Wednesday, August 24, 2016

कुठली कसली आझादी?

Image result for azadi amnesty

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लालकिल्ल्यावरून भाषण करताना बलुचिस्तान येथील नागरिकांवर होणार्‍या अत्याचाराला तोंड फ़ोडले आणि पाकिस्तानचा तिळपापड झाला, हे समजू शकते. कारण गेल्या सात दशकात भारताने अशारितीने कधी उघड पाकिस्तानच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप केलेला नव्हता. पण त्या सभ्यतेला दुबळेपणा समजून पाकिस्तान जगाच्या प्रत्येक व्यासपीठावर काश्मिरचा विषय उकरून काढत राहिला. मोदींच्या त्या वक्तव्याने पाकिस्तानातील अनेक असंतुष्टांना हिंमत आली असून, तिथे ‘आझादी’चे नारे घुमू लागले आहेत. त्याची परिणिती मग अशा बलुची वा अन्य पाकिस्तानी नागरिकांना सतावण्यात झाली तर नवल नाही. तीन बलुची नेत्यांनी मोदींचा त्या वक्तव्याचे स्वागत केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अर्थात त्यात नवे काहीच नाही. काही महिन्यांपुर्वी पाकिस्तानच्या कुणा क्रिडाशौकीनाने विराट कोहलीचे कौतुक केल्याबद्दल त्याच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. कारण शत्रू देशातील कुणाचेही गुणगान हा देशद्रोह मानण्याची पुर्वापार पद्धत आहे. आजकाल अविष्कार स्वातंत्र्य वा लोकशाहीच्या नावाखाली आपल्या मातृभूमीची विटंबना वा शत्रूचे गुणगान म्हणजे उदारमतवाद ठरवला गेला आहे. त्यामुळे देशाशी बेईमानी हा देशप्रेमाचा दाखला होत असतो. कर्नाटकची कानडी अभिनेत्री व कॉग्रेस नेता रम्या हिनेही तशीच पाकिस्तानची तरफ़दारी केलेली आहे. तिला तर पाकिस्तान हा नरक नसून स्वर्ग असल्याचा साक्षात्कार झालेला आहे. मजेची गोष्ट अशी, की ज्यांना असे वाटते त्यांनी नरकात तडफ़डत रहाण्याची काय गरज असते, तेही सांगून टाकावे. पण ते कधी होत नाही. कुठल्याही स्वातंत्र्याचा वापर ते स्वातंत्र्य देणारी व्यवस्था उध्वस्त करण्यासाठीच अधिक व नेमका होत असतो. सहाजिकच सध्या जे काही चालू आहे, त्यात कुठलीही नवलाई नाही.

अशा ‘स्वातंत्र्यवीरांशी’ भांडत बसण्यापेक्षा आपण कसले स्वातंत्र्य आपल्याला हवे आहे आणि कसे टिकवायचे, त्याची चिंता केली पाहिजे. काश्मिरातील काही लोकांना आझादी हवी आहे आणि दिल्लीत नेहरू विद्यापीठाच्या आवारात तशा घोषणाही झाल्या. मग त्याचीच पुनरावृत्ती कालपरवा बंगलोरमध्ये झाली. पण आझादी कसली व कशापासून, त्याचाही खुलासा व्हायला पाहिजे ना? तुम्हाला देशातील सत्तेविरूद्ध घोषणा करण्याचे स्वातंत्र्य आहे. ते सरकार उलथून टाकण्याचा थेट मतदानाचा मार्गही उपलब्ध आहे. वेगळा विचार व धोरणे घेऊन सत्तांतर करण्याचीही मोकळीक आहे. मग आणखी कुठले स्वातंत्र्य बाकी उरले, की ज्याची मागणी चालू आहे? कुठल्या आझादीसाठी घोषणाबाजी चालू आहे? या घोषणाबाजीने इथल्या पुरोगाम्यांना नव्या दमाचा प्रेषित कन्हैयाच्या रुपाने मिळाला होता. काही दिवस गजाआड पडल्यावर जामिन घेऊन सुटलेल्या कन्हैयाने कोणती मुक्ताफ़ळे उधळली होती? काश्मिरात भारतीय सैनिक बलात्कार करतात. तीच त्याला आझादी वाटते काय? त्याला वा तत्सम लोकांना अशारितीने गुन्हे करण्याची आझादी हवी आहे काय? कारण याच काही दिवसात नेहरू विद्यापीठामध्ये वसतीगृहात एका विद्यार्थिनीला गुंगीचे पेय पाजून बलात्कार करण्यात आला. त्याबद्दल कुठे वाच्यता करू नये म्हणून तिला धमकावण्यात आले. तो बलात्कार करणारा त्याच कन्हैयाच्या विचार व पक्षाचा मोठा युवानेताही आहे. मग त्याने कुठले स्वातंत्र्य अनुभवले? विद्यापीठात बलात्कार करण्याला हे लोक आझादी म्हणतात काय? तशी मुभा म्हणजे आझादी असते काय? सैनिकांनी केलेला बलात्कार असतो आणि पुरोगामी विद्यार्थी नेत्याने बलात्कार केल्यास त्याला महिलांचा उद्धार समजण्याला आझादी म्हणतात काय? ह्या आझादीची व्याख्या नेमकी काय आहे?

कुठलाही समाज किंवा देश काही श्रद्धा व समजुतीच्या आधारे उभा रहातो किंवा टिकून रहातो. त्या श्रद्धा हाच त्याचा भरभक्कम पाया असतो आणि त्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे त्याचे रक्षण करीत असतात. त्यांच्याशी लढूनच त्या देशाला पादाक्रांत करता येत असते. तेच शक्य नसेल तर सोपा मार्ग त्या देशाचा भरभक्कम पाया असलेल्या समजुती वा श्रद्धा खिळखिळ्या करून टाकण्याचा असतो. ते काम सोपे व किमान धोक्याचे असते. त्याच देशातील बुद्धीवाद युक्तीवाद यांची हत्यारे बनवून पाया खिळखिळा करून टाकता येतो. तुम्ही कुठल्या तरी अभिमानाच्या आधारे जगत असता. आज मागास पाकिस्तानला जगणे कठीण आहे. मग तिथल्या जनतेला आपली क्रुर सत्ता उलथून पाडणे कशामुळे शक्य झालेले नाही? कुठलाही अन्याय हिंसा वा हाल सोसून पाकिस्तान कशाला टिकून आहे? त्यामागे धर्माची श्रद्धा कामी येते. उपाशी पोटी त्या धर्मश्रद्धेसाठी तो पाकिस्तानी अन्याय सहन करतो, अर्धपोटी जगतो. धर्माभिमानावर तिथले राज्यकर्ते उपाशी जनतेला खेळवू शकतात. उलट त्यापेक्षा सुखवस्तु असलेल्या भारतात आझादीची भूक काहीजणांना लागलेली आहे. त्या आझादीला हत्यार बनवून लोकांची माथी भडकवली जातात. पोटापाण्यापेक्षा धर्म महत्वाचा आणि त्यासाठी उपाशीपोटी राहून धर्माचे रक्षण केले पाहिजे. प्राण पाणाला लावून लढले पाहिजे, ही वेगळी श्रद्धा त्या लोकांमध्ये रुजवली जाते. इसिसमध्ये दाखल व्हायला गेलेल्यांना कुठली व कशापासून आझादी हवी होती? त्यांना कुणा मौलवीने चिथावण्या दिल्याचा आरोप निराधार आहे. त्याने भले आगीत तेल ओतले असेल. पण त्याला हवी असलेली आग आझादीच्या घोषणाबाजीने लावलेली असते. एकीकडे अशी आग लावायची आणि दुसरीकडे तशा घोषणा वा कृत्यांवर पांघरूण घालण्यासाठी अविष्कार स्वातंत्र्याचा अधिकार वापरायचा. त्याचा परिणाम काय होतो?

आझादी बोंबलणारे शिरजोर होतात आणि दुसरीकडे त्यामुळे दुखावले जाणार्‍यांच्या देशाभिमानाचा पाया खिळखिळा होऊन जातो,. अशा देशविरोधी घोषणा वा वक्तव्याला कायदा रोखू शकत नसेल, तर हा कायदा काय कामाचा, असे सामान्य देशप्रेमीलाही वाटू लागते. जो कायदा देशाच्या अभिमानाचे संरक्षण करू शकत नाही, तोच कायदा किंवा व्यवस्था आपले तरी संकटातून रक्षण कसे करील, अशी धारणा त्यातून वाढीस लागते. ही धारणा मग कुठल्याही समाज वा देशाचा भरभक्कम पाया खिळखिळा करून टाकत असते. हे सर्वात सोपे युद्ध असते. ज्यात तुमच्या देशाचे कायदेच शत्रूला संरक्षण देतात आणि त्याची जोपासनाही करतात. कारण अभिमान संपुष्टात आला, मग कशासाठी लढायचे तेच कारण-हेतू निकालात निघालेले असतात. लढणे ही हिंमत व धाडस असते आणि मनोधैर्य खच्ची झालेली माणसे लढू शकत नाहीत. आजकाल देशात अविष्कार स्वातंत्र्य वा आझादीच्या नावाने तेच युद्ध पुकारले गेले आहे. त्यातून लोकांच्या मनातील देशाभिमान, स्वाभिमान याचे खच्चीकरण जोरात चालू आहे. कुणी केरळी चित्रपट दिग्दर्शक सिंधूने मिळवलेल्या पदकावर थुंकायची भाषा करतो. रम्या नावाच्या अभिनेत्रीला पाकिस्तान स्वर्ग वाटतो. काश्मिरच्या खोर्‍यात दंगल हिंसा माजवणार्‍यांच्या प्रकृतीची चिंता संसदेच्या चर्चेचा विषय बनतो. पण दोन दशकाहून अधिक काळ आपल्याच देशात अभिमानाने जगण्याचा अधिकार नाकारल्या गेलेल्या काश्मिरी पंडितांची कोणाला फ़िकीर नसते. त्यांना धर्माच्या नावाखाली मायभूमीतून पिटाळून लावण्यात कुणाची तरी आझादी सामावलेली असते. त्या गुंडगिरी, हिंसेची आझादी कौतुकाचा विषय असतो आणि भारतीय नागरिक म्हणून जगण्याचा अभिमान ही लांच्छनास्पद बाब झाली आहे. अशा देशाकडे कितीही मोठी फ़ौज वा शस्त्रास्त्रे असून उपयोग नसतो. कारण ती शस्त्रास्त्रे उचलण्याची मनगटी शक्ती अभिमानाच्या हातात असते.

4 comments:

 1. भाऊ तांदळात खडे असणारच निवडायची प्रक्रिया चालू झाली आहे

  ReplyDelete
 2. Yevde changle lihinarala blog cha adhar ani faltu lekh lihinarala Sare paper uplabdha

  ReplyDelete
 3. अभिव्यक्तिस्वातंत्र दिलेल्या व्यवस्थेला सोयीच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा धोका सर्वाधिक असतो.����
  अतिशय नेमक्या शब्दात मांडलंय भाऊ.
  -वैभव जगदाळे

  ReplyDelete