Sunday, February 14, 2016

ये तो होना ही था!



आज १४ फ़ेब्रुवारी म्हणजे प्रेमीयुगुलांच्या अभिव्यक्तीचा दिवस मानला जातो. नेमक्या आजच्या दिवशी एका मित्राने मला मेसेज करून तीन वर्षे जुना माझाच एक लेख आठवण म्हणून पाठवला आणि गंमत वाटली. एक खुप जुने चित्रपटगीत आठवले. हा माझा लेख १३ फ़ेब्रुवारी २०१३ रोजीचा आहे आणि त्या गीताचे बोल आहेत, ‘ये तो होना ही था’! अर्थात हेही त्या मित्रानेच सुचवलेले बोल आहेत. म्हणजे माझा तो लेख त्याला आठवला आणि त्याने त्यात काय घडू शकेल त्याचे मी केलेले भाकित, आशयाने समजावण्यासाठी ते बोल वापरले आहेत. १९७३ सालात ‘खेल खेलमे’ नावाचा चित्रपट आला आणि खुप गाजला होता, त्यातले हे लोकप्रिय गीत होते. आजच्या पिढीतल्या रणवीर कपूरचे जन्मदाते ॠषीकपूर आणि नितू सिंग तेव्हा कोवळ्या वयातले तरूण नायक नायिका होते आणि तोच बहुधा त्यांचा पहिला एकत्र चित्रपट होता. तेव्हा प्रेमात पडलेल्या त्या जोडप्याने गायलेले हे गीत आहे.
एक मै और एक तू
दोनो मिले इस तराह
फ़िर जो तनमनमे हो रहा है
ये तो होना ही था
माझ्या तीन वर्षे जुन्या लेखात तसले काही रोमॅन्टीक नाही. तो चक्क राजकीय विश्लेषणाचा लेख आहे. पण योगायोगाने त्यात मी जो धोका सूचित केला होता, त्याची प्रचिती आता येते आहे. तो लेख मी अफ़जल गुरूच्या फ़ाशीनंतरच्या एका घटनेवर लिहीला होता. त्यावर तेव्हा ज्या प्रतिक्रीया उमटल्या होत्या, त्याचा उहापोह करताना काय भयंकर परिस्थिती येऊ शकेल, त्याविषयी विवरण केले होते. काय घटना होती? अफ़जल गुरूच्या फ़ाशीनंतर उत्तर प्रदेशच्या अलिगड मुस्लिम विद्यापीठात काही विद्यार्थ्यांनी ‘आम्ही सारे अफ़जल गुरू’ असे फ़लक झळकवित निदर्शने केली होती. त्याविषयी मुख्यप्रवाहातूल माध्यमांनी पुर्ण मौन पाळले होते. किरकोळ वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या वगळता कुठल्या वाहिनीने त्याची दखलही घेणे आवश्यक मानले नव्हते. कोणी त्यावर कुठली कारवाई केली नव्हती, की त्यात कसला धोका असल्याची बोंब ठोकण्याची कोणाला गरज वाटली नव्हती. आज तो व्हायरस दिल्लीच्या नेहरू विद्यापीठात येऊन पोहोचला आहे. तेव्हा बंदोबस्त अलिगडमध्ये केला नाही, म्हणूनच त्याची लागण अन्यत्र इतक्या झपाट्याने होऊ शकली ना?

मुद्दा वेगळा आहे. आज दिल्लीच्या विद्यापीठात अफ़जल गुरूच्या उदात्तीकरणाची घटना घडल्यावर ओरडा झाला आणि शेवटी पोलिसांनी कठोर पावले उचलत काही विद्यार्थ्यांना अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरला, म्हणून चर्चा रंगल्या आहेत. केवळ घोषणा दिल्या म्हणून इतकी कठोर कारवाई करावी का? पोलिसी कारवाई हा अतिरेक नाही काय? अफ़जल गुरूच्या उदात्तीकरणाचा निषेध केलाच पाहिजे, असे म्हणत देशद्रोहाला पाठीशी घालणार्‍यांनी तेव्हा अलिगड विद्यापीठातील घोषणांचा निषेध केला होता काय? त्याची दखलही तेव्हा मुख्य माध्यमांनी घेतली नाही, की तात्कालीन सरकारने त्यावर कारवाई सुद्धा केलेली नव्हती. तेव्हाच कायद्याचा बडगा उचलला गेला असता, तर आज दिल्लीपर्यंत ही रोगट साथ पोहोचली नसती. पण रोगाच्या सपाट्यात माणुस आला, मग त्याच्या रक्तपेशीही रोगपेशीत रुपांतरीत होऊ लागतात. तशा लागणीला म्हणूनच व्हायरस मानले जाते. अलिगडच्या विद्यार्थांना तेव्हाच बडगा दाखवला असता, तर आज नेहरू विद्यापीठात ही लागण होऊ शकली नसती. पण झाले उलटेच! तेव्हा हा विषय जात्यंध धर्मांध मुस्लिम तरूणांपुरती मर्यादित होता. आता त्याची लागण पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या तरूणांना व विद्यार्थ्यांना झाली आहे. अलिगडच्या विद्यार्थ्यांत मुस्लिम तरूण अफ़जल गुरूचे उदात्तीकरण करत होते. तीन वर्षानंतर त्यांच्या सहवासात सतत राहिल्याने पुरोगामीही अफ़जलचे समर्थन करू लागले आहेत. मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याचे राजकारण करताना मुस्लिम धर्मांध आणि पुरोगामी ‘दोनो मिले इस तराह’, की पुढला जिहाद अपरिहार्यच होताना? ये तो होनाही था! देश धर्म वा पुरोगामीत्व कुठल्या कुठे वाहून गेले. प्रेमात पडलेले युगुल जगाचे व व्यवहाराचे भान विसरून जाते आणि पुढल्या गोष्टी आपोआप होऊन जातात. त्याला पर्याय नसतो. एकदा भान सुटले, मग कशाची लाज वाटत नाही, की कसला संयम मर्यादा शिल्लक रहात नाहीत. पुरोगाम्यांची अवस्था आज तशीच झाली आहे. त्यांना पक्षीय विरोध आणि राष्ट्रविरोध याचे भान सुटलेले आहे. म्हणून मोदी विरोधात जाताना पाकिस्तानवादी व्हायलाही लाज वाटेनाशी झाली आहे.

तेव्हा लोकसभेच्या निवडणूकांना तब्बल सव्वा वर्षाचा कालावधी बाकी होता. पण सेक्युलर पुरोगामी म्हणून मिरवणार्‍यांच्या मुस्लिमधार्जिण्या वागण्याने बहुसंख्य हिंदू समाज कसा विचलीत होत चालला आहे आणि त्यातूनच मोदींची हिंदू व्होटबॅन्क कशी उभी रहाते आहे, त्याचा इशारा मी दिलेला होता. पण माझ्या कुठल्याही सेक्युलर मित्रांच्या डोक्यात त्यामुळे प्रकाश पडला नव्हता. त्यांना ती माझी मोदीभक्ती वाटली होती. अर्थात तुमच्या मुर्खपणामुळे नुकसान व्हायचे टाळता येत नाही. झालेही तसेच! असल्या पुरोगामी अफ़जलप्रेम व मुस्लिमधार्जिणेपणाने मोदींचे काम एकदम सोपे करून टाकले. तेव्हा अलिगड किंवा काही किरकोळ जागी जो मुस्लिम आक्रमकतेचा अनुभव घेऊन बहुसंख्य समाजात अस्वस्थता वाढत गेली, त्याचा प्रचंड लाभ मोदींना व पर्यायाने भाजपाला मिळाला होता. अलिगड विद्यापीठातील अफ़जल प्रेमानेच मोदींना उत्तरप्रदेशात ८० पैकी ७१ लोकसभेच्या जागा मिळून गेल्या. ते मोदींचे कर्तृत्व नव्हते, इतकी पुरोगाम्यांची आत्महत्या होती. त्याला आत्महत्या म्हणायचे असेल, तर आज नेहरू विद्यापीठात जे काही चालले आहे, त्याता आत्मघातकी अतिरेकच म्हणावा लागेल ना? हे अर्थातच राहुल गांधी वा येच्युरी यांच्यासारख्या पढतमुर्खांच्या आवाक्यातले नाही. पण अडाणी गावठी राजकारणी मानल्या जाणार्‍या मुलायमसिंग वा लालू, मायावती यांना त्यातला धोका कळतो. म्हणूनच दिल्लीत अफ़जल ब्रिगेडची इतकी रणधुमाळी माजली असताना हे तिन्ही नेते त्यापासून पुर्णपणे अलिप्त राहिलेले आहेत. कारण याप्रकारे देशद्रोही मुस्लिमप्रेम आपल्या मतांवर घाला घालू शकेल, हे त्यांना नेमके उमजलेले आहे. म्हणूनच आता चार दिवस उलटून गेल्यावरही नेहरू विद्यापीठ वा अफ़जल ब्रिगेडपासून हे तिन्ही नेते कटाक्षाने दूर राहिले आहेत. म्हणून त्यांचे व्हायचे ते नुकसान टाळले जाईलच असेही नाही. बाकी कोणापेक्षा उत्तरप्रदेशात मायावती-मुलायम यांनाच अशा अतिरेकाचा फ़टका बसू शकतो आणि तिथल्या निवडणूका बारा महिन्यांनी व्हायच्या आहेत. त्यात फ़क्त मुस्लिम मतांवर बहूमताचा पल्ला गाठता येणार नाही.

लोकसभा निवडणूकीने लालू, मुलायम वा मायावती काही धडा शिकले. कारण त्यापैकी कोणी विद्यापीठातून राज्यशास्त्र शिकून राजकारणात आलेले नाहीत. विद्यापीठातून राज्यशास्त्र शिकताना संघाला विरोध करताना संघ म्हणजे हिंदूंना दुखावण्यातून मुस्लिमांची मते मिळतात, असा जो सिद्धांत शिकवला गेला त्याचे काही पढतमुर्ख बळी झाले आहेत. म्हणूनच विद्यार्थीदशेतून राजकारणात आलेले पुरोगामी आणि आपल्या गावगल्लीतून राजकारणात आलेले पुरोगामी, यातला फ़रक लक्षात घ्यावा लागेल. आता देशभरच्या विद्यापीठातील पुरोगामी विद्यार्थी संघटनांवर जिहादी कब्जा झालेला आहे. त्यामुळे संघाला भाजपाला विरोध करताना हिंदूंना विरोध आणि मग हिंदूंना राष्ट्र महत्वाचे वाटत असेल, तर भारत नावाच्या राष्ट्रालाही विरोध, अशी सुशिक्षित पुरोगामी मानसिकता घडवली गेली आहे. म्हणूनच तीन वर्षापुर्वी अलिगड विद्यापीठात अफ़जलचे समर्थन व उदात्तीकरण झाल्यावर माध्यमांनी तावर झोड उठवली नव्हती. सहाजिकच पुरोगामी विद्यार्थी संघटना व मुस्लिम धर्मांध संघटना अशा जवळ येत गेल्या, की त्याचे असेच परिणाम होणे अपरिहार्य होते. ये तो होनाही था! आज नेहरू विद्यापीठात जे काही घडले आहे, ते होण्याला पर्यायच नव्हता. ज्याप्रकारे पुरोगामी व जिहादी जवळ येत गेले वा आणले गेले, त्याचा परिणाम यापेक्षा वेगळा संभवतच नव्हता. कारण पुरोगामीत्व क्रमाक्रमाने हिंदूविरोधी होण्यातून सुटका नव्हती. अफ़जलच्या फ़ाशीवर शिक्कामोर्तब झाल्यावर अलिगड विद्यापीठात विद्यार्थ्यांनी काय घोषणा दिल्या होत्या? 'यू किल्ड वन अफझल अँड गेव बर्थ टू हंड्रेड अफझल...' आज नेहरू विद्यापीठ वा हैद्राबाद विद्यापीठात तेच ‘हंड्रेड अफझल’ घसा कोरडा करीत म्हणत आहेत भारतकी बरबादी! त्यांच्याकडून वंदे मातरम किंवा हिंदूस्तान झिंदाबादच्या घोषणा होण्याची अपेक्षा करता येईल काय? तीन वर्षापुर्वी ती विषवल्ली ठेचली नाही, त्याचा हा परिणाम आहे. पण तेव्हा किती पत्रकार माध्यमांना वा विचारवंत, राजकारण्यांना त्याचे भान होते?

(तीन वर्षापुर्वीच्या मूळ लेखाचा दुवा पुढीलप्रमाणे)
http://bhautorsekar.blogspot.in/2013/02/blog-post_13.html

5 comments:

  1. छान भाऊ जे घडायचे ते घडूदे यांचा (secular & company)कडेलोट होत आहे आपण कशाला सावध करायचे

    ReplyDelete
  2. अफझलच्या समर्थकांना बघून भीती वाटत नाही सेकुलर लोकांना . शांततेने (आणान सारखे ) आंदोलन का करत नाहीत हे लोक.
    राष्ट्रद्रोहाच्या घोषणा मीडिया एका सिनेमा सारखा दाखवते . अश्या लोकांना सामोरे जाणारे मोदी खरच ग्ग्रेट वाटतात सामान्य लोकांना .
    या समर्थकांना वेगळा नियम का लावावा सरकारने !

    ReplyDelete
  3. या असल्या घटनांवर मिडियावाले चर्चा घेतात.
    मुळात चर्चा करण्यासारखे आहेच काय?
    सरळ सरळ कारवाई झाली पाहिजे गद्दारांवर.

    ReplyDelete
  4. ये तो होना ही था

    विद्याधर(विजय) कुलकर्णी

    ReplyDelete
  5. हिजड्यांना दुसर्याच्या मदतीनेच पुत्रप्राप्तीचे डोहाळे लागतात.

    ReplyDelete