Tuesday, April 12, 2016

पनामा पेपर्स आणि असहिष्णूता



काही गोष्टी चमत्कारीक योगायोगाच्या असतात. गेल्या वर्षी याच दरम्यान गुजरात दंगलीतील मुस्लिमांच्या प्रेषित तीस्ता सेटलवाड जामिन मिळवायला कोर्टाच्या पायर्‍या झिजवत होत्या. अमेरिकन संस्थेकडून मिळालेले पिडीतांच्या पुनर्वसनाचे कोट्यवधी रुपये त्यांनी परस्पर आपल्या कंपनीत फ़िरवले, किंवा चैनीसाठी उडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मग त्याची दखल भारत सरकारच्या अर्थखात्याला घ्यावी लागली होती. त्याचा तपास करता कोट्यवधी अब्जावधी रुपये असेच अमेरिकन वा परदेशी संस्थांकाडून इथल्या स्वयंसेवी संस्थांना मिळत असल्याचे उघड झाले. त्यावर सरकारने कारवाई सुरू केली. फ़ोर्ड फ़ौंडेशन या संस्थेकडून भारतातल्या एनजीओ म्हणजे स्वयंसेवी संस्थांना मिळणार्‍या अशा पैशाचा हिशोब मागण्यात आला. फ़ोर्डकडून येणार्‍या पैशाचा ओघ रोखण्यात आला. त्यानंतर काही आठवड्यातच देशामध्ये अकस्मात असहिष्णूता वाढत असल्याचा शोध लागला होता. एकामागून एक साहित्य अकादमी पुरस्कार विजेते आपले सन्मान परत करण्याचा रोग पसरला होता. तर विविध क्षेत्रातून सहिष्णुता संपल्याचे आरोप व चर्चा सुरू झाल्या होत्या. कालपरवा जगातला मोठा गौप्यस्फ़ोट म्हणून पनामा पेपर्स उघड करण्यात आले. त्यालाही नेमक्या अशाच एका रोगाची बाधा झालेली आहे. भारतात जेव्हा तीस्ता कोर्टाच्या पायर्‍या झिजवत होती व सरकारने फ़ोर्ड फ़ौंडेशनच्या पैशाचा हिशोब मागितला, त्याच दरम्यान रशियातही तशीच कारवाई सुरू झालेली होती. अमेरिकन फ़ौडेशन व संस्थांच्या मदतीने रशियात चालू असलेल्या कारवायांना कायदेशीर प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांचे काम थांबवण्याचे आदेश जारी झाले होते. ज्या अमेरिकन संस्थांना रशियाच्या सरकारने लगाम लावला, त्यांचा आणि पनामा पेपर्सचा गौप्यस्फ़ोट करणार्‍या पत्रकार संस्थेचा थेट संबंध असावा, यालाही योगायोग म्हणायचे काय?

रशियाने म्हणजे तिथे एकहाती हुकूमत गाजवणार्‍या ब्लादिमीर पुतिन यांनीच उपरोक्त अमेरिकन संस्थांशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. आणि योगायोग बघा, पनामा पेपर्सने जो गौप्यस्फ़ोट केला, त्याचा चेहरा म्हणून बहुतेक पाश्चात्य माध्यमांनी पुतिन यांचाच चेहरा जगासमोर मांडला. बहुतेक वर्तमानपत्रे व वाहिन्यांनी पुतिन यांचाच चेहरा व चित्रणे त्या भानगडीचा म्होरक्या असल्याप्रमाणे पेश केले. पण प्रत्यक्षात कुठलाही पुरावा पुतिन यांच्यापर्यंत पोहोचणारा नाही. भारतातही ज्यावरून असहिष्णुतेचा गदारोळ सुरू झाला, त्यात कुठेही मोदी सरकार वा भाजपाचे राज्यसरकार गुंतलेले नाही. पण मोदी सत्तेत आले, म्हणून देशात असहिष्णूता आल्याचा गदारोळ चालू होता. त्यामागची प्रेरणा नेमकी फ़ोर्ड फ़ौडेशनच्या पैशावर इथे लोकसेवा करणार्‍या संस्थांपासूनच घेतली गेलेली होती. म्हणजे फ़ोर्ड फ़ौंडेशन वा अमेरिकन पैशावर समाजसेवा करणारा जो वर्ग आहे, तोच जगात कुठेही अशा उचापती करताना दिसतो आहे. याकुब मेमन वा अफ़जल गुरू यांना न्याय मिळण्यासाठी झटणार्‍या इंदिरा जयसिंग यांच्यावरही अमेरिकन पैसे घेऊन उचापती केल्याचा आरोप आहे. त्याविषयी त्यांना तात्काळ खुलासा देता आलेला नाही. तोच प्रकार पनामा पेपर्समध्ये आढळून येतो. ज्या पत्रकारांच्या पथकाने व संस्थेने हा उद्योग केला आहे, त्यांचे मुख्यालयच अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन येथे आहे. त्यांना लागणारा पैसा सोरोस नावाचीन सरकारी संस्था पुरवते. थोडक्यात जगभर कुठल्याही देशात समाजसेवेच्या नावाखाली उचापती करण्यासाठी अमेरिकन हेरखात्याने विविध संस्था व निधी उभारून ठेवलेले आहेत. त्यांच्या मार्फ़त सेवेचे मुखवटे पांघरलेल्या स्थानिक लोकांना अमेरिका आपले हस्तक म्हणून वापरत असते. त्यासाठी आजवर आडून माध्यमे व पत्रकारांचा वापर होत असे. पनामा पेपर्ससाठी उजळमाथ्याने माध्यमांना वापरण्यात आलेले आहे.

गुन्हेगारी तपासात मोडस ऑपरेन्डी असा एक शब्द वापरला जातो. त्याचा अर्थ असा, की गुन्हेगार एक ठराविक शैलीत काम करत असतो. त्याची एक कार्यपद्धती असते. त्याच्या खाणाखुणा गुन्ह्यात आढळून येतात. त्यावरून अमूक गुन्हा कोणी केला त्याचा शोध पोलिसांना घेता येत असतो. फ़ोर्ड फ़ौंडेशन वा अमेरिकन संस्थांचे जगभर पसरलेले काम बघितले, तर त्याचीही एक मोडस ऑपरेन्डी आढळून येते. त्यात पत्रकार, माध्यमे, समाजसेवी हस्तक आणि त्यांनी चालविलेल्या संस्था यांच्या माध्यमातून अलगद आपले उद्देश अमेरिकन हेरखाते साध्य करून घेत असते. त्यातून स्थानिक सरकार व राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण केला जात असतो. त्यांना ब्लॅकमेलही केले जात असते. पनामा पेपर्स त्याचाच एक प्रयोग आहे. गेल्या दोनचार वर्षात जगभर जसे राजकारण फ़िरत गेले, त्यातून एकमेव महाशक्ती असून सुद्धा अमेरिकेल कोणी दाद देईनासा झाला. दरम्यान चीन व रशिया अशा दोन अन्य महाशक्ती म्हणून पुन्हा उदयास आल्या. त्यांच्याशी थेट लढण्याची कुवत नाही, म्हणून अमेरिकेने काही डाव खेळले. त्यात लहानसहान देशात अस्थिरता निर्माण करण्याच खेळ होता. अरब स्प्रिंग म्हणून पश्चिम आशियात उठाव घडवून आणले गेले. पुर्वीच्या सोवियत युनियनचे स्वतंत्र असलेले छोटे देश रशियाच्या विरोधात उभे करण्याचे कारस्थान राबवले गेले. जॉर्जिया, युक्रेन इथे रशियाविरोधी भूमिका मांडण्याचे संघर्ष उभे करण्यात आले. भारतात लोकपाल नावाचे नाटक रंगवण्यात आले. यामागची मूळ प्रेरणा अमेरिकन पैशावर चालणार्‍या त्या त्या देशातील स्वयंसेवी संस्थाच असल्याचे दिसून येईल. ते इजिप्तसारख्या देशात यशस्वी झाले, तरी रशिया भारतासारख्या देशात यशस्वी होणे अवघड होते. म्हणून मग त्यांना भिन्न मार्गाने बदनाम करून उखडण्याचे डाव खेळण्याची योजना आखली गेली. पनामा पेपर्स त्याचाच एक भाग आहे.

भारतात असहिष्णूतेचे नाटक रंगवले गेले. त्याचा रंग उतरू लागला, तेव्हा वेमुला कन्हैया असली प्यादी पुढे करण्यात आली. आताही रशियातील भक्कम सत्तेला आव्हान देण्याची कुवत नसल्याने पुतिन यांना बदनाम करून डळमळीत करण्याचा खेळ होतो आहे. अर्थात त्यात दम नाही. म्हणूनच विनाविलंब त्याचा गाशा गुंडाळला गेला. यातून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. विविध घटक कसे नाटकातल्या पात्राप्रमाणे समोर मंचावर आणले जातात, त्याचा हा अनुभव आहे. नामवंत माणसे, पत्रकार, माध्यमे, समाजसेवी चेहरे व संस्था, कलावंत अशांना सराईतपणे असे पेश केले जाते, की सर्वकाही उत्स्फ़ुर्त व वास्तव असल्याचा आभास निर्माण व्हावा. भारतातल्या साहित्य अकादमी पुरस्कृतांनी सन्मान परत करणे जितके उत्स्फ़ुर्त वाटत होते, ति्तकाच आरंभी पनामा पेपर्स गौप्यस्फ़ोट वाटला नव्हता काय? यातली काही पात्रे पैसे देवून अभिनय करायला आणली जातात, तर काही पात्रे नकळत त्यात ओढली जातात. कोणी बातमीदारीच्या नशेत त्यात ओढला जातो, तर कोणी सामाजिक बांधिलकी म्हणून त्यात गुरफ़टत जातो. आपण कोणासाठी व कुठल्या हेतूने वापरले जातोय, याचेही भान यापैकी अनेकांना रहात नाही. अण्णा हजारे यांना ज्या धुर्तपणे लोकपाल आंदोलनात वापरले गेले, त्याचा त्यांना तरी कुठे थांगपत्ता लागला होता? किरण बेदी वा तत्सम अनेकजण त्यात ओढले गेले होतेच ना? तेव्हा तिथे पोहोचलेले अनुपम खेर तसेच ओढले गेले होते. पण केजरीवाल, शिसोदिया किंवा तत्सम लोक मात्र मोबदला घेऊन त्या नाटकात सहभागी झालेले असतात. आपल्या समोर येणार्‍या वार्ता बातम्या म्हणून तपासून बघणे अगत्याचे असते. इशरत निष्पाप म्हणून पेश केली जाते आणि मोदी गुन्हेगार म्हणून पेश केले जातात. त्याचा बोलविता धनी कोणीतरी भलताच असतो. सवाल आपल्या डोळसपणाचा आहे. समोर दिसते ते बघण्याचा व समजून घेण्याचा डोळसपणा नसेल, तर सासबहूच्या कथेने रडणारे वा गौप्यस्फ़ोटाने भारावणारे; यात कुठला फ़रक शिल्लक उरतो?

3 comments:

  1. Panama Papers: the Indian journalists behind it
    An Indian Express team was among the 250 journalists in the gigantic, global investigation which has begun to topple presidents and prime ministers.

    http://www.thehoot.org/media-watch/media-practice/panama-papers-the-indian-journalists-behind-it-9285
    हे आपल्याकडचे ...............

    ReplyDelete
  2. प्रतिक्रिया, सावधपणे त्या प्रश्नाचं आकलन करुन, त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य त्या प्रमाणे व्यक्त केली जावी.

    ReplyDelete