Friday, October 16, 2015

धरलं तर चावतं, सोडलं तर पळतं



The art of war is to gain time when your strength is inferior. -Napoleon Bonaparte

महाराष्ट्रातल्या युती सरकारसह युतीपक्षांची अवस्था नेमकी कशी आहे? ते एकत्र गुण्यागिविंदाने नांदत नाहीत आणि वेगळेही होत नाहीत. अर्थात ते वेगळे व्हावेत म्हणून पराभूत पक्ष आपापले नास्तिक देवही पाण्यात घालून बसले आहेत. तर दुसरीकडे सत्तेत बसलेल्यांना मनसोक्त सत्ताही भोगता येत नाही, अशी एकूण स्थिती आहे. वरकरणी बघता, राज्यात युतीचे सरकार आहे. पण युती म्हणून ते सरकार अस्तित्वात आलेले नाही आणि म्हणूनच ते युतीप्रमाणे चालताना दिसत नाही. त्यात सरकार तुमचे नाही तर फ़क्त आमचे आहे आणि त्यात तुम्ही सत्तेच्या ओसरीवरचे आहात, असे सेनेला दाखवण्याची भाजपाची हौस फ़िटलेली नाही. तर सत्तेत सहभागी असूनही सुखाने भाजपाला सत्ता उपभोगू द्यायची नाही, असा सेनेने विडा उचलला आहे. सहाजिकच जे काही चालू आहे, ते भाजपाला अवघड जागीचे दुखणे होऊन राहिले आहे. म्हणजे परवा गुलाम अली वा सुधींद्र कुलकर्णी प्रकरणात सरकारचे नाक कापले गेले आणि तो डाव सेनेने किंवा उद्धवनी अत्यंत हिशोबी पद्धतीने खेळलेला होता. त्यावरून माध्यमात व बुद्धीमंतांचे काहूर उठणार याची पक्षप्रमुखाला खात्री नसेल, असे समजणे मुर्खपणाचे होईल. पण असे काहूर माजले तर त्याचा दबाव सरकार चालवणार्‍या भाजपावर येतो, शिवसेनेला त्याचे टेन्शन घेण्याचे कारण नाही. उलट जे काही झाले, त्याचा लाभ कोणाच्या वाट्याला येतो? पाकच्या बाबतीत जो हळवा सामान्य समाज आहे, तोच मतदानात मोठ्या संख्येने भाग घेतो आणि काहूर माजवणारा बुद्धीवादी वर्ग मुळातच नगण्य! अधिक मतदानाला सहसा न फ़िरकणारा! म्हणजेच त्याच्या चाबकाचे फ़टके भाजपाला बसणार आणि मतदारांचा ओढा सेनेकडे येणार, अ्सा हा हिशोबी खेळ होता. किंबहूना यावरून भाजपाने सेनेला सत्तेतुन हाकलले तर उद्धवला हवेच होते.

मुद्दा इतकाच, की त्यासाठी पाण्यात देव घालून बसलेले माध्यमातील पुरोगामी पत्रकार व पवारांसारखे काही लोक हिरमुसले. कारण उशीरा का होईना भाजपाच्या लक्षात उद्धवचा डाव आला आणि युती मोडण्याच्या गमजा हवेतच विरल्या. युती कशासाठी मोडली वा विस्कटली? सत्तेवर कोणी कशासाठी पाणी सोडले? अशा प्रश्नांची उत्तरे मतदान केंद्रात रांगा लावणार्‍या लोकांसाठी अगत्याची असतात. त्यापुढे महागलेली तुरडाळ किंवा रस्त्यातले खड्डे दुय्यम असतात. ह्या तक्रारी बाजारात कधीही न फ़िरकणार्‍या व माध्यमातल्या बातम्या वाचून अग्रलेख लिहीणार्‍यांचे मनोरंजन असते. सामान्य माणसाला स्वस्तातली वा महागातली तुरडाळही परवडत नसते. त्याला कुठल्याही राज्यात उपाशीपोटीच जगावे लागते. अशावेळी त्या सामान्य माणसाला भुकेपेक्षा अहंकारावर गुजराण करावी लागते. म्हणून तर घरातली दु:खे समस्या यांचा विसर पडल्यासारखा हा सामान्य माणूस क्रिकेट वा तत्सम विजयोत्सव साजरा करायला सर्वात पुढे असतो. त्याला पाकिस्तानचे नाक कापले गेल्यावर घरातल्या कोरड्या भाकरीवर तूप वाढल्यासारखे समाधान मिळते. कारण कुठलीही राजव्यवस्था त्याला खर्‍या तुपाचे भोजन ताटात वाढायची परिस्थिती आणणार नाही, याची मतदाराला खात्री पटलेली आहे. मग ती भूक वा समस्या विसरायला लागणारी गुंगी-नशा पुरवणारा पक्ष वा नेता जनतेला हवा असतो. कुठलाही बुद्धीमंत किंवा जाणता ती गरज भागवत नाही. तर दु:ख कुठे आहे व समस्या कशी भेडसावते आहे, त्याचे विवेचन देत असतो. म्हणजे जखमेवर मीठ चोळत असतो. उपाय त्याच्याकडेही नसतो. मग त्यांच्यापेक्षा दु:ख समस्या इत्यादींशी गुण्यागोविंदाने नांदायची सोय महत्वाची होऊन जाते. जी तात्काळ वेदनाशामक म्हणून काम करते. गुलाम अली वा कुलकर्णीला काळे फ़ासण्यातून ती सुविधा उपलब्ध होते. ज्यांना हे रहस्य उलगडलेले नाही, त्यांना सेनेने केला तो मुर्खपणाच वाटणार ना?

शिवसेनेने काय व कशाला केले, त्याचे रहस्य ज्यांना समजून घ्यायचे नाही, त्यांनी सेनेची खिल्ली उडवली तर उद्धव किंवा सेनेचे काहीही वाकडे होत नाही. मागल्या पाच दशकात सेनेला त्याची सवय जडली आहे. पण सेनेचा मुर्खपणा सांगण्यात समाधानी झालेले मात्र राजकीय क्षितीजावरून अस्तंगत होऊन गेलेत. भाजपाला युती मोडताना व पुन्हा थोरला भाऊ म्हणून युती जुळवताना; त्याचेच भान राहिलेले नाही. नगण्य खाती वा किमान मंत्रीपदे देऊन आपण सेनेची बोळवण केली म्हणून भाजपा नेते खुश आहेत. पण नामोहरम झालेल्या विरोधी पक्षाची जागा व्यापत सेनेने सत्तेत हिस्सा मिळवला आहे. तो हिस्सा नगण्य असेल. मात्र सत्तेत राहून सत्तेवरच हल्ला चढवत उद्धव नेमके काय राजकारण करतो, हे जाणून घेण्याची भाजपालाही गरज भासत नाही, याचे नवल वाटते. सरकारमध्ये असलो, तरी त्यात आमचे मत कोणी विचारत नाही, म्हणूनच त्यातल्या कुठल्याही निर्णयाला वा त्याच्या परिणामांना आपण जबाबदार नाही, असे उद्धव आपल्या प्रत्येक खेळीतून मतदाराला समजावतो आहे. आज राष्ट्रवादी विस्कळीत होऊन पडलेला पक्ष आहे, तर कॉग्रेसपाशी विरोधात राजकारण करण्याची क्षमताच उरलेली नाही. सहाजिकच विरोधाचा सूर लावून उद्धव विरोधातली जागा व्यापतो आहे. सहाजिकच जेव्हा केव्हा मतदानाची वेळ येईल, तेव्हा आजच्या सरकारवर आरोप करायची बेगमी सध्या चालू आहे. दोन्ही कॉग्रेस तेव्हा भाजपा विरोधात असलेल्या लोकमताचा लाभ उठवण्यास सज्ज नसतील. तेव्हा आपण सज्ज असावे, अशी त्यामागची रणनिती आहे. त्यात अन्य मुद्दे आहेत, तसेच उद्या भाजपावर पाकधार्जिणेपणाचा आरोप करायलाही सेनेने सुरूवात करून ठेवलेली आहे. म्हणूनच गुलाम अली वा काळे फ़ासण्याच्या विषयावर सामान्य जनतेत कोणती भावना आहे, त्याचा अंदाज घेतला, मग सेनेचे खरे डावपेच लक्षात येऊ शकतील.

सर्वसाधारण परिस्थिती बघितली तर मागल्या लोकसभा, विधानसभा मतदानात भाजपाने मिळवलेल्या मतांची टक्केवारी पुन्हा मिळवणे सोपे नाही. शेतकरी आत्महत्या किंवा इतर भेडसावणार्‍या प्रश्नांबाबत जनमत बिथरलेले आहे. त्याचा परिणाम नजिकच्या कुठल्याही मतदानावर होणार आहे. उद्यापरवा ज्या दोन महापालिकांचे मतदान व्हायचे आहे, त्यातही त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसेल. अशारितीने भाजपाची लोकप्रियता घसरत असताना, त्याचा लाभार्थी होण्याची तयारी उद्धव करतो आहे. त्यामधून सत्ता टिकवणे ही प्रामुख्याने भाजपाची गरज आहे. त्यातला एक मार्ग म्हणजे छोटा पक्ष असला तरी सेनेशी जुळवून घेणे. त्यातली असमर्थता भाजपाने मागल्या वर्षात दाखवून दिली आहे. उलट सेनेना खिजवून सतत अंगावर घेण्यात धन्यता मानली आहे. परिणामी सत्ता कधीही मोडली तरी आपण लाभार्थी असावे, असे गणित मांडून उद्धव काम करीत आहे. दुसरीकडे सत्ता मोडायची वेळ आल्यास अन्य कुठल्या पक्षाला सोबत घेऊन बहुमत टिकवण्याची लाचारी भाजपाला परवडणारी नाही. म्हणजेच दोन्हीकडून भाजपाच कोंडीत आहे. बहूमतासाठी सेनेची गरज आहे आणि पर्याय दुसरा कुठलाच नाही. अधिक वर्षभराच्या अनुभवानंतर कुठेही नमते घ्यायचे नाही, यावर सेना अधिक ठाम होत चालली आहे. किंबहूना शहाण्यांना वा विश्लेषकांना जी सेनेची दंडेलशाही वा गुंडगिरी वाटते आहे, ती सेनेसाठी मतांची बेगमी आहे. भाजपासाठी तीच तोट्याची बाजू आहे. अर्थात ते लक्षात यायला मस्तीतून शुद्धीवर यावे लागेल. ते इतक्या लौकर शक्य नाही. मतदाराची मानसिकता ओळखूनच निवडणूका जिंकता येतात. नेपोलियन म्हणतो, ‘दुबळे असाल तेव्हा युद्धात सवड काढणे हीच खरी युद्धकला असते.’ सत्तेत सहभागी होऊन व विरोधातली आघाडी संभाळुन उद्धव काय खेळ करतोय? त्याचे वेगळे विवरण देण्याची गरज आहे काय?

5 comments:

  1. भाऊ जे चाललंय ते चालू द्या की सुखाने . कशाला सावध करताय सत्तांध भाजपाला . निदान महाराष्ट्राततरी या कृतघ्न सत्तालोलूप भणंगाना गुडघ्यावर आलेलं पाहायचंय आम्हाला .

    ReplyDelete
  2. इथून पुढे महाराष्ट्रात दोनच पक्ष राहतील असे वाटते . भाजप व शिवसेना.

    ReplyDelete
  3. भविष्यात महाराष्ट्रात फक्त शिवसेना व भाजप हे दोनच पक्ष दिसुन येतील....

    ReplyDelete