Thursday, December 17, 2015

राजकीय सुडबुद्धी आणि सीबीआय



२००४ मध्ये वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालच्या एनडीए आघाडीला पराभूत करण्यासाठी सोनियांनी मायावतीपासून शरद पवार यांच्यापर्यंत कोणाचेही उंबरठे झिजवले. त्यातून युपीए आघाडी उभी राहिली आणि सत्ता सोनियांच्या हाती आली. त्यात कॉग्रेसला सर्वात मोठा हात दिला होता आंध्रप्रदेश या राज्याने! तिथे देशातला सर्वात प्रभावी मुख्यमंत्री म्हणून ओळखले जाणारे चंद्राबाबू नायडू सत्तेत होते आणि राजशेखर रेड्डी या प्रादेशिक कॉग्रेस नेत्याने चंद्राबाबूंना पराभूत करून दाखवले होते. सर्वाधिक खासदार त्यांनी निवडून आणल्याने कॉग्रेसला दिल्लीची सत्ता काबीज करणे शक्य झाले होते. पुढे पाच वर्षाची सत्ता भोगताना रेड्डी यांनी आपल्या मुलालाही राजकारणात आणले होते. २००९ सालात पुन्हा आंध्रात सत्ता जिंकताना रेड्डी यांनी चंद्राबाबूंचा निर्विवाद पराभव केला आणि तसाच तेलंगणातील लोकप्रिय नेते चंद्रशेखर राव यांनाही पाणी पाजले. मात्र मिळालेले यश उपभोगायला रेड्डी हयात राहिले नाहीत. दुसर्‍यांदा मुख्यमंत्री झालेले राजशेखर रेड्डी अनंत चतुर्दशीच्या दिवशी हेलिकॉप्टरने प्रवास करताना अपघातात मरण पावले. पण त्यांची लोकप्रियता इतकी होती, की त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करण्याची मागंणी पुढे आली आणि सोनियांना ते राजकीय आव्हान वाटले. रेड्डीपुत्र जगनमोहन त्यासाठी धडपडत होता आणि पित्याच्या मृत्यूच्या सहानुभूतीवर स्वार व्हायची संधी त्याने सोडली नाही. त्याने सहानुभूती यात्रा काढायचा प्रयत्न केला त्यालाही सोनियांनी आडकाठी केली. तेव्हापासून त्याच्यावर कॉग्रेसश्रेष्ठींनी डूख धरला आणि जगनला संपवण्याचे डावपेच सुरू झाले. सोनियांच्या डावपेचांना जगन शरण जात नव्हता आणि मतदारही त्याला साथ देत होता. त्यामुळे युपीए म्हणजे सोनिया सरकारने त्याच्या विरोधात मोठे हत्यार उपसले. त्याचे नाव सीबीआय! याला म्हणतात राजकीय सूडबुद्धी!

आज राजकीय सूडबुद्धी शब्दाचा सरसकट वापर होतो आहे. पण त्याचा अर्थ नेमका कितीजण सांगू शकतील? जगन रेड्डी हा कॉग्रेसचाच खासदार होता आणि त्याने फ़क्त पित्याच्या वारश्यावर दावा केला होता. त्यामुळे सोनियांनी त्याला राजकीय व सार्वजनिक जीवनातून उठवण्याचा निर्धार केला. त्याच्या मागे विविध भ्रष्टाचाराची प्रकरणे लावून सीबीआयने त्याला गोत्यात आणले. पिता मुख्यमंत्री असताना जगन याने अनेक कंपन्या स्थापन केल्या आणि त्यात एकामागून एक नामवंत कंपन्यांनी अफ़ाट गुंतवणूक केली. ही गुंतवणूक त्यांना मिळालेल्या सरकारी मेहरबानीची किंमत होती. पण जोपर्यंत रेड्डी वा त्यांचा पुत्र कॉग्रेसमध्येच होते आणि सोनियांचे आदेश मानत होते, तोपर्यंत कुठलीही सरकारी यंत्रणा रेड्डींच्या भ्रष्टाचाराला हात लावायला राजी नव्हती. पण पक्षातून जगन बाहेर पडला व त्याने पित्याच्या नावानेच प्रादेशिक पक्ष सुरू केला, तिथून त्याचे ग्रह बदलले. अकस्मात सीबीआय व अंमलबजावणी खात्याला त्याच्या विविध कंपन्यात भ्रष्टाचार व अफ़रातफ़र असल्याचे साक्षात्कार झाले आणि कित्येक खटले भरले गेले. नुसतेच खटले भरण्यात आले नाहीत तर जामिनाशिवाय जगनला कोठडीत डांबले गेले. खालच्या कोर्टापासून सुप्रिम कोर्टापर्यंत जगन दाद मागत फ़िरत होता. पण त्याला जामिन मिळू शकला नव्हता. त्याच्या कुठल्याही आवाहनाला लाखो लोकांचा प्रतिसाद मिळत असला, तरी जामिन मिळू शकला नाही. तब्बल सोळा महिने जगन तुरूंगात खितपत पडला होता आणि कुणाला त्यात राजकीय सूडबुद्धी असल्याचे कधीच उमगले नाही. सर्व कारवाई थेट सोनियाप्रणित युपीए सरकार करीत होते. त्यांच्याच इशार्‍यावर सीबीआय करीत होती. कशासाठी? तर सोनियांच्या आदेशाला जगन शरण जात नव्हता आणि आंध्रामध्ये पित्याने जो राजकीय वारसा निर्माण केला, त्यावर जगन हक्क सांगत होता.

२०१२ पासून सुरू झालेला हा तमाशा सोळा महिने चालू राहिला आणि एकामागून एक नवनवे खटले व आरोपपत्र जगनवर दाखल होत राहिले. अकरा आरोपपत्रे दाखल झाल्यावर त्याला कोर्टाने काही अटींवर जामिन दिला होता. ज्या काळात रॉबर्ट वाड्रा यांच्यावरील तत्सम आरोपांची सीबीआय वा अन्य सरकारी यंत्रणा दखलही घ्यायला राजी नसायची, त्याचवेळी जगनच्या बाबतीत मात्र सीबीआय कमालीची कार्यतत्पर दिसत होती. याला राजकीय सूडबुद्धी म्हणतात. देशभर डबघाईला गेलेला कॉग्रेस पक्ष नव्याने उभा करून दाखवणार्‍या राजशेखर रेड्डी या नेत्याच्या वारसाची सोनियांनी काय अवस्था करून टाकली, त्याचा हा दाखला आहे. जगनवरचे आरोप कुणा खाजगी व्यक्तीने केले नव्हते किंवा त्याच्यावर व्यक्तीगत कुणी खटले भरले नव्हते. सर्वकाही सोनिया सरकारच्या इशार्‍यावर चालले होते. सगळे गुन्हे वा भ्रष्टाचार सोनियांची कृपा रेड्डी कुटुंबावर असताना झालेले होते. पण तो भ्रष्टाचार चालू असताना सीबीआय वा भारत सरकारने तिकडे काणाडोळा केलेला होता. मात्र सोनियांच्या आदेशाला जुमानायचे जगनने नाकारले आणि सरकारी यंत्रणा कामाला लागली. याला राजकीय सूडबुद्धी म्हणतात. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी असे काही राजकीय हेतूने काही उकरून काढलेले नाही. सोनिया वा राहुल यांच्यावरील खटले हे स्वामी या खाजगी माणसाने दाखल केलेले आहेत. त्याचा भारत सरकारशी कुठलाही संबंध नाही. तरी त्याला मात्र आज सूडबुद्धी म्हटले जाते. किती विरोधाभास आहे ना? योगायोग बघा. जेव्हा जगनविरोधात कारवाई सुरू झाली, त्याच दरम्यान स्वामी यांनी नॅशनल हेराल्डचे प्रकरण कोर्टात नेलेले होते. पण त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेही सरकारकडून स्वामींना नाकारली जात होती. पण त्या बाबतीत हलगर्जीपणा करणारे सरकार जगनविषयी मात्र कमालीचे कार्यतत्पर होते.

स्वामी याना हवी असलेली सरकारी दफ़्तरातील कागदपत्रे मोदी सरकार सत्तेत आल्यावर मिळू शकली. जी दडपण्यासाठी युपीए सरकार राबत होते. म्हणून हे प्रकरण इतके ऐरणीवर आलेले आहे. त्यात कोर्टाने तुमची बाजू स्पष्ट करायला बोलावले तर सोनिया-राहुलना काय अडचण वाटते आहे? कमीपणा कसला वाटतो आहे? समन्स आले म्हणजे तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची संधी दिली आहे आणि तुरूंगात जायची भाषा कशाला? जामिन मागणार नाही तुरूंगात जाऊ, ही फ़ुशारकी कशाला? कुठल्याही कायद्याने वा कोर्टाने तुम्हाला तुरूंगात घालण्याची भाषा केलेली नाही. मग तुरूंगात जाण्याचा उतावळेपणा कशाला? समन्स आल्यावर सोळा महिने उपस्थित रहायला आढेवेढे घेणार्‍यांना तुरूंगात जाण्याची घाई कशाला झाली आहे? आपल्यावरील आरोपाची सफ़ाई देण्यापेक्षा हे दोघेजण भलतेच उलटे आरोप करण्यात रमलेले आहेत. पण आपण कसे निर्दोष आहोत, त्याचा एकाही शब्दाने खुलासा मात्र करीत नाहीत. त्याच्याही पलिकडे जाऊन राजकीय सूडबुद्धीचा आरोप करीत असतात. कारण आपल्याच पापाची भुते त्यांना भेडसावत असावीत. आपण जगन रेड्डीला कसे छळले, त्याच्या आठवणी सोनियांना सतावत असाव्यात. सूडबुद्धीने वागायचे म्हणजे काय ते त्यांच्यापेक्षा अन्य कुणाला अजून कळलेले सुद्धा नाही. त्यांच्याच पद्धतीने वागायचे असते, तर वाड्रापासून नॅशनल हेराल्डपर्यंत मोदी सरकार सीबीआय त्यांच्यामागे लावू शकले असते. पण मोदींनी तसे केले नाही. कारण गंधी खानदानाचा तमासगीर वारसा त्यांना पक्का ठाऊक आहे. सुपात अफ़ूची गुंगी दिलेले अर्भक ठेवून सहानुभूतीची भिक मागणार्‍या भिकारणीपेक्षा गांधी खानदानाची कार्त्यपद्धती अजिबात भिन्न नाही. म्हणूनच कुठलीही राजकीय सूडाची कारवाई मोदी सरकारने केलेली नसताना हा नुसताच कांगावा चालू आहे. तुरूंगात जाण्याच्या फ़ुशारक्या मारल्या जात आहेत.

11 comments:

  1. सुपात अफ़ूची गुंगी दिलेले अर्भक ठेवून सहानुभूतीची भिक मागणार्‍या भिकारणीपेक्षा गांधी खानदानाची कार्त्यपद्धती अजिबात भिन्न नाही.
    Bhau mastar stroke....

    ReplyDelete
  2. अज्ञानपङकपरिमग्रमपेतसारं
    दुःखालयं मरणजन्मजरावसक्तम् ।
    संसारबंधनमनित्यमवेक्ष्य धन्या

    सुंदर लेख

    ReplyDelete
  3. भाऊ आगदी बरोबर आहे

    ReplyDelete
  4. सुम्दर आणि अतिशय मुद्देसूद लिखाण! खरंतर प्रत्येकाने वाचावे, असे.

    ReplyDelete
  5. सोन्न्या गांधी या महान त्यागमूर्ति असल्याचे आपण विसरलात वाटते.मुलाच्या प्रगतिसाठी त्या माउलीने एवढेतरी करणे गरजेचे आहे.आता हे लवकरच कळेल की आई आहे का पिलाला पायाखाली घेणारी आहे.

    ReplyDelete
  6. भाऊ लेख नेहमीप्रमाणेच सणसणीत!

    ReplyDelete
  7. Ekdam khare bhau !!
    Bhau mi tar NewsPaper vachanech sodun dile ahe, sagle kuthalyatari political party chya davanila bandhele ahet,mhanun mi fakt tumacha ani online news vachat asto

    ReplyDelete
  8. जे जगन मोहनबाबतीत ;तेच मुलायम, मायावती बाबत झाले आहे. यूपीए सरकारला पाठिंबा दिल्यास त्यांचा भ्रष्टाचार डोळ्याआड करुन धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारायच्या. आणि त्यांनी स्वतंत्र लढायचे ठरवल्यास किंवा नंतर काँग्रेसला पाठिंबा न दिल्यास लगेच सर्वोच्च न्यायालयात सीबीआई अवैध सम्पत्तिप्रकरणी(ताज कॉरिडोर प्रकरण आठवते का ?) रात्रितून आरोपपत्र दाखल करायची. पाठिंबा मिळाल्यावर लगेच सुनावणी लांबणीवर...

    ReplyDelete
  9. सुपात अफ़ूची गुंगी दिलेले अर्भक.... हे वाक्य कायम लक्षात राहील

    ReplyDelete
  10. हे सर्व लेब लिहायचे कालिज व डेफ्त फक्त भाऊ तोरसेकरानचीच हा उदाहरणपुर्ण लेख वास्तविकतेपर्यत मजल मारने सोफी गोष्ठ नाही म्हणुन ज्यान्च्या हातात हे लेख वाचुन विचार करावा व ईतर पर्यत पोहचविण्याची दखल घ्यावी हि सर्वान्ना विनन्ती । दिशा उद्याची नव्या युगाची । सशक्त,सम्पन्न भारताची।

    ReplyDelete