नवनवे खुलासे होत रहाणार आहेत. जितके खोदत जावे तितके नवे रहस्य उलगडणार आहे. सहाजिकच लोक त्याच बातम्यांवर लक्ष ठेवतील. त्या धक्कादायक बातम्यांतून पुरस्कार परती व साहित्यिकांच्या तथाकथित संहिष्णूतेचा विषय कुठल्या कुठे झाकला जाणार आहे. मग त्यातून पुन्हा त्याला फ़ोडणी देवून नव्याने सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करायचे, तर आणखी लढवय्ये मैदानात आणावे लागतील. ते आणायचे कुठून आणि त्यांनी तरी बळीचा बकरा व्हायला कशाला पुढे यायचे? ही समस्या अशा पुरोगामी साहित्यिकांना भेडसावणार आहे. खरे सांगायचे तर ज्यांना महान म्हणून पेश केले त्या मोठ्यांच्या कपाळी हा ‘छोटा’ असा येऊन बसला, की सगळ्या नाटकातील हवाच परस्पर निघून गेली आहे. मग या लोकांची दया येते. ज्या नरेंद्र मोदी या माणसाविषयी त्यांना इतका आकस आहे, त्याच्याशी लढाईला उतरण्यापुर्वी हे लोक किमान त्याचा अभ्यास का करत नाहीत, तेच लक्षात येत नाही. मोदी हा संयमाचा मुर्तिमंत पुतळा आहे. कालापव्यय हे त्याचे सर्वात मोठे हत्यार आहे. इथेही नेमके तेच झाले आहे. नुसता वेळ जाऊ दिला आणि पुरस्कार परतीच्या नाटकातील हवा एका गुन्हेगारी बातमीने काढून घेतली. ही आपल्या देशातील माध्यमे, बुद्धीमंत व साहित्यिकांची शोकांतिकाच नाही काय?


पूर्वप्रसिद्धी  तरूण भारत नागपूर
रविवार  १/११/२०१५

2 comments:

 1. एकदा एका माकडाने आपली टोपी काढून फेकून दिली …
  त्याला पाहून इतर अनेक माकडांनी आपापल्या टोप्या काढून फेकून दिल्या.
  माकडंच ती ………

  काही नाही मित्रानो …
  सहजच गोष्ट आठवली… तुम्ही याचा संबंध उगीच पुरस्कार परत देण्याशी लावू नका !

  ReplyDelete
 2. भाऊराव,

  पुरस्कार परतीचे नाटक नव्याने रंगवावे लागेल हे खरंय. बघा, गणेश देवींनी साहित्य अकादमीचा पुरस्कार परत केला, पण पद्म पुरस्कार स्वत: जवळच ठेवलाय. तो दुसरी इनिंग खेळण्यासाठीच जणू. याला म्हणतात आचरटपणा !

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete