Saturday, March 19, 2016

स्वयंसेवी संस्था कुणाची सेवा करतात?

इशरत जहान प्रकरणातले अनेक गुंते समजून घेण्य़ासाठी पार ओसामापर्यंत जावे लागेल. इशरत जहानच्या चकमकीनंतर भारतातल्या अनेक मानवतावादी संस्था किंवा स्वय़ंसेवी संस्था, कमालीच्या अस्वस्थ होत्या. चकमकीची बातमी आल्यापासून त्यांनी ती चकमक खोटी असल्याचा दावा केला आणि संपुर्ण चौकशीची मागणी केली. पण चौकशीपुर्वी ती चकमक खोटी असल्याचा अशा लोकांचा निष्कर्ष तयारच होता. म्हणजे चौकशी तपास दुय्यम होता आणि त्या संशयाला दुजोरा देण्यापुरती चौकशी त्यांना हवी होती. याकुब अफ़जलपासून इशरतपर्यंत देशाचे शत्रू मानल्या गेलेल्या लोकांविषयी ह्या स्वयंसेवी मंडळींना इतकी आपुलकी कशाला असते? हा कुणाही भारतीयाला सतावणारा प्रश्न आहे. भारतातल्या स्वयंसेवी संस्थांचे परकीय वा देशाच्या शत्रू मानल्या गेलेल्यांशी इतके साटेलोटे कशाला असते, असाही एक गंभीर प्रश्न लोकांना पडतो. पण त्याचे उत्तर सापडत नाही. कारण अशा संबंधांची इतकी बारीक गुंतागुंत असते, की त्याचे धागेदोरे सापडणेही अशक्य होऊन जाते. पण अशाच एका प्रकरणात स्वयंसेवी संस्था कशा परकीय हस्तक असतात, त्याचा खुलासा होऊ शकत असल्याने आपण ओसामाकडे बघू शकतो. चार वर्षापुर्वी पाकिस्तानच्या अबोटाबाद या छोटेखानी शहरामध्ये अतिशय गोपनीय जागी दडी मारून बसलेल्या ओसामा बिन लादेन याचा अमेरिकन कमांडोंनी खात्मा केला. पाकिस्तानी हद्दीत जाऊन लष्कराचे मुख्यालय असलेल्या कुंपणानजिक ही कारवाई झाली, हे अवघ्या जगाला ठाऊक आहे. पण पाक पोलिस, प्रशासन व हेरखात्याला गाफ़ील ठेवून ही नुसती कारवाई झाली नव्हती. ती माहिती पाकला संपुर्ण अंधारात ठेवून अमेरिकन हेरखात्याने मिळवली होती. त्यासाठी पाकिस्तानात ज्या अमेरिकन मदतीवर चालणार्‍या स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांचा बिनधास्तपणे वापर करण्यात आला होता.
ओसामा कुठे लपलाय हे पाक प्रशासनाला वा हेरखात्याला गुढ नव्हते. कारण त्यांनीच अतिशय गोपनीय जागी त्याला लपवले होते. त्याच्या निवासस्थानाच्या जवळपास सुद्धा कोणी फ़िरकू शकणार नाही, इतकी सज्जता राखलेली होती. अबोटाबाद येथे त्या इमारतीच्या जवळपास परिसरातल्या वस्तीलाही ओसामा तिथे असल्याचा कधी थांग लागलेला नव्हता. मग इतक्या गुप्त जागी अमेरिकन हस्तक वा खबरे कसे पोहोचू शकले? त्यासाठी कुठली चतूर यंत्रणा अमेरिकेने वापरली असेल? अमेरिकन मदतीवर चालणार्‍या विविध मानव कल्याण संस्थांच्या पाकिस्तानी शाखांचा त्यासाठी सीआयए या हेरखात्याने मोठ्या खुबीने वापर केलेला होता. मात्र त्यविषयी कमालीची गुप्तता राखण्यात आलेली होती. योजना वरकरणी गोपनीय माहिती काढण्याची नव्हतीच. अबोटाबाद येथे ओसामा लपल्याची माहिती मिळाली म्हणून तिथे घरोघर जाऊन शोध घेणे शक्य नव्हते. त्यासाठी मग तिथे पोलिओने बालकांची जीव धोक्यात असल्याच्या आवया उठवण्यात आल्या. त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मग स्थानिक प्रशासनाला पोलिओ लस टोचण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेण्य़ास भाग पाडण्यात आले. तशी सज्जता स्थानिक प्रशासनाकडे नसल्याने ती जबाबदारी स्वयंसेवी संस्थांनी उचलली आणि घराघरात पोलिओ मोहिम राबवली गेली. त्यातला एक डॉक्टर अमेरिकन योजनेविषयी जाणून होता व ती मोहिम राबवित होता. त्याचे नाव डॉक्टर शकील आफ़्रिदी! मुलांविषयी माहिती मिळवणे, त्यांची तपासणी व मग योग्य तेवढी लस टोचणे, असे काम या मोहिमे अंतर्गत झाले. त्यातून जिथे ओसामा बिन लादेन आपल्या विस्तारीत कुटुंबासहीत लपून बसला होता, त्याची माहिती अमेरिकन हेरखात्याच्या हाती आली. तिथे किती माणसे, महिला व मुले आहेत त्याचाही तपशील हाती आला. त्याच आधारावर मग ओसामाला संपवण्याची मोहिम आखली गेली.
जेव्हा ओसामाचा खात्मा झाला, तेव्हा ती प्रत्यक्ष कारवाई अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा आणि त्यांचे सहकारी व्हाईट हाऊसमध्ये बसूनही बघत होते आणि काही मैलावर असलेल्या पाक सेनाप्रमुखांना त्याचा थांगपत्ताही नव्हता. इतकी नेमकी माहिती स्वयंसेवी संस्थांनी आपल्या देशाची गुपिते फ़ोडून अमेरिकेला पुरवली होती. अमेरिकन मदतीवर पाकिस्तानात कार्यरत असलेल्या शेकडो मानवी कल्याणकारी संस्थांविषयी पाक सरकारला त्यापुर्वी कधी शंकाही आलेली नव्हती आणि ओसामाचा खात्मा झाल्यावरही त्याचा सुगावा पाक हेरखात्याला लागला नाही. पण काही काळानंतर ओसामा मोहिमेविषयी बोलताना अमेरिकेचे संरक्षणमंत्री लिओन पेनेटा यांनी त्याचा जाहिर उल्लेख केला आणि बिचारा डॉ. शकील आफ़्रिदी आपल्या मायभूमीत देशद्रोही ठरला. ओसामाचा खात्मा करण्यासाठी त्याचा ठावठिकाणा लागण्याला अतिशय महत्व होते आणि ते काम डॉ. आफ़्रिदीने केल्याबद्दल पेनेटा यांनी जहिरपणे आभार मानले. त्यातच त्यांनी शकीलच्या पोलिओ मोहिमेची माहिती दिली अधिक तशी मोहिम कशी जणिवपुर्वक योजण्यात आली आणि स्वयंसेवी संस्थांना हेरगिरीच्या कामाला कसे जुंपण्यात आले, त्याचाही तपशील दिला. पण त्यामुळे पाकमध्ये अमेरिकन पैशावर समाजसेवा करणार्‍या बहुतांश व्यक्ती वा संघटनांचा मुखवटा गळून पडला. अमेरिकन अनुदान व देणग्या घेणार्‍या संस्था व व्यक्ती भले सामान्य माणसांच्या कल्याणाचा आव आणत असतील, पण त्यांना मिळणारे अनुदान व देणग्या मूलत: अमेरिकन हेरगिरीला उपयुक्त ठरण्यासाठीच असते, हे त्यातून पुन्हा चव्हाट्यावर आले. सहाजिकच आज तो डॉ. आफ़्रिदी गजाआड जाऊन पडला आहे. आजवर ज्याचे नाव पाकिस्तानात गरीबांच्या मुलांना जीवदान देणारा म्हणून लोकप्रिय होते, त्याच्याकडे आज देशद्रोही म्हणून बघितले जात आहे. त्याने असे कशाला करावे?
डॉ. आफ़्रिदी याने केला तो देशद्रोह होता काय? ओसामा मुळात पाकिस्तानचा नागरीकच नव्हता. म्हणून त्याच्याविषयी माहिती अमेरिकन हेरखात्याला मिळवून देण्यात आफ़्रिदीने केला त्याला देशद्रोह कसे म्हणता येईल? असे अनेक प्रश्न विचारता येतील. पण मुद्दा तो नाहीच! सवाल स्वयंसेवी किंवा जनहित म्हणून कर्यरत असलेल्या संस्थांनी अशाप्रकारे परदेशी हेरसंस्थेसाठी काम करावे काय? आपल्याच देशातल्या सरकारला गाफ़ील वा अंधारात ठेवून सरकारी योजना वा धोरणांना सुरूंग लावण्याचे हे कृत्य मानवी हिताशी निगडीत आहे काय? डझनावारी अमेरिकन स्वयंसेवी संस्था जगभरच्या मागास गरीब देशात अब्जावधी डॉलर्सची मदत पाठवित असतात. भारतातही कित्येक कोटी डॉलर्स विविध जनहित योजनांच्या नावाखाली येत असतात आणि त्यांचा वापर सढळहस्ते विविध व्यक्ती व संस्था करीत असतात. तीस्ता सेटलवाड किंवा इंदिरा जयसिंग यांच्या अशाच संस्थांना अमेरिकन फ़ोर्ड फ़ौंडेशनने कित्येक लाख डॉलर्स वा कोट्यवधी रुपये देणगी दाखल दिले आहेत. त्यातली रक्कम गरीब, वंचित, महिला वा बालकांच्या कल्याणासाठी असल्याचे म्हटले जाते. हे कल्याण साधतांना अशा लोकांनी केलेले उपदव्याप बघितले, तर त्यामागचा खरा हेतू लपून रहात नाही. यातल्या बहुतांश संस्था सरकार वा सरकारी धोरणाच्या विरोधात उचापती करताना दिसतील. त्यांना अमेरिकन संस्थांनीच कोट्यवधी रकमा का द्याव्यात? त्याचा अमेरिकन हेरखात्याला कोणता फ़ायदा होणार आहे? त्याचे उत्तर आज मिळू शकत नाही. पण उद्या डॉक्टर आफ़्रिदी याच्यासारखे काही काम करून घेतले जाईल आणि जेव्हा त्याचे दुष्परिणाम होऊन जातील. तेव्हाच त्याचा उलगडा होऊ शकतो. पण तितक्याही लांब जाण्याची गरज नाही. भारतातील स्वयंसेवी संस्थांना मिळणार्‍या अमेरिकन देणग्या कुठल्या कारणास्तव वापरल्या जातात, ते बघितले तरी त्यातले डॉ. आफ़्रिदी लपून रहाणार नाहीत.

1 comment:

 1. भाऊ एकदम बरोबर. .
  भारतात अशा एनजीओ न वर सरकारने ( ते जर खरोखरच भारतीय असेल तर नाहितर UPA प्रणीत विदेशी काँग्रेस नव्हे) प्रशासनाने (भ्रष्टाचारी व राजकीय दबावाखाली काहीही देशद्रोह करणारे नव्हे) मिडियाने ( निष्पक्ष, सत्य संशोधनातमक व निरभीड असलेला ) जागरूक व देशप्रेमी नागरिक ( स्वार्थी स्वतःतच मश्गुल विकाऊ नव्हे) व कणखर नेतृत्वाने (भ्रष्टाचारी विदेशी नव्हे) लक्ष ठेवणे आवश्यक आहे. भाजप सरकारने अशा एनजीओ ची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व निसपृरूह न्यायालयाने (भ्रष्टाचारी व राजकीय दबावाखाली काहीही देशद्रोह करणारे नव्हे ) देहदंडाची शिक्षा केली पाहिजे. तरच ह्या गोष्टीचा पायबंद होइल. मिडिया
  लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो व त्याची विश्वासार्हता पत्रकार व संपादक यांच्या निष्पक्ष, सत्य संशोधनातमक व निरभीड पत्रकारीते वर अवलंबुन असते. नेमकी हिच गोष्ट हेरून विदेशी व विकाऊ देशी मिडीयाने देश गेली तिस पसतीस वर्षे पोखरला आहे. आणि आता TV मुळे हे काम अधिक सुलभ व परिणामकारक झाले आहे. हे सर्व थांबवायचे असेल तर अशा मिडिया वर निरबंध घालणे व न्यायालयीन प्रक्रियेत अशा देशद्रोही ना देहदंडाची शिक्षा केली पाहिजे. गेली 30 वर्षे ठराविक पक्षाला व ठरावीक घराण्याला या सर्वानी साथ का दिली याची पण चोकसी करणे आवश्यक आहे.
  रोहितच्या आत्महत्येचा विषय असो वा दादरिचा विषय असो केंद्र सरकारला बदनाम करण्याचा एकच अजेंडा मिडीयाने केन्द्र सरकार बदललेल्या पासून सुरू केला आहे. प्रतिक्रियेवर पुरोगाम्यांना साथीला घेऊन सरकारला बदनाम करण्याचा एकच अजेंडा मिडीयाने घेतला आहे. त्यात आरणव गोस्वामी व राजदीप सरदेसाई व इतर अनेक आघाडी वर आहेत.
  परंतु खरच या मुळे देश असाच शतकानुशतके गुमराह दिशाभूल झालेल्या अवस्थेत भरकटत आहे. आपल्या देशातील विचारवंत अशा कारस्थानात सामील होतात व देशबांधव व देश सोयीस्कर पणे (कारण शहानिशा करायला मेनदुला मेहनत दयावी लागते हजारो (आता लाखो ) मावळे व स्वतंत्रसैनिका प्रमाणे घरावर तुळशीपत्र ठेवावे लागते त्याची कोणाची तयारी नाही )दिशाभूलीचे बळी होत आहेत...
  Amool Shetye

  ReplyDelete