Thursday, May 19, 2016

नकारात्मकतेला नकारबंगालमध्ये डाव्या आघाडीचा धुव्वा आणि आसाममध्ये भाजपाचा अभूतपुर्व विजय, ह्या निवडणूक निकालाचे विश्लेषण सोप्या भाषेत कसे करायचे? तर त्याला निव्वळ कन्हैयाकृपा असेच म्हणावे लागेल. गेल्या दोनचार महिन्यात जो तमाशा देशभर चालू होता, त्याला सामान्य माणसाने चार राज्यात नेमक्या कृतीने उत्तर दिले आहे. ज्यांनी म्हणून नेहरू विद्यापीठातील देशद्रोही घोषणांची पाठराखण केली, त्यांना मतदाराने धुळीला मिळवले आहे. पण त्याहीपेक्षा या निकालांनी दिलेला स्पष्ट संकेत, म्हणजे कॉग्रेस हा कालबाह्य झालेला पक्ष आहे आणि त्याला नव्याने उभे रहायचे असेल, तर त्या पक्षाच्या उत्साही नेत्यांना आपल्या श्रेष्ठींना झुगारून पुनश्च हरिओम करणे भाग आहे. इंदिराजींप्रमाणे सोनिया गांधी पक्षाला नव्याने संजीवनी देतील, ह्या अपेक्षेलाच मतदाराने या निकालातून मूठमाती दिली आहे. बंगाल व तामिळनाडूचे निकाल बघितले, तर मतदाराचे मत साफ़ लक्षात येऊ शकते. गेल्या वर्षभरात जो नकारात्मक उद्योग राजकारणात चालू होता, त्याला जनतेने साफ़ नकार दिला असेही म्हणता येते. मतमोजणीचे निकाल आल्यावर प्रत्येक पक्षाच्या नेत्याने आपण लोकमतचा आदर करतो असे अगत्याने सांगितले. पण खरेच ते तसे वागतात काय? तसे असते तर संसदेत रोजच्या रोज कामकाज बंद पाडण्याचा उद्योग झाला नसता. आपल्याला लोकसभेत जनतेने कशाला नाकारले, त्याचा थांगपत्ता अजून सोनिया वा राहुल यांना लागलेला नाही. तितकाच त्याचा अर्थ डाव्यांनाही उमजलेला नाही. तो लागला असता, तर त्या पक्षांनी व त्यांच्या नेत्यांनी नकारात्मकता सोडून आपापल्या पक्षांची संघटनात्मक बांधणी गेल्या दोन वर्षात नक्कीच केली असती आणि त्याचा लाभ त्यांना यावेळी विधानसभेला मिळू शकला असता. पण जनतेमध्ये जाऊन संघटनात्मक बांधणी करण्यापेक्षा माध्यमात काहूर माजवण्याने आजचा पराभव ओढवून आणला गेला आहे.

या निकालाचे खास महत्व असे, की दिल्लीत बसून पांडित्य सांगणार्‍यांच्या नादी लागलेल्यांना मतदाराने पराभूत केले आहे. ३६ वर्षे ज्या बंगालमध्ये डाव्या आघाडीने सतत राज्य केले व आपली शक्ती वाढवत नेली, त्यांची दारूण अवस्था कशामुळे झाली? भाजप कशामुळे देशभर वाढला? डावी आघाडी हा कायम बिगर कॉग्रेसी पर्याय म्हणून बंगाली जनतेसमोर होता आणि तोपर्यंत त्याची शक्ती कायम होती. पण २००४ सालात मार्क्सवादी पक्षाचे नेतृत्व (सीताराम येच्युरी व प्रकाश कारथ अशा)विद्यापीठीय पोथीनिष्ठांकडे गेले आणि त्यांनी जमिनीवरची वास्तविकता सोडुन ग्रंथप्रामाण्याने निर्णय घ्यायला सुरूवात केली. ज्या बंगाल व केरळात डाव्यांचा प्रतिस्पर्धी भाजपा नव्हता, त्याला दिल्लीत सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी डाव्यांनी सोनियांचा पदर पकडला. तिथून त्यांची घसरगुंडी सुरू झाली. भाजपाला रोखून सेक्युलर विचारांना बळ देण्याच्या नादात पुरोगाम्यांनी १९९९ सालापासून आत्महत्येचा पवित्रा घेतला होता. त्याचा आरंभ महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. सेना-भाजपा युतीला सत्तेपासून रोखण्यासाठी तेव्हा पुरोगामी पत्रकार व बुद्धीमंतांच्या दबावाखाली इथले पुरोगामी पक्ष कॉग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी करायला पुढे आले. त्यांच्या बळावर कॉग्रेसी सत्तेचे पुनरूज्जीवन झाले. पण पुढल्या काळात त्याच डाव्या पुरोगाम्यांचा महाराष्ट्रातूनच अस्त झाला. पाच वर्षाचा महाराष्ट्रातला हा अनुभव गाठीशी असताना, तोच प्रयोग सोनियांनी २००४ साली देशव्यापी राजकरणात आरंभला. खरे तर तेव्हाच पुरोगाम्यांनी महाराष्ट्रातील अनुभवाने शिकायला हवे होते. पण भाजपा विरोधाच्या विघातक वा नकारात्मक भूमिकेच्या पुरोगामी पक्ष इतके आहारी गेले, की २००४ सालात मनमोहन वा सोनियांना पंतप्रधान करण्यासाठी डाव्या आघाडीने पुढाकार घेतला. तिथूनच त्यांचे पावित्र्य संपले होते. आज त्याची परमावधी झाली आहे.

महाराष्ट्र वा अन्य राज्यात गेल्या दोन दशकात झाले, तेच आता बंगालमध्ये झालेले आहे. जिथे कॉग्रेसचे प्रादेशिक विरोधक म्हणून पुरोगामी पक्ष ठामपणे उभे राहिले, त्यांचा असा पराभव झालेला नाही. मुलायम, मायावती वा नविन पटनाईक यांच्यासह करुणानिधी जयललिता यांच्याकडे बघता येईल. इंदिरा हत्येनंतर राजीव गांधींना प्रचंड यश मिळाले, तरी ते पक्षाचे यश नव्हते, तर सहानुभूतीचा प्रभाव होता. तो ओसरला तिथून कॉग्रेसची घसरगुंडी सुरू झाली. लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने कॉग्रेसची जागा घेण्यास आरंभ केला होता. त्यांच्यासोबत राहिले त्या बिगर कॉग्रेसी पक्षांचा र्‍हास होऊ शकला नाही. पण आपली मूळची बिगर कॉग्रेसी राजकारणाची कास सोडलेल्यांचा पुढल्या काळात र्‍हास होत गेला. तीच जागा भाजपा व्यापत गेलेला आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, बिहार वा उत्तरप्रदेश अशा राज्यात भाजपा विस्तारला, त्याला तिथल्या तथाकथित पुरोगाम्यांची आत्महत्या हेच कारण होते. आत्महत्या म्हणजे त्यांनीच कॉग्रेसला साथ देण्याचा घेतलेला चमत्कारीक पवित्रा! त्यात डाव्या आघाडीची आहुती अलिकडे पडली. या प्रत्येकाने कॉग्रेसला जीवदान देण्यासाठी आपले प्राण अर्पण केले. आताही बंगालचे निकाल बघितले, तर डाव्या आघाडीमुळे कॉग्रेसला आपल्या जागा टिकवता आल्या. पण बदल्यात कॉग्रेसच्या सहकार्यामुळे डाव्यांना अधिक जागा जिंकता आल्या नाही. उलट स्वबळावर मिळवलेल्या जागाही गमवाव्या आहेत. नेमकी तीच स्थिती तामिळनाडूत द्रमुकची झाली आहे. जयललितांना आपल्या जागा टिकल्या नाहीतरी किमान बहुमत मिळाले आहे. कॉग्रेसला दिलेल्या ४१ जागा द्रमुकने लढवल्या असत्या, तर त्यातल्या १५-२० जिंकल्या असत्या आणि काठावरचे बहूमत त्या पक्षाला मिळू शकले असते. पण ज्या जागा कॉग्रेसला दिल्या त्यांनी त्या जयललितांना सहज जिंकता आल्या.

थोडक्यात आज देशातील लढाई भाजपाविरोधी राजकारणाची नसून कॉग्रेसच्या र्‍हासाची आहे. भाजपाला आपल्या बळावर आपापल्या प्रदेशात अन्य पक्षांनी रोखले तर बिघडत नाही. पण कॉग्रेसच्या सोबत जाणे म्हणजे तिला जीवदान देऊन आपण आत्महत्या करणेच होय. तेच केरळात डाव्या आघाडीने केले आणि बंगालमध्ये ममतांनी करून दाखवले आहे. तीन राज्यात भाजपा मते मिळवू शकला तरी बाजी मारू शकला नाही. कारण तिथे तो समर्थ पक्ष नाही. जयललिता, ममता किंवा केरळात डाव्यांनी यश मिळवले, तिथे त्यांच्या सोबत कॉग्रेस नव्हती. उलट जिथे द्रमुक व डाव्यांनी जिथे कॉग्रेसशी सोबत केली, तिथे त्यांचाही पराभव झाला. महाराष्ट्रात १९९९ सालात सुरू झालेला हा प्रयोग देशव्यापी होऊन त्यात काही पुरोगामी पक्षांनी आत्महत्या केली, म्हणून कॉग्रेस आज इतकी टिकून आहे. अन्यथा कॉग्रेस केव्हाच संपली असती आणि कदाचित भाजपा इतका प्रभावी किंवा देशव्यापी होऊ शकला नसता. भाजपाला रोखणे महत्वाचे नसून, पुरोगाम्यांनी आपले संघटनात्मक बळ विस्तारणे आवश्यक आहे. ऑगस्टा वेस्टलॅन्ड वा इशरत प्रकरणात डाव्यांनी कॉग्रेसची पाठराखण केल्याची किंमत किती, ते त्यांच्या लक्षात आले तरी पुरेसे आहे. नेहरू विद्यापीठ परिसरात देशविरोधी घोषणांचे समर्थन करण्याची किंमत अशी मोजावी लागली आहे. मजेची गोष्ट म्हणजे जयललिता किंवा ममतांच्या पक्षाने कन्हैयाकुमार वा देशद्रोही घोषणांचे समर्थन केले नव्हते. कॉग्रेस युपीएच्या घोटाळे पापाची ‘सेक्युलर’ पाठराखण ज्यांनी केली नाही, त्यांना मतदाराने चांगला कौल दिला आहे. उलट कॉग्रेससहीत सोनिया-राहुलच्या नकारात्मक आगावूपणाच्या पाठीशी उभे राहिले, त्यांनी किंमत मोजली आहे. लौकरच प्रत्येक पुरोगामी पक्षाला सेक्युलॅरीझम आणि कॉग्रेस यातला फ़रक ओळखावा लागणार आहे. अन्यथा त्यांना संपवणारी ममता जयललिता त्यांच्या बालेकिल्ल्यात उदयास येईल, किंवा त्यांची जागा भाजपाला मिळत जाईल.

2 comments:

 1. बरोबर भाऊ छानच सुंदर

  ReplyDelete
 2. भाऊ आपल्या Quick reaction लाजवाब..
  ज्या पुरोगामी मध्यमवर्गा च्या जोरावर भारताने बलाढ्य इंग्रजा कडून स्वराज्य जिंकले त्याच वर्गाचा स्वार्थी व अती कुटुंब वच्छल, मश्गुल वर्ग एका बाजूला व खानदानी (गांधी पासुन सिंदया पर्यंत)) इतर काही करु न शकल्या मूळे मवालीगीरी करत राजकारणात शिरलेला वर्ग, केवळ पैसा व सत्ता कमवण्यासाठी राजकारणात शिरलेला, व JNU सारख्या कुटिल मुशीत तयार करुन पुरोगाम्यांचे नेतृत्व करण्यासाठी पेरलेला वर्ग, प्रांतीय स्वार्थातुन निर्माण/एकत्र झालेला वर्ग (शिवसेना, आण्णा डिएमके, तृणमूल, पटनायक, जेडीयू, सपा इ.) त्यांच्या प्रांतीय नेतृत्वाला पंतप्रधान पदाचे आमिषे दाखवणारे कार्यकर्ते व मिडिया या सर्वांचे बेमालूम मिश्रणाचा हा परिपाक आहे. अनेक राज्यांत यामुळे प्रांतीय राज्य सरकारे आली याचे लोकशाहीच्या ढाचावर किती खोलवर परिणाम होतात हे आपण अनेक लेखातुन सांगितले आहे.
  लोकसभा व राज्यसभा यामध्ये एकाचवेळी जोपर्यंत भाजप-मोदी यासारख्या राष्ट्रवादी विकासी सरकार ला निर्णायक बहुमत मिळणार नाही तोपर्यंत देश असाच भरकटत रहाणार.
  या सर्व गोष्टी दुशपरीणाम भारतीयांना भोगावे लागतील. भाजपने एक हाती लोकसभा जिंकुन पण एकही देशाला विकासाची दिशा देणारे बिल मोदी सारखे कणखर नेतृत्व पास करु शकत नाही. यासारखा लोकशाहीचा पराभव नाही.
  हे सर्व बदलण्यासाठी भाजप नेतृत्वाने राज्यतील जनतेला भाजपला राज्य सरकार मध्ये निवडुन देण्याचे आवाहन केलेले दिसत नाही आणि केले तरी एका बाजूला मिडिया ते जनतेवर बिंबंवणार नाही. असे भाजपने म्हणाल्या वर उलट भाजप वर कमकुवत पणाचा व नसती कारण देण्याचा दोषारोप मिडिया करु शकतो. त्यामुळे मिडिया कडुन याची अपेक्षा बाळगु शकत नाही. हे सर्व जनते पर्यंत पोहचवण्यासाठी आपल्या सारखे स॔त संपुर्ण भारतभर जन्म घ्यावे लागतील.
  तसेच आत्मकेंद्रीत, स्वार्थी व अजुनही सेलिब्रिटी सिनेकलाकाराना निवडून देणार्‍या साउथ इंडियन (आपला गैरसमज आहे की साउथ इंडियन हे सुशिक्षित आहेत परंतु त्यांनी दशकानुदशके फिल्मी नेत्यांना निवडून दिले आहे व एकही वेळा या मद्रशानी राष्ट्रीय कैउला/लाटे प्रमाणे मतदान केले नाही ) साउथ इंडियन याना सुशिक्षित करुन राष्ट्रीय प्रवाहात सामील केले पाहिजे. व सक्षम परंतु राष्ट्रीय लोकभावनेत साथ देणारे साउथ मधे स्थानिक नेतृत्व तयार करणे आवश्यक आहे.

  अमुल शेटे पनवेल

  ReplyDelete