Tuesday, July 26, 2016

‘रॅडीकलायझेशन’चा सोपा अर्थसोनी नावाच्या वाहिनीवर क्राईम पेट्रोल नावाची एक मालिका चालते. त्यात देशातील विविध प्रांतातील घडलेले गुन्हे व त्याचा पोलिसांनी केलेला तपास, असे सत्याधारीत कथानक रंगवलेले असते. फ़क्त त्यातील वास्तव पात्रांची नावे व स्थाने बदलून सादरीकरण होत असते. माणूस एखाद्या गोष्टीच्या आहारी गेला, मग कसा बहकत जातो, त्याचे अस्सल नमूने त्यात बघायला मिळतात. दोन महिन्यापुर्वी त्यात उत्तरप्रदेशातील एका तरूणाची सत्यकथा बघायला मिळाली. कॉलेजमध्ये शिकणार्‍या तरूण तरूणीची मैत्री आणि त्यांनी युपीएससी परिक्षेला बसण्याची धडपड त्यात आहे. दोघेही हुशार असतात आणि प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याची महत्वाकांक्षा बाळगून असतात. कसेही करून ते ध्येय गाठण्याची नशा त्यातल्या तरूणावर स्वार झालेली असते आणि त्यासाठी एका नवाजलेल्या क्लासमध्ये भरती होण्यासाठी त्याला लाख रुपयांची गरज असते. पण शेतीवर पोट भरणार्‍या पालकांकडून ती मागणी पुर्ण होऊ शकत नाही. पण अमूक एका क्लासमध्ये भरती झालो मग परिक्षा उत्तीर्ण झालोच, अशा समजूतीने त्या मुलला पछाडलेले असते. मग पैसे आणायचे कुठून ह्या विवंचनेत तो गावातून पुन्हा शहराकडे निघालेला असताना त्याला विमनस्क अवस्थेत बालपणीचा एक मित्र त्याला भेटतो. उनाड वाया गेलेला हा मित्र त्याला पैसे सहज मिळवण्याचा एक झटपट मार्ग सुचवतो. त्यातला धोका या गुणी तरूणाला दिसत असतो. पण लालबत्तीचे स्वप्न झाला खुणावत असते आणि तो मित्राच्या आग्रहात सहज ओढला जातो. मैत्रीणीच्या श्रीमंत घरमालकाच्या मुलाचे अपहरण करून काही लाखाची खंडणी उकळायची, की विनाविलंब क्लासच्या मोठ्या फ़ीची सोय लागणार असते. प्लान अचूक असतो. कलेक्टर किंवा कायद्याचा अंमलदार व्हायला निघालेला हा हुशार बुद्धीमान तरूण, त्या जाळ्यात कसा ओढला जात असेल? त्याची बुद्धी कुठे गेली अशावेळी?

त्या सत्यघटनेत तो गुणी मुलगा गुन्हा करायला प्रवृत्त होतो. कारण त्याला क्लासमध्ये प्रवेश हवाच असतो आणि तो घेतला तरच स्वप्न साकार होणे शक्य असते. त्याच क्लासमध्ये प्रवेश आणि पर्यायाने प्रशासकीय अधिकार्‍याची लालबत्ती त्याला खुणावत असते. अशी इच्छा अनावर होते. याला त्या क्लासच्या जाहिराती कारण असतात. आपण क्लासला गेल्यानेच उत्तीर्ण होऊ शकतो, स्वत: अभ्यास करून मजल मारू शकणार नाही, हा न्युनगंड त्याला क्लासच्या मोहात ओढत असतो. तसे नसते तर स्वबळावर अभ्यासातून उत्तीर्ण होण्या्ची जिद्द त्याने दाखवली असती. त्यात गुन्हा अपेशी ठरतो आणि अंमलदार व्हायला निघालेला तरूण तुरूंगाच्या गजाआड जाऊन पडतो. त्या्च्या या उद्योगातली भागिदार असल्याच्या संशयाने त्याच्या मैत्रीणीमागेही पोलिसांसा ससेमिरा लागतो आणि अब्रु गेली म्हणून ती होतकरू मुलगी आत्महत्या करते. एकूणच शोकांतिका होऊन जाते. पण मग असा प्रश्न पडतो, की मुळातच हुशार असलेल्या त्या मुलाची बुद्धी गुन्हेगारी आपल्याला रसातळाला घेऊन जाईल, असा सारासार विचार कशाला करू शकत नाही? त्याची बुद्धी निकामी कशी होते? डोळसपणे असे हुशार तरूण विघातक मार्गाकडे वळतातच कसे? त्या सत्यकथेतला होतकरू तरूण आणि कालपरवा इसिसमध्ये सहभागी झालेले भारतातील मुस्लिम उच्चशिक्षित तरूण, यात कितीसा फ़रक आहे? तेही तसेच कुठल्या तरी मोहात भरकटत गेलेले आहेत. या तरूणाला महत्वाकांक्षेने आंधळे करून फ़रफ़टत नेलेले होते, तर इसिसमध्ये सहभागी होणार्‍यांना आपण काही उदात्त धार्मिक पवित्र कार्य करीत असल्याच्या भावनेने गुरफ़टून टाकलेले असते. त्यासाठी वाटेल ते करायला ते सज्ज होत असतात. त्यांचे परिणाम दिसले, मग त्यांचे ‘रॅडीकलायझेशन’ झाले असे म्हटले जाते. आपले उद्दीष्ट गाठण्यासाठी कुठलाही भलाबुरा मार्ग अवलंबण्याचा अतिरेक म्हणजे ‘रॅडीकलायझेशन’!

इन्डॉक्ट्रीनेशन पुरेसे झालेले असेल, तरच पुढली पायरी ‘रॅडीकलायझेशन’ने गाठता येऊ शकते. आरंभी सहजगत्या गप्पा गंमतीतून तुमच्या समजुती, विचार करण्याची क्षमता यांना निष्क्रीय केले जाते. अगदी नकळत तुमच्या अशा उपजत वृत्तींना निकामी केले जात असते. कसले दगडाचे देव पुजता? गाय हा पशू आहे आणि माणूस असून पशूच्या पाया पडता, ही गंमत असते. तर्काला बुद्धीला पटणारी असते. त्यामुळे तुम्ही आपण बुद्धीमान असल्याचे सिद्ध करण्यासाठी आपल्या बालपणापासूनच्या समजुतीना नाकारण्याने त्याचा आरंभ करत असता. त्यात गैर काहीही नाही. पण आपल्या श्रद्धा समजुती सोडताना बुद्धी व तारतम्यालाही सोडण्यापर्यंत जाऊ नये, याचे भान असलेले पुढल्या पायरीपासून सावध राहू शकतात. ज्यांची तितकी तयारी वा कुवत नसते, त्यांच्या डोक्यात मग इन्डॉक्ट्रीनेशन करणे सोपे असते. आजवरची श्रद्धा चुकीची असेल, तरी तो जगण्याचा आधार असतो. तो तुटल्याने निराधार झाल्यासारखे वाटणार्‍यांना दुसरी श्रद्धा आधारासाठी हवी असते. त्यांच्या मनात नवी श्रद्धा अपुर्व किंवा अपरिहार्य म्हणून सहज प्रस्थापित करता येते. ती श्रद्धा म्हणजेच अंतिम सत्य असल्याचे पक्के झाले, मग ‘रॅडीकलायझेशन’ची पायरी सुरू होत असते. आपण बुद्धीमान असल्याने प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो, हे एकदा मनात पक्के झाले, मग तो टप्पा गाठण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नाही. त्यासाठीचा मार्ग शोधला जाऊ लागतो. स्वबळावर अभ्यास करून तिथपर्यंत जाण्यात काहीही गैर नाही. पण आत्मविश्वास नसला, मग आधार हवासा वाटू लागतो. मग आजवर अनेक परिक्षार्थींना त्यात यश मिळवून दिल्याचा दावा करणारे क्लास, तो आधार वाटणे स्वाभाविक असते. पण तिथे प्रवेशासाठी लागणारे पैसे नसले की झटपट ते पैसे मिळवून देण्य़ाची कल्पना तारतम्य सोडून पटणे अपरिहार्य होऊन जाते.

सहजपणे हा तरूण क्लासच्या पैशासाठी बालकाचे अपहरण करून खंडणीच्या मार्गाने पैसे उभे करू बघतो. त्याची कुशाग्र बुद्धी त्याला रोखू शकत नाही, तशीच काहीशी अवस्था इसिसमध्ये भरती होणार्‍या मुस्लिम तरूणांची आहे. त्यांच्या डोक्यात धर्माची महत्ता सहजासहजी इतकी पक्की भिनवली जात असते, की त्यापेक्षा आयुष्यात काहीही साध्य करण्यासारखे नाही, असे त्यांनाही वाटू लागते. प्रथम घरात टिव्हीच्या मालिका, सिनेमा बघणे धर्मबाह्य असल्याचे पाप डोक्यात घातले जाते आणि त्यात रमणारे कुटुंबिय शत्रूसम वाटू लागतात. त्यांच्यासोबत जगणे, वास्तव्य करणे पापकृत्य वाटू लागते. तो न्युनगंड धार्मिक पावित्र्याचा अहंगंड जोपासू लागतो आणि इन्डॉक्ट्रीनेशची प्रक्रिया पुर्ण होते. ती जितकी प्रभावी असते, तितकी ‘रॅडीकलायझेशन’ची पायरी जवळ येत असते. जेव्हा तुमची बुद्धी व तारतम्य निकामी होऊन जाते तेव्हा तुम्ही किती सुशिक्षित वा अशिक्षित आहात, यात काहीही फ़रक शिल्लक उरत नाही. तुम्ही विचार करण्याची कुवत गमावलेली असते आणि प्रभावी व्यक्तीमत्व असलेल्या इतर कुणाच्या हातचे बाहुले म्हणून तुम्ही वागू लागलेले असता. मग तो तरूण मदरशातला असेल किंवा उच्चशिक्षण देणार्‍या संस्थेतला विद्यार्थी असेल, काहीही फ़रक नसतो. ती एक कठपुतळी असते. त्याच्या मनावर ताबा मिळवलेल्यांसाठी अशी माणसे एक हत्यार वा अवजार बनून जातात. त्यामुळे ही सुशिक्षित बुद्धीमान मुले कशी बहकली, त्याचा शोध घेण्यासाठी फ़ारसे प्रयास करण्याची गरज नाही. झाकीर नाईक यांच्यासारखे लोक त्यांचे इन्डॉक्ट्रीनेशन करतात. पुढले काम इसिस वा तत्सम संस्थांमधील व्यक्ती वा प्रसारसाधनांच्या माध्यमातून होते, ज्याला ‘रॅडीकलायझेशन’ म्हटले जाते. पकडले गेलो तर गुन्हेगार म्हणून उर्वरीत आयुष्य मातीमोल होईल, हे त्या होतकरू तरूणाला सुचत नाही आणि जिहादमध्ये मारले गेल्यानंतरचे जीवन कोणी बघितलेलेच नाही, तर साध्य काय होणार, हे जिहादमध्ये ओढल्या जाणार्‍या सुशिक्षित मुस्लिम तरूणांना समजत नाही. कारण अशी माणसे बुद्धी निकामी होऊन भरकटत गेलेली असतात.  (संपुर्ण)

2 comments:

  1. भाऊ छानच सुंदर लेख

    ReplyDelete
  2. सुंदर विवरण !
    बनारसला भेटुच !

    ReplyDelete