Thursday, February 25, 2016

मोदीभक्तांचा तद्दन मुर्खपणाशहाण्याला शब्दाचा मार असे म्हणतात. पण शहाणाच समोर नाही आणि अडाण्याला शब्दाचा सोस नसतो. पण शहाणा असून जो मुर्खासारखा बोलू लागतो, तेव्हा त्याला शब्दांनी समजावणे, हाच मुर्खपणा असतो. नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणांना अविष्कार स्वातंत्र्य ठरवण्याची जी स्पर्धा चालू आहे, त्यामध्येही यापेक्षा किंचित वेगळी परिस्थिती नाही. मग अशा लोकांना विविध पुरावे देवून वा साक्षी सादर करून उपयोग नसतो. उपयोग असता, तर मुंबईतील कसाब टोळीच्या हल्ल्यानंतर भारताने सादर केलेले पुरावेही पाकिस्तानने स्विकारले असते आणि तिथे बसलेल्या जिहादींच्या मुसक्या आवळल्या असत्या. पण त्यापैकी काही होऊ शकले नाही आणि त्याचीच पुनरावृत्ती आता पठाणकोट हल्ल्यानंतर होत आहे. एकदा नव्हे अनेकदा असा अनुभव आलेला असताना पाकिस्तानला वा त्यांच्या इथल्या बगलबच्च्यांना पुरावे किंवा साक्षी सादर करणे, हाच मुर्खपणा नाही काय? अशा लोकांच्या व्याख्या व अन्वय भिन्न असतात. तुम्ही ज्या अर्थाने शब्द वापरता त्यापेक्षा त्यांचे अर्थच भिन्न असतील, तर कितीही युक्तीवाद करून वा समजावून उपयोग नसतो. त्यांना तुमचे म्हणणे कळलेले असते. पण त्यांच्या गैरसोयीचे असल्याने तुमचे अर्थच नाकारून ते आपली बाजू समर्थनीय ठरवत रहाणार. उदाहरणार्थ अविष्कार स्वातंत्र्यातच विटंबना वा अवहेलना करण्याचा अंतर्भाव आहे, असा दावा राजदीप सरदेसाई याने आपल्या लेखातून केलेला आहे. ‘टु ऑफ़ेन्ड’ असा शब्द त्याने स्वातंत्र्याची व्याप्ती वाढवताना केलेला आहे. ऑफ़ेन्डपासूनच ऑफ़ेन्डर हा शब्द तयार होतो. म्हणजेच कायद्याच्या राज्यामध्ये ऑफ़ेन्डरला तसे वागायचे स्वातंत्र्य आहे. ऑफ़ेन्डर म्हणजे गुन्हेगार दोषी होय आणि दोषी असणे हेच स्वातंत्र्य वा अधिकार असल्याचा युक्तीवाद त्याने केला आहे. अर्थातच तमाम सेक्युलर पुरोगामी त्याच्यामागे समर्थपणे उभे ठाकणार, हे वेगळे सांगायला नको. गोळाबेरीज इतकीच, की देश सेक्युलर पुरोगामी असणे म्हणजे गुन्हेगारांच्या हवाली असणे आणि गुन्हे करण्याचे अधिकार वा स्वातंत्र्य असणे, म्हणजे सेक्युलर राज्य इथवर मजल आली आहे.

पाकिस्तान आणि भारतातले सेक्युलर यांच्या शब्द, युक्तीवाद यातले साम्य ओळखले तर त्यांच्याशी वाद घालण्यात वा त्यांना समजावण्यात अर्थ राहिलेला नाही, हे लक्षात येऊ शकेल. त्यांचे शब्द वा अर्थ किती वेगाने बदलू शकतात, त्याची शेकडो उदाहरणे देता येतील. चार वर्षापुर्वी लालूप्रसाद यांना दोषी ठरवून त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय सुप्रिम कोर्टाने दिला होता. पण त्यांचा पाठींबा हवा म्हणून आणि आपल्याही एका खासदाराचे सदस्यत्व रद्द होणार म्हणून, त्या निर्णयाला रोखणारा अध्यादेश जारी करण्याचा निर्णय मनमोहन सरकारने घेतला होता. त्यावरून देशभर गदारोळ सुरू झाला. भ्रष्टाचार व गुन्ह्याला पाठीशी घालणारा अध्यादेश म्हणून काहूर माजवले गेले. तो अध्यादेश राष्ट्रपतींच्या सहीसाठी पाठवून पंतप्रधान मनमोहन सिंग अमेरिकेला रवाना झाले. त्याचेच समर्थन करणारी एक पत्रकार परिषद कॉग्रेसचे प्रमुख प्रवक्ते अजय माकन यांनी प्रेसक्लबमध्ये घेतलेली होती. ते जोरदार भाषेत त्या अध्यादेशाचे समर्थन तिथे करत होते. इतक्यात तिथे राहुल गांधी येऊन टपकले आणि त्यांनी चार मिनीटात पत्रकारांना काही गोष्टी सांगितल्या. ‘हा अध्यादेश रद्दड असून तो फ़ाडून कचर्‍याच्या टोपलीत टाकला पाहिजे’ असे विधान त्यांनी केले. त्यांचेच प्रवक्ते माकन व पत्रकार थक्क होऊन त्यांच्याकडे बघत राहिले. चार मिनीटात राहुल तिथून निघून गेले आणि पुढे पत्रकार परिषद चालवणार्‍या माकन यांनी कोलांटी उडी मारून त्या अध्यादेशाची निंदानालस्ती सुरू केली. जी पत्रकार परिषद त्या अध्यादेशाच्या गुणगौरवासाठी योजलेली होती, तिथेच तिचा निषेध सुरू झाला. तात्काळ तमाम कॉग्रेसजन त्याची हेटाळणी करू लागले. याला पुरोगामीत्व म्हणतात. याला सेक्युलर म्हणतात. कुठल्याही क्षणी कशीही कोलांटी उडी मारणे, मर्कटलिला करणे म्हणजे सेक्युलर बुद्धीवाद असतो, त्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. पण त्याबद्दल कोणी बोलायचे नसते. त्या बाबतीत गप्प बसलात मग तुम्हाला पुरोगामीत्वाचे प्रशस्तीपत्र मिळते.

ज्यांची एकूण बुद्धी अशी चालू शकते आणि त्यासाठी आपली विवेकबुद्धी ज्याला गहाण ठेवता येईल, त्यालाच पुरोगामी म्हणून मान्यता मिळू शकते. धडधडीत खोटे बोलणे त्यासाठीची गुणवत्ता आहे. तेही शक्य नसेल तर खुळचट पोपाटपंची करणे तरी शक्य झाले पाहिजे. म्हणूनच मग मकबुल बट्ट वा अफ़जल गुरूला देशप्रेमी ठरवण्याची सेक्युलर स्पर्धा झाली तर नवल नाही. साक्षी महाराज वा कोणी साध्वी असेच काही बरळली, मग देशाला धोका निर्माण होत असतो. म्हणून हेच पुरोगामी आक्रोश सुरू करतात. त्यांची मुस्कटदाबी करीत नाही म्हणून सरकारला जाब विचारत असतात. तेव्हा नुसत्या बोलण्याने हिंसा माजत नाही किंवा माजलेली नाही, म्हणून त्या महाराज साध्वीची बडबड अविष्कार स्वातंत्र्यात सहभागी होऊ शकते, हे त्यांची विवेकबुद्धी त्यांना सांगत नाही. कारण विवेकबुद्धीचा पुरोगामीत्वाशी संबंध नसतो. विवेकाला तिलांजली दिल्याखेरीज कुणाला पुरोगामी म्हणून मान्यताच मिळत नाही. मग साध्वीचे बोल त्यांना भयभीत करतात. वंदेमातरम त्यांना भयानक वाटू लागते आणि ‘भारतके टुकडे’ त्यांना देशप्रेम वाटू लागते. त्यातली तर्कबुद्धी सुसंगत आहे. त्यांना देशाशी, समाजाशी काही कर्तव्य नसते. आपापल्या रागलोभासाठी देश समाजाचेही नुकसान करायला ते मागेपुढे बघत नाहीत. मग मणिशंकर अय्यर पाकिस्तानात जाऊन मोदींना हटवा म्हणून आवाहन करू शकतात आणि नेहरू विद्यापीठात भारतविरोधी घोषणाही दिल्या जाऊ शकतात. तिथे बाबा रामदेव भाषण द्यायला आल्यास देशाला धोका असतो. पण फ़ुटीरवादी पाकिस्तानवादी गर्जना करण्यापर्यंत सोकावले, तरी धोका नसतो. ही तर्कसंगत सेक्युलर प्रगती आहे. मोदींना संपवण्यासाठी देश बुडाला तरी बेहत्तर ,इतक्या टोकाला जाण्याचे ते लक्षण आहे. पण त्यात देशच संपला तर उद्या आपले काय होईल, याचीही त्यांना फ़िकीर उरलेली नाही. हिंदी सिनेमात चौधरी ठाकुर जसे पिढीजात वैरासाठी विध्वंस घडवून आणतात, तशी आता सेक्युलर मानसिकता झालेली आहे.

आम्हाला दया येते, ती अशा पुरोगाम्यांना आपली बाजू समजावण्यासाठी बौद्धिक युक्तीवाद करत बसलेल्या देशप्रेमी, हिंदूत्ववादी किंवा भाजपा शिवसेनावाल्यांची! ते दगडावर कपाळ आपटण्यात कशाला आपली शक्ती खर्ची घालत आहेत? ज्यांना तुमची भाषा, त्यातले शब्द वा त्यांचे अर्थही ठाऊक नाहीत वा समजूनही घ्यायचे नाहीत, त्यांना काय समजावत बसलात? इतकी अक्कल असती, तर मुळात त्यांनी मोदींना मागल्या लोकसभेत जिंकूच दिले नसते. इतक्या थराला सेक्युलर बालीशपणा जाऊच दिला नसता. हिंदूत्ववाद्यांना वाटते, की मतदाराने हिंदूत्वाला कौल दिलेला आहे. मोदींचा विजय हा हिंदूत्वाचा विजय आहे. तसे काहीही झालेले नाही. लोक सेक्युलर मुर्खपणा व अतिरेकाला कंटाळून मोदीकडे वळले. कारण त्यांना देशद्रोह, बुडवेगिरी व दिवाळखोरी याचा कंटाळा आलेला होता. ते सत्य झाकण्यासाठी व आपली भामटेगिरी लपवण्यासाठी पुरोगाम्यांनी मोदींच्या विजयाला हिंदूत्वाचे लेबल लावले आणि त्यात मोदीभक्त वा समर्थक फ़सले आहेत. लोक हिंदूत्ववादी झालेले नाहीत, की हिंदूराष्ट्र स्थापनेसाठी लोकांनी कौल दिलेला नाही. सेक्युलर पाखंड व पुरोगामी भामटेगिरीचा तमाशा संपावा, इतक्याच उदात्त हेतूने लोकांनी मोदींच्या हाती सत्ता दिलेली आहे. ते पुरोगामीही पक्के ओळखून आहेत. पण ते सत्य मान्य केल्यास मुर्खपणा मान्य करावा लागेल. म्हणून आता त्यांनी खुळेपणाची पुढली पायरी चढण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याचा मोदींना अधिकच लाभ होऊ शकतो. म्हणून पुरोगाम्यांच्या असल्या मुर्खपणाला अधिक प्रोत्साहन देणे, भाजपाला लाभदायक ठरू शकेल. त्यातून पुरोगामी सेक्युलर डावे म्हणजे देशद्रोही वा पाकवादी, अशी प्रतिमा तेच जनमानसात उभी करत आहेत. पर्यायाने लोक त्यांच्यापासून अधिक दुरावतील आणि त्याचा राजकीय लाभ भाजपाला मिळणार आहे. मग त्याला नमोभक्तांनी वेसण कशाला घालावी? आत्महत्या करणार्‍या शत्रूच्या कामात हस्तक्षेप करू नये असे नेपोलियन उगाच म्हणालेला नाही.

9 comments:

 1. भाऊ, मला वाटते मोदी भक्त म्हणून जरी भुमिका मांडली तरी त्यात गैर काय दुसरे त्यांना समजवणे हा उद्देश नसून सर्व सामान्य माणसाला ही बाजू पण समजली पाहिजे.बोलेल त्याचे विकले जाते...

  ReplyDelete
 2. You said it Bhau Sir! "आत्महत्या करणार्‍या शत्रूच्या कामात हस्तक्षेप करू नये" it's a brilliant masterpiece from Nepolean to refer here.

  ReplyDelete
 3. भाऊ बरोबर आहे तुमचे म्हणणे, ज्या देशात राहतो, ज्या देशाचे मीठ खातो त्याबद्दल खुळचट व्यक्तिस्वातंत्राच्या नावाखाली निंदा नालस्ती केल्यास राग येणारचना

  ReplyDelete
 4. Excellent study..... pan Bharatiyanchi smaran shakti kami ahe he pan titkech khare

  ReplyDelete
 5. भाऊ निळसर दामल्याला, अक्कल द्या नं थोडी !

  ReplyDelete
 6. भाऊ , अगदी बरोबर ! लोक सेक्युलर मुर्खपणा व अतिरेकाला कंटाळून मोदीकडे वळले. पण यांची पाळेमुळे एवढी खोलवर पसरलेली आहेत जी देशाला दुय्यम मानतात . हे सत्य लोकांसमोर येत आहे . मीडिया पण यात सामील आहे . लोकांनी मोदींना निवडून योग्यच केला . पण असे सेक्युलर attack चालूच राहणार असे वाटतं कारण आता यांची उपासमार होत आहे .

  ReplyDelete
 7. Please share your every Page on face book so that people can read it.

  ReplyDelete