Tuesday, February 23, 2016

अर्धवट अतिशहाण्यांचे पोस्टमार्टेम

(पढतमुर्खांचे मनोविकार -२)
अमू्क इतके शिकलेले पदवीभर उ़च्चशिक्षीत म्हणून जी माणसे आपल्यापुढे पेश केली जातात, त्यांच्याकडे बघताना वा त्यांचे ऐकताना आपण गाफ़ील होऊन जात असतो. ते सुशिक्षीत म्हणून शहाणे व त्यांना जगातले सर्वकाही कळते, अशा भ्रमात आपण फ़सत असतो. प्राध्यापक, लेखक, साहित्यिक, विचारवंत वा विश्लेषक लेखक अशा बिरूदावल्या लावून आपल्यासमोर अशी माणसे पेश केली जातात. मग तो बोलतो काय, लिहीतो काय ते तपासून घेण्याविषयी आपण पुरते गाफ़ील होऊन जातो. एकप्रकारे आपण त्यांच्या शब्दावर आंधळा विश्वास ठेवून मोकळे होतो. असे का घडते? ब्रॅन्ड यालाच म्हणतात. रस्त्यात कुठल्या भाजीवाल्याकडून काही घेताना आपण निवडून तपासून घेतो. पण पॅकबंद माल डोळे झाकून छापलेली किंमत देवून खरेदी करतो. तेव्हा तो नावाजलेला ब्रॅन्ड आपली बुद्धी निद्रीस्त करीत असतो. अमूक नाव-छाप म्हणजे उत्तमच, अशी जाहिरातीतून आपली तर्कबुद्धी चिकित्सकवृत्ती निकामी केलेली असल्याचाच तो परिणाम असतो. कुठल्याही व्याख्यान वा कार्यक्रमात एखाद्या व्यक्तीला पेश केले जाते, तेव्हा त्याचे गुणगान आपल्यापुढे असे केलेले असते, की त्याने काहीही बरळावे आपण त्याला महान विचार समजून बसतो. त्यातले शब्द, त्यांची संगती, त्यांचा अन्वय लावूनही बघायला विसरून जातो. माध्यमे तीच जादू करत असतात. अलिकडेच दिल्लीच्या नेहरू विद्यापीठात देशद्रोही घोषणा दिल्याचा गदारोळ झाला. त्यावर दैनिक लोकसत्ताच्या संपादकांनी अग्रलेख लिहीला. त्यातले पहिले वाक्यच बघा, ‘विचारांच्या युद्धात सर्वात निरुपयोगी अस्त्र म्हणजे शस्त्र.’ चटकन गाफ़िलपणे वाचले तर किती महान सुविचार आहे असेच वाटणार. पण या शब्द योजनेचा नेमका अर्थ आपण कधीतरी लावून बघतो काय? संपादकाने लिहीले आणि तो बुद्धीमान आहे, म्हणजे महत्वाचेच लिहीले असणार, हे आपले गृहित असते. पण पुन्हा पुन्हा वाचून या इवल्या वाक्याची चिकित्सा करून बघा. आपल्या तर्कबुद्धीला ताण देवून बघा. हा सुविचार आहे की चक्क अडाणीपणा आहे, त्याचा शोध घेऊन बघा.
पृथ्वीतलावर कोट्यवधी सजीवप्राणी आहेत, त्यात विचार करू शकणारा एकमेव माणूस प्राणी आहे. तो वगळता अन्य कुठल्याही सजीवाला तितका विचार वा चिकित्सा करण्याची बुद्धी नाही. अवघ्या जगाची व विश्वाच्या रहस्यांची कोडी सोडवण्याचा मक्ता माणसाने घेतला आहे. अन्य कुठल्या सजीवाला ते कधीच शक्य झाले नाही. अन्य प्राण्यांनी तसा प्रयत्नही केलेला नाही. कारण त्यांच्यापाशी विचार करण्याची व तर्काने तपासून बघण्याची नैसर्गिक क्षमताच नाही. पण माणसाकडे ती पात्रता आहे. मात्र तशीच आणखी एक बाब आहे. अन्य सजीवांच्या तुलनेत माणूसच इतकी मजल मारून निसर्गावर मात करीत पुढारला आहे. अन्य प्राण्यांप्रमाणे जसा होता तसाच नैसर्गिक अवस्थेत राहिला नाही. कारण जी विचारशक्ती व बुद्धी माणसाला अपुर्व ठेवा म्हणून उपजतच मिळालेली आहे, तिचा उपयोग करून माणसाने आपल्या नैसर्गिक अपुरेपणावर मात करण्याचा सतत प्रयत्न केला आहे. आपल्याहून शक्तीमान, अक्राळविक्राळ प्राणिमात्रापासून आपला बचाव करण्याची नैसर्गिक कुवत माणसापाशी नाही. तर त्याने बुद्धीच्या बळावर ती कुवत साध्य केलेली आहे. त्यासाठी विविध साधने, उपकरणे निर्माण केली. अन्य सजीवांना आपले गुलाम केले आणि ती करताना त्याच माणसाने शस्त्रे व अस्त्रे निर्माण केली. ही बचावात्मक वा विध्वंसक अस्त्रे व शस्त्रास्त्रे आयती मिळालेली नाहीत, तर बुद्धी व विचारांची किमया आहे. भोवताली घडते त्याचा उलगडा करत गेलेल्या माणसाने विचार करून व मिमांसा करण्यातून अशी संहारक अस्त्रे शोधून काढली. पण तो माणूस प्राणी सोडता अन्य कुठल्या सजीवाला त्या दिशेने एकही पाऊल आजवर टाकता आलेले नाही. कारण अन्य प्राण्यांपाशी विचारांची अगाध शक्ती नाही. माणसापाशी विचारांची शक्ती आहे आणि त्यातूनच अनेक सुखकारक सुविधा जन्माला आल्या आणि विध्वंसक अशी शस्त्रेही विचारातूनच आलेली आहेत. आपण सुरक्षित जागी दडी मारून हजारो मैल दूर असलेल्या कोणालाही ठार मारणाती शस्त्रे विचारांनीच निर्माण केली ना? मग शस्त्रच विचारांनी निर्माण झाले असेल, तर विचारांच्या लढाईत शस्त्र हे अस्त्र नाही, असे म्हणणे शहाणपणाचे आहे काय?
किंबहूना पुर्वीच्या काळात सत्ता व संपत्ती भूमीसाठी माणसे शस्त्रे घेऊन एकमेकांच्या जीवावर उठायची. जितका माणूस प्रगत व विचारांच्या आहारी गेला, तसा तो विचारांच्या विजयासाठी शस्त्रांना बेधडक बेगुमानपणे वापरू लागला. नक्षलवादी वा जिहादी कशासाठी शस्त्रांचा वापर इतका सढळपणे करीत असतात? त्यांचे बळी होणार्‍यांचे अशा संघटनांशी कुठलेही वैर भांडण नसते. तरी ती सामान्य माणसे अशा हल्ले व स्फ़ोटाचे बळी होतात. ते कशाचे बळी आहेत? जिहाद वा नक्षलवाद ही विचारप्रणाली आहे. अमूक एका विचारांच्या अधीन राहून लोकसंख्येने जगावे, या आग्रह अट्टाहासातून जी हिंसा होत असते, त्याला विचारांची नव्हेतर कसली लढाई म्हणतात? जे कोणी सत्ताधारी वा सरकार अशा कारवायांच्या विरोधात सैनिकी पोलिसी कारवाई करतात, त्यांचीही एक विचारसरणी असते. तिचीच हुकूमत रहावी म्हणून शस्त्रांची सज्जता राखली जाते व वापरही होत असतो. पाकिस्तान, भारत वा चीन या देशातल्या सामान्य जनतेचे एकमेकाशी कुठले भांडण नाही, तरीही त्या त्या देशातील सत्ताधीशांच्या वैचारिक तात्विक भांडणात शस्त्रांचा वापर होतो आणि बळी सामान्य माणसालाच पडावे लागते. ही माणसे शस्त्राची बळी नसतात, तर विचारांच्या लढाईतले हकनाक बळी असतात. थोडक्यात विचारांच्या लढाईतच शस्त्राचे अस्त्र होऊन सामान्य माणसाचा बळी जात असतो. शस्त्राची निर्मिती विचारातून होते आणि त्याचा बरावाईट वापरही विचारांतूनच उदभवतो. कारण विचार आणि विवेकात मोठा फ़रक आहे. विचारांना विवेकाचा लगाम लावलेला असेल, तर सुविधा व साधने प्रभावी असतात. पण विवेकाचा बांध फ़ुटला, मग विचारच शस्त्रापेक्षा घातक विध्वंसक होऊन जातात. ही इतकी मिमांसा आपण करत नाही. त्यामुळे असे एखादे जड जड अनाकलनीय शब्दांचे वाक्य आपल्याला मोठा सुविचार वाटून जातो. पण प्रत्यक्षात असे लिखाण वा विश्लेषण दिशाभूल करणारे असते आणि त्यातून आपल्यातल्या उपजत चिकित्सक बुद्धीला निद्रीस्त केले जात असते. एकदा त्यात समोरचा यशस्वी झाला, मग सहजगत्या भरदिवसा तुम्हाला चांदणे दाखवू शकतो किंवा काळोखाला उजेडही ठरवू शकतो. कारण आपण वास्तव बघायचेच विसरून गेलेले असतो. असे असले म्हणून आपणच अज्ञानी वा मुर्ख नसतो. बुद्धीमान म्हणून मिरवणारे लोक आपल्या इतकेच निद्रीस्त बुद्धीने वावरत असतात. समोरचे वास्तव सामान्य माणूस एकवेळ सहज ओळखू शकतो. पण बुद्धीमान माणसाला ते बघणे अशक्य असते. किंबहूना त्यासाठीच विविध कला. योजना, उपक्रम सातत्याने राबवले जात असतात. तुम्ही विचार करूच नये आणि समोर आणले जाईल त्यावर डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवावा, अशी स्थिती निर्माण केली जाते. माध्यमे मोठ्या प्रमाणात तेच काम करीत असतात. त्यांचे मुखवटे जागरूकपणे फ़ाडण्य़ाची म्हणूनच गरज असते. (संपुर्ण)

5 comments:

 1. कम्युनिस्ट लोक विचारांची लढाईविचाराने लढतात का? कम्युनिस्ट नेहमी विचारांची लढाई कारस्थान, कपट,खोटारडेपणा आणि हिंसा यांच्या एकत्रित वापर करून लढतात.

  ReplyDelete
 2. विचारांचं युद्ध म्हणजे दोन्ही बाजू वैचारिक वादविवाद करत असतील तरच. एक बाजू विचारासोबत शस्त्रही सोबत घेत असेल तर दुसऱ्या बाजूलाही शस्त्र उचलावे लागेल.
  तेव्हा केवळ विचारांचे युद्ध असेल तर शस्त्र निरुपयोगी

  ReplyDelete
 3. sadhyachya sansad gondhal kiva etar jya kahi adachani ahet tyatun UPAY sanganari ek lekhamalika apan suru karavi joparyant adhiveshan ahe toparyant.

  ReplyDelete
 4. या सर्वच पुरोगामी, सिक लोकांचे सामायिक जावई, श्री. रा. रा. बगदादी विचारानेच लढतात वाटते त्यांची यांना आधीच पटलेल्या विचारांची लढाई ! आपापल्या मुलीना सवत येऊ नये म्हणून काय एकपत्नी रामाचे विचार ऐकवातात की काय हे पुरोगामी आपापल्या लव्ह जिहादी जावईबापुना ?

  ReplyDelete