Sunday, March 20, 2016

जावेद: मियादाद आणि अख्तर

पाकिस्तानी संघाचा कर्णधार शाहीद आफ़्रिदी याने भारतात २०-२० स्पर्धेसाठी आल्यावर काढलेल्या उदगारांनी पाकिस्तानात खळबळ माजवली आहे. कारण मागल्या पिढीतला त्याचा सहकारी जावेद मियादाद, यानेच आफ़्रिदीची जाहिर निर्भत्सना केलेली असून कुणा वकीलाने आफ़्रिदीच्या विरोधात खटलाही भरला आहे. असे काय बोलला हा पकिस्तानचा कर्णधार, की त्याच्यावर मायदेशी बांधव इतके तुटून पडावेत? भारतात खेळायला नेहमीच आवडते आणि भारतात पाकिस्तानी खेळाडूंना नेहमीच प्रेम मिळालेले आहे. पाकिस्तानातही आमच्या वाट्याला इतके प्रेम येत नाही, असे आफ़्रिदी म्हणाला आणि त्याच्यावर त्याचे देशबांधव तुटून पडले आहेत. भारतीयांचा पाकिस्तानी द्वेष करतात, यात काही नवे नाही. किंबहूना भारताचा द्वेष इतक्याच एका हेतूवर हा देश उभा आहे. तोच त्यांच्या अस्तित्वाचा आधार आहे. भारताचा द्वेष सोडला तर जगणार कसा पाकिस्तान, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच सात दशकाचा कालखंड उलटून गेला, तरी त्यांना द्वेषातून बाहेर पडता आलेले नाही, की स्वतंत्र देश म्हणून उभे रहाता आलेले नाही. त्यांना भारतातून प्रेम मिळाले तर ते बिचारे आणखीनच कासाविस होतात. जावेद मियादाद त्यामुळेच खवळला आहे. भारतीयांच्या प्रेमाने भारावलेला कर्णधार भारताला पराभूत करणारा खेळ कसा करू शकेल, असा प्रश्न मियादादला पडला आहे. त्यातूनच पाकिस्तानी मानसिकता लक्षात येऊ शकते. कारण या एकाच वाक्यातून मियादादने भारतातल्या पाकप्रेमींचा जोड्याने मारले आहे. पाकिस्तानी जनता भारतावर प्रेम करते आणि म्हणूनच आपणही त्यांच्यावर प्रेम करायला हवे, असा इथल्या दिवट्यांचा दावा असतो. तोच मियादादने खोडून काढला आहे. भारताशी युद्ध असो किंवा खेळ असो, त्यात भारताला पराभूत करणे, इतकेच उद्दीष्ट असू शकते. खेळ की युद्ध हा विषय दुय्यम असतो.
मियादाद म्हणतो, भारतीयांच्या प्रेमाने भारावलेला कर्णधार भारतीय संघाला हरवण्याचा खेळच करू शकणार नाही. याचा सरळ अर्थ इतकाच, की खेळ वा क्रिकेटला काही महत्व नाही. कुठल्याही बाबतीत भारताला हरवणे, मान खाली घालायला लावणे, हे पाकिस्तानी उद्दीष्ट असायला हवे. शत्रूत्व पत्करूनच भारताला सामोरे जायला हवे. अन्यथा त्याला पराभूत करता येणार नाही. थोडक्यात भारताशी फ़क्त शत्रूत्वाचेच संबंध असायला हवेत, असा त्याचा आग्रह आहे. तो फ़क्त एका खेळाडूपुरता नाही, तर अन्य एका मोठ्या वकीलानेही तशी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. भारतात पाकिस्तानी खेळाडूंना मायदेशापेक्षाही जास्त प्रेम मिळते, ही बाब वकील कोर्टात जाऊन आक्षेपार्ह ठरवू बघतो आणि त्याचा असला दावा तिथले कोर्ट दाखलही करून घेते. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यातून पाकिस्तानची मानसिकता कोणती आहे, त्याची साक्ष मिळते. दोन्ही देशातील जनतेला परस्परांविषयी आपुलकी आहे किंवा प्रेम आहे; असले दाव निव्वळ खोटे असतात, त्याचे हे पुरावे आहेत. आफ़्रिदी जे बोलतो आहे त्याचा अनुभव मियादादलाही मिळालेला आहे. म्हणजे त्याला भारतात प्रेम मिळाले असले, तरी त्याला फ़क्त भारताचा द्वेषच करावा असे वाटते. याचा अर्थ कोणालाही कळू शकतो. त्यासाठी मोठे विवेचन करण्याची गरज नाही. मग इतकी साधी गोष्ट भारतातल्या पाकप्रेमी लोकांच्या लक्षात कशाला येत नाही? मुंबईत गुलाम अलीचा गझलांचा कार्यक्रम योजायला धडपडणारे किंवा दिल्ली कोलकात्यात त्याचा मुशायरा भरवायला तडफ़डणारे; कोणता खोटारडेपणा करीत असतात? विराट कोहलीच्या फ़लंदाजीवर खुश होऊन कोणी भारताचा ध्वज घरी फ़डकावला, तरी त्याला पाक कायदा तुरूंगात धाडतो. त्याचीच पुनरावृत्ती आफ़्रिदीच्या विधानानंतर होताना दिसते. हे वास्तव आहे, जे पुरोगामी भारतीयांना बघायचे नसते किंवा झाकायचे असते.
मुंबईवर हल्ला करणारा अजमल कसाब असो किंवा आफ़्रिदीवर खटला भरणारा वकील वा मियादाद असो, त्यांच्या मानसिकतेमध्ये कुठलाही फ़रक नसतो. आपापल्या गरजेनुसार त्यांना भारताची मदत वा मैत्री हवी असते. भारतात येऊन हिरोगिरी करणारा पाकिस्तानी खेळाडू मोहसिन खान त्यापैकीच एक आहे. मियादादचा समकालीन असलेला मोहसिन खान क्रिकेटचे कौशल्य संपल्यावर भारतात आला आणि इथे त्याने काही चित्रपटात भूमिकाही केल्या. रिना राय नावाच्या अभिनेत्रीशी विवाह करून इथे स्थायिक होण्याचा त्याचा विचार होता. पण अभिनयात फ़ारशी डाळ शिजली नाही आणि मोहसिन मायदेशी निघून गेला. तर त्याच्या पत्नीला तिथे प्रवेश देण्यात आला नाही. असा मोहसिन मियादादच्याच शब्दात सूर मिसळून भारतविरोधी गरळ ओकला आहे. सापाला कितीही दूध पाजा, त्याचे विषातच रुपांतर होते म्हणतात, त्यातला हा प्रकार आहे. भारताचा द्वेष ही पाकिस्तानी मानसिकता आहे. त्यामुळे खोट्या प्रेमाचे उमाळे कितीही आणलेत, म्हणून उपयोग नाही. क्रिकेट खेळून अथवा गझलांचे कार्यक्रम योजून पाकिस्तानला प्रेम शिकवता येणार नाही. भारताचा द्वेष आणि त्यातून आलेला न्युनगंड; या पायावर उभा असलेला समाज व त्यांचा देश असे पाकिस्तानचे चरित्र आहे. त्याला प्रेमाने कोणी जिंकू शकत नाही. करण त्याला प्रेमाचीच भिती वाटते. अन्यथा ही मंडळी अशी आफ़्रिदीवर कशाला तुटून पडली असती? अर्थात आफ़्रिदीलाही भारताच्या प्रेमाचे उमाळे आलेले नाहीत. नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने म्हणतात, तशी त्याचा संघ भारतात येण्यामध्ये एकामागून एक विघ्नेच आलेली होती. त्यामुळे अखेरीस इथे येऊन पोहोचल्यावर शुभेच्छा व्यक्त कराव्यात म्हणून सौजन्य दाखवायला आफ़्रिदी असे गुळगुळीत शब्द बोलला होता. पण तेही समजून घेण्याचे सौजन्य त्याच्या मायदेशी कोणी दाखवू शकला नाही.
तिकडे मियादाद मोहसिन खान असे बरळले, तर इथे ओवायसी नावाच्या दिवट्याने मुक्ताफ़ळे उधळली आहेत. बाकी कोणापेक्षा जावेद अख्तर या पटकथालेखक कविने ओवायसीला चांगलाच फ़टकारला आहे. अख्तर त्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण मजेची गोष्ट म्हणजे अन्य कोणी अस्सल सेक्युलर ओवायसीला अवाक्षर बोललेला नाही. उलट संघावर ठपका ठेवण्याचा अव्यापारेषू व्यापार अनेकांनी केलेला आहे. तेही आता नेहमीचेच झाले आहे. किंबहूना म्हणूनच कोणी पुरोगामी सेक्युलरांना गंभीरपणे घेत नाही. ओवायसीसारख्या आगलाव्या माणसाला गल्लीतही कोण विचारत नसताना, पुरोगामी माध्यमांनी त्याला कसा राष्ट्रीय पातळीवरच्या प्रसिद्दीने मोठा मुस्लिम नेता करून ठेवला आहे, त्यावर जावेद अख्तर यांनी नेमके बोट ठेवले आहे. केवळ बेताल व बेछूट बोलण्यापलिकडे ओवायसी याची लायकी शुन्य आहे. माध्यमानी त्याला व्यापक प्रसिद्धी दिली नसती, तर त्याचा चेहराही देशातल्या मुस्लिमांना ओळखताही आला नसता. पण या निमीत्ताने अख्तर यांनी संविधानाचा आडोसा करून आपल्या घातक राजकारणाला पुढे रेटणार्‍या मुस्लिम नेत्यांना विचारलेला एक सवाल सेक्युलरांनाही निरूत्तर करणारा आहे. संविधानात भारतमाता की जय असे म्हणायची सक्ती नसल्याने तसा जयजयकार करणार नाही, म्हणणार्‍या ओवायसीचे संविधानप्रेम किती तकलादू आहे? तो घालतो ती शेरवानी वा टोपी तरी घालण्याची सक्ती संविधानाने केलेली आहे काय? नसेल तर देशभर ओवायसी त्याच बेंगरूळ वेशात कशाला फ़िरत असतो, हा अख्तर यांचा सवाल बेमिसाल आहे. खरे तर तो अन्य कुठल्याही कडव्या पुरोगाम्याने विचारायला हवा होता. पण जिहादी इस्लाम म्हणजे पुरोगामीत्व झालेल्या देशातल्या सेक्युलरांकडे तितकी हिंमत कुठून असायची? पण या निमीत्ताने पाकप्रेमी व सेक्युलरांची जिहादी मानसिकता उघडी पडली हेही कमी नाही.

4 comments:

 1. Parkhad lekh...

  ReplyDelete
 2. भाऊराव,

  लेखातला शब्द अन शब्द पटला. विशेषत: ओवैशांचे बेगडी संविधानप्रेम ठळकपणे उठून दिसते. #गून झाल्यावर #गण धुवावे असं कुठेही संविधानात लिहिलेलं नाहीये. मग औवेशी माखल्या #गणाने देशभर नाचणार का?

  औवेशी बंधूंना आजचे जिना बनायचं आहे. जिनाला त्याच्या वेळेस काळं कुत्रंही विचारात नव्हतं. तेव्हा इंग्रजांच्या टाचेखालच्या प्रसारमाध्यमांनी त्याला मोठा केला. जणू तोच भारतातल्या सर्व मुस्लिमांचा प्रतिनिधी आहे असं भासवण्यात आलं. प्रत्यक्षात १९४६ च्या सार्वत्रिक निवडणुकांत मुस्लिम लीगला सरकार बनवण्याइतपत बहुमत एकाही प्रांतात नव्हतं. तेव्हा दंगली करून जिनाने पाकिस्तान हिसकावून घेतला. पुढे काय झालं? तर तिथल्या मुस्लिमांची अखंड हिंदुस्थानात होत नव्हती तशी फरपट सुरू झाली. ती आजही चालूच आहे. पाकिस्तानातल्या मुस्लिमांनी कधीही पाकिस्तान वेगळा तोडून मागितला नव्हता, हे लक्षणीय आहे.

  आता आपण सत्तर वर्षं पुढे येऊया. आज थोरल्या औवेशाची भाषा संवैधानिक असते, तर धाकट्याची खुनाखुनीची असते. जिनाची पण तशीच होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर जिनाला धर्मनिरपेक्षतेचे उमाळे फुटले. पहिल्या भाषणात त्याने पाकिस्तान धर्मनिरपेक्ष असून त्यात सर्वांना समान संधी असेल असं घोषित केलं. मग पाकिस्तान वेगळा काढलाच कशाला मुळातून? आज थोरला औवेशी पण स्वत:ला दलितांचा व वंचितांचा तारणहार म्हणवून घेतो. काय फरक आहे जिना आणि औवेशी बंधूंत?

  सांगायचा मुद्दा काये की औवेशी बंधू स्वत:ला जिना समजतात. फक्त अडचण अशीये की त्यांना डोक्यावर घ्यायला आज कोणी गांधी मिळणार नाहीये.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 3. Bhavusaheb
  Jars panama papers baddal satya Kay ahe te liha
  Mhanje amhalapan kalel
  Ti news achanak band zhali

  ReplyDelete