Tuesday, April 12, 2016

प्रसिद्धीचा मानसिक आजार

या आठवड्यात राजधानी दिल्लीतल्या नेहरू विद्यापीठातल्या घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत आणि त्यामुळेच कन्हैयाकुमार नावाच्या नव्या मॉडेलचे महात्म्यही हळुहळू संपत चालले आहे. पण दरम्यान एका जुन्या मॉडेलला प्रसिद्धीची भ्रांत पडलेली दिसते. कन्हैया किंवा केजरीवाल यांच्यात एक मोठे साम्य म्हणजे, ते दोघेही माध्यमांनी उभे केलेले मॉडेल आहेत. माध्यमातून ज्यांचे महात्म्य लोकांच्या गळी मारण्यात आले, असे हे दोन महात्मे होत. त्यापैकी केजरीवाल तरी निदान काही वर्षे राजधानी दिल्लीत विविध स्वयंसेवी संस्थांना हाताशी धरून काही करीत होते. पुढे राजकारणात शिरायची सुरसुरी आल्यावर त्यांनी धुर्तपणे काही चाली खेळल्या. विजेची तोडलेली कनेक्शन जोडून किंवा विजबिले कमी करण्यासाठी उपोषण करून, मतदारांमध्ये स्वत:विषयी सहानुभूती निर्माण केलेली होती. पण कन्हैया मात्र रातोरात हिरो बनून गेला. तसे त्याच्या डोक्यात नव्हते, की त्यासाठी त्याला काही करावेही लागले नाही. विद्यापीठातल्या एका कार्यक्रमात आरोप झाले आणि कन्हैयाला अटक झाली. सहाजिकच तमाम बेकार पुरोगाम्यांना रोजगार मिळाला आणि पुरोगामी सक्तीमुळे मोदी सरकारला शिव्याशाप देण्याचे निमीत्त म्हणून झाडून सगळे कन्हैयाच्या भोवती गोळा झाले. तोपर्यंत बिचार्‍या कन्हैयालाही आपली महत्ता ठाऊक नव्हती. पण एकाहून एक महागडे वकील त्याची बाजू मांडायला कोर्टात हजर झाले आणि जामिन मिळताच त्याला हिरोसारखे पेश करण्यात आले. मग काय, आपण प्रेषित असल्याचा भास कन्हैयाला झाल्यास नवल नव्हते. पण या गडबडीत बिचार्‍या केजरीवालांवर माध्यमांनी मोठाच अन्याय सुरू केला. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी केजरीवाल जातिनिशी नेहरू विद्यापीठात धावलेही. पण अन्य डझनभर पुरोगामी नेत्यांपेक्षा केजरीवाल यांना किंमत मिळाली नाही. पुढे तर केजरीवाल यांची माध्यमातली जागाच कन्हैयाने व्यापली.
गेले दोन महिने केजरीवाल माध्यमाच्या प्रसारणात व वर्तमानपत्राच्या पानांमध्ये स्वत:ला शोधत आहेत. पण कुठे म्हणून केजरीवाल दिसत नाही. सहाजिकच हा जुना हिरो अस्वस्थ झाल्यास नवल नव्हते. त्यातून बाहेर पडण्यासाठी केजरीवाल पंजाबला जाऊन आले. आपल्या गाडीवर त्यांनी अगडफ़ेक करून घेतली. मग कोणी मतचाचण्या घेऊन केजरीवाल मुख्यमंत्री होणार असतील, तर आम आदमी पक्षाला त्या राज्यात ९० टक्के जागा मिळण्याचाही निर्वाळा दिला. पण माध्यमे बिचार्‍या केजरीवालची दखलच घ्यायला तयार नाहीत. सहाजिकच आपल्या जुन्या युक्तीने पुन्हा प्रसिद्धी झोतात येण्याखेरीज केजरीवाल यांनाही पर्याय राहिला नाही. माध्यमांत प्रसिद्धी मिळण्यासाठी मोदींवर आरोप करावे लागतात आणि केजरीवाल यांनाही तोच मार्ग चोखाळणे भाग होते. पण कशासाठी मोदींच्या नावाने शंख करायचा? दिल्लीत काम करू देत नाहीत, आप सरकारची मोदी अडवणूक करतात, असे सर्व बोलून झाले आहे. फ़ार कशाला मोदींना मनोरुग्णही ठरवून केजरीवाल मोकळे झालेले आहेत. मग आता कशासाठी शंख करायचा? तर त्यांनी मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ़ यांच्यात काही सौदा झाला असल्याचा शोध लावला आहे. पाकिस्तानला फ़ायदेशीर ठरतील असेच निर्णय मोदी कशासाठी घेतात, हे आता भारतीय जनतेला कळलेच पाहिजे अशी चमत्कारीक मागणी त्यामुळेच केजरीवाल यांनी केली आहे. वास्तविक आजवर पाकिस्तानच्या प्रेमात खुद्द केजरीवालच पडलेले होते. सौदेबाजीच म्हणायची असेल, तर पाकचे गझलनवाज गुलाम अलींना केजरीवाल दिल्लीत कशाला घेऊन आले होते? ती कुठली सौदेबाजी होती? शत्रू देशाच्या कलाकाराला काही लाख रुपये देऊन दिल्लीत बोलावण्यामध्ये केजरीवाल किंवा दिल्लीकरांचा कोणता लाभ होता? ते देशाला कधी समझणार आहे? दिल्लीकरांनी यासाठी केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदी बसवले आहे काय?
पण असल्या गोष्टी अधूनमधून केजरीवाल यांना कराव्याच लागतात. अन्यथा त्यांना कोणी प्रसिद्धी देत नाही. दिल्लीत कचरा किती माजला आहे? दिल्लीकर पाण्यासाठी तळमळतात. अशा कुठल्याही विषयावर केजरीवाल यांनी कोणते काय केले, त्याविषयी ते माहिती देत नाहीत आणि दिली तरी कोणी पत्रकार त्त्यासाठी प्रसिद्धी देत नाहीत. मग केजरीवाल यांनी तरी काय करायचे? त्यांना सिधी उंगली घी निघत नसेल, तर उंगली टेढी करावी लागणारच ना? मोदींना शिव्याशाप दिले तरच प्रसिद्धी मिळणार असेल, तर बिचार्‍या केजरीवाल यांना दोष कसा देता येईल? कन्हैयाची कहाणीही वेगळी नाही. त्यालाही विद्यार्थ्यांच्या समस्या बोलण्यापेक्षा संघ व मोदींवर दुगाण्या झाडण्याखेरीज गत्यंतर नाही. पण त्याही दोघांच्या अडचणी आपण समजून घेतल्या पाहिजेत. तेच तेच वायफ़ळ बोलून फ़ार काळ चालत नाही. काहीतरी नाविन्यपुर्ण बोलणे भाग असते. गेल्या वर्षी माजी पोलिस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनीही अशीच प्रसिद्धी मिळवली नव्हती का? काही किरकोळ घटना घडल्या तर आपल्याच देशात आता जगायची भिती वाटते, असे रिबेरो म्हणाल्याचा खुप गाजावाजा झालेला होता. पण नंतर काही दिवसांनी आपल्या अतिशयोक्तीचे स्पष्टीकरण रिबेरो यांनी एका वाहिनीलाच दिलेले होते. आपण खरे व वास्तविक बोललो असे रिबेरो म्हणाले नाहीत. लक्ष वेधून घ्यायचे असेल, तर काही अतिशयोक्ती करावीच लागते, असे त्यांनी कारण दिले होते. ज्याच्यावर राष्ट्रीय माध्यमांनी चर्चा केली ती बातमी नव्हती की वास्तविकता नव्हती. तर एका जाणत्या अनुभवी माणसाने केलेली अतिशयोक्ती होती. हे आजच्या माध्यमांचे व पत्रकारितेचे स्वरूप झालेले आहे. त्यांना वास्तवाशी कर्तव्य उरलेले नाही. काहीतरी अतिशयोक्ती घेऊन गुर्‍हाळ घालण्याला आजकाल अविष्कार स्वातंत्र्य म्हटले जात असेल, तर केजरीवाल काय करणार?
तर प्रसिद्धी झोतातून खुप काळ दूर राहिले मग केजरीवाल यांना आपल्याला लोक विसरले की काय अशी भिती वाटू लागते. मग कुठल्याही मार्गाने अतिशयोक्ती करून ते प्रसिद्धी झोतात येऊ बघतात. केजरीवाल बोलले मग त्यांचे सहकारी अवाच्या सव्वा बोलू लागतात. कपील मिश्रा नावाचे केजरीवाल यांचे निकटवर्ति आहेत. त्यांनी कळसच केला आहे. त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या हेरखात्याचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे. लगेच त्यावरून कपील मिश्रा प्रसिद्धी झोतात आले ना? नाहीतर बिचार्‍याला कोण प्रसिद्धी देणार? आजकाल अतिशयोक्तीला मोठे मार्केट आहे. शनिमंदिरात महिलांना प्रवेश पाहिजे म्हणून नाटके झाली तर त्याला उगाच प्रसिद्धी मिळते का? महिलांना खेडोपाडी मैलोगणती वणवण करून पाणी भरावे लागते. तिथे कोणी महिलांच्या हक्काचे पाणी म्हणून त्यांना प्रसिद्धी दिली आहे काय? पण तृप्ती देसाई शनिच्या चौथर्‍यावर चढूनच पूजा करणार म्हणाल्या, तर तमाम राष्ट्रीय माध्यमे त्यांना सतत प्रसिद्धीच्या झोतात ठेवत आहेत ना? पण त्याच काळात किती महिला त्याच महाराष्ट्रात दुष्काळाशी झुंजत आहेत. रात्रंदिवस पाण्यासाठी वणवण फ़िरत आहेत. सरकारी भरपाईसाठी मृत शेतकर्‍यांच्या विधवा सरकारी कचेरीच्या पायर्‍या झिजवत आहेत. त्यांची कोणी बातमी बनवली काय? दुष्काळ, पाणीटंचाई किंवा विधवांच्या यातना-वेदना ही वस्तुस्थिती आहे. त्यात कवडीची अतिशयोक्ती नाही. मग त्यांच्याकडे कोण ढुंकून बघणार? एखादीच्या घरी राहुल गांधी रात्रभर मुक्काम करायला आले, तर अतिशयोक्ती असते, त्याला प्रसिद्धी मिळते ना? त्याला म्हणतात पत्रकारिता! ते असते अविष्कार स्वातंत्र्य! मग बिचारा कन्हैया, केजरीवाल, रिबेरो किंवा तत्सम प्रसिद्धीला हपापल्या लोकांनी करायचे काय? त्यांनी अतिशयोक्ती नाही तर दुसरे काय करायचे?

5 comments:

 1. भाऊ लेख वाचताना हसू ही येते आणि विचारही हाेताे की ही माणस किती हलक्या पायरीची जाली फक्त परसिध्दी साठी

  ReplyDelete
 2. भाऊराव,

  अतिशयोक्तीची लागण निवृत्त नोकरशहांनाही लागली आहे की काय असे वाटते. माधव गोडबोले यांचे धर्मनिरपेक्षतेवरचे मंत्रालयातले व्याख्यान रद्द करण्यात आले. (बातमी : http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/former-home-secretary-gagged-from-questioning-indias-secularism/articleshow/51752707.cms)

  आता बघा की, राज्यघटनेच्या एकाही कलमात सेक्युलर या शब्दाचा उल्लेख नाही. गोडबोल्यांना हे निश्चितंच माहीत असणार. मग नसते वाद उकरून काढायचं कारणच काय? म्हणे भारत सेक्युलर आहे का! वैचारिक अतिशयोक्ती म्हणतात ती हीच.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete
 3. भाऊ एकदम बरोबर. ..
  मिडिया माफ॔त विदेशी शक्तीं एका बाजुला मशरुमी लिडर तयार करत आहे (जे सुमार व इशार्‍यावर नाचणारे नेतृत्व ) तयार करत आहे. व दुसऱ्या बाजूला. .आजकाल आपणा सगळ्यांना शिस्तीत कात्रजचा घाट दाखवला जातोय आणि आपणही येड्यासारखे जिथे जायचं ते सोडून भलतीकडेच धावतो आहोत...!

  मुद्दा असा आहे की,

  भीषण दुष्काळ, कायदा आणि सुव्यवस्था, महागाई, भ्रष्टाचार निर्मूलन बेकारी, लोकसंख्या वाढ इत्यादी खऱ्याखुऱ्या समस्यांपासून निसटून जावं म्हणून

  "सहिष्णुता-असहिष्णुता",
  "दादरी"
  "देशप्रेम-देशद्रोह",

  "भारत माता",

  "कन्हैया-JNU",

  इत्यादी इत्यादी

  "शिंगांना मशाली बांधलेले अनेक बैल"

  रोज बाजारात सोडले जात आहेत आणि आपणही येड्यासारखे आपल्या मूलभूत समस्या विसरून जाऊन या फसव्या बैलांच्या मागे धावण्यात धन्यता मानायला लागलो आहोत...
  अर्थात,
  तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना कात्रजचा घाट दाखवण्याचं काम फक्त आपली सध्याची माध्यमांच (वत॔मानपत्र व टिव्ही ) करतायत असं नाही..

  गेली साठ वर्षं सर्व तेच करत आली आहेत... (1974-75 लोकसंख्या नियंत्रण करणाऱ्या इंदिरा व संजय गांधी यांच्या योजनेला बदनाम बिबीसी व इतर वत॔मानपत्रांनी केला कारण त्या वेळी लोकसंख्या 65-70 कोटी होती व नियंत्रण योजने मुळे लोकसंख्या वाढीचा रेट पहिल्यांदा मायनस एक होता त्याच वेळी चायना ने लोकसंख्या नियंत्रण केले व तो कितीतरी पुढे गेला आता भारतात नुसतीच लोकसंख्या वाढली नाही तर अशीक्षीत, असंस्कृत कट्टर धार्मिक च नव्हे तर विशिष्ट धर्मियांनची लोकसंख्या बेसुमार वाढली )

  आपल्या समोर फसव्या आणि अनावश्यक समस्यांचे बैल सोडून आपल्याला पळवत ठेवणं हे आपल्या माध्यमांच (वत॔मानपत्र व टिव्ही ) कर्तव्यच असतं जणु...!

  कदाचित,

  "हि योजना विदेशी शक्तींनी सहज कोणाच्या ही आहारी जाणाऱ्या भारतीयांना एडिटर इन चिफ निवडुन त्यांच्याच तोंडी वदवून वरषनु वर्षे दिशाभूल करुन भारता सारख्या सुजलाम सुफलाम देशाला आथिर्क व तंत्रवैज्ञानिक गुलामगिरीत ठेवण्यात यशस्वी झाले आहेत . .. आणि भारताची प्रगती मेगेसेसे आवाड॔ विनर फोड॔ फाऊंडेशन ngo
  अशा देश द्रोहींचा उदोउदो करून देशाची प्रगती रोखली (आठवा गेल्या 35-40 वर्षे अनेक (नम॔दा सारखे) धरणे वीजप्रकल्प (एनराॅन सारखे) देशभरात रोखण्याची कारस्थाने रचली व प्रगती रोखली. असे बेलगाम चालु आहे. (पण गुजरात मध्ये अशा आंदोलकाच्या नेत्यांना शेतकर्‍यांनीच ठोकून हाकलून दिले (अमीर खान अशा देशद्रोही अदोंलक नेत्यांची पाठराखण करुन सुद्धा त्याला शेतकऱ्यांने जुमानले नाही )

  अन या कंपल्शनपोटी ते आपल्याला सदोदित
  "कात्रजचा घाट" दाखवत असावेत...
  या मागे निश्चित योजना आहे व त्या नुसार मिडीया आपल्याला अशा शिंगांना मशाली बांधलेल्या बैलांमागे घावडवत आहे. आणि मग एकमेकांची टाळकी फोडत बसतो हा आपलाच मूर्खपणा...

  आणि जोवर आपण हा मूर्खपणा करणार याची मिडीयाला खात्री आहे
  तोवर आपल्यासाठी रोज नवे कात्रजचे घाट बांधले जातील आणि रोज नव्या बैलांच्या शिंगांना मशाली बांधून त्यात पळवत सोडलं जाईल... व देश दिशाहीन स्थतीत भरकटत राहील. ..किवां सोवियत रशिया प्रमाणे फुटून तरी जाइल. .
  हे थांबवण्यासाठी विदेशी मिडीया व देशी एडिटर इन चिफ यांचा पायबंद करणे आवश्यक आहे. ..
  अमुल शेटे पनवेल

  ReplyDelete
 4. केजरीवाल तसे चांगले आहेत पण मिडियामध्ये स्पेस मिळवण्यासाठी कधीकधी असंबंद्ध बडबड करून निव्वळ चमकोगिरी करतात असे वाटते.

  ReplyDelete