Thursday, January 21, 2016

दोनदा आडवा आलेला सभ्यपणा-सुसंस्कृतपणा



नुकत्याच संपलेल्या पिंपरी चिंचवड येथील मराठी साहित्य संमेलनात गाजलेला साहित्यिक विषय, म्हणजे ‘जाणता राजा’ शरद पवार यांची मुलाखत! त्यात मुलाखतकारांनीच अधिक बोलून पवारांना बोलायला़च वेळच दिला नाही, असे बहुतेक माध्यमांनी स्पष्ट केले आहे. पण तीच तर आजकालची पद्धत आहे ना? प्रत्येकजण अर्णब गोस्वामी व्हायला धडपडत असतो आणि अर्णब व्हायचे तर ज्याची मुलाखत आहे, त्याला शब्दही बोलू द्यायचा नसतो ना? मग त्याच वास्तवाचा प्रभाव साहित्य संमेलनावर पडल्यास गैर ते काय? या मुलाखतीत पवारांना खुप कमी बोलण्याची संधी मिळाली, तरी त्यांनी काही महत्वाचे राजकीय व ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट केले. त्यापैकी एक म्हणजे मराठी माणसाला हुकलेले देशाचे पंतप्रधानपद! खुद्द पवार साहेब मागली दोन दशके मोठ्या आतुरतेने त्या पदावर आरुढ व्हायला सज्ज होऊन बसले आहेत. पण तशी संधीच त्यांच्या दिशेने येत नाही आणि आलीच असेल, तर तिला पिटाळून लावण्यात पवारांचा हातखंडा आहे. मात्र पवारांनी मुलाखतीत आपल्या हुकलेल्या संधीचा विषयच येऊ दिला नाही. तर मराठी माणसाला तशी संधी होती, तो इतिहास सांगितला. तब्बल अर्धशतकापुर्वी दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे आकस्मिक निधन झाले आणि नव्या पंतप्रधानाची निवड व्हायची होती. त्यावेळी केंद्रात यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा खुप उजळ होती. सहाजिकच कॉग्रेसश्रेष्ठी त्यांच्याच नावाचा विचार करीत होते. पण चव्हाण पडले भिडस्त आणि सभ्य! कुठलाही दावा करण्यापेक्षा त्यांनी आपल्या समर्थक अनुयायांची बैठक घेऊन त्यावर विचारविनियम केला. त्या गडबडीत संधी कशी निघून गेली, त्याचा संदर्भ पवारांनी सविस्तर कथन केला आहे. तो अर्थातच यशवंतरावांच्या थोरपणाचा नमूना म्हणता येईल. सभ्यपणा व सुसंस्कृतपणा हा चव्हाणांच्या राजकारणाचा पाया होता.

शास्त्री यांचे निधन झाल्यावर संधी आलेली असताना आपल्यावर पंडित नेहरू व इंदिराजींचे असलेले उपकार चव्हाण विसरले नाहीत. म्हणूनच दावा करण्याच्याही आधी इंदिराजींकडे त्याबद्दल विचारणा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसे केल्यास इंदिराजी आपलेच घोडे पुढे दामटतील, अशी शंका किंवा भिती पवारांनी तेव्हा व्यक्त केली होती. त्यावर यशवंतराव रागावले. पण शेवटी पवार यांचेच शब्द खरे ठरले. कारण चव्हाणांनी विचारणा केल्यावर दुसर्‍या दिवशी इंदिराजींनीच आपण दावा करणार असल्याचे चव्हाणांना कळवले आणि परस्पर मराठी माणसाचा दावा निकालात निघाला. चव्हाणांनी तसे कशामुळे केले? तर त्याला सभ्यपणा व सुसंस्कृतपणा म्हणतात. ते शब्द अर्थातच मुलाखतीत पवारांनीच वापरले आहेत. पण तोच सभ्यपणा चव्हाणांच्या पंतप्रधान पदावर आरूढ होण्यास आडवा आला, असेही शरद पवार म्हणतात. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. सत्तापदाला असलेला धोका आमदारही नसताना कोवळ्या वयात पवार ओळखू लागले होते. कारण हा प्रसंग घडला, तेव्हा १९६६ सालात पवार आमदारही झालेले नव्हते. पण पंतप्रधान पदाच्या घडामोडीतही किती बारकाईने लक्ष घालत होते, त्याची साक्ष मिळते. त्यात चव्हाणांनी सभ्यपणा दाखवून पुर्वी इंदिराजींनी केलेल्या मदतीचे स्मरण ठेवले. हाच तो सभ्यपणा असतो ना? तोच यशवंतरावांनी दाखवायला नको होता, असा पवारांचा आग्रह होता. अर्थात त्याला चव्हाण बधले नाहीत. त्यांनी पंतप्रधानपदावर पाणी सोडून सभ्यपणाला साथ दिली. हाच गुरू शिष्यातला फ़रक आहे. पण पवारांना अजून त्याचा अर्थ उमगलेला नसावा. अन्यथा त्यांनी सभ्यपणा व सुसंस्कृतपणा ‘आडवा’ आला, अशी भाषा केली नसती. की आपण तसे सभ्य सुसंस्कृत नाही हे लोकांना ठाऊक असतानाही पुन्हा ओरडून जाहिरपणे सांगायची गरज पवारांना वाटली नसती.

२०१२ च्या महापालिका निवडणुका चालू असताना अनेक वाहिन्यांनी बड्या नेत्यांच्या प्रदिर्घ मुलाखती घेतल्या होत्या. त्यापैकी एका मुलाखतीत चव्हाणांच्या पंतप्रधान पदाच्या संधीचा दुसरा किस्सा पवारांनीच कथन केला होता. १९७९ सालात मोरारजींचे जनता सरकार कोसळले आणि विरोधी नेता असलेल्या यशवंतरावांना राष्ट्रपती संजीव रेड्डी यांनी सरकार स्थापनेचे आमंत्रण दिले होते. तर संख्या बघून सांगतो, असे चव्हाणांनी कळवले. नंतर पाठीशी बहुमत नसल्याचे मान्य करून माघार घेतली. पुढे चव्हाण रेड्डी एकत्र जुन्या आठवणी काढत बसले असताना, संजीव रेड्डी यांनी तो प्रसंग आठवून केलेली शेरेबाजी पवारांनी इथे कथन केली. रेड्डी चव्हाणांना म्हणाले, ‘तशी ऑफ़र शरदला दिली असती, तर आधी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन मगच तो बहुमताची जुळवाजुळव करायला गेला असता’. हा किस्सा सांगून पवारांनी विषय हसण्यावारी नेला. पण पिंपरीत ज्या सभ्य सुसंस्कृतपणाचे वावडे पवारांना सतावत होते, त्याचा चार वर्षे जुन्या मुलाखतीशी संबंध असू शकतो का? एकदा नव्हेतर दोनदा चव्हाणांनी पंतप्रधान पदाची संधी गमावली. ती सभ्यपणा, सुसंस्कृतपणा इतकीच प्रामाणिकपणामुळे गमावली. आपण त्यांच्या जागी असतो, तर अशा सदगुणांची किंचितही बाधा होऊ दिली नसती, असेच पवारांना अपरोक्ष सुचवायचे असेल काय? चव्हाण आणि पवार यांच्यातला हाच एक सुक्ष्म किंवा मूलभूत फ़रक आहे. एकाला सभ्यपणा हा गुण वाटत होता, तर दुसर्‍याला सुसंस्कृतपणा ही राजकीय अडचण वाटत राहिली आहे. म्हणूनच या गुणांमुळे महाराष्ट्राला पंतप्रधानपदाची संधी हुकली, हा दावा गंभीरपणे तपासावा लागतो. हे गुण असल्यामुळे चव्हाणांची संधी दोनदा हुकली यात शंकाच नाही. पण पवारांचे काय? त्यांनाही त्यासाठी संधी आलेली होती. ती संधी त्यांनी कशामुळे गमावली, तेही स्पष्ट करायला नको का?

१९९६ सालात म्हणजे वीस वर्षापुर्वी नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर भाजपाचे अल्पमत सरकार स्थापन झाले. पण बहुमताअभावी वाजपेयींना राजिनामा द्यावा लागला. तेव्हापासून दोन वर्षे आघाडीचे प्रयत्न चालू होते आणि पवार लोकसभेतील विरोधी नेता होते. तेव्हा त्यांच्या इतका अनुभवी आणि जाणता नेता बिगर भाजपा गोटात नव्हता. पण इच्छुक असूनही पवार आपला दावा पेश करू शकले नाहीत, की कोणी त्यांचे नाव पुढे केले नाही. तेव्हा नरसिंहरावांना आव्हान द्यायला राजेश पायलट पुढे आले, तर त्यांना विश्वासात घेऊन पवारांनी आपले घोडे पुढे दामटले होते. पण प्रत्यक्षात रावांशी तडजोड करून माघार घेतली. मग तर केसरी यांनीही पवारांना कधी विश्वासात घेतले नाही. मग अन्य बिगरभाजपा विरोधकांच्या आघाडीत पवारांच्या नावाचा विचार कशाला होणार? मात्र यावेळी पंतप्रधान व्हायची शरद पवार नावाच्या मराठी माणसाला असलेली संधी सभ्यपणा वा प्रामाणिक सुसंस्कृतपणामुळे गेली नाही. हे गुण आडवे आले नाहीत. त्या गुणांचाच अभाव असल्याने पवार दावा करू शकले नाहीत, की त्यांचे नाव कुणाला पुढे करता आले नाही. ही महाराष्ट्राने पंतप्रधानपद गमावण्याची दुसरी वेळ होती. एकदा गुण आडवे आले आणि दुसर्‍यांदा त्याच गुणांचा अभाव आडवा आला. वीस वर्षात वाजपेयींचा अपवाद करता देवेगौडा, गुजराल आणि दहा वर्षे मनमोहन सिंग हे पवारांच्या तुलनेत अगदी कमजोर उमेदवार होते. त्यांच्यापेक्षा पवार खुपच गुणी, अनुभवी व प्रतिभावान राजकारणी होते. पण पंतप्रधानपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता आणि प्रामाणिकपणा, यांचा पवारांकडे दुष्काळ असल्याने सर्व पक्षात मित्र असूनही त्यांना तो पल्ला गाठता आला नाही. थोडक्यात सभ्यता व सुसंस्कृतपणा दोनदा महाराष्ट्राला अपशकुनी ठरला. पण एकदम भिन्न मार्गाने. यशवंतराव प्रामाणिक होते आणि पवारांचा त्याच गुणांशी छत्तीसचा आकडा!

  

4 comments:

  1. मस्त भाऊ खुपच छान निरीक्षण

    ReplyDelete
  2. आजपर्यंततरी शिवाजीराजांशिवाय कोणी ' जाणता राजा ' होऊ शकलेलं नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. याला उपहास म्हणतात पदवी नव्हे।

      Delete
  3. हा हा हा क्या बात! क्या बात!👍
    मराठी भाषेचा योग्य उपयोग करून भाऊ तुम्ही खूप छान विश्लेषण केले आहे.

    ReplyDelete