Sunday, February 28, 2016

संघ भाजपाचे पुरोगामी प्रचारक?


गेल्या आठवड्यात ‘टाइम्स नाऊ’ वाहिनीने मोहिम उघडल्याप्रमाणे देशातील पाखंडी सेक्युलर मंडळींची लक्तरे वेशीवर टांगली आणि डाव्यांचा धीर सुटलेला आहे. म्हणूनच सर्व सभ्यता सोडून त्या वाहिनीच्या संपादक अर्णब गोस्वामी याला बहिष्कृत करण्याचे खुले आवाहन काही संपादक वा नामवंत पत्रकारांनीच आरंभले. हा खरे तर विनोद होता. कारण त्याच काळात अर्णब जी आकडेवारी दाखवत होता, त्याला कोणी आक्षेप घेतला नाही. कारण तीच खरे तर अशा लोकांची खरी पोटदुखी होती. अर्णबने इंग्रजी वृत्तवाहिन्यांच्या ९३ टक्के प्रेक्षकांना खिशात टाकले आणि उरलेल्या ७ टक्क्यातही ज्यांना एक टक्का प्रेक्षक मिळवता आलेला नाही, त्यांनी अर्णबवर बहिष्काराची भाषा केलेली आहे. किती चमत्कारीक गोष्ट आहे ना? ज्यांच्यावर देशातला ९९ टक्के इंग्रजी प्रेक्षकांनीच बहिष्कार घातला आहे, ते त्यालाच आवाहन करीत आहेत, की ज्याच्याकडे झुंबड करून धावत सुटलाय त्याला बहिष्कृत करा. जुनेजाणते असुन प्रेक्षकाने आपल्याला असे बहिष्कृत कशाला केले आहे, त्याचा साधा विचारही करायची इच्छा ज्यांना होत नाही, ते विचारस्वातंत्र्याच्या गप्पा मारत आहेत, बहिष्काराच्या वल्गना करीत आहेत. तुमचे हे आवाहन तरी कोणाच्या खिजगणतीत आहे काय? पण विचार करू शकत नाही, त्याला आजकाल सेक्युलर जगात विचारवंत समजले जाते. पुरोगामी विचारवंतांची एकच चुक असते, ती म्हणजे ते चुकत नाहीत. अर्थात चुकत नाही याचा आत्मविश्वास असल्याने ते कधी चुका सुधारण्याचा विचारही करीत नाहीत. चुक झाली तर ती मान्य करून सुधारणेला सुरूवात होत असते. पण आपण चुकतच नसल्याचा फ़ाजिल आत्मविश्वास प्रभावी असला, मग चुका होत रहातात आणि त्याचे दुष्परिणामही होतच रहातात. त्यापासून सुटका नसते. पुरोगामी म्हणून मिरवणार्‍या बहुतांश पत्रकार, वाहिन्या व वर्तमानपत्रांची तीच एक शोकांतिका होऊन बसली आहे. आपण गळ्यापर्यंत बुडालो आहोत आणि दिवाळखोर झालो आहोत, हे कळण्याइतकेही भान त्यांना उरलेले नाही.
या निमीत्ताने शिव विश्वनाथन यांचे स्मरण झाले. अनेक इंग्रजी वाहिन्यांवर राजकीय सामाजिक विषयाच्या चर्चेत त्यांचा सहभाग आपण बघितलेला आहे. एक सेक्युलर उदारमतवादी विचारवंत अशी त्यांची ख्याती आहे. लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान विविध मतचाचण्या किंवा चर्चांच्या वेळी त्यांनी आपला मोदीविरोध स्पष्टपणे व्यक्त केलेला होता. आजही आपला भाजपा वा मोदीविरोध त्यांनी लपवलेला नाही. पण लोकसभेत मोदींनी प्रचंड यश मिळवले, तेव्हा कुठलाही डावा पुरोगामी विचारवंत पत्रकार ज्या सत्याला जाऊन भिडायला राजी नव्हता, तेव्हा विश्वनाथन यांनी एक लेख लिहून आपल्या मुर्खपणाची जाहिर कबुली दिलेली होती. मोदींचा पंतप्रधान म्हणून शपथविधी व्हायच्या दिवशी ‘द हिंदु’ या इंग्रजी दैनिकात त्यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. ती त्यांची कबुली म्हणून महत्वाची होती. पण त्यापेक्षा डाव्यांना व उदारमतवाद्यांना त्या लेखातून त्यांनी आरशा दाखवला होता. पण नुसता आरशा दाखवून काय उपयोग असतो? आंधळ्याला आरशासमोर उभे करून उपयोग नसतो. कारण समोरचे आपले प्रतिबिंब तो बघू शकत नसतो. त्याला डोळेच नसतात. पण पुरोगामी लोकांची गोष्ट वेगळीच! त्यांना डोळे असले तरी आरसा दाखवला मग ते तात्काळ डोळे मिटून घेतात. आपण डोळे मिटले, मग आपले विकृत विद्रुप स्वरूप आपोआप लपून राहिल अशी त्यांची अंधश्रद्धा आहे. म्हणुनच विश्वनाथन असोत किंवा अन्य कोणी असो, त्यांनी आरसा दाखवून उपयोग नसतो. कारण आपला विद्रुप झालेला चेहरा पुरोगाम्यांना बघायचाच नसतो. पण म्हणून बाकीच्या जगाला तो भयकारी चेहरा दिसणार नाही, अशीही त्यांची पक्की समजूत असते. म्हणूनच आरश्या समोर डोळे मिटून घेणारे पुरोगामी बाकीच्या जगात मात्र उजळमाथ्याने वावरत असतात. आपल्याकडे लोक चमत्कारीक नजरेने बघू लागले, तर त्यांना नवल वाटते वा राग येतो. सध्या अर्णब गोस्वामीवरला या लोकांचा राग त्यासाठीच आहे.
अर्णबने अशा पुरोगाम्यांचा विकृत चेहरा जगाला दाखवलेला नाही. त्याने बाकीच्या जगातल्या वास्तव घटना जशाच्या तशा लोकांपुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जे फ़सवे चित्र बाकीचे पत्रकार वा माध्यमे जगापुढे आणत होती, त्यांचे पितळ उघडे पडलेले आहे. चाकूने भोसकले जात असताना, मोरपीस फ़िरवले जाते आहे, असे तुम्ही कोणाला सांगितले तर सामान्य माणुस त्यावर विश्वास ठेवणार नाही. आपल्या जाणिवा किंवा अनुभवानुसारच तो होणार्‍या वेदनांचा अर्थ लावणार. मात्र पुरोगामी शहाण्यांना अनुभव किंवा जाणिवांपेक्षा पुस्तकी व्याख्या खर्‍या वाटतात. इतक्या त्यांच्या संवेदना बोथटलेल्या असतात. त्यालाही हरकत नाही. पण म्हणून त्यांचे भ्रम अवघ्या जगाने तसेच स्विकारावेत, हा हट्ट गैरलागू आहे. तिथेच गफ़लत होते. त्यांनी मुर्खाच्या नंदनवनात रममाण व्हायला कोणी हरकत घेतलेली नाही. पण बाकीच्या जगाने तशा मुर्खपणात निमूट सहभागी व्हायच्या आग्रहामुळे गोंधळ झालेला आहे. सामान्य लोकांनी अशा मुर्खांकडे साफ़ पाठ फ़िरवली आहे. अर्णब किंवा त्याच्या वाहिनीला मिळालेला ९३ टक्के प्रेक्षकांचा प्रतिसाद त्याचीच साक्ष आहे. त्यापासून शिकायचे आणि आपल्या चुका सुधाराव्यात हा शहाणपणा झाला असता. पण चुक सुधारायला चुक कबुल करावी लागते, तिथेच घोडे अडलेले आहे. इथेच शिव विश्वनाथन यांचा लेख महत्वाचा आहे. कारण त्यांनी याच चुकीचे कबुली दिलेली आहे. त्यांच्या वीस महिने जुन्या लेखाचे शिर्षकच त्याचा पुरावा आहे. ‘माझ्यासारख्या उदारमतवाद्याला मोदींनी कसे हरवले’ हेच ते शिर्षक आहे. सेक्युलर पक्ष वा उदारमतवादाचा मोदींनी पराभव केला, असे म्हटलेले नाही, तर व्यक्तीगत आपला मोदींनी पराभव केल्याचे मानले आहे. तिथे न थांबता त्यांनी आपल्या चुकांची त्यात जंत्री दिली असून, त्याची मिमांसाही केली आहे. कुठल्याही पुरोगाम्यासाठी म्हणूनच तो लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे. पण पुन्हा अंजनाने काम करायला अंजन डोळ्यात पडायला हवे आणि त्यासाठी डोळे उघडे असायला हवेत ना?
पुरोगाम्यांची तीच तर शोकांतिका आहे. ते चुकत नाहीत आणि म्हणून झालेल्या चुका सुधारतही नाहीत. म्हणून तर जी रणनिती चुकली वा उलटली, तिचाच अवलंब पुन्हा सुरू झाला आहे. मोदींवर आरोप करून संघावर शिंतोडे उडवून प्रत्यक्षात काही उपयोग होत नाही. कारण अशा हल्ल्यासाठी भाजपा वा संघ सज्ज असतो. पण पुरोगाम्यांच्या अशा हल्ल्याने व आरोपांनी जो सामान्य हिंदू बहुसंख्यांक दुखावला जातो, व्याकुळ केला जातो, तो आपोआप मोदी व संघ यांचा सहानुभूतीदार होऊन जातो. कारण सहवेदना लोकांना जवळ आणते. दुय्यम दर्जाच्या नेहरूवादी व पुरोगाम्यांनी थिल्लर पोपटपंचीतून सतत हिंदूंना दुखावण्यात धन्यता मानली. पण त्याचवेळी अल्पसंख्यांक म्हणून मुस्लिमांच्या धर्मांधतेचे चोचले पुरवले. पदोपदी हिंदू असण्यासाठी बहुसंख्यांकांना इतके कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत राहिला, की पुरोगामी असण्यापेक्षा प्रतिगामी असण्यात लोकांनी दिलासा शोधायला सुरुवात केली. मोदींना त्याचाच लाभ मिळाला. त्यामुळे कुठल्याही निकषाने कडवे हिंदू नसलेल्या वा धर्माशी कर्तव्य नसलेल्या हिंदूंना सेक्युलरांनी मोदींच्या गोटात आणूस सोडले, असे विश्वनाथन म्हणतात. आता त्याच्या पुढला टप्पा सुरू आहे. राष्ट्रप्रेम हा गुन्हा ठरवून पुरोगामी उरल्या लोकांनाही मोदींच्या कच्छपि लावण्याचे काम जोरात चालवित आहेत. काश्मिरात सामान्य सैनिक शहीद होत असताना तिथेच जिहाद दहशतवाद माजवणार्‍यांचे उदात्तीकरण करायला पुरोगामी कळपाने मैदानात आलेले आहेत. या विषयात जितका दिर्घकाळ उहापोह होत राहिल, तितकेच मोठ्या संख्येने देशाविषयी आस्था असलेले लोक पुरोगाम्यांपासून दुरावत जाणार आहेत. माजी सैनिक, त्यांचे कुटुंबिय वा तत्सम लोकसंख्या गेल्या आठवड्यात पुरोगाम्यांकडे संशयाने बघू लागली आहे. त्यांना मोदी वा भाजपा हाच एकमेव पर्याय असल्याचे पटवून देण्याचे काम संघाला शक्य नव्हते, इतके पुरोगाम्यांनी सोपे करून ठेवले आहे. किंबहूना सेक्युलर पुरोगामी म्हणजे देशद्रोह ही प्रतिमा त्यांनीच जनमानसात यातून ठसवली आहे.
http://www.thehindu.com/opinion/lead/how-modi-defeated-liberals-like-me/article6034057.ece

9 comments:

 1. Bhavu
  What do you think about Ravish Kumar of ndtv?

  ReplyDelete
 2. भाऊ आपल्या लेखातून मोठे समाज प्रबोधन होते आहे. व सोप्या भाषेत अनेक गहन विषया बाबत सामन्य माणसाला सत्य व मिडियाने लपवलेली बाजु माहित पडत आहे. खरतर मिडीयाने impartially या सर्व गोष्टी सामन्याचया लक्षात वेळोवेळी आणुन दिले पाहिजे परंतु टक्के वारी वर वा सत्तेतील छुपी भागीदारी असेल देव जाणे पण अरणब गोस्वामी सकट सर्वांनी समाजाची दिशाभूल केली. ...
  मी गेली 6 वर्षे माझ्या रेकाॅरडींग सेटटाॅप बाॅकस वर News Hour व इतर प्रोग्राम रेकाॅरड करत आहे. अर्णब गोस्वामी राजदीप सरदेसाई निखिल वागळे
  अत्यंत बेमालूम पणे त्यावेळी च्या विरोधी पक्षाच्या spokesman उत्तर देताना मध्येच कमेंट्स करुन मुद्दा बोलुच दयायचा नाहि. सत्ताधारी पक्षाच्या भ्रष्टाचारा चे मुद्दयांवर अॅकर पारसिलीटी करत यडुरआपाचा जाॅरज फर्नांडिस यांची उदाहरणे देऊन विरोधी पक्षालाच कोंडीत पकडत. हि शुद्ध धुळफेक होती व आज ही आहे. .
  आता भाऊ सारख्यांनी पोलखोल केल्या मुळे व सोशल नेटवर्क मुळे नाइलाजाने हे संपादक आता काही गोष्टी दाखवतात.
  यामुळे देशाचे अतोनात नुकसान झाले आहे व होत रहाणार आहे...
  या मिडियाचा असाच पोलखोल भाऊ सारख्यांनी करावा..म्हणजे या Idiators ना Editor बनावे लागेल ..
  Amool Shetye

  ReplyDelete
 3. भाउ , मस्त लेख !! नेहमिप्रमाणेच !! वाचुन समाधान झाले. ' नावाप्रमाणेच ' जागता पहारा !! शुभेच्छा ...

  ReplyDelete
 4. Agadi khare aahe.Bhau welcome back.

  ReplyDelete
 5. भाऊराव,

  शिव विश्वनाथन यांचा लेख वाचला. लेखकाकडे आपण चुकलो हे कबूल करण्याइतके तरी धैर्य आहे. चूक कुठे झाली त्याबाबत मात्र आनंदीआनंद आहे. त्यामुळे लेखापेक्षा त्याखालचे प्रतिसाद अधिक वाचनीय आणि बोधप्रद झालेत.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 6. सहमत,
  शेवटच्या तीन-चार वाक्यांशी तर बिनाशर्त सहमत.
  आपण नकळत भाजपला फायदा मिळवून देत आहोत
  हे कळेना झालय फेक्युलरांना.

  ReplyDelete
 7. मुळात कम्युनिस्ट आणि त्यांचे दंभिक पुरोगामी साथी यांनी कोणताही थेट वैचारिक वादविवाद केलेला नाही फक्त त्यांना विरोध करणाऱ्यांची बी बदनामी करणे आणि लोकांत वैचारिक गोंधळ उडवून देणे एवढेच काम त्यांनी आजवर केले. त्यामुळे वाद घालण्याचा प्रसंग आला की त्यांचा तिलपापड़ होतो. दुसरे म्हणजे आपण काहीही केले तरी आपल्याला कोणी विरोध करू शकत नाही असा त्यांचा समज होता. त्यामुळे हे सरकार अशी करवाई करेल असा त्यांना अंदाज नव्हता. पण आता प्रत्यक्षात मात्र भम्बेरि उडलेली आहे. शौर्याचे आणि बुद्धिमत्तेचे मुखवटे गळून पड़ायला लागले आहेत. मुख्य म्हणजे सामान्य माणसेही (नको नको ते) तार्किक प्रश्न विचारु लागली आहेत. पूर्वी केलेल्या उद्योगांचे 'पोस्ट मार्टम' होते आहे. त्यामुळेच असे भान सुटले आहे.

  ReplyDelete