Monday, March 14, 2016

नंगेसे खुदा डरता है, हाफ़चड्डी नही!

संसदेचे वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत बोलताना कॉग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी संघ व आयसिस यांची तुलना केल्याने गदारोळ सुरू होणे स्वाभाविक होते. त्यात नवे असे काही राहिलेले नाही. वास्तविक आझाद यांनी नेमके काय विधान केले, यापेक्षा ते विधान करण्याची काय गरज होती, असा प्रश्न विचारला पाहिजे. कारण कॉग्रेस वा अन्य सेक्युलर पक्षांना किंवा संघटनांना हल्ली आपले असे काही काम उरलेले नाही. उठताबसता संघाच्या नावाने शिवीगाळ केली, म्हणजे गंगेत घोडे न्हाले अशी त्यांची समजूत होऊन बसली आहे. कधीकधी मग अशी विधाने उलटतात आणि त्याचे इन्कार वा खुलासे देत बसावे लागते. मग त्या भानगडीत पडायचेच कशाला? संघाशी अशी वाचाळ लढत देण्यापेक्षा थेट जनसामान्यात जाऊन संघापेक्षा अधिक प्रभावी लोकसंघटन उभे केल्यास, अशी वायफ़ळ बडबड करण्याची गरज उरणार नाही. संघाचे काम विविध आघाड्यांकडून थेट जनतेमध्ये चालते आणि त्याच्या परिणामी त्यांची राजकीय आघाडी असलेल्या भाजपाला त्याचा राजकारणात लाभ मिळालेला आहे. याच्या उलट मागल्या दोनतीन दशकात सर्वच पुरोगामी सेक्युलर पक्षांचा सामान्य जनजीवनाशी संपर्क उरलेला नाही. प्रसार माध्यमांच्या पलिकडे या लोकांचे संघटन शिल्लक उरलेले नाही. त्यामुळे माध्यमांच्या मेहरबानीवर या पक्ष वा संघटनांना जगावे लागते आहे. त्यामुळे मग अशी खळबळ माजवणारी विधाने करावी लागतात आणि उलटल्यावर सारवासारव करण्याची नामुष्की येत असते. आताही या विधानाने आझाद गोत्यात आले आणि आपण तसे बोललोच नाही, अशी मखलाशी त्यांनी चालविली आहे. पण नेमके शब्द दुय्यम असतात आणि यामागचा हेतू महत्वाचा असतो. आझाद यांनी भले संघ व आयसिसची थेट तुलना केलेली नसेल, पण त्यांच्या मनात तीच तुलना आहे.
आझाद कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणूनच त्यांना आपल्या पक्षाचा पुर्वेतिहास नक्की ठाऊक असेल. तीन वर्षापुर्वी त्यांच्याहून ज्येष्ठ नेता असलेले सुशीलकुमार शिंदे भारताचे गृहमंत्री होते आणि नव्याने इतके मोठे पद मिळाल्याने कमालीचे फ़ुशारले होते. मग त्यांनीही असेच एक गळ्याशी येणारे विधान करून खळबळ माजवली होती. संघाच्या शाखेवर घातपाताचे व दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते, असा आरोप शिंदे यांनी पक्षाच्या अधिवेशनातच केला होता. नुसता आरोप करून शिंदे थांबले नाहीत, तर आपल्याकडे तसा गोपनीय अहवाल आलेला असल्याचा दावा त्यांनी केलेला होता. त्यामुळे सीमेपलिकडे जिहादी प्रशिक्षणाचे खास अभ्यासक्रम चालवणारे सईदभाई हाफ़ीजजी इतके सुखावले, की त्यांनी ट्वीटरवरून शिंदे यांचे अभिनंदन केलेले होते. राष्ट्रसंघाने ज्याला घातपाती म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्यालाच ठार मारण्यासाठी काही कोटी डॉलर्सचे बक्षीसही अमेरिकेने लावलेले आहे, त्या हाफ़ीजने शिंदे यांची पाठ थोपटावी, यापेक्षा कॉग्रेसच्या मानसिकतेचा आणखी कुठला पुरावा द्यायला हवा? मात्र पुढे संसदेत शिंदे यांना त्याचा जाब द्यावा लागला आणि आपण तसे बोललोच नाही, म्हणून त्यांनीही गुलामाप्रमाणे माफ़ी मागण्याची ‘आझादी’ संपादन केली होती. शिंदे यांनी तर गोपनीय माहितीपर्यंत मजल मारली होती. आझाद यांनी तितकी आझादी घेतलेली नाही. पण एकूण कॉग्रेसवाल्यांचे व पुरोगाम्यांचे किती बौद्धिक दिवाळे वाजलेले आहे, त्याची ही साक्ष आहे. संघाला शिव्याशाप देवून कॉग्रेस वा पुरोगामी राजकारणाचे कुठलेही पुनरुज्जीवन होणार नाही. त्यापेक्षा आपले संघटन आणि कार्यक्रम घेऊन जनतेला जाऊन भिडण्याचे कष्ट घेणे लाभदायक ठरू शकेल. तिथेच बोंब आहे. सोनिया वा राहूल यांची भजने गाण्यापेक्षा दुसरे कुठले कामच उरलेले नसेल, तर पक्ष नव्याने उभा तरी कसा रहाणार? किंवा संघाला लाखोली वाहून संघ तरी कसा संपणार?
याच आठवड्यात संघाने आपल्या स्वयंसेवकांच्या गणवेशात बदल केला आहे. त्यावरूनही मोठे काहुर माजवण्यात आलेले आहे. दिग्विजय सिंग यांच्यापासून अनेकांनी त्यावर खिल्ली उडवणार्‍या प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. ही खिल्ली उडवणारी माणसे किती भोंदू व दुटप्पी असावीत? एका बाजूला खाण्यापासून वस्त्रापर्यंत प्रत्येकाला आपापल्या आवडीनुसार मोकळीक असायला हवी, असे हिरीरीने सांगायला पुढे येणारी हीच माणसे आहेत. पण तेच तितक्याच अगत्याने संघाच्या गणवेशाची हेटाळणी करण्यात पुढे असतात. मग त्यांची ही हेटाळणी योग्य म्हणायची की वस्त्राबाबतीतल्या मोकळीकीचा आग्रह खोटा म्हणायचा? मुळात संघातल्या बदलत्या गणवेशाविषयी कोणी कशाला दखल घ्यायला ह्वी? संघ हे आव्हान असल्याची ती कबुलीच नाही काय? मग प्रश्न संघाच्या गणवेशाचा नसून इतक्या वर्षात संघाला संपवण्याचे सारे प्रयास कुठे चुकले, ते शोधण्याची गरज आहे. अवघ्या देशावर ज्या कॉग्रेसने एकघराण्य़ाचे राज्य केले, त्याची आजची दुर्गती संघाच्या गणवेशाने केलेली नाही, संघाच्या अथक कार्याने कॉग्रेसला संपुष्टात आणलेले आहे. संघाने गणवेश बदलण्याबरोबर आपली विचारसरणी बदलावी, असे आवाहन दिग्विजय सिंग यांनी केले आहे. त्यामुळे काय होईल? कुठलीही संघटना विचारांनी उभी रहाते आणि लोकांमध्ये तिला मान्यता मिळेल त्यावर फ़ोफ़ावते. कॉग्रेस तशीच विस्तारली व फ़ोफ़ावली. जेव्हा विचार मागे पडून घराणेशाहीच्या आहारी कॉग्रेस भरकटत गेली, तिथे अंगावरची पायघोळ खादीही कॉग्रेसला वाचवू शकली नाही, की गांधींचे नाव कॉग्रेसला संजीवनी देऊ शकलेले नाही. म्हणूनच गणवेश दुय्यम असतो आणि जनतेशी सुसंवाद निर्णायक असतो. पायघोळ खादी वा गांधींचा पंचा कॉग्रेसला बुडण्यापासून कशाला वाचवू शकला नाही, याचा सिंग यांनी विचार करावा. पण ते कदापी शक्य नाही.
कॉग्रेस असो किंवा पुरोगामी राजकारण असो, त्यांना विचारांचे वावडे आहे. निव्वळ गांधी हे नाव आणि नेहरू घराण्याचा वारस आपल्याला यश मिळवून देईल, या भ्रमात कॉग्रेस रसातळाला गेलेली आहे. त्यांना वाचवताना बाकीचे सेक्युलर पक्ष व संघटना एकामागून एक रसातळाला चालल्या आहेत. दहा वर्षापुर्वी कॉग्रेसचा युवक चेहरा म्हणून राहुल गांधींना पेश करण्यात आले. त्याला आज इतक्या वर्षानंतर एका विद्यापीठातल्या वादग्रस्त विद्यार्थ्याच्या अटकेवरून होणार्‍या निदर्शनात सहभागी व्हायची नामुष्की आलेली आहे. कन्हैयाचा काडीचा आधार घेऊन राहुलसह अवघे पुरोगामी राजकारण आपल्या पायावर पुन्हा उभे रहायला धडपडते आहे. मोदी नावाच्या संघ स्वयंसेवकाने एका झटक्यात सेक्युलर चड्ड्या ओढून ज्यांना विवस्त्र केले, त्यांनी संघाच्या गणवेशापेक्षा आपल्या कंबरेला वस्त्र शिल्लक किती उरले आहे, त्याचीच चाचपणी करण्याची गरज आहे. कारण सलग कित्येक वर्षे ज्यांना अर्धीचड्डी म्हणून हिणवले, त्यांनीच चिडवणार्‍यांची पुर्ण वस्त्रे फ़ेडली आहेत. त्यांना विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळण्याइतकीही अब्रु शिल्लक राहिलेली नाही. त्याचे श्रेय संघाला वा मोदींनाही नाही, इतके शिंदे, आझाद वा दिग्गीराजा यांच्यासारख्या उडाणटप्पू नेत्यांनाच आहे. कारण कर्तृत्वशून्य माणसे जेव्हा संघटनेच्या म्होरकेपदी येतात, तेव्हा त्या संघटना वा पक्षांना भवितव्य नसते. राहुलने वा अन्य फ़ुटकळ नेत्यांनी आपापल्या पक्ष व राजकारणाला इतके नग्न करून टाकले आहे, की अब्रु झाकायला जनाधाराची चिंधी उरलेली नाही. अशा लोकांनी संघच कशाला, कुणाच्याही गणवेशाबद्दल चर्चा करण्याने काहीही साध्य होणार नाही. जे लोक मोदीला दु:शासन ठरवून कन्हैयाने वस्त्रहरणापासून वाचवावे म्हणून धावले, त्यांच्याकडून कुठल्या महाभारताची अपेक्षा करायची? नंगेसे खुदा डरता है, हाफ़चड्डीवाला नही डरता, हे सिद्धच झाले ना?

10 comments:

 1. नंगा नहायेगा?

  ReplyDelete
 2. एकदम जबरदस्त पुरे नागडे केले

  ReplyDelete
 3. काँग्रेस पक्ष आता वैचारिक अधिष्ठानविहीन झाला आहे..
  मूर्ख पप्पू आणि त्याचे भाट यांची टोळी म्हणजे काँग्रेस...
  संघासारख्या Well Organised शक्तीशी या येडपटांची तुलनाच शक्य नाही.

  ReplyDelete
 4. Another very analytical article by Bhau Torasekar. ..
  How Dynasty (Gharaneshahi and it's blind followers. Foreigners were confident that only one family will rule this country as our some citizens are fool and others are self centred happy go lucky many can be fooled by purchase of foreign aid NGOs)ruled, looted country and killed party...

  ReplyDelete
 5. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 6. सेवादल नामक काहीतरी होत अस ऐकलय आम्ही.

  ReplyDelete
 7. अधःपतन म्हणजे काय ह्याचे मूर्तिमंत उदाहरण जर कोणाला बघायचे असेल तर अजून दुसऱ्या कुठल्या कलखंडाकडे बघण्या पेक्षा ह्याच्याकडे पाहायला हवे

  ReplyDelete