Saturday, November 7, 2015

कुछ तो गडबड है भाई!

Displaying ayyar.jpg

आठ महिन्यांपुर्वीची गोष्ट आहे. मुंबईत एका कार्यक्रमासाठी आलेले संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. तसे बघितले तर ते विधान वादग्रस्त नव्हते. पण मुद्दाम त्यावरून वाद उभा केला गेला होता. आपल्या देशाच्या दोन पंतप्रधानांनी देशाच्या महत्वाच्या डीप असेटना बळी दिले असे ते विधान होते. मुळात माध्यमा्तल्या अनेकांना त्याचा नेमका अर्थ उमगलाच नाही. त्यातही पुन्हा पर्रीकर हा नेता भाजपा व संघाशी संबंधित, म्हणून त्यांनी इंदिराजी वा नेहरूंनाच दोषी ठरवण्यासाठी असे विधान केल्याचे गृहीत त्यामागे होते. म्हणूनच देशाच्या सुरक्षेशी खेळ करणारे ते पंतप्रधान कोण व त्यांची नावे पर्रीकरांनी कशाला सांगितली नाहीत, यावरून काहुर माजवले गेले. यातले एक दोघेजण जरी शहाणे व अभ्यासू असते, तरी तो वाद उभाच राहिला नसता. कारण त्यात कुठलेही रहस्य वा लपवाछपवी नव्हती. मोरारजी देसाई व इंद्रकुमार गुजराल अशी त्या दोन पंतप्रधानांची नावे आहेत. गुप्तचर खात्याशी संबंधित माजी अधिकार्‍यांचे लेख वा पुस्तके वाचली असतील, त्यांना पर्रीकर कोणाबद्दल बोलले ते सहज लक्षात येऊ शकले असते. पण ज्यांना यातले काही कळत नाही, ते अशा विषयावर पोपटपंची करतात आणि नकळत शत्रूदेशाला मात्र मदत करत असतात. अनवधानाने असे दिवाळखोर पत्रकार वा विचारवंत अनेकदा जाणता अजाणता शत्रू देशाचे असेट बनत असतात. अर्थात काही लोक अजाणता शत्रूचे हस्तक होतात, तर काही लोक जाणिवपुर्वक शत्रूचे हस्तक होऊन जगत असतात. कायद्याच्या कचाट्यात अशा लोकांना पकडताही येत नसते. पर्रीकर यांनी अतिशय सूचकपणे काही निर्देश केलेले होते. आजही आपल्या देशात उजळमाथ्याने वावरणारे अनेक शत्रूचे हस्तक असू शकतात. उदाहरणार्थ कालपरवाची एक बातमी देता येईल.

मुंबईत ज्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमीत्ताने सुधींद्र कुलकर्णी यांच्या तोंडाला काळे फ़ासण्याची घटना घडली होती, त्याच पुस्तकाचे पुन्हा एक प्रकाशन पाकिस्तानात झाले. त्याला लेखक खुर्शीद कसुरी यांच्यासह माजी लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ़ उपथित होते. अधिक भारताचे माजी मंत्री व कॉग्रेस नेते मणिशंकर अय्यरही उपस्थित होते. त्या प्रकाशनानंतर एक परिसंवाद व प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम झाला. त्यात बोलताना पाकिस्तानी नेते जितके भारत विरोधी गरळ ओकणार नाहीत, इतकी जहरी भाषा अय्यर यांनी वापरली. जोवर भारतात भाजपाचे सरकार जाऊन पुन्हा कॉग्रेस सत्तेत येत नाही, तोवर भारत-पाक वाटाघाटी होऊ शकणार नाहीत. दोन देशात शांतता स्थापन होऊ शकत नाही, अशी भाषा अय्यर यांनी वापरली. योगायोग बघा, अगदी मुशर्रफ़ही त्यांच्याशी सहमत झाले नाहीत. दोन देशात बोलणी व शांतता यायला इतक्या टोकाला जाण्याची गरज नाही. दोन्हीकडले नेते लौकरच ताळ्यावर येतील आणि समजुतदारपणे वाटाघाटी करतील, असे तिथे मुशर्रफ़ यांनी सांगितले. शत्रू देशाचा माजी राष्ट्राध्यक्ष भारताच्या पंतप्रधानाविषयी इतका आत्मविश्वास दाखवतो आणि मायदेशीच्या राष्ट्रप्रमुखाविषयी अय्यर यांच्यासारखा कॉग्रेस नेता इतक्या टोकाचा अविश्वास दाखवतो, ही बाब लक्षात घेण्य़ासारखी आहे. त्यात नवे काहीच नाही. कारण अय्यर यांना देशाविषयी कुठलीही आत्मियता नाही. किंबहूना त्यांच्यासारख्या बहुतेक पुरोगाम्यांना देशाविषयी कुठलीच आस्था नसते. त्यांच्या लेखी देश, त्याचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व दुय्यम गोष्टी असतात. सत्ता त्यांच्या हाती नसेल तर देश बुडाला तरी बेहत्तर, अशी त्यांची मानसिकता असते. आपल्या मनासारखे होणार नसेल, तर विध्वंस झाला तरी चालेल, ही आजची एकूण पुरोगामी मानसिकता झालेली आहे. आणि मग त्या बरहुकूम त्यांचे वर्तन होताना आपण बघू शकतो.

असे लोक कुठल्याही शत्रूदेशाला कधीही हवेच असतात. कारण त्यातूनच त्यांचे भारतातील डीप असेट तयार होत असतात. कारण अशी माणसे मायदेशाशी गद्दार आणि शत्रूदेशाशी निष्ठावान होऊ शकतात. त्यातही अय्यर खुप प्रामाणिक आहेत. त्यांनी आपला मोदीद्वेष कधी लपवला नाही. दोन वर्षापुर्वी कॉग्रेसच्या अधिवेशनात ‘एक चायवाला कभी प्रधानमंत्री नही हो सकता’, इतका तुच्छतेने त्यांनी मोदींचा उल्लेख करून आपले प्रामाणिक मतप्रदर्शन केलेले होते. बाकीचे पुरोगामी मानभावीपणे तितके सत्य बोलत नाहीत. पण ही मंडळी जसे गेल्या काही महिन्यात वागू लागली आहेत, त्यातून त्यांचा अजेंडा लपलेला नाही. मोदी सलग पाच वर्षे सत्तेत राहिले तर पुन्हा तथाकथित पुरोगामी राजकारणाला वाव उरणार नाही, याची प्रत्येकाला खात्री आहे. मग सवाल असा येतो, की मोदीच सत्तेत कायम रहातील अशी भिती त्यांना कशामुळे वाटते आहे? त्याची अनेक कारणे असू शकतात. पण एक महत्वाचे कारण मोदींच्या आक्रमक परराष्ट्र धोरणाने काही लोकांना भयभीत केले आहे. पाकिस्तान चीन नव्हे, इतके इथले पुरोगामी त्यामुळे भयभीत झाले आहेत. उदाहरणार्थ पाकव्याप्त काश्मिर भारताने पुन्हा जिंकला, तर मोदींना २०१९ ची लोकसभा पुन्हा जिंकणे किती सोपे होऊन जाईल? मग देशातील महागाई वाढलेली असली तरी बेहत्तर! लोक पुन्हा मोदींनाच बहुमत देतील. नव्हे प्रचंड बहूमत देतील. हे कितपत शक्य आहे? त्याचे उत्तर माझ्यापेक्षा पाकिस्तानी नेते, राज्यकर्ते वा पत्रकार देवू शकतात. पाकिस्तानात सध्या युद्धभयाने चिंतेचे वातावरण आहे. त्याचे कारण काय ते आज सांगता येत नाही. पण युद्ध झाले तर आपला टिकाव लागणार नाही; अशा भयगंडाने पाकिस्तानला पछाडले आहे. म्हणून कधी नव्हे इतकी पाकिस्तानला भारताशी बोलणी वाटाघाटी करून शांतता प्रस्थापित करायची उताविळ झाली आहे.

त्याचे कारण असेही असू शकते, की इथे महाराष्ट्रात बसून आपल्याला सीमेवर होणार्‍या कालचाली कळत नसतात. पण मुशर्रफ़ वा पाक सेनाधिकार्‍यांना त्याचा नेमका अंदाज येत असतो. अर्थात दोन्ही देशांच्या सेना अनेक वर्षे समोरासमोर उभ्या आहेत. पण पाकिस्तान कधी भारताला घाबरलेला नव्हता. गेल्या दिड वर्षात पाकिस्तान घाबरगुंडी उडाल्यासारखा वागतो आहे. त्याचे एक कारण अणुयुद्ध अशक्य आहे आणि पारंपारिक युद्धात आपण भारतासमोर टिकणार नाही, अशी भिती त्यांना सतावते आहे. सहाजिकच अशा युद्धात काश्मिर बघता बघता हातचा जाईल, असे त्याचे कारण असावे. बलुचीस्तान उलटला आहे आणि व्याप्त काश्मिरात लोक नाराज आहेत. म्हणूनच भारतीय सेनेने घुसखोरी केली, तर स्थानिक जनताच त्यांना साथ देईल; हे पाकिस्तानचे खरे भय आहे. म्हणुनच पाकिस्तानला मनापासून शांतता नको असली, तरी निदान युद्ध अजिबात नको आहे. ते टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे तात्पुरती शांतता वा युद्धबंदी करार! तो करायचा तर वाटाघाटी हव्यात. भारत त्यालाच दाद देत नाही, ही पाकिस्तानची तक्रार आहे. कारण भले अय्यर वा तत्सम अनेकजण पाकिस्तानचे हितचिंतक इथे असतील. पण त्यांच्यापेक्षा अनेकपटीने भारताचे हस्तक वा हितचिंतक सध्या पाकिस्तानात निर्माण झाले आहेत. हे अय्यर यांच्यासारख्या दिवट्यांना कळत नसले, तरी पाकिस्तानात राज्य केलेल्या मुशर्रफ़ सारख्यांना नेमके कळते. म्हणून तर अय्यर पाच वर्षांनी सरकार बदलले की बोलणी होतील म्हणतात आणि मुशर्रफ़ तितके थांबायला तयार नाहीत. आधीच बोलणी व्हावीत व होतील, अशी आश्वासक भाषा मुशर्रफ़ बोलतात. कारण अय्यर यांच्या कॉग्रेसला भारतात पुन्हा सत्ता मिळेपर्यंत काश्मिर हातचा गेला, तर कारभारच आटोपला, हे मुशर्रफ़ना कळते. सुधींद्र कुलकर्णी वा अय्यर यांचा तो विषय नव्हे.

काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचा ताबा मिळवणे ही भारताची कायमची भूमिका राहिलेली आहे. पण पुढल्या काळात इंदिराजींच्या नंतर कोणी त्याचा गंभीरपणे विचारही केला नाही. त्यापेक्षा पाकिस्तानी जिहादला तोंड देण्यातच भारताची शक्ती खर्ची पडत राहिली. पण गेल्या दिड वर्षात जिहादला झुगारून मोदी व पर्रीकर यांच्यासह सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाकिस्तान पोखरून तिथे घरभेदी हाताशी धरण्याचा सपाटा लावला आहे. त्याच्या बातम्या इथल्या माध्यमात येत नसतील, तरी पाकिस्तानी वर्तमानपत्रात त्याचा रोजचा रतीब घातला जात असतो. त्यातून युद्ध छेडले गेले तर हवे, असा एकूण भारताचा पवित्रा आहे. कारण अणुबॉम्बच्या धमकीत अर्थ नाही हे जगाला ठाऊक आहे. पाकिस्तानकडे अणूबॉम्ब असले तरी ते भारताविरुद्ध वापरणे त्यांना शक्य नाही, हे ठाऊक असल्यानेच पाक नेते पोकळ धमक्या देत असतात. खरी भिती नेहमीच्या पारंपारिक युद्धाची आहे. ते होऊ नये म्हणून पाकिस्तानने आजकाल किती शेपूट घातली आहे? कालपरवाच हाफ़ीज सईदच्या जमात उद दावासह पन्नास जिहादी संघटनांवर शरीफ़ सरकारने प्रतिबंध लागू केला. त्यांच्या बातम्या द्यायला सुद्धा बंदी घातली गेली आहे. दहा वर्षे तशी मागणी करून भारत थकला आणि आज तशी कुठली मागणी भारताने केलेली नसताना, पाकला अशी उपरती कशाला झाली आहे? त्याचे उत्तर अय्यरना ठाऊक नाही, की इथल्या अतिशहाण्या राजकीय विश्लेषकांना उमजलेले नाही. त्याचे कारण सीमेवरील युद्धसज्जता पाकिस्तानला भेडसावते आहे. म्हणून तिकडे छोटा राजनला इडोनेशियात अटक झाली, तर इथे पाकिस्तानात दाऊदच्या निवासस्थानी थेट लष्करी कमांडो तैनात करण्यात आले. याला भय म्हणतात. इतका घाबरलेला पाकिस्तान कुठल्याही किंमतीत युद्ध टाळण्याची केविलवाणी कसरत करतो आहे.

कालपरवाच मुशर्रफ़ यांनी आजवर दहशतवाद व जिहादचा आसरा घेतल्याची कबुली दिली. ओसामा व हाफ़ीज आमचे हिरो असल्याचे जाहिरपणे सांगताना आणखी एक कबुली त्यांनी दिली. त्याकडे गंभीरपने बघण्याची गरज आहे. ‘जिहादी आम्हीच तयार केले आणि आज ते पाकिस्तानवरच उलटले आहेत’, असे मुशर्रफ़ म्हणतात. त्याचा अर्थ काय? त्यांच्याच हिंसक बगलबच्चांना कोणी पाकिस्तानवर उलटवले आहेत? जे उलटले त्यांना आवरून भारताशी युद्ध लढता येणार नाही, याचीच कबुली मुशर्रफ़ यांनी त्या मोजक्या शब्दातून दिली आहे. त्याचा अर्थ अय्यरसारख्या अतिशहाण्यांना कित्येक जन्म घेतले तरी उमजणार नाही. जानेवारीत आपले डीप असेट पाकमध्ये असायला हवेत, असे पर्रीकर म्हणाले आणि आज तसे (उलटलेले) असेट वा हस्तक असल्याची कबुलीच मुशर्रफ़ देत आहेत ना? त्यामुळे या अस्सल कमांडोला भयभीत केले आहे. ज्याने दगाबाजी करून जिहादी कारगिलमध्ये घुसवले, त्यालाच आता शांतता लौकर व्हावी अशी घाई कशाला झाली आहे? त्याचे उत्तर ‘उलटले’ याच शब्दात मिळू शकते. ती स्थिती आली म्हणून मग दोन देशात शांतता हवी आणि युद्ध नको, असली भूमिका भारतीय जनतेत रुजवण्यासाठी इथे कसुरी यांच्या पुस्तकाची प्रकाशने होत असतात. अय्यर इत्यादिंना हाताशी धरून भारत सरकारवर बोलणी करण्यासाठी दबाव आणला जात आहे. युद्धाची खुमखुमी पाकिस्तान विसरला आहे आणि त्यालाच आता शांततेचे वेध लागले आहेत. कारण भारताचा संरक्षणमंत्री दिर्घकाळ सेनेला आळशी बसवणे योग्य नाही, म्हणत युद्धाला सज्ज होतो आहे. वेगवेगळ्या वेळी अशा बातम्या येतात, त्या जोडून वाचल्या तर त्याचे अर्थ लागतात. म्हणून अय्यर कॉग्रेसची सत्ता आल्यावर बोलणी होतील म्हणतात, तर मुशर्रफ़ तितके थांबायला राजी नाहीत. आजवर छुपे पाकिस्तानी हितचिंतक असलेल्यांना आता उघड मैदानात आणले जात आहे. पाक हाफ़ीजच्या संघटनेवर बंदी घालतो आहे, त्यांच्या बातम्यांना बंदी घालतो आहे. मुशर्रफ़ जिहादी उलटल्याची कबुली देत आहेत. आणि नेमक्या अशावेळीच इथे असंहिष्णूतेचा डांगोरा का पिटला जातो आहे?

कुछ तो गडबड है भाई!

3 comments:

  1. मोरारजी देसाई यांच्या विषयी माझ्या ब्लॉग वर सविस्तर लिहिले आहे. prashantbhalerao.blogspot.in

    ReplyDelete
  2. सुरेख लेख, भाऊसाहेब! सुरेख लेख, भाऊसाहेब! बबलोचिस्तान तर 'पाडाला पिकलेला' अांबा आहे! त्याला आधी आज़ाद केलेले बरे! त्यात एका दगडात दोन पक्षी मारता येतील कारण मग ग्वादार हे कराचीच्या पश्चिमेला असलेले बंदर पाकिस्तानच्या हातून जाईल व China Pakistan Economic Corrudor या प्रकल्पाची वाट लागेल! मग काश्मीरची मुक्तता! Chatham House ने घेतलेल्या opinion pollनुसार पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानात विलीन व्हायला राज़ी नाहीं!

    ReplyDelete
  3. सर उत्तम विश्लेषण केंला आहे. आपल्या काही मुर्ख माध्यमांची कीव करावी वाटते व राग हि येतो. जो पाक आधी गुर्मीत असायचा आज त्याची घाबरगुंडी उडलेली दिसते हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश मानवे लागेल.

    ReplyDelete