Tuesday, February 23, 2016

पुरोगामी मुखवटे आणि सनातनी चेहरेनेहरू विद्यपीठ, हैद्राबाद विद्यापीठ, पुण्याची फ़िल्म इन्स्टीट्युट अशा सर्व केंद्रीय शिक्षणसंस्था सरकारी अनुदानावर चालतात. कित्येक कोटी रुपये सरकार त्यावर खर्च करीत असते आणि तिथे त्याच सरकारी पैशावर मौजमजा करणारे तथाकथित बुद्धीमान, प्रतिभावान, प्राध्यापक किंवा विद्यार्थी अभिजन मानले जातात. त्यांची मागणी काय आहे? आमचा खर्च किंवा बोजा (मोदी) सरकारने उचलला पाहिजे. त्याच्या बदल्यात आम्ही अभिजन कुठल्या मार्गाने परतफ़ेड करू? तर आम्ही त्याच सरकारची निंदानालस्ती करू. त्याच सरकारला शिव्याशाप देवू. त्याच्या कामात अडथळे आणू आणि त्याबद्दल पुन्हा त्याच सरकारने आमची पाठ थोपटली पाहिजे. हे पहिल्यांदाच झालेले नाही. शतकापुर्वीही अशाच घटना याच देशात घडत होत्या आणि तेव्हाच्या क्रांतीकारी सुधारक पुरोगामी महापुरूषांच्या नावाने आज नेमकी उलटी गंगा वहाते आहे. फ़ुले शाहू आंबेडकरांचा सतत नामजप करणारे कसे वागत आहेत? त्याच सुधारक वारश्याला काळीमा फ़ासणारे वर्तन त्याच महापुरूषांच्या तथाकथित अनुयायांकडून आज चाललेले आहे. संपुर्ण समाजाला ओलिस ठेवण्याच्या ज्या मक्तेदारीपासून शाहू महाराजांनी मुक्ती मागितली होती, त्याच मक्तेदारीच्या हक्कासाठी लढणार्‍यांना आज पुरोगामी म्हटले जाते. खरे वाटत नाही? अविष्कार स्वातंत्र्याचा कोणता अर्थ आग्रहाने मांडला जातो आहे? थोडी इतिहासाची पाने उलगडा.....

    ‘मी ब्राह्मणांवर प्रेम करीत असताही जर ते माझे द्वेष व तिरस्कार करतील तर मलाही जशास तसे वागावे लागेल. त्यांची माझ्याशी प्रेमाची वागणूक आढळून येईल तर मी माझ्या घरच्या देवांची पूजा व इतर धर्मकृत्ये ब्राह्मणांकडून करवून घेण्याचे चालू ठेवीन. नाहीतर ब्राह्मण पुजार्‍यांना बंद करून माझ्या घरच्या देवांची पूजा मी मराठे पुजार्‍यांकडून करवून घेईन. ते मला मनुष्य समजत असतील तरच त्यांच्याकडे पुजारीपणा ठेवीन आणि जर का ते मला जनावराप्रमाणे समजतील तर मी ठेवणार नाही.’

      ‘राजकारण’कर्त्यासारख्या (दामलेशास्त्री) मजवर टिका करणार्‍यास माझी विनंती आहे, की त्यांनी माझे समग्र भाषण देऊन प्रत्येक पॅरेग्राफ़समोर त्यावर आपली टिका असेल ती छापावी. असे केले म्हणजे लोकांस आपले मत देण्यास बरे पडेल. अर्धाअधिक मजकूर गाळून थोडेसे अवतरण घेतल्याने; माझ्या सांगण्याचा विपर्यास होतो. ‘राजकारण’कर्त्यास अशी विनंती करणे, हे मी मोठे धाडस करितो अशीही भिती वाटते. कारण मग त्यास विरुद्ध टिका करण्यास स्थळे कमीच सापडतील’

   तब्बल ब्याण्णव वर्षापुर्वीच्या राजर्षी शाहू महाराजांच्या एका भाषणातला हा उतारा आहे. नेमके सांगायचे; तर १५ एप्रिल १९२० रोजीचे हे भाषण आहे. नाशिक येथे श्री. उदाजीराव मराठा विद्यार्थी वसतीगृहाच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभातले प्रमुख पाहुणे म्हणून महाराजांनी जे सर्वस्पर्शी विस्तारपुर्वक भाषण केले होते, त्यातला हा उल्लेख आजच्या संबंधातही तेवढाच मोलाचा ठरावा. शाहू महाराजांनी जी ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या विरोधात मोहिम त्या काळात छेडली होती आणि दुसरीकडे समाजसुधारणा व तात्कालिन राजकीय सुधारणांचे काम चालविले होते; त्याचा उहापोह त्यांनी या भाषणातून केलेला होता. महाराजांवर त्यावेळी व आजही धर्मविरोधी व ब्राह्मणांचा द्वेष करणारे असा आरोप होतो. त्याचाही समाचार त्याच भाषणातून घेतलेला आहे. जातीपातीच्या वर्चस्ववादाने समाजात जो उचनीच भाव पसरला होता, तो मोडीत काढून, तमाम समाजाला एकत्र आणायचे जे प्रयास चालू होते, त्यात आपली बुद्धी विघ्नसंतोषी वृत्तीने वापरणार्‍यांना महाराजांनी दिलेला तो इशारा होता. यातले शब्द व त्यांची योजना काळजीपुर्वक वाचली; तर असे दिसेल की महाराज आपल्या नुसत्या अपमान व अवहेलनेने व्यथित झालेले नाहीत. ज्याप्रकारे कारस्थानी वृत्तीने व टोळीबाज मानसिकतेने, त्यांना बदनाम व अपमानित करण्याचे प्रयास चालू होते, त्याने चिडून उठलेले दिसतील.

   आपण ब्राह्मणांवर प्रेम करीत असूनही ते (ब्राह्मण) आपला द्वेष व तिरस्कार करतात व आपल्याला जनावरासारखी वागणूक देतात; ही त्यांची तक्रार आहे तेवढीच वेदना सुद्धा आहे. म्हणजे आपल्याला कुणाही ब्राह्मणाचा द्वेष वा तिरस्कार करायचा नाही. पण ते तसे वागत असतील, तर त्यांना तसाच प्रतिसाद द्यावा लागेल, असा त्यात इशारा आहे. इतके महाराज का चिडलेले असावेत? तर साक्षात राजा असून व त्याच्याच अनुदानावर उदरनिर्वाह करणार्‍यांनी, त्या राजाला अपमानित करायचे उद्योग चालू होते. सामान्य माणसाचे किंवा अस्पृष्य जातीच्या लोकांचे सोडाच; खुद्द राजालाही तुच्छ ठरवणार्‍या अभिजन वर्गाच्या प्रवृत्तीने महाराज संतापले होते. आणि तो अभिजनवर्ग म्हणजे बुद्धीचा मक्ता आपल्याकडेच आहे; अशी समजूत असल्याने मुजोर झालेला ब्राह्मणवर्ग होता. त्या समजाला कोणी आव्हान दिलेले नव्हते. पण स्वत:ला तुम्ही शहाणे समजत असला; म्हणून इतरेजनांना तुच्छ लेखून सातत्याने त्यांची अवहेलना कराण्याचा अधिकार गाजवला जात होता, त्याच्या विरोधात महाराजांनी शड्डू ठोकला होता. आपल्याच अनुदानावर पोसला जाणारा हा मुजोर वर्ग आपल्यालाच असे वागवत असेल, तर सत्ताहीन, शक्तीहीन व संपत्तीहीन सामान्य लोकांची काय कथा? हे लक्षात आल्यानेच शाहू महाराजांनी या बौद्धिक मुजोरीचे कंबरडे मोडायचा विडा उचलला होता. त्यासाठी त्यांनी तळागाळातल्या विविध समाजघटकांच्या शिक्षणांला प्रोत्साहान दिले, सवलती दिल्या. पण नुसत्या सवलती देऊन ते थांबले नाहीत. तर या मुजोरीशी दोन हात करायलाही शाहू महाराज पुढे आलेले होते. आणि त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या त्या भाषणात पडलेले होते.

   महाराजांना धर्मकार्य वा कर्मकांडात ब्राह्मणांचा त्रास झाला व अडवणूक झाली असेल हा त्यांचा व्यक्तीगत विषय होता. म्हणूनच त्यांनी त्याला फ़ारसे महत्व दिलेले दिसत नाही. पण त्यांच्या कार्यात बाधा आणणार्‍यांचे प्रयत्न मुळातच बौद्धिक मुजोरी व मक्तेदारीचे होते, आणि त्यामुळेच तात्कालीन ब्रह्मवृंद विचलित होऊन महाराजांच्या विरोधात एकवटला होता. संघटित हल्ले केल्याप्रमाणे खोटेनाटे आरोप करीत होता, लिहित होता. अशाच त्यावेळच्या एका नियतकालिकात जो अवास्तव टिकेचा प्रकार घडला होता, त्यावर महाराज तुटून पडले आहेत. पण आपल्यावरचे नुसते आरोप त्यांनी खोडून काढलेले नाहीत. तर त्या आरोपबाजी व टिकेच्या आडची बदमाशी त्यांनी चव्हाट्यावर आणलेली आहे. टिका व बदनामी, यात खुप मोठा फ़रक असतो, महाराजांनी टिकेचे त्याही भाषणात स्वागत केले आहे आणि जरूर टिका करा, म्हणजे मला सुधारण्यास मदत होईल; असेही उदगार काढलेले आहेत. पण टिकेच्या आडून बदनामीचे कारस्थान चालवले जाते, त्या बौद्धिक बदमाशीवर महाराजांनी नेमके बोट ठेवले आहे. ते काय म्हणतात? ‘अर्धाअधिक मजकूर गाळून थोडेसे अवतरण घेतल्याने माझ्या सांगण्याचा विपर्यास होतो.’

   आपल्या भाषणाचा बरचसा मजकूर गाळला जातो आणि बारीकसे अवतरण देऊन अर्थाचा अनर्थ केला जातो. ते कोण करत होते? तेव्हाचा बुद्धीवादी अभिजन वर्ग. अर्थात त्यावेळी शिक्षणाचा आजच्यासारखा प्रसार झालेला नसल्याने जो पिढीजात सुशिक्षित उच्चभ्रू ब्राह्मण समाज होता, त्यातूनच अभिजन घडवले जात. आणि तेच असे बौद्धिक मुजोरी दाखवून सत्याचा विपर्यास करीत होते. मुठभर लोक वृत्तपत्रे वाचन होते आणि हाताच्या बोटावर मोजावी इतकीच वृत्तपत्रे होती, तेव्हाची ही गोष्ट आहे. लिहिता वाचता येणारे व बुद्धीमान समजले जाणारे ब्राह्मण सुधारणेच्या चळवळीला व्यत्यय आणण्यासाठी सत्याचा अपलाप करीत होते. आणि तो विपर्यास कोणत्या मार्गाने केला जात होता? मूळ भाषण छापायचेच नाही. त्यातला सोयीचा शब्द, वाक्ये वा अवतरणे घेऊन त्यावरच झोड उठवायची. म्हणजे असे, की मांडलेल्या मूळ मुद्द्याचा अनर्थ होऊन लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाले पाहिजेत. त्याला काही लोक बामणीकावा म्हणतील. मी त्यात पडणार नाही. पण हा इतिहास आज अगत्याने इथे शाहू महाराजांच्या नेमक्या शब्दात सांगायचे कारण असे; की एक शतकाचा काळ उलटून जायची वेळ आली, म्हणुन त्याच माध्यमे व नियतकालिकातील मानसिकता कितीशी बदलली आहे? अर्थाचा अनर्थ व मूळ भाषणाचा विपर्यास करायचे थांबले आहे काय? हे असे चालू शकते कारण भामटे चलाख असतात. ‘परिवर्तनाच्या दिशा’ पुस्तकात कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणतात,

    ‘शोषक चलाख असतात, आहेत. ते ज्या अनेक चलाख्या करतात, त्यातील एक चलाखी अशी असते, की, ते स्वत:च शोषितांच्या हिताचा विचार मांडतात. शोषितांना बनवायचा तो प्रकार असतो. शोषक दुसरी एक चलाखी करतात. जे शोषितांचा विचार मांडतात त्यांनाच शोषक मान्यता देतात. त्यांनाच आपले विचारवंत म्हणून घोषित करतात. याचा परिणाम शोषितांचा संघर्ष कमकुवत करण्यात होतो. काही वेळा शोषितांमधून आलेल्या नेत्या कार्यकर्त्यांना शोषक जवळ करतात, सत्तेत थोडाबहूत वाटा देतात. हा सुद्धा शोषितांना फ़सवण्याचा डाव असतो. म्हणूनच आपल्या धडावर आपलेच डोके असावे आणि आपल्या डोक्याखाली आपलेच धड असावे.’

2 comments:

  1. भाऊ आणखी एक डोळे उघडणारा लेख. ..
    खरच शतकानुशतके भारतात तिच तिच पुनरर्वारुती होत आहे परंतु शोषक व शोषित भारतीयच आहेत काही शोषक किरकोळ स्वार्थासाठी देश व देशबांधव यांची लुट शोषण करत आहेत. धर्म वाढ करणाऱ्यानिच धर्माचे शतकानुशतके स्वार्थासाठी , दंभीक, purity, मोठेपणा साठी नुकसान केले आहे. ते नाशिकचे काळाराम मंदिरातील पुजारी आहेत आणि शिवरायांचा राज्याभिषेकाला विरोध करणारे असोत.. अशी शेकडो उदाहरणे आहेत. आज माध्यमात मोक्याच्या ठिकाणी बसून आपल्याच देशबांधवाची दिशाभूल करीत आहेत.
    त्यामुळेच अरणब गोस्वामी, कुमार केतकर, निखिल वागळे, राजदीप सरदेसाई सराईत पणे दिशाभूल करीत असूनही सर्व सामान्याना देशप्रेमी व सुसंस्कृत professional talented वाटत आहेत. कारण वरवरुन हेच देशाचे कैवारी आहेत असे वाटते. पण यांची बुद्धीमत्ता शोध पत्रकारांना इशरत जहान प्रकरणात, खाण 2g घोटाळ्यात, कुठे गहाण ठेवली / विकली गेली होती? त्यांनचा बेलालुमपणा सर्वसामान्यानचया लक्षात येत नाही. इथेच दिशाभूल होते व बघता बघता देशाची देशवासीची लुट होते व आपण सर्व बोकडा प्रमाणे एक बोकड कापत असताना दुसरा निर्विकार पणे बघत असतो त्या सथतीत जातो.परंतू भाऊ सारख्याच लेखा मुळे प्रबोधन होते. पूढे क्रांति कशी व कधी उभी राहणार हा भिषण प्रश्न आहे. .. Amool Shetye

    ReplyDelete
  2. योग्य विचार योग्य माहिती आणि मांडणी

    ReplyDelete