Sunday, November 1, 2015

हे समजून घ्या, पवार साहेब!



गेल्या फ़ेब्रुवारी महिन्यात व्हॅलेन्टाईनडे या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला भेट द्यायला गेलेले होते. त्यावर बरीच मल्लीनाथी झालेली होती. पण लौकरच लोकांचा भ्रमनिरास झाला. कारण तिथे जाहिरसभेत बोलताना पंतप्रधानांनी मोठा खुलासा केला. आपण नियमितपणे शरद पवारांशी सल्लामसलत करतो असे मोदी म्हणाले. अर्थात अशा गोष्टी नेहमीच यजमानांना खुश करण्यासाठी पाहुणे बोलत असतात. त्या कधी मनावर घ्यायच्या नसतात. नंतर अर्थमंत्री अरूण जेटली अलिकडेच बारामतीला येऊन गेले आणि त्यांनी पवारांचे कौतुक करताना देशात शंभर बारामती हव्यात अशी भाषा केली. त्यावरही बर्‍याच प्रतिक्रीया उमटल्या. पण त्यामुळे पवारांचा भलताच गैरसमज झालेला दिसतो. कारण संधी मिळेल तिथे पवार पंतप्रधानांसह भाजपाला सल्ला देऊ लागले आहेत. इथपर्यंत ठिक होते. पण हल्ली शरद पवार संघालाही सल्ले देऊ लागले आहेत. कालपरवा त्यांनी सरदार पटेल हे कॉग्रेसचे नेते होते आणि त्यांनीच संघावर बंदी आणल्याची आठवण संघाला करून दिली आहे. इतिहासाचे जाणते म्हणून पवार असे बोललेले असू शकतात. सातत्याने जीतेंद्र आव्हाडांच्या संगतीत राहिल्यावर इतका तर परिणाम व्हायलाच हवा ना? कारण हल्ली आव्हाड स्वत: पवारांपेक्षा संभाजी ब्रिगेडच्या संगतीत जास्त असतात. तिथे तर इतिहासकारांची प्रचंड झुंबड आहे. त्यामुळे त्याचा काहीसा संसर्ग पवारांवर झाला तर नवल नाही. म्हणून पवारांना इतिहासाचे दाखले देण्याचा मोह झाला तर नवल नाही. कदाचित हल्ली पवारांना वर्तमानात रहाणे आवडत नसावे. म्हणून ते इतिहासात अधिकाधिक रममाण होताना दिसतात. अन्यथा त्यांनी संघाला व भाजपाला सरदार पटेल कॉग्रेसचे होते, असा आगंतुक सल्ला देण्याची काय गरज होती? तसेच असेल तर इंदिरा गांधीसुद्धा कॉग्रेस पक्षाच्याच होत्या, हे पवारांना कसे आठवत नाही?

पहिला सवाल असा, की सरदार पटेल हे कॉग्रेसचे होते वा आहेत, याची आठवण पवारांसह जुन्या नव्या कॉग्रेसवाल्यांना कधी झाली? दोन वर्षापुर्वी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी पटेलांचे गुणगान सुरू करण्यापर्यंत कधी कॉगेसने संघटनात्मक वा सरकारी पातळीवर पटेलांचे गौरव करणारे समारंभ योजले वा साजरे केले होते? काही आठवते का पवारांना? नसेल तर त्यांनी आधी मोदी वा तत्सम भाजपावाल्यांचे आभार मानायला हवेत. त्यांच्यामुळे कॉग्रेसजनांना नेहरू कुटुंबापलिकडेही काही कॉग्रेसनेते आहेत. किंवा अशा इतरांनीही देशासाठी काही केले आहे याची जाणिव होऊ लागली. दु:ख कसले आहे? आपण ज्या व्यक्ती वा नेत्यांना संपवून देशात फ़क्त नेहरू घराण्याची राजेशाही सुरू केली, त्याचे पाप भेडसावते आहे की सत्य लोकांना उमजू लागले याने झोप उडाली आहे? बाकीच्यांचे सोडून देवू! कॉग्रेसचाच वारसा सांगत गेली पंधरा वर्षे पवार एक वेगळा पक्ष चालवित आहेत. त्याचाही वारसा सरदार पटेलांचाच नाही काय? पण यशवंतरावांचे स्मरण अगत्याने करणार्‍या पवारांना कधी पटेलांचे स्मरण झाले होते? आजवर राष्ट्रवादी कॉग्रेसने कधी पटेलांचा जन्मदिवस साजरा केल्याचा पुरावा आहे काय? नसेल तर दुसर्‍यांना शहाणपणा सांगण्यापुर्वी आपल्याच अंतरंगात झाकून बघायला हरकत नसावी. यामुळेच सामान्य माणसाला तुमचा कंटाळा आला आहे. नुसता मानभावीपणा म्हणजे सभ्यता वा सुसंस्कृतपणा नसतो. त्यात सच्चाईची झाक असावी लागते. अन्यथा लोक येऊन तुमची कॉलर पकडत नाहीत. पण तुमच्याकडे काणाडोळा करू लागतात. याच कारणास्तव पवारांना राज्यात सुद्धा आपली पत गमावण्याची पाळी आलेली आहे. असले काही हास्यास्पद बोलून टाळ्या मिळवण्यापेक्षा पवारांनी निदान उर्वरीत आयुष्यात सार्वजनिक जीवनात थोडे गंभीर व्हावे असे वाटते. दुसर्‍यांना सल्ले देण्यापेक्षा ते आपण पाळावेत, हे लक्षात येऊ शकेल.

इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान होत्या आणि त्यांची पुण्यतिथी व पटेलांचा जन्मदिवस एकाच दिवशी आलेत. तर एका कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहिले व दुसर्‍या कार्यक्रमाकडे त्यांनी काणाडोळा केला असेल, तर दोष जरूर द्यावा. पण इतकी वर्षे आपण पटेलांना दुर्लक्षित कशाला ठेवले, त्याचाही खुलासा द्यायला हवा ना? इतक्या वर्षात पटेलांचा उल्लेख कॉग्रेसने वा पवारांसारख्या वारसांनी कशाला केला नाही? थोडक्यात पटेलांची महती असल्याचे मोदींनी म्हटले नसते, तर यापैकी कोणाला पटेल कॉग्रेसचेच नेते असल्याचे आठवत तरी होते काय? इंदिराजींचे स्मरण अगत्याचे वाटते, याला हरकत नाही. पण तितकेच पटेलांचेही स्मरण अगत्याचे आहे आणि गेल्य सहा दशकात कॉग्रेसनेच ते कधी समारंभपुर्वक होऊ दिले नाही, ही वस्तुस्थिती आहे. खरे तर त्यामुळेच कॉग्रेस रसातळाला गेलेली आहे. नेहरू कुटुंबाचे गोडवे गाताना स्वातंत्र्य चळवळीचा वारसा बुडवला गेला. त्याचीच शिक्षा भोगायची वेळ त्यांच्यावर आज आलेली आहे. कशी गंमत आहे बघा, पटेल वा इंदिराजी स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित म्हणून त्यांचे वेळच्यावेळी स्मरण व्हायला हवे. मग सावरकरांच्या स्मरणाचे काय? कधी अगत्याने पवारांनी त्यांचे स्मरण केलेले आहे काय? पक्षाच्या भूमिका बाजूला ठेवून अशा विभूतींचे स्मरण करावे असे पवारच सांगतात. मग स्वातंत्र्याच्या लढ्यात नेताजी बोस वा सावरकरांचा हिस्सा नव्हता काय? त्या सावरकरांच्या अंदमान येथील स्मारकावर अविरत जळणारी ज्योती उभारली होती. ती बंद करून टाकणार्‍या मणिशंकर अय्यर यांनी कोणता सभ्यपणा दाखवला होता? तेव्हा युपीएमधील आपल्या त्या सहकारी मंत्र्याला सभ्यता व सुसंस्कृतपणाचे डोस द्यायची बुद्धी पवारांना कशी झाली नाही? इंदिरा गांधींचे स्मरण मोदींनी करायला हवे आणि कॉग्रेसने सावरकरांचे किरकोळ स्मारकही पुसून टाकायला हवे होते काय?

कुठल्या जमान्यात शरद पवार वा तत्सम पुरोगामी जगत आहेत? याच शहाजोगपणाला कंटाळलेल्या मतदाराने कॉग्रेसला धुळ चारून देशात मोदींना पंतप्रधान पदावर आणून बसवले आहे. त्याचे कारणच तेच आहे. ह्या मानभावीपणाला भिक न घालणारा नेता, हीच मोदींची सर्वात मोठी गुणवत्ता भारतीय मतदाराने बघितली. म्हणून तर इतक्या निर्विवाद मतांनी मोदींना मतदाराने सत्ता दिलेली आहे. अगदी या देशातील तमाम सभ्य व सुसंस्कृत बुद्धीमंत नाके मुरडत मोदींना विरोध करीत असताना, तोच माणूस इतक्या प्रचंड मतांनी सत्तेवर येऊ शकला! त्याला पवारसाहेब तुमचा असला शहाजोगपणाच कारण झाला आहे. बदमाशाला बदमाश आणि भामट्याला भामटा म्हणायची हिंमत असलेला माणुस म्हणून लोकांनी मोदींना मते दिली. भुरट्या पुरस्कृत विद्वान व पोसलेल्या साहित्यिकांना दबणारा माणूस नाही, हीच मोदींची खरी ख्याती आहे. म्हणून वाजपेयींपेक्षा मोदींना भारतीय मतदाराने प्रतिसाद दिला. तो सावरकर वा पटेलांचे स्मरण करण्यासाठीच दिला. त्यांचे विस्मरण झालेल्यांना मतदाराने बाहेरचा रस्ता दाखवला. तेव्हा पटेल कोणाचे हे पवारांनी सांगण्यापेक्षा स्वत:च समजून घेण्याची गरज आहे. पटेल, सावरकर वा इंदिराजी कुठल्या एका पक्षाचे नसतात, तर देशाचे असतात. याचे भान कॉग्रेस व तिच्या वारसांनी ठेवले नाही. किंबहूना पटेल कॉग्रेसचे आणि इंदिराजी देशाच्या हे तर्कट म्हणजे शुद्ध भामटेगिरीच आहे. त्यालाच लोक कंटाळले आहेत. त्या लोकभावनेचा नेता म्हणून मोदी पंतप्रधान होऊ शकले. कॉग्रेस वा तिने आजवर पोसलेले विचारवंत, कलावंत, साहित्यिक आणि इतिहासकार, नेहरू घराण्याच्या पुर्वज-वारसांचे गोडवे गाण्यासाठी सज्ज आहेत. पण इतर लोक ज्यांनी या देशासाठी आपले जीवन खर्ची घातले, त्यांचा गुणगौरव करायला कोणीच नव्हता. म्हणून लोकांनी मोदींना सत्तेवर आणले आहे. पवारसाहेब इतके वर्तमान समजून घेतलेत तर इतिहासात चा़चपडण्याही गरज रहाणार नाही.

7 comments:

  1. "अर्थात अशा गोष्टी नेहमीच यजमानांना खुश करण्यासाठी पाहुणे बोलत असतात. त्या कधी मनावर घ्यायच्या नसतात." नाही तरी ते जुमले सांगतात असे अमित शाह म्हनाल्यापसुन आम्ही त्यांचे बोलणेच मनावर घ्यायचे सोडून दिले आहे सरदार पटेल यांनीच संघावर बंदी संघावर बंदी आणली होती का नाही ते सांगा आधी "कदाचित हल्ली पवारांना वर्तमानात रहाणे आवडत नसावे. म्हणून ते इतिहासात अधिकाधिक रममाण होताना दिसतात." पुराणात रममाण होण्यापेक्षा बरे ईतिहासात रमलं तरच बरे दिवस जातील हे पवार जाणून आहेत. नाहितर, सत्तेशिवाय दिवस कसे काढायचे हा प्रश्न गहन आहे, क्लेषकारक आहे, नाही का..?"त्या सावरकरांच्या अंदमान येथील स्मारकावर अविरत जळणारी ज्योती उभारली होती. ती बंद करून टाकणार्‍या मणिशंकर अय्यर यांनी कोणता सभ्यपणा दाखवला होता?" हो त्यांनी shirt काढला आता त्याचा बदला म्हणून भाजप वाले च……। काढणार आहेत काय? नशीबच त्या भारतीयांचे खोटे दगडा पेक्षा वीट मऊ म्हणून संधी द्यावी तर हा कातळ निघावा वीट निदान डोके आपटून थोडीतरी फुटली असती आणि भारत जिवंत तरी राहिला असता आता ती शक्यता पण धुसर दिसते डोके आपटून पाहतायत काही जन उदा. ftii , साहित्यिक, संशोधक वगैरे किरकोळ मंडळी "म्हणून वाजपेयींपेक्षा मोदींना भारतीय मतदाराने प्रतिसाद दिला. " असू शकेल. एखाद्या रघुराम राजन किंवा सत्यार्थी यांच्या भाषणापेक्षा johny lever च्या कार्यक्रमाला गर्दी जास्त होतही असते. ( मी इथे कुणालाही johny lever म्हटलेले नाही कृपया गैर समाज नसावा फक्त उदाहरण दिले आहे) म्हणून वाजपेयींची लायकी कमी होत नाही कि इतरांची वाढत नाही

    ReplyDelete
  2. Very accurate and pin-pointed analysis. Congress has ignored many stalwarts in history.

    ReplyDelete
  3. bhaunche lekh vachatana chidahi yete ... 65 varsha chukicha itihas shikalyachi.. ani shikavanaryanchi sudhaa... sundar lekh bhau

    ReplyDelete
  4. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  5. भाऊराव,

    दीर्घपल्ल्याचा विचार करता पवारांचं राजकीय जीवन अपयशी दिसतं. पण कधीकधी वाटतं की पवारांच्या खेळींच्या मागे काही योजना तर नाही ना ! पवार गांधी-नेहरू घराण्यासमोर लाचार का होतात? (संदर्भ :- राजू परुळेकरांचा लेख : http://www.lokprabha.com/20090911/alke.htm )

    आता हेच पहा ना की माधवराव शिंदे, राजेश पायलट, जितेंद्र प्रसाद, प्रमोद महाजन (भाजपचे असले तरी) ही लोकं पवारांच्या तुलनेने उजवी दिसंत नाहीत. या साऱ्यांचा अस्त झाला. पण पवार आजूनही टिकून आहेत. दीर्घपल्ल्याचा विचार करता हे पवारांचं यश मानावं का? की इतक्या प्रदीर्घ कारकीर्दीनंतरही पवारांना त्यांचे प्रतिस्पर्धी गांभीर्याने घेत नाहीत, म्हणून अपयश मानावं?

    तसेच, पवारांची लाचारी हे ढोंग तर नाही ना? पवार बेमालूमपणे एखाद्याचा दालमिया करतात. गांधी-नेहरू घराण्याचा दालमिया झालेला मराठी माणसाला बघायला आवडला असता (इति राजू परुळेकर). सध्या मोदींनी हे काम अंगावर घेतलंय. तर मग मोदी याचीच खलबतं करायला पवारांच्या नियमित संपर्कात असतात की काय? काहीतरी शिजतंय बुवा.

    या सगळ्याकडे कसं पहायचं? काय दृष्टीकोन ठेवायचा? तुमची मतं वाचायला आवडतील.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  6. नितांत सुंदर व अचूक विश्लेषण

    ReplyDelete