Thursday, January 21, 2016

रावसाहेबांचा झेंडा आणि अजेंडादिल्ली आणि बिहारमध्ये सपाटून मार खाण्यातून भाजपाने आपल्याच प्रयत्नातून देशातली मोदीलाट ओसरल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. पण आपल्याच पक्षाला गोत्यात आणण्याची त्या पक्षाच्या नेत्यांची हौस अजून संपलेली दिसत नाही. तसे नसते तर महाराष्ट्रात आपल्याला खुप मोठा बदल दिसला असतात. इथेही लोकसभेत यश मिळवण्यात भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा वा पक्ष संघटनेचे फ़ारसे कर्तृत्व नव्हते. मोदींची देशव्यापी लोकप्रियता व राजकीय परिस्थितीचा लाभ घेत भाजपाने युती करून चांगले यश संपादन केले होते. पण ते आपल्याच संघटनात्मक कौशल्याचे यश असल्याच्या भ्रमाने इथल्या नेत्यांना इतके पछाडले, की त्यांनी स्वबळावर राज्याची सत्ता संपादन करण्याचा निर्धार केला. त्यासाठी कुठल्याही पक्षातून उमेदवार आयात करण्यापासून मोदींची लोकप्रियताही जुगारात पणाला लावली. मात्र त्याचा हवा तसा लाभ झाला नाही. पण एका बाजूला राष्ट्रवादीशी जवळीक केल्याची दुषणे पक्षाला लागली आणि दुसरीकडे शिवसेनेसारखा जुना मित्र कायमचा दुरावला. त्याचे परिणाम लगेच दिसले नाही, तरी मागल्या दिड वर्षात क्रमाक्रमाने त्याचे दुष्परिणाम उघड झाले आहेत. विरार-वसई व नव्या मुंबईत तर संपुर्ण मार खावा लागला. तर औरंगाबाद पालिकेत दणका बसला. तरीही शत-प्रतिशत भाजपा हा अजेंडा काही डोक्यातून निघण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळेच येत्या वर्षी होऊ घातलेल्या मुंबई पालिकेच्या निवडणूकीत आपलाच झेंडा फ़डकवण्याची गर्जना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केल्यास नवल नव्हते. पण जे काही बोलतोय, त्याचा अर्थ निदान आपल्याला तरी उमजला पाहिजे, इतकेही भान रावसाहेबांना उरलेले दिसत नाही. मुंबई पालिकेवर आपलाच पक्षाचा झेंडा फ़डकवण्य़ाची मनिषा गैर नाही. पण त्यासाठी संघटनात्मक बळ हवे आणि आवश्यक तितकी ताकद पाठीशी असायला हवी, त्याचे काय?

कल्याण डोंबिवली येथे तोच प्रयोग अलिकडे झाला आणि तिथे राष्ट्रवादीतून आयात केलेल्यांची आता पक्षावर पकड बसली आहे. संख्या वाढली तरी पक्षात भेसळ झाली आणि आता मुळचा भाजपा त्या पालिका क्षेत्रात किती शिल्लक राहिला, हा संशोधनाचा विषय आहे. लागोपाठच्या देशभरातील निवडणूका एक संकेत देत आहेत आणि त्याची दखल घेणारा पक्षच भविष्याची पावले ओळखू शकत असतो. इंदिराजींच्या रुपाने राष्ट्रीय नेत्याला पुढे करून कुठल्याही निवडणूका जिंकण्याचा कालखंड १९७० नंतर सुरू झाला. त्याचा शेवट २००० पुर्वीच झाला होता. त्यानंतर मोदींनी जो प्रयोग यशस्वी केला, त्याचे स्वरूप भाजपा सोडून अनेकांच्या लक्षात आले आहे. पण आपलाच प्रयोग भाजपा विसरून गेला आहे. २०१४ च्या निवडणूकांनी एकूण मतदानाचे स्वरूप बदलून टाकले आहे. पक्ष वा संघटनांना निवडून देण्यापेक्षा मतदार नेतृत्व कोण करणार, त्या चेहर्‍याला कौल देवू लागला आहे. अमेरिकेत जसा प्रत्येक स्तरावर अध्यक्षीय पद्धतीने नेता निवडला जातो, तसे भारतीय मतदानाचे स्वरूप होत चालले आहे. बिहार वा दिल्लीत भावी मुख्यमंत्री म्हणून भाजपाकडे चेहरा नव्हता, त्याचा दणका बसला. तीच स्थिती महापालिका वा स्थानिक निवडणूकात दिसलेली आहे. उत्तर प्रदेशात जिल्हा, तालुका वा महापालिका निवडणूकीत भाजपा चौथ्या क्रमांकावर फ़ेकला गेला. तेच गुजरात वा मध्यप्रदेशातही घडलेले आहे. महाराष्ट्रात नवी मुंबई वा विरार-वसईत भाजपाचा सफ़ाया झाला. तेव्हा लोकांनी हितेंद्र ठाकुर वा गणेश नाईक यांना कौल दिला होता. त्याला मोदीलाट पॅटर्न म्हणतात. भाजपालाही त्याच मार्गाने जाणे भाग आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवरचे नेते उभे करावे लागतील. नेमकी तीच गोष्ट भाजपा विसरून गेला आहे. त्यापेक्षा उसनवारीचे उमेदवार गोळा करून १९७०च्या जमान्यातील डावपेच भाजपा खेळू बघतो आहे.

प्रदेशाध्यक्ष पदासाठी नव्याने निवड झाल्यावर रावसाहेब दानवे यांनी मुंबई पालिकेवर पक्षाचा झेंडा फ़डकवण्याची केलेली घोषणा, त्याच मार्गावरचे पुढले पाऊल आहे. आपण सलग अनेक निवडणूकात मार कशाला खातोय, त्याचा विचारही केला जात नाही तेव्हा संकटाला माणुस आमंत्रण देत असतो. पक्ष वा संघटना त्याला अपवाद नसतात. कॉग्रेस त्याच मार्गाने रसातळाला गेलेली आहे. बिहारमध्ये उमेदवारांची उसनवारी किंवा मोदींचा अतिवापर करूनही भाजपाला सर्वात मोठा पक्ष होणेही अशक्य झाले. तेवढेच नाही तर सपाटून मार खाण्यापर्यंत दुर्दशा झालेली आहे. पण बेताल बोलण्याची हौस काही फ़िटलेली नाही. ज्या बोलण्यातून मित्र दुखावले जातात आणि आपल्याच अडचणी वाढतात, ते बोलू नये; यालाच राजकारण म्हणतात. एवढेही ज्यांच्या गावी नाही, त्यांच्या हाती सध्या भाजपाची सुत्रे गेलेली आहेत. त्यामुळे दुर्दशा अपरिहार्य आहे. उदाहरणार्थ रावसाहेब दानवे यांनी मुंबई वा आगामी पालिका निवडणुकीत पक्षाचा झेंडा फ़डकवण्याची भाषा केली. पण कालपरवा आपल्याच जालना जिल्ह्यात हाती असलेल्या नगरपालिका गमावल्याचे भान त्यांना होते काय? मोदींच्या उदयापुर्वी जे यश भाजपाने या पालिकात मिळवलेले होते, त्यालाही बाधा आलेली आहे. म्हणजेच कुठेतरी चुकते आहे, इतके लक्षात यायला हरकत नाही. बाकीच्या महाराष्ट्राचे सोडून द्या. दानवे यांचा जालना जिल्हाही तसाच हातातून निसटतो आहे. तर तिथे डागडुजी करण्यापेक्षा रावसाहेब मुंबईवर झेंडा फ़डकवण्याच्या वल्गना करीत आहेत. हे कसे करणार त्याबद्दल मात्र दानवे काहीही बोलत नाहीत. रणनिती उघड बोलता येत नाही, हा त्यांचा दावा योग्यच आहे. पण रणनिती बोलायची नसेल, तर लक्ष्य तरी घोषित कशाला करायचे? वेळ आल्यावर त्याची चर्चा होऊ शकते. तोपर्यंत दानवे कळ कशाला काढत नाहीत? उतावळेपणाची काय गरज आहे?

पत्रकार वा कॅमेरे समोर आले म्हणजे आपण काही बोललेच पाहिजे, अशी काही सक्ती भाजपाच्या नेत्यांवर शिस्त म्हणून लादण्यात आलेली आहे काय? नसल्यास ह्या तोंडपाटिलकीची काय गरज आहे? आताही पदावर नव्याने निवड झाल्यानंतर प्रदेशाध्यक्षाने आपल्या आगामी कारकिर्दीबद्दल काही भूमिका मांडायची अपेक्षा असते. त्यात कुठे झेंडा फ़डवणार याच्यापेक्षा पक्षासमोरची खरी व गंभीर आव्हाने, यांचा गोषवारा दानवे यांनी दिला असता तर अधिक बरे झाले असते. किंबहूना तेच करायला हवे होते. कारण लोकसभेतील यशानंतर पक्षाला बर्‍याच जागी अपयशाला सामोरे जावे लागले आहे आणि महाराष्ट्रातही अजून सरकार धडपणे आपल्या पायावर ठामपणे उभे राहू शकलेले नाही. घोटाळ्यांच्या चौकशीपासून विविध नेमणूकांपर्यंत काहीही हालचाल झालेली नाही. सत्ताधारी युती म्हणून शिवसेनेला सोबत घेतले असले, तरी दोन्ही पक्षातला बेबनाव कायम आहे. युती कशी असू नये, याचे सतत प्रदर्शन चालू असते. त्यातून मतदाराच्या मनात साशंकता निर्माण होते, याचेही भाजपा नेत्यांना भान उरलेले नाही. लोकसभा विधानसभेतील मोठ्या यशानंतर २०१२ मध्ये मुंबईच्या पालिका निवडणूकीत कॉग्रेस राष्ट्रवादीला दणका बसला, त्याचाही विचार भाजपाने करायला हवा. मतदार आता सरसकट कुठल्या पक्षाला आंधळेपणाने कायम पाठींबा देत नाही. नेतृत्व आणि कुठल्या संस्थेसाठी मतदान, यानुसार लोकमत सतत बदलते हा नवा पॅटर्न आहे. म्हणूनच नुसता झेंडा व अजेंडा यांची महत्ता आजच्या राजकारणात व निवडणुकात शिल्लक उरलेली नाही. आपण कुणालाही सत्ताधारी करू शकतो आणि सत्ताभ्रष्टही करू शकतो, हा जनतेचा आत्मविश्वास आताच्या राजकारणाला आकार देत असतो. म्हणूनच कुठल्याही पक्षाने मतदाराला गृहीत धरण्याचे दिवस संपले आहेत. रावसाहेबांना त्याचे भान दिसत नाही. अन्यथा मुंबईवर झेंडा फ़डकवण्याआधी त्यांनी नव्या मुंबई पालिकेचे निकाल अभ्यासले असते.

3 comments:

 1. छान भाऊ 5वा पक्ष कोणता????

  ReplyDelete
 2. भाऊ विषयांतर करतोय पण इराक-सिरीया मधिल याजिदी समुह मुळचे राजा दशरथाचे सैनिकांचे वंशज आहेत असे वारंवार ऐकायला मिळते खरे आहे का? Please कळवा

  ReplyDelete
 3. Hi mahesh,

  Your piece is interesting. FOund soemthing on net.
  https://www.quora.com/Are-Yazidi-tradition-and-culture-similar-to-those-of-Hindus
  regards,
  SRP

  ReplyDelete