Friday, July 22, 2016

आशिष शेलार आगे बढो.....



बारा वर्षापुर्वी वाजपेयी सरकारच्या हातून सत्ता गेली आणि सोनिया गांधींनी गोळा केलेल्या पक्षांची युपीए सत्तेत आली; तेव्हा भाजपाच्या नेत्यांनाही सत्ता कशामुळे गेली त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. अपयश पचवण्यात पुढली पाच वर्षे गेली आणि २००९ सालात दुसर्‍यांदा युपीए सत्तेत आली. तेव्हा भाजपावाले काहीसे शुद्धीवर येऊ लागले. त्याच दरम्यान भारतात प्रसारमाध्यमांचा विस्तार सुरू झाला होता. त्यावर झळकण्याची नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झालेली होती. आपण टिव्हीच्या पडद्यावर दिसतो याचे इतके अप्रुप होते, की प्रत्येकाला लक्ष वेधून घेण्याचा छंद जडू लागला होता. त्यामुळे अकस्मात प्रत्येक पक्षाला प्रवक्ता नावाच्या वस्तुची टंचाई जाणवू लागली. कोणीही उठून पक्षाची भूमिका मांडायला वाहिन्यावर हजेरी लावू लागला आणि नेता होण्यापेक्षा प्रवक्ता होण्याला महत्व येत गेले. त्याच काळात तेव्हाचे भाजपा सर्वेसर्वा लालकृष्ण अडवाणी म्हणाले होते, की आमच्या पक्षात आता नेत्यांपेक्षा प्रवक्ते अधिक झाले आहेत. प्रवक्ता म्हणजे काय याचा थांगपत्ता नसलेले कोणीही कॅमेरा समोर उभे राहून वा बोलून पक्षाची प्रतिमा उभी करू लागले होते. हळुहळू तंत्रज्ञान विकसित होते गेले आणि शेकडो वाहिन्या सुरू झाल्या. त्यासाठी राजकीय पक्षांना प्रवक्ते प्रशिक्षित करण्याची वेळ आली. कारण राजकीय धुमकुळ घालणारी चर्चा, हा वाहिन्यांचा प्रमुख कार्यक्रम बनून गेला. अशा चर्चेत प्रतिपक्षाला चितपट करण्याची स्पर्धा आणि त्यात ओरडण्याची कुवत, हे दोन मुख्य गुण आवश्यक ठरू लागले. प्रसिद्धीच्या मागे धावत सुटलेल्या अशा अनेक बोलघेवड्या नेत्यांनी गेल्या दहाबारा वर्षात आपापल्या पक्षाचे किती नुकसान केले, हा एक संशोधनाचा विषय होऊ शकेल. कार्यकर्त्याने संघटनेने उभारलेले मनोरे अशा वाचाळवीरांनी नुसती तोंडाची वाफ़ दवडून जमिनदोस्त केल्याचा तो अभ्यास अतिशय उदबोधक ठरू शकेल.

आज अशाच बोलघेवडेपणाने भाजपा व मोदी सरकार गोत्यात सापडले आहे. कोणालाही अपेक्षा नसताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत बहुमत मिळवले आणि सत्ताही संपादन केली. त्यातले कष्ट मोदींनी व्यक्तीश: किती उपसले ते जगासमोर आहे. पण अशा मोहिमेत किरकोळ काम केलेल्या अनेकांना आपणच पक्षाला असे अभूतपुर्व यश मिळवून दिले, अशा भ्रमाने पछाडले आहे. सहाजिकच असे लोक आपल्या पक्षाला अधिक यश मिळवून द्यायला उत्सुक व उतावळे असल्यास नवल नाही. खडसे-शेलारांपासून विविध राज्यातील अशा नेत्यांची भाजपाला गणती करावी लागणार आहे. कारण लोकसभेचा भर ओसरला असून मोदीलाटही संपली आहे. आता लोकांचे बारीक लक्ष सत्ता हाती आल्यावर काय केले, यावर असणार आहे. प्रामुख्याने ज्या उत्तरप्रदेशने ७१ जागा देऊन भाजपासाठी सत्तेचा मार्ग मोकळा केला, तिथे विधानसभाही जिंकणे भाजपा भाग आहे. अन्यथा तो पंतप्रधान मोदींचा व्यक्तीगत पराभव मानला जाणार आहे. अशा वेळी मंत्रिमंडळ व पक्षात उत्तरप्रदेशची जमवाजमव मोदी करत आहेत. त्यासाठीच नवे मंत्री घेण्यात आले आणि प्रदेश भाजपाचीही नवी रचना करण्यात आली. त्यातल्या उपाध्यक्षाला थेट चौकशीविना अल्पावधीत पक्षातूनच बडतर्फ़ करण्याची वेळ आलेली आहे. दयाशंकर सिंग यांनी आपल्याला नेमून दिलेले काम करण्यापेक्षा कुठल्या तरी वाहिनीच्या कॅमेरासमोर आपली अक्कल पाजळली. त्यांनी मायावतींच्या संदर्भात अशी काही मुक्ताफ़ळे उधळली, की भाजपाची उत्तरप्रदेश रणनितीच डबघाईला आली आहे. किंबहूना त्यातून मायवतींच्या बहुजन समाज पक्षाला नवी संजिवनी देण्याचे काम हा भाजपाचा नेता करून गेला आहे. मागल्या लोकसभेतील पराभवानंतर शांतपणे माध्यमांकडे पाठ फ़िरवून काम करणार्‍या मायावती आता एकदम प्रकाशझोतात आल्या आहेत.

लोकसभेत फ़टका बसल्यापासून मायावती प्रसिद्धीपासून अजिबात दूर होत्या. उत्तरप्रदेशात मुलायमसिंगना आव्हान देण्याची कुवत त्यांच्यापाशीच आहे. पण अलिकडेच त्यांच्या पक्षातले दिग्गज नेते व विधानसभेतील पक्षनेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी साथ सोडली होती. मौर्य आरंभापासूनचे बसपाचे नेते आणि त्यांनीच मायावतींवर गंभीर आरोप केलेले होते. कांशीराम यांच्या काळातला दलीत पिडितांचा बहुजन समाजपक्ष मायावतींनी उच्चवर्णियांना विकून टाकला. पैसे देणार्‍याला मायावती पक्षाच्या उमेदवारीचे तिकीट विकतात; असा मौर्य यांचा आरोप होता. त्यामुळे मायावती यांची खुप तारांबळ उडालेली होती. या एका व्यक्तीच्या पक्ष सोडण्याने मायावती इतक्या विचलीत झाल्या, की तिनदा पत्रकार परिषद घेऊन त्यांना आपली बाजू मांडावी लागली होती. त्यांचा हक्काचा दलित मतदार स्वामीप्रसाद मौर्य यांच्या आरोपाने विचलीत झालेला होता. सहाजिकच त्यातून बाहेर पडणे मायावतींना अवघड झालेले होते. थोडक्यात विधानसभा मतदानात पहिल्या दोन स्पर्धकापैकी एक असलेल्या मायावतींना त्यांच्याच जुन्या सहकार्‍याने घायाळ केलेले होते. म्हणूनच तिथल्या स्पर्धेत पुढे मुसंडी मारण्याची राजकीय स्थिती भाजपाला पोषक झालेली होती. त्यावरच डोळा ठेवून भाजपाने प्रदेश पक्षाचा अध्यक्ष म्हणून मौर्य नामक दलित नेत्याची नेमणूकही केलेली होती. दलित मतदार आपल्याकडे ओढण्याचा व आपणही दलितांचे कैवारी आहोत, असे भासवण्याचा डाव भाजपा खेळत होता. पण दयाशंकर नावाच्या त्यांच्याच उतावळ्या उपाध्यक्षाने अशी काही मुक्ताफ़ळे उधळली, की संसदेत भाजपाला दलितविरोधी ठरवण्याचे कोलित विरोधकांच्या हाती दिले. बसपातील बंडातून सावरण्यासाठी मायावतींना संधी हवी होती. भाजपाच्या वाचाळवीर नेत्याने त्यांना मुसंडी मारून पुढे येण्याची लॉटरीच त्यांना बहाल केली. या एका घटनेने विस्कळीत हताश मायावतींना संजीवनी मिळाली.

सव्वा दोन वर्षापुर्वी भाजपाने सत्ता मिळवली किंवा लोकसभेची मोहिम राबवली, तेव्हा पक्षाचा एकच आवाज होता. पक्षाचा एकच नेता होता. त्याचे नाव नरेंद्र मोदी. आज भाजपामध्ये प्रत्येकजण नेता प्रवक्ता आणि रणनितीकार झाला आहे. मग तो मुंबईचा पक्षाध्यक्ष असो किंवा उत्तरप्रदेश भाजपाचा उपाध्यक्ष असो. अलिकडेच मोदींनी वाचाळ सुब्रमण्यम स्वामींना लगाम लावलेला होता. पण पक्षाच्या प्रत्येक पायरीवर लहानमोठे स्वामी बुडवेगिरीसाठी दबा धरून बसलेत, याची सुतराम कल्पना मोदींना अजून आलेली नाही. त्याचे कारण सोपे आहे. हे यश मोदी किंवा भाजपाचे नाही, तर आपल्या गल्लीत आपण शेर आहोत, म्हणून मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकल्याची ठार समजूत त्याचे कारण आहे. खरे तर मायावतींचे दिर्घकालीन सहकारी स्वामीप्रसाद मौर्य यांनी पैसे घेऊन तिकीट विकण्याचा तोच आरोप केलेला होता. त्याविषयी भाजपा नेत्याने अक्कल पाजळण्याचे काहीही कारण नव्हते. त्यामुळे चार मते भाजपाच्या पारड्यात वाढणार नव्हती. पण अक्कल नसली, मग तीच अक्कल पाजळण्याची अधिक सुरसुरी येत असते आणि आजकाल भाजपामध्ये अशा शूरवीरांची रेलचेल झालेली आहे. तशाच एकाने उत्तरप्रदेशातील भाजपाच्या रणनितीचा असा पुरता बोर्‍या वाजवून दिला आहे. जुन्या सहकार्‍याच्या आरोपाने गोत्यात सापडलेल्या मायावतींची या भाजपा वाचाळवीराने मुक्तता केलीच. पण त्यानिमीत्ताने राज्यात विखुरलेल्या मायावतींच्या पाठीराख्यांना शक्तीप्रदर्शन करण्याची अपुर्व संधी मिळवून दिली. आठ महिन्यांनी व्हायच्या मतदानात मायावतींचे पारडे यातून किती जड झाले, त्याची प्रचिती मुलायम यांच्या मौनव्रताने येऊ शकते. इतर पक्षातले बिभीषण शोधणार्‍यांनी आता किमान आपल्यातच बोकाळलेल्या भीषणांची मोजदाद केली, तरी खुप झाले. आशिष शेलार आगे बढो, दयाशंकर तुम्हारे साथ है!

2 comments:

  1. छान भाऊ मस्त

    ReplyDelete
  2. हे मिडिया वाले ( सर्वच म्हणजे आर्रणव गोस्वामी तर कहरच करतो ) पुरोगामी, जेडुयु, सपा, एनसीपी, पक्ष प्रवक्ते राईचा पर्वत करतात. ज्यावेळी (आपण न्युज चॅनेल चर्चा बघीतल्या तर जवळ जवळ रोजच) भाजप /संघ यांच्या विरोधात विषय असेल तेंव्हा यांच्या भाजप प्रवक्ता वरील हल्ला अत्यंत तिव्रतेने होतो. यात सबा, (गांधी घराण्याचे असतील तर कुमार केतकर ), अजय अलोक, पवन वर्मा, (काश्मीर प्रश्‍न असेल तर शबनम लोध जे भारतीयांचा अत्यंत निच भावनेने पाणउतारा करतात ) व इतर अनेक एकाच वेळी हल्ले करतात व भाजप प्रवक्त्याला आपली बाजू पूर्ण मांडण्याचा चान्सच देत नाहीत. ( कालच्या News hour मध्ये सबाने भाजपने उत्तर प्रदेशात दलीतांची मते घालवली हा कौल देवुन टाकला) यामागे भारतीय मतदाराचे भाजप बद्दल मत कलुषित करणे हा उद्देश आहे.
    यामध्ये अगदी 1973-74 मधील इंदिरा गांधीचा लोकसंख्या नियंत्रणाचा प्रोग्राम पासुन 2003-4 च्या दिल्ली राज्य सरकार निवडणूकीत कांद्याचा किमतीचा मुद्दा भाजपचे सरकार हरण्यासाठी पुरेसा ठरला. व हीच शक्कल लढवून पुढे 2004 ला भाजपच्या केंद्रीय सरकारला सत्तेवरून खाली करण्यात मिडिया यशस्वी झाला.
    व लगेचच हाच मिडिया नंतर भाजपचे काम 1999- 2004 चांगले झाले पण लोकांपर्यंत पोहचण्यात अयशस्वी ठरले असे आज म्हणत आहेत. (डिप
    विचार करा या गेली अनेक दशके चाललेल्या मिडिया ची कुटनीती मागे कोण आहे? ).
    तसेच प्रमोद महाजन 2006 ज्यावेळी मृत्यूशी झुंज देत होते तेव्हा प्रमोद महाजन म्हणजे भाजपाचे केवळ एकच थिंक टँक आहेत व त्यांना वाचवले तरच भाजप वाचेल व त्यांच्या शिवाय भाजप शुन्य आहे असा समज भारतीयांचा ( मिडियाने) करून दिला गेला. हे पण दुरगामी परिणाम करणारे अस्त होते व 2009 च्या निवडणुकीत मतदारांची दिशाभूल करणारी रणनिती होती.
    मोदींच्या विदेश दौर्‍याचा ( ढोल वाजवणारे मोदी व तस्सम द्रुश्य वारंवार दाखवणे हा असाच एक जनतेच्या भावनांना दुरगामी परिणाम करणारा आहे.)
    आता उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या आधी असे अनेक मुद्दे उपस्थित राहणार. व उत्तर प्रदेशच्या निवडणूक भाजप हरलातर 2019 च्या निवडणुका भाजप हरण्याची ही नांदी असेल अशी अवाई उठवली जात आहे व जाईल.
    या मिडिया च्या अतिम विरोधात मोदी काय रणनीती वापरतात हे पहाणे रोमांचक आहे.
    तसेच हे ज्यावेळी मिडियाची राहीलेली विश्वासहर्यता संपवण्यात भारतीय यशस्वी होतील तेंव्हाच होईल.
    नाहीतर कांदा टाॅमेटा डाळ तेल गहु, दादरी अखलक, संघ प्रमुख यांचे एक वाक्य हे मिडियाच्या सह्याने मोदी सरकाला 2019 ला पाणी पाजायला पुरेसे आहे का हे नियतीच ठरवेल.
    अमुल

    ReplyDelete