Tuesday, November 24, 2015

तिसर्‍या महायुद्धाची चाहुल“You may not be interested in war, but war is interested in you.” ― Leon Trotsky

आज मंगळवारी सिरीयातील जिहादी अतिरेक्यांवर हल्ला करायला नेहमीप्रमाणे उड्डाण केलेल्या रशियन लढावू विमानाला तुर्कस्तानच्या लष्कराने विमानविरोधी हल्ला करून पाडले. ही येऊ घातलेल्या महायुद्धाची चाहुल आहे. आपण ज्याला जिहाद वा दहशतवाद म्हणून चिवडत बसतो, त्याने आता जगाच्य राजकारणाची सुत्रे हाती घेतली असून, त्यात एकामागून एक देश ओढले जात आहेत आणि ओढले जाणार आहेत. सात दशकापुर्वी पुन्हा युद्धाचा विध्वंस नको म्हणून स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या उदारमतवादी भूमिकेचे हे पाप आहे. त्यामुळेच महायुद्धात जितकी माणसे मारली जणार नाहीत, त्यापेक्षा अनेकपटीने लोक उदारमतवादी शांततेच्या भूमिकेने बळी घेतले आहेत. राजकारण वा राजकीय तत्वज्ञान कोणतेही असो, त्याला सत्तेची ओढ लागली, मग असे डावपेच खेळले जातात, की युद्ध नको म्हणत जग युद्धाच्या खाईत लोटले जात असते. जिहाद नावाच्या भस्मासूराला ज्या उदारमतवादी राजकारणाने जोजवले, त्याचे खरे स्वरूप आता समोर येत चालले असून, येत्या काही महिन्यात वा वर्षात जग युद्धाच्या खाईत लोटले जाणार आहे. आज सिरीयात हवाई हल्ला करायला गेलेल्या रशियन लढावू विमानाला पाडून तुर्कस्तानने त्याची नांदी केली आहे. प्रथमच दोन देशांत थेट युद्धाची स्थिती उभी ठाकली आहे. ज्यापैकी एका बाजूला अमेरिका तर दुसर्‍या बाजूला रशिया खडा उभा आहे. दिसायला भले हा दोन देशातील वाद दिसेल. पण रशियाने उघड इराण व सिरीयाच्या राजसत्तेशी हातमिळवणी केली आहे आणि अमेरिका आधीपासूनच सौदी व तुर्की यांच्याशी इसिसला मदत देण्याबाबत संमनमत करून बसली आहे. राहिला प्रश्न युरोपमधल्या प्रगत राष्ट्रांचा व नंतर उदयास आलेल्या भारत, ब्राझील, चीन वा अन्य देशांचा! त्यांना यापासून फ़ार काळ अलिप्त रहाता येणार नाही. म्हणूनच हा सगळा गुंता समजून घ्यावा लागेल.

युद्ध कोणालाच नको असते. पण ते व्हायलाही पर्याय नसतो. कारण युद्ध तुमच्या इच्छेनुसार होत नाही, की टाळता येत नाही. युद्ध तुमच्यावर लादले जात असते आणि मग त्यापासून सुटका नसते. आपला बचाव करणे किंवा पराभव मान्य करून शरण जाणे; इतकेच पर्याय असतात. यात मग युद्ध नको आणि शांतता हवी असा घोषा लावणारेही तितकेच जबाबदार असतात. तालिबान, मुजाहिदीन, अलकायदा, बोको हराम, इसिस वा तत्सम डझनावारी जिहादी गट कुठल्या ना कुठल्या समर्थ देशाच्या पैशाने व पाठबळानेच हिंसाचार करीत असतात. इसिसचे दैनंदिन उत्पन्न पंधरा लाख डॉलर्स इतके आहे. हे कुठून येत असते? नुसते बलात्कार करून वा बॉम्ब फ़ोडून पैसे मिळत नाहीत. लूटमारीतून इतकी प्रचंड रक्कम दरोडेखोरही मिळवू शकत नाहीत. मग इसिसला इतके दैनंदिन उत्पन्न कुठून मिळते? त्यांनी व्यापलेल्या इराक व सिरीयातील प्रदेशातल्या खनीज तेलाच्या खाणीतून आजही तेलाचा उपसा चालू आहे आणि त्याची विक्रीही चालू आहे. त्यातूनच हा पैसा येत असतो. शिवाय असदला नामोहरम करण्यासाठी व जिंकलेल्या प्रदेशावर आपला कब्जा राखण्यासाठी त्या हिंसक संघटनेला सौदी व आखाती देशांकडून रितसर पैसे-हत्यारे मिळत असतात. युरोपातून तुर्कस्थान मार्गे कोणीही अन्य देशातला मुस्लिम सुखरूप इसिसमध्ये लढवय्या व्हायला पोहोचू शकत असतो. बदल्यात इसिस चोरलेले वा उपसलेले खनीज तेल तुर्कस्थानला बहाल करीत असतो. अमेरिका व नाटो इसिसचा बंदोबस्त करीत नाहीत. पण इसिसचा कणा मोडू बघणार्‍या सिरीयाच्या असदशी निष्ठावान सैन्यावरच हल्ले करतात. पर्यायाने इसिस बळकट होत गेली, शिरजोर होत गेली. रशियाने त्यात हस्तक्षेप केल्यावर इसिसचा दबदबा संपू लागला तरी रशियाला उघडपणे अमेरिका वा सौदी आव्हान देवू शकत नव्हते. म्हणून तुर्कस्थानला पुढे केलेले आहे.

रशियन लढावू विमाने आपल्या हवाई हद्दीचा भंग करीत असतात, अशी तुर्कस्थानची तक्रार होती. तेच कारण पुढे करून त्यांनी मंगळवारी एक लढावू विमान पाडले आहे. पण आपल्या हवाई दलाने तुर्कस्थानच्या हवाई हद्दीचा कुठेही भंग केलेला नाही, असा दावा रशियाने केलेला आहे. त्यात तथ्यही दिसते. कारण पडलेले रशियन विमान कित्येक किलोमिटर्स आत सिरीयाच्या प्रदेशात पडलेले आहे. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी तुर्कस्थानवर पाठीत वार केल्याचा आरोप केला आहे. तो करताना त्यांनी विमान पाडणारे दहशतवाद्यांचे साथीदार असल्याचेही म्हटले आहे. मध्यंतरी पुतीन यांनी चाळीस देश इसिसला सहाय्य करीत असल्याचा आरोप केला होता. आता तर त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी तुर्कीवर इसिसचे साथीदार असल्याचा आरोप केला आहे. मजेची गोष्ट म्हणजे हा आरोप फ़क्त तुर्कस्थानला लागत नाही. कारण तो देश अमेरिकाप्रणित नाटो लष्करी आघाडीचा सहसदस्य आहे. म्हणजेच इसिसचा पाठीराखा अमेरिका व सौदी असल्याचाच अप्रत्यक्ष आरोप पुतीन यांनी केला आहे. त्यात तथ्यही वाटते. कारण जोवर सिरीयाचा अध्यक्ष असद व त्याचे सैन्य कमकुवत होते, तोवर अमेरिका वा तुर्कीने कुठलेही हल्ले सिरीयात केले नव्हते आणि इसिसला शिव्या घालत प्रत्यक्षात असदच्या अधिकृत राष्ट्रीय सेनेला कमकुवत करण्यात धन्यता मानलेली होती. पण रशियाने सिरीयाला मदत देण्यासाठी इसिसच्या प्रभावक्षेत्रात सरसकट हल्ले सुरू केले, त्यात इसिसचा कणा मोडला आहे. त्यांना वाचवायचे तर रशियन हल्ल्यांना पायबंद घालणे आवश्यक आहे. तुर्कस्थानने रशियन विमान पाडून तेच काम केले आहे. मात्र त्यातून थेट दोन देशांना एकमेकांशी भिडण्याचा प्रसंग येऊ शकतो. कारण पुतीन शांतपणे हा प्रतिहल्ला सहन करतील अशी शक्यता नाही. म्हणूनच ही येऊ घातलेल्या महायुद्धाची नांदी वाटते.

अनेकांचा असा गैरसमज आहे की या युद्धाचा, हवाई हल्ल्याचा वा तिथून निघालेल्या निर्वासितांचा मामला सिरीया, इराक वा युरोपपुरता मर्यादित आहे. भारताचा त्याच्याशी काय संबंध? आपण युरोपपासून खुप दूर आहोत आणि सिरीया इराकही मैलोगणती दूर आहेत. युद्ध पेटले तरी आपल्यावर त्याची सावलीही पडणार नाही, असेही वाटू शकते. पण वस्तुस्थिती खुप भयंकर आहे. आपल्याला दिसत आहेत वा दाखवले जात आहेत, ते एका भयंकर जटील कोड्याचे अनंतविध तुकडे आहेत. ते संगतवार मांडले, तरच त्याचा खरा अर्थबोध होऊ शकेल. मग छोटा राजनला मायदेशी आणणे असो, किंवा पुरस्कारवापसी असो. अकस्मात देशात असंहिष्णूतेचे काहूर माजवून निर्माण केला जात असलेला भयगंड असो, किंवा दिड वर्षात पंतप्रधान मोदींनी लागोपाठ केलेले विविध देशांचे दौरे असोत. मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी पाकिस्तानची ‘मागितलेली मदत’ असो, किंवा सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याला मुंबईत आणून सन्मानित करताना सोसलेली मानहानी असो. फ़ोर्ड फ़ौडेशनचे अब्जावधीचे देशात येणारे निधी व त्याचे लाभार्थी असोत, वा मॅगसेसे वा नोबेल पारितोषिके असोत. यांचा येऊ घातलेल्या युद्धाशी, पेटलेल्या जागतिक जिहादशी, जगभर उत्पन्न झालेल्या राजकीय अस्थीरतेशी कसा गुंतागुंतीचा संबंध आहे, ते उलगडायला हवे. तरच मंगळवारी रशियन विमान तुर्कीने पाडण्यातून काय भयंकर भविष्य पुढ्यात वाढले आहे त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकेल. किंबहूना येत्या काही दिवसात तीच गुंतागुंत उलगडण्याचा प्रयास मी करणार आहे. सहज डोळ्यांना न दिसणारे हे विस्काटलेले धागे जुळवून व्यापक परिस्थितीचे चित्र उभे करायचा माझा प्रयास असेल. त्यामुळे काहीकाळ स्थानिक राजकारण वा त्यामधले दुवे मांडण्याला वेळ देता येणार नाही, की मित्रांच्या प्रश्न शंकांना उत्तरे वा खुलासे देता येणार नाहीत. तेव्हा कृपया तसा आग्रह धरू नये ही नम्र विनंती!

15 comments:

 1. फार छान विश्लेषण

  ReplyDelete
 2. फार सुंदर रीतीने मांडले

  ReplyDelete
 3. भाऊ खूप आतुरतेने पुढच्या विश्लेषणाची वाट पाहत आहोत. धन्यवाद.

  ReplyDelete
 4. Information Technology has brought the world very near and formed in to a Global Village Where every one knows every body, the main conflict is between those who have and those who do not have, presently energy resorce availability is a bone of content behind the conflicts, so as you say the 3rd world war is near, is if not 100% but substantially true, There will be local conflicts, and nations of World has to decide, whether to participate in them or not, they will bw forced by power mongers in to it and wiil have to pay the cost of it, you just cant wait and watch, the things to Happen. So it is best for Indians to decide whether we want to take side or not, in any case burns and bruies are their and we must be ever ready for them.

  ReplyDelete
 5. खुप छान विष्लेशन सर, प्रत्येक भारतीय नागरिकाने वाचावे असे मला वाटते । मी दररोज आपले लेख माझ्या फेसबुक अकाउन्टवर शेअर करतो ।
  अरुण गावन्डे । उद्याची नव्या युगाची। सशक्त,सम्पन्न भारताची।

  ReplyDelete
 6. मयुर कांबळेNovember 24, 2015 at 8:38 PM

  आता भाऊंच्या लेखनीतून जागतिक राजकारणावर आसूड ओढले जाणार. वि ग कानिटकरांच्या लेखनीच्या तोडीचे लेखन आता वाचायास भेटणार.या सगळ्या गोंधळातील खरे वस्तुनिष्ठ लिखान समोर येणार.
  भाऊ, तुम्हाला पत्रकारांमधले "राजहंस" म्हटले तर वावगे नाही ठरणार. खूप खूप धन्यवाद

  ReplyDelete
 7. bhau.... downing russian plane by turkey is as provocative as murder of arched duke of Austria.I think you have rightly pointed the incidence.

  ReplyDelete
 8. इस्लामी परंपरेनुसार
  तीन निकष जो पुर्ण करतो त्यासच खलिफा मानले जाते , पण एकदा खलिफा मानले की जगातील प्रत्येक मुसलमानास त्या प्रती तन, मन व धनाचे निष्ठ राहणे ( बया देणे) क्रमप्राप्त आहे
  ते निकष म्हणजे
  खलिफा कुरेशी जमातीचा असावा
  त्याच्या कडे शरीयत प्रमाणे राज्यकारभार करण्याची स्वतःचा देश असावे ( छोटा देशही चालतो)
  त्याने एक वर्षापेक्षा जास्त काळ जिहादी युध्दा विना राहु नये

  आयसिस चा बगदादी हे तीनही निकष पुर्ण करतो
  तेंव्हा प्रकरण गंभीर आहे
  प्रत्येक मुसलमानच्या निष्ठेची परीक्षा घेण्याचा काळ समीप आलेला असु शकतो

  ReplyDelete
 9. आपल्या जागतिक विश्लषणाची
  वाट बघत आहे

  ReplyDelete
 10. खुप छान व समजन्यायोग्य विश्लेषण भाऊ. असे जागतिक दर्जाचे लेख खुप कमी वाचायला मिळतात मराठी मधे.
  पुढील लेखाची प्रतीक्षा राहील

  ReplyDelete
 11. visit to my blog all freands jagarblog.com

  ReplyDelete
 12. खर आहे सर,इच्छा असो व नसो आपल्याला भविष्यातील युद्धाचा सामना करावा लागणार आहे. इथनिक इगो हे या युद्धाचे सर्वात मोठे कारण असणार आहे.

  ReplyDelete
 13. Wah agadi achuk aani khare vastav mandle aahe aapan.. Great...

  ReplyDelete