Friday, July 15, 2016

आम्ही फ़क्त ऐकत असतो, आमुची खुशाली



गुन्हेगाराला पाठीशी घालणे किंवा त्याच्या गुन्ह्याचे पुरावे लपवणे, हा सुद्धा तितकाच गंभीर गुन्हा मानला जातो. कुठल्याही फ़ौजदारी खटल्यात अशा लोकांनाही शिक्षा होत असते. तो कायदा जर मान्य करायचा असेल, तर कुठल्याही घातपाती दहशतवादी गुन्ह्यामध्ये बहुतेक देशातील सरका्रे व राज्यकर्त्यांना गुन्हेगार मानावे लागेल. कारण सातत्याने जगाला जो दहशतवाद भेडसावतो आहे, त्यामागे इस्लामी धर्माची शिकवण देणार्‍या संस्था व संघटना आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा अशी घटना घडते, तेव्हा त्याच्या गुन्ह्यावर पांघरूण घालण्यासाठी अशा संस्था व संघटनांसह त्यांचे पाठीराखेही पुढे येत असतात आणि विविध देशांचे राज्यकर्तेही त्यांच्याच सुरात सुर मिसळून दहशतवादाला धर्म नसतो, अशी पोपटपंची करीत असतात. जगातल्या कुठल्याही देशातला असा दहशतवादी हल्ला वा हत्याकांड बघितले, तर त्यामागची प्रेरणा धार्मिक असल्याचे स्पष्टपणे नेहमी समोर आले आहे. मग तो हल्ला ब्रुसेल्स, पॅरीसमधला असो, किंवा फ़्रान्सच्या नीस शहरातली ताजी घटना असो. यातला जिहादी ट्युनिशियातून येऊन स्थायिक झालेला मुस्लिम होता. ढाक्यातील बेकरी हॉटेलात झालेल्या घटनेतील हल्लेखोरांनी मुस्लिम नसलेल्यांना कुराणाच्या आयता म्हणायची सक्ती करून व ते बिगरमुस्लिम आल्याची खातरजमा करूनच ठार मारले. सहाजिकच इस्लामची शिकवण काय असेल, ती असेल. पण जे असे हिंसाचार व हत्याकांड करीत आहेत, त्यांना मिळणारी इस्लामची धार्मिक शिकवण हिंसाचारी आहे. त्यापासूनच प्रेरणा घेऊन हा भयंकर हिंसाचार निर्माण झालेला आहे. धर्माची शिकवण काय आहे याचे मूल्यमापन तथाकथित धार्मिक पंडितांनी करण्यापेक्षा जे त्याचे बळी होतात, त्यांनी करायला हवी. कारण अशा शिकवणीचे दुष्परिणाम ज्यांना भोगावे लागत आहेत, त्यांनाच सुरक्षित जगण्यासाठी उपाय योजावे लागत आहेत.

एका निरपराध माणसाला मारला तरी तरी अवघ्या मानवतेची हत्या केली, अशी इस्लामची शिकवण असल्याचे आपण वाहिन्यांवर प्रत्येक घटनेनंतर ऐकत असतो. पण अनुभव तसा आहे काय? एक गुन्हेगार मोकाट सुटलेला असतो आणि त्याला रोखण्याचे प्रयत्न होत नाहीत. म्हणून तो मानवतेसाठीच मृत्यूचा सापळा बनलेला असतो. हाच सार्वत्रिक अनुभव आहे. अशा गुन्ह्यामध्ये त्याचा व्यक्तीगत लाभ फ़ायदा कुठला असल्याचे कोणी सिद्ध करू शकलेला नाही. कसाब असो किंवा याकुब मेमन असो, त्यांनी कुठल्या आर्थिक लाभासाठी हत्याकांड केल्याचा पुरावा समोर येऊ शकलेला नाही. पण त्यांनी धार्मिक कृत्य म्हणून अशी हिंसा करताना, आपलेही जीवन पणाला लावलेलेच दिसते. याचा अर्थ असा, की त्यांच्यासाठी कुठलेही व्यक्तीगत स्वार्थ, पैसा धनसंपत्ती दुय्यम असून, धर्माचे पवित्र कार्य सर्वोपरी आहे. हे सर्वोपरी कार्य कुठले तर जे बिगर मुस्लिम आहेत, त्यांचे हत्याकांड करताना आपणही मृत्यूला कवटाळणेच होय. थोडक्यात अशी हिंसा करणारे कुठल्या तरी पवित्र कार्याला प्रवृत्त होऊन हिंसा करीत असतात आणि त्यांना ते उदात्त कार्य वाटत असते. मग त्यांच्या हाती कुठले स्फ़ोटक वा हत्यार असण्याचीही गरज उरत नाही. विविध हल्ल्यांचा अभ्यास केला तर कुठलाही जिहादी अमुकतमूक हत्यारामुळे विधातक ठरलेला नाही. त्याच्या हाती असलेले वा सहज उपलब्ध होऊ शकणारे साधन, त्याने हत्याकांडासाठी वापरलेले आहे. त्याला कुठल्याही कारस्थानी सज्जतेची गरज भासलेली नाही. एकांडा शिलेदार किंवा मोजक्या हल्लेखोरांनी स्वयंभूपणे योजलेले हल्लेच दिसून येतील. म्हणूनच मुद्दा त्यांच्या संघटनेचा, एकत्रित प्रयत्नांचा किंवा कारस्थानी कारवाईचा नाही. सर्वात चिंतेचा विषय या हल्ल्यामागील प्रेरणेचा आहे. ती प्रेरणाच आज जगाला भेडसावते आहे. ती प्रेरणाच दहशत बनलेली आहे. पण त्याबद्दल कोणी बोलयलाही राजी नाही.

मुस्लिम विचारवंतांचा एक गट असा युक्तीवाद करतो, की हे वाट चुकलेले मुस्लिम आहेत आणि त्यांनी जसा अर्थ लावला तशी धर्माची शिकवणच नाही. दुसरा मुस्लिम पंडीतांचा असाही गट आहे, की तो अशा हिंसक कारवायांची वकीली करताना त्याला स्थानिक राजकीय सामाजिक कारणे चिकटवत असतो. जणू तशी सामाजिक स्थिती नसती, तर असे हल्लेखोर हिंसेला प्रवृत्त झालेच नसते, असा हा बचाव असतो. मुस्लिमांवर अन्याय होत असतो म्हणून ते न्यायासाठी हत्यार उचलतात, असा यातला लबाड युक्तीवाद आहे. हाच युक्तीवाद दिर्घकाळ इस्त्रायल पॅलेस्टाईनच्या वादात वापरला गेला आणि आता त्याने अक्राळविक्राळ जागतिक रूप धारण केले आहे. जगात अनेक समाजगट असे आहेत, की त्यांनाही विविध भागात व प्रसंगी सामाजिक अन्यायाला सामोरे जावे लागले आहे. पण त्यांनी हत्यार हाती घेऊन निरपराधांचे हत्याकांड केल्याचे आढळत नाही. प्रस्थापित सत्तेविरोधात हिंसाचार केला असेल. पण धर्माच्या रक्षणार्थ उभे रहाताना सामाजिक एकजूट दाखवलेली नाही. अफ़गाण वा इराक येथे जिहादच्या नावाने हिंसा माजवणार्‍यात जगातल्या कुठल्याही देशातून आलेले मुस्लिम सहभागी आहेत. त्यांच्यावर मातृभूमीत कुठला सामाजिक राजकीय अन्याय झाला आहे? तो त्यांच्यावर झालेला नसून त्यांच्या परकीय धर्मबांधवांवर झालेला अन्याय आहे. पण जगात कुठेही असा अन्याय झाल्याची बातमी आली, की कुठलाही मुस्लिम समाज रस्त्यावर येतो ही वस्तुस्थिती आहे. चार वर्षापुर्वी ब्रह्मदेशातील मुस्लिमांवर अन्याय झाल्याची बातमी आली आणि मुंबईत रझा अकादमी या मुस्लिम संघटनेने मोर्चा काढला. त्यात नागरिक, पोलिस व महिलांवर हल्ले झाले. त्यामागची प्रेरणा वा कारण कोणते होते? कुणा मुंबईकराने ब्राह्मी मुस्लिमावर अन्याय केला नव्हता. तरीही य हिंसाचाराचे चटके मुंबईला बसले. त्याची प्रेरणा धर्म नाही तर कुठली होती?

ही शुद्ध दिशभूल आहे. ती करणारे मुस्लिम पंडित दुय्यम आणि त्याचीच री ओढणारे अन्य सामाजिक राजकीय जाणकार खरे गुन्हेगार आहेत. कारण तेच गुन्हेगारांना पाठीशी घालत असतात, असे जिहादी हिंसेचे गुन्हे करणार्‍यांच्या प्रेरणेला शिकवणीला झाकून सामान्य माणसाची दिशाभूल करणारा खरा गुन्हेगार नाही काय? वयात आलेल्या तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून कोठीवर विकणारा अधिक गुन्हेगार असतो. कारण तो विश्वासघाताने त्या मुलीला बलात्कारी व अत्याचारी लोकांच्या हवाली करत असतो. म्हणूनच जिहादी हिंसेच्या मागची धार्मिक प्रेरणा नाकारून लोकांना गाफ़ील करणारे जिहादींपेक्षा मोठे गुन्हेगार आहेत. पॅरीस व ब्रुसेल्सच्या हल्ल्यानंतर त्यामागे धार्मिक प्रेरणा नाही किंवा त्या शहरात वावरणारे मुस्लिम संशयित धोकादायक नाहीत, अशी हमी देणारेच यातले खरे गुन्हेगार नाहीत काय? कारण दुर्घटनेत बळी पडलेले व पडणारे बहुतांश लोक अशाच दिशाभूलीचे बळी आहेत. कारण अशी बौद्धिक दिशाभूल करणार्‍यांनी त्यांना अलगद नेऊन मृत्यूच्या सापळ्यात सोडलेले असते. घटना कुठल्या देशात वा शहरात घडली त्याला अजिबात महत्व नाही. जिथे कुठे अशा धार्मिक शिकवणीने प्रवृत्त झालेले जिहादी असतील, तिथे असे हत्याकांड कधीही होऊ शकते. ते करण्याचे मोकाट रान मानवाधिकारांनी हल्लेखोरांना बहाल केलेले आहे. कायदेशीर बंदुक हाती असलेल्या पोलिसाने चुकून कुणाचा बळी घेतला तर त्याची ससेहोलपट करणार्‍या कायद्यांनी सुरक्षेच्या मुसक्या बांधलेल्या आहेत. त्यामुळेच असे कोणी जिहादी मौजमजा म्हणून आपली कधीही हत्या करू शकतात. मरायला ते घाबरत नाहीत कारण पृथ्वीवर जगण्यापेक्षा जन्नतमध्ये जाण्याची त्यांना घाई झालेली आहे. जाताना अन्य किती निरपराध मारता येतील, इतकीच त्यांना विवंचना असते. ते गुन्हेगार नाहीतच. त्यांची पाठराखण करणारा बुद्धीवाद युक्तीवाद खरा गुन्हेगार आहे. मग सुरेश भटांच्या कवितेतील ओळी आठवतात,

आम्ही फ़क्त ऐकत असतो, आमुची खुशाली

5 comments:

  1. छान निरीक्षण भाऊ यावर उपाय काय???

    ReplyDelete
  2. भाऊ इराक/सिरीया मधिल याजिदी लोकांवर एक लेख अपेक्षित आहे कृपा करावी

    ReplyDelete
  3. भाऊ अप्रतिम लेख धन्य झालो आम्ही.
    तुमचे प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द पटला व ओवी प्रमाणे आमच्या सारख्याला वाटला व आपल्या ब्लॉग च्या वाचकाला वाटला असणार. त्यांना अव्हान करावेसे वाटते की सगळ्यांना शेअर करा. लाइक देण्याची लायकी / दानत जोक मध्ये/ सैराट व इतर चित्रपट गाणी मोबाईल मधे ऐकण्यात मश्गुल असल्याने नागरिकां मधे नसेल तरीही नाउमेद होवु नका. एक युग इंतजार करण्याची सवय हिंदूस्थानीयांना आहे.
    धन्यवाद.
    अमुल

    ReplyDelete
  4. Dwell standard of world leaders is reasons why terrorist isnot eradicate from the world.

    ReplyDelete
  5. भाऊ, लेख फारच छान आहे. प्रत्येक मुद्दा पटला. पण यावर उपाय खरंच कठीण आहे. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीकडे जिहादी म्हणूनही बघू शकत नाही.

    ReplyDelete