Sunday, July 17, 2016

काश्मिरची समस्या की कांगावा?



‘भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात काश्मिरला जायचा योग आला. श्रीनगरात ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो त्याचे मालक पंजाबी हिंदू होते. परंतू नोकर काश्मिरी मुसलमान होता. कसा कुणास ठाऊक त्याला मी मुसलमान असल्याचा पत्ता लागला. एका सकाळी बेसीनपाशी मी पाणी पिण्यासाठी ग्लास धुत होतो. मला ग्लास धुताना पाहताच तो लगबगीने पुढे आला. माझ्या हातातून ग्लास घेऊन स्वत: धुत तो मला म्हणाला, ‘मेरे साथ आप परेज मत किजिये. मै मुसलमान हू और आप भी मुसलमान है.’
मी नुसताच हसलो. त्याच्याशी काय बोलावे हे मला कळेनासे झाले. काही बोलता येण्यासारखेही नव्हते.
‘आप कल कहॉ गये थे?’ मग त्याने विचारले.
मी त्याच्या बोलण्याला उत्साहाने प्रतिसाद देत नाही हे त्याच्या लक्षात आले असावे.
‘हाजीपीर’ मी त्याला सांगितले.
हाजीपीरच्या उल्लेखाने त्याचा चेहरा काळवंडला. त्याने अस्वस्थपणे विचारले, ‘तेथे काय पाहिलेत?’
‘लढाई चाललेली पाहिली.’
‘कुणाची जीत होत आहे?’
‘हिंदूस्तानी फ़ौजेची.’
कसली तरी अशुभ वार्ता ऐकल्यासारखा त्याचा चेहरा पडला, अधिकच पडला.
मग तो बोलू लागला - अधिकच त्वेषाने. त्या बोलण्यातून त्याच्या भावनांचा होत असलेला उद्रेक मला जाणवला. पाकिस्तान्यांना भारतीय सैन्य मागे रेटीत आहे. याचे त्याला अतिशय दु:ख झाले होते! पाकिस्तानी घुसखोरांनी चोरून असे मदतीला कशाला यायचे? यायचे तर उघड यायचे. ‘चोरून येऊन आमच्या दु:खातच त्यांनी भर टाकली.’ असे मत त्याने अतिशय कडवटपणे व्यक्त केले. ‘तुम्हा भारतीय मुसलमानांसाठी आम्ही अद्याप संयम पाळला आहे’, असेही त्याने बोलून दाखवले.
मी विचारले, ‘तुला पाकिस्तानात का जावेसे वाटते? येथे काय दु;ख आहे? कशाची कमतरता आहे?’
तो उत्तरला दु:ख कसलेच नाही. कमतरताही कसलीच नाही. येथे रोटी स्वस्त मिळते. लोकांची परिस्थिती देखील पाकिस्तानी काश्मिरातील लोकांहून बरी आहे. परंतु तेवढ्याने संपत नाही बाबूजी.’ आणि मग त्याचे डोळे लकाकले. अतिशय भावनात्मक स्वरात तो मला म्हणाला, ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’
श्रीनगरच्या हॉटेलातील नोकराचे हे उद्गार अनेक दिवस माझ्या मनात रेंगाळत राहिले. अजूनही रेंगाळत राहिले आहेत. त्याच्या भावनात्मक युक्तीवादापुढे माझ्या तार्किक दृष्टीकोनाचे मूल्य शून्यवत असल्याचे मला त्या दिवशी जाणवले.’

१९६५ सालच्या भारत पाक युद्धात आचार्य अत्रे यांच्या दै. ‘मराठा’ तर्फ़े हमीद दलवाई व वसंत सोपारकर हे पत्रकार युद्धवार्ता घेण्यासाठी गेलेले होते. त्यावेळचा हमीदभाईंनी एका लेखात लिहून ठेवलेला हा अनुभव. तेव्हाच्या काश्मिरी व भारतीय मुस्लिम मानसिकतेचा हा दाखला आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या ३ मे १९८२ रोजी प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात दलवाईंनी मुस्लिम व सेक्युलर मानसिकतेचे नेमके विश्लेषण केलेले आहे. आज जो सेक्युलर दांभिकपणा दिसत असतो त्या आजाराची लक्षणे हमीदभाईंनी पन्नास वर्षापुर्वी ओळखली, लिहिली होती. काहीवेळी बोलताना सांगितली सुद्धा होती. या पुस्तकात अशा आजाराचे अनेक तपशील सापडू शकतील. पण हमीदचे पुरस्कर्ते व अनुयायी म्हणवणार्‍यांनी ती किती वाचलीत वा समजून घेतलीत, देवजाणे. कारण तेव्हा तो हॉटेलमधला नोकर अजाण मुलगा जे बोलत होता, तेच आज खुलेआम राजकीय पांडित्य म्हणून मांडले जात असते. तेव्हाही त्याचा हिंदूत्ववाद वा संघाशी संबंध नव्हता आणि आजसुद्धा नाही. पण सेक्युलर अंधश्रद्धेचे अंगारेधुपारे करणार्‍यातच मग्न असलेल्यांना सत्य कोणी सांगायचे व कसे समजवायचे?

आज काश्मिर पेटलाय आणि कशासाठी? काय आहे काश्मिरची समस्या? अर्थातच तिथे दहशतवाद माजलाय आणि जिहादी मानसिकतेने काश्मिरला विळखा घातलाय, असे उत्तर ताबडतोब दिले जाईल. मात्र पुढला प्रश्न तुम्ही विचारण्याच्या आधीच त्या उत्तराला पुस्ती जोडली जाईल. ‘दहशतवादाला धर्म नसतो’. इथून खरी समस्या सुरू होते. कारण धर्म हीच तर काश्मिरची खरी समस्या आहे. ती फ़क्त काश्मिरपुरती नाही, की पॅलेस्टाईनपुरती नाही. कारण आज आपल्याला काश्मिरात पॅलेस्टाईनची पुनरावृत्ती होताना दिसते आहे. पंधरावीस वर्षापुर्वीचे गाझापट्टी वा पॅलेस्टाईनचे फ़ोटो शोधा आणि आजच्या श्रीनगर काश्मिरशी त्यांची तुलना करून बघा. मग समस्या उमजू शकेल. तिथेही ज्यू लोकांच्या सोबत जगायचे नाही, हाच हट्ट आहे आणि पाकिस्तानची निर्मीती त्याच कारणास्तव झाली. आता काश्मिरात काय वेगळे चालले आहे? तिथून जवळपास सर्व हिंदू धर्मियांना पिटाळून लावण्यात आले. म्हणून शांतता प्रस्थापित होऊ शकली आहे काय? करोडो रुपये ओतून विकासाच्या विविध योजना राबवल्या गेल्या. म्हणून गुण्यागोविंदाने कोणी नांदू शकला आहे काय? समस्या काय आहे, ती तेव्हाच त्या हॉटेलातल्या अजाण नोकराने सांगितली होती आणि आजचे तमाम मुस्लिम बुद्धीमंत किंवा पुरोगामी विचारवंत तेच सांगत आहेत. काश्मिर स्वतंत्र करा. भारतापासून त्याला आझादी हवी आहे. आझादी कसली? काश्मिरची समस्या आहे काय? ती सोडवणार कशी? त्यासाठी चाळीस वर्षे मागे जावे लागेल.

१९७५ सालात इंदिराजींनी देशात आणिबाणी जारी केली होती आणि नागरी हक्क रद्द केलेले होते. एकप्रकारे हुकूमशाहीच देशात अवतरली होती. तोपर्यंत काश्मिरमध्ये सार्वमत किंवा आझादी असले शब्द प्रतिबंधित होते. असे कोणी जाहिरपणे बोलला, तर त्याची रवानगी तुरूंगात व्हायची. दिर्घकाळ अशा भूमिकेचे समर्थन करणारे ‘शेरे काश्मिर’ शेख अब्दुल्ला तुरूंगात खितपत पडलेले होते आणि काश्मिर सुंदर शांत निसर्गरम्य प्रदेश होता. तिथे निवडणूका व्हायच्या, सरकार चालायले आणि कुठली गडबड नव्हती. आणिबाणीच्या कालखंडात इंदिराजींनी अब्दुल्लांशी तडजोड केली आणि त्यांनी सार्वमत व आझादीची मागणी सोडून दिली. त्यांनाच मुख्यमंत्री करून इंदिराजींनी कॉग्रेसची ताकद त्यांच्या मागे उभी केली. त्यानंतर त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आणि हळुहळू काश्मिर मुख्यप्रवाहात येत गेला. पुढे जगात एक नवे पाखंड सुरू झाले, त्याचे नाव मानवाधिकार! त्याचे लोण भारतातही आले आणि नागरी हक्कासमोर प्रशासन व कायद्याला नतमस्तक व्हावे लागले. त्यानंतर क्रमाक्रमाने काश्मिरची स्थिती भरकटत गेली. काश्मिर कशाला, जगातल्या कुठल्याही लोकशाही देशात मग शांतता नावाला उरली नाही. कारण कायदा व प्रशासनाला हुलकवण्या देणार्‍यांना अभय देणारा नवा प्रेषित जन्माला आलेला होता. त्याचे नाव मानवी हक्क! १९८८ सालात सोवियत युनियन कोलमडले आणि जगातल्या अनेक देशातले कम्युनिस्ट रातोरात मानवाधिकारी होऊन गेले. त्यांनी जगातल्या भांडवलशाहीला रोखण्यासाठी नवा एल्गार पुकारला, त्याचे नाव मानवाधिकार! अवघ्या वर्षभरात काश्मिरमध्ये पहिली घातपाती घटना घडली. चार परदेशी पर्यटकांचे अपहरण झाले. त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. अशावेळी देशात सत्तांतर होऊन विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान झाले. त्यांचे गृहमंत्री होते मुफ़्ती महंमद सईद. त्यांच्याच कन्येचे (विद्यमान मुख्यमंत्री महबुबा मुफ़्ती यांच्या भगिनी डॉ. रुबाया) हिजबुल मुजाहिदीनांनी अपहरण केले. तिच्या सुटकेसाठी भारत सरकार शरण गेले आणि तुरूंगात पडलेल्या खतरनाक चार जिहादी मुजाहिदीनांना मुक्त करण्यात आले. आज अक्राळविक्राळ झालेली भासते, ती काश्मिरची समस्या तिथून सुरू झाली. ही समस्या रुबायाच्या अपहरणाने सुरू झाली नव्हती. तर असे घातपात करण्याला कायद्याने मिळालेली मुक्त संधी, त्याच कारण होते. त्यामागचे ध्येय अर्थात इस्लामी राष्ट्र हेच होते. ज्याची साक्ष पन्नास वर्षापुर्वी हमीद दलवाई यांच्यापुढे त्या सामान्य कामगाराने दिलेली होती.

‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’

ही इतकी साधीसरळ समस्या आहे. खायला भरपूर आहे. सर्व सुविधा आहेत. कामधंदा आहे. जीवन सुरक्षित व सुखवस्तू आहे. म्हणून काय उपयोग? धर्माच्या निष्ठेपुढे सर्वकाही फ़िके आहे. खयाल कशाचा ठेवायचा? इस्लामके झंडे का! ही आरंभापासूनची समस्या आहे. मात्र ती समस्या नाकारून ती सोडवायची आहे. ती सुटणार कशी? दहशतवादाला धर्म नसतो, किंवा काश्मिरच्या असंतोषाशी धर्माचा संबंध जोडू नका म्हटले, की समस्याच अस्तंगत होऊन जाते. तिथे आज बहुतांश मुस्लिमच वस्ती शिल्लक उरली आहे. सिरीयात बहुतांश मुस्लिमच आहेत. इराकमध्ये अन्यधर्मिय किती आहेत? लिबियात चाललेल्या हिंसाचारात नित्यनेमाने मृत्यूमुखी पडणारे मुस्लिम आहेत ना? जगात जिथे कुठे मोठ्या संख्येने हिंसेला माणसे बळी पडत आहेत, ती मुस्लिम आहेत आणि चाललेली हिंसाही इस्लामच्याच नावाने चाललेली आहे ना? मग त्याच्याशी धर्माचा संबंध नाही, असे म्हणून आपण कोणाची दिशाभूल करीत असतो? बुर्‍हान वाणी या मुजाहिदीनाने काश्मिरात काही वर्षे हिंसेचे थैमान घातले त्यात बळी पडलेले बहुतांश काश्मिरी मुस्लिमच आहेत. पण त्याच्याच अंत्ययात्रेला गर्दी करणारे हजारो लोक तिथलेच मुस्लिम आहेत ना? कशाला जमले ते इतक्या मोठ्या संख्येने? मरण, हत्या, हिंसा यांच्या रागापेक्षा धर्म महत्वाचा! ‘अखीर इस्लामके झंडे का भी कोई खयाल करना चाहिये या नही?’ अन्य कुठल्याही गोष्टी व गरजांपेक्षा इस्लाम महत्वाचा आहे. त्याच्यापुढे दु:ख, प्रश्न, वेदना, हिंसा सर्वकाही दुय्यम आहे. आणि हे फ़क्त काश्मिरातले नाही. सिरीया, लिबिया, अफ़गाण, पाकिस्तान, कुठलाही मुस्लिम देश घ्या. तिथलेही मुस्लिम आपल्या जगण्यापेक्षा धर्मासाठी वाटेल ते सोसायला सज्ज आहेत. मग ही समस्या काय आहे? तिचा धर्माशी नव्हेतर कशाशी संबंध आहे? जगाने पॅलेस्टाईनला अब्जवधी रुपये आजवर दानापोटी दिलेत. त्यातून तिथल्या मुस्लिमांना सुखवस्तु समाज उभा करता आला असता. पण आजही तिथे फ़क्त धर्माच्या नावाने आझादी मागत हिंसेचेच थैमान चालू आहे.

काश्मिरची समस्या म्हणून जो उहापोह चालतो, ती मुळातच दिशाभूल आहे. कारण काश्मिरात कुठलीही समस्या नाही. इस्लामी राष्ट्र म्हणून वेगळे होण्याचा अट्टाहास ही तिथली समस्या आहे आणि ती भारत स्वतंत्र झाल्यापासून व देशाची फ़ाळणी झाल्यापासूनची समस्या आहे. तेव्हाचा त्याचा दाखला हमीद दलवाई अनुभवातून देतात आणि आजचे दाखले काश्मिरी मुस्लिम बुर्‍हानच्या अंत्ययात्रेला गर्दी करून देतात. जगभर मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशात, समाजातच असा हिंसाचार चालला आहे आणि त्याचा धर्माशी संबंध नाही, अशी शाब्दिक कसरत करण्यासाठी बुद्धीमंत राबत राहिले आहेत. समस्या सोपी आहे. जेव्हा याच जगात दिसेल इथे गोळी घाला असे फ़तवे सरकारे काढत होती, तेव्हा जगात इतक्या दंगली व हिंसाचार माजलेला नव्हता. आजही चीन, सौदी अरेबिया किंवा तत्सम देशात दिसताच गोळ्या घातल्या जातात. तिथे कुणाला आझादी नको असते, किंवा इस्लामच्या झंड्याची फ़िकीर नसते. मात्र जिथे लोकशाही नांदते आहे आणि धर्माच्या नावाने धुडगुस घालण्याची मोकळीक आहे, तिथेच ‘काश्मिर’ नावाची समस्या दिसून येईल. जिथे तशी मोकळीक नाही, तिथे गुण्यागोविंदाने लोक जगताना दिसतील. थोडक्यात मानवाधिकार ही गेल्या चार दशकात जगाला भेडसावणारी खरी समस्या आहे. ती ज्या प्रदेशात असेल, तिला तिथले प्रादेशिक नाव दिले जाते. काश्मिरात ‘दिसेल तिथे गोळ्या घालण्याचे अधिकार सेनादलाला देऊन बघा, किती जागी असंतोष व जिहादची भाषा शिल्लक उरते त्याचे प्रत्यंतर येईल. समस्या चुचकारलेल्या गोंजारलेल्या आजाराने निर्माण केली आहे. अन्यथा ती समस्याच असायचे कारण नाही. नेहरू इंदिराजींच्या जमान्यात काश्मिर शांत होता. कारण तिथे आझादी मागण्य़ाची मुभा नव्हती की त्यासाठी रस्त्यावर यायला मोकळीक नव्हती. तेच पुन्हा सुरू करा आणि मग दाखवा समस्या आहे कुठे? समस्या म्हणून चालला आहे, तो निव्वळ कांगावा आहे.

2 comments:

  1. छान भाऊ यावर उपाय काय???

    ReplyDelete
  2. भाऊ एकदम बरोबर
    हे सर्व प्रकारां बाबतीत आपले लेख त्यामागील कारणांचे कंगोराचे उघड करणारे आहेत.
    मिडियाच्या साथीने पध्दतशीर पणे मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा डाव आहे.
    मोदी सरकारने सिमारेशे पलीकडून येणारे अतिरेकी व रसद प्रामाणीक सैनिक व अधिकारी नेमुन काश्मीर मध्ये शीरकाव रोखण्यात मोठे यश मिळविले आहे. आधिच्या काळात भारतीय सेनेचे व सुरक्षा व्यवस्थेचे पंख क्लीप केले होते व संगनमताने सर्व चालु होते.
    त्यामुळे आता काश्मिरी आतीरेक्यांची पण कोंडी झाली आहे. काश्मीरी तरुणांना बेहकवुन आतीरेकी कारवायात सामिल केले आहे. त्यामुळे आता पाकी व मिडिया बुरहान कुठे आमचा नागरिक होता असा युक्तिवाद करुन सरकारला जबाबदार धरले आहे. व दुसऱ्या बाजूने काश्मीरी जनतेलाच स्वातंत्र्य पाहिजे आहे अशी ओरड सुरू केली आहे.
    त्यामुळे मोदी सरकाला यामध्ये अपयश हे जसजशा लोकसभा निवडणूका जवळ येतील तस तशे अशे विदेशी व मिडिया हल्ले तेज होतील.
    मोदींची नवाज शरीफ यांच्या वाढदिवस भेट कशी चुकीची होती हे परत परत घोकले जाइल. शरिफ नी बुरहानला शहिद म्हणून विश्वास घात केला आहे.

    मोदी सरकारला पुर्वी वारंवार होणार्‍या सिमेवरिल पाकी हल्ल्याला जशास तसे उत्तर देत पाकी हल्ले कमी करण्यात यश मिळविल्याची चर्चा हिच माध्यमे करताना दिसत नाहीत. परंतु लोकसभा निवडणुकीची चाहुल लागताच पाकी (सिमेवर) व मिडिया (स्टुडिओत ) मोदींच्या सरकारवर हल्ले करतील व सरकार अयशस्वी झाल्याची बोंबाबोंब करतील.

    मोदींच्या विदेशी दौर्‍याला हाच मिडिया पर्यटन ठरवत आहे हे मोदी ओबामा बरोबर भारत दौऱ्यात संसद परिसरात चहा घेत व अमेरिकेतील बागेतील / सदनातील फेफटक्यात दाखवून तसेच कुठे ढोल वाजताना दाखवत आहेत.

    व दुसऱ्या बाजूला गावा गावातील विरोधी पक्ष कार्यकर्ते व सरकारी कामगार बघा मोदी कशी मजा करतात हि टिपणी अशिक्षित व अर्ध शिक्षित गावकरयांन सोबत करित आहेत. मोदींच्या अशा परदेश दौऱ्यात गेल्या साठ वर्षांत इतर सरकारे न करु शकणाऱ्या देश हिताच्या करारां बाबतीत मोदींना आलेले यश मिडिया झाकुन ठेवत आहेत. व ढोल वाजवताना परत परत दाखवुन दिशाभूल करत आहे हे मोदी सरकारला कळेल जेव्हा हेच विदेशी करारातून मान्य केलेली मदत देणार नाहीत. (नवाज शरीफ नी नुकत्याच केलेल्या बुरहान च्या विधानवरुन आर्थ घेतला तर समजु शकेल). व मिडिया व विरोधक सरकारचा लेखा जोखा मांडताना चौफेर टीका करतील तेव्हा समजेल.

    2004 प्रमाणे इतर क्षेत्रात मोदीं सरकारने केलेल्या प्रगतीचा प्रचार करण्यात अपयशी ठरले व निवडणूक हरले असे हेच मिडियावाले कारण देतील.

    एकंदरीत प्रत्येक बाबतीत मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा घाट मिडिया व पुरोगामी यांनी घेतला आहे.

    व परत खिचडी सरकार आणुन देशाची लुट चालु करतील.
    अशा परिस्थितीत भाऊ आपले लेख एक आशेचा किरण आहेत.
    अमुल

    ReplyDelete