Wednesday, September 28, 2016

एक मराठा लाख मराठा

kulbhushan jadhav के लिए चित्र परिणाम

मराठा मोर्चाच्या निमीत्ताने खुप काही सांगितले गेले आहे. त्यातल्या मागण्या किंवा जमणारी गर्दी यावरही खुप बोलले जात आहे. वेगवेगळ्या आकर्षक घोषणाही पुढे येत आहेत. गर्दी जमवली वा जमवायची असेल, तर तिच्यात आवेश आणण्याचीही गरज असते. आपण काही जगावेगळे करीत असल्याची धारणा अगत्याची असते. त्यासाठी अशा घोषणा, फ़लक व प्रतिमा आवश्यक असतात. अण्णा, केजरीवालांचे रामलिलावरील आंदोलन असो किंवा हार्दिक पटेल इत्यादींचे गुजरातचे आंदोलन असो, त्यामध्ये अशी काही वेगळी गोष्ट असल्यानेच चर्चा झाली. जेव्हा लोकांमध्ये एखाद्या गोष्टीविषयी कुतूहल निर्माण होते, तेव्हा माध्यमांनाही त्यापासून फ़ारकाळ अलिप्त रहाता येत नाही. त्या घटना, घोषणा सोशल माध्यमातून लोकप्रिय होऊ लागल्यामुळे मुख्यप्रवाहातील माध्यमांनाही त्याची उचलेगिरी करावी लागते. ताज्या मराठा क्रांती मोर्चाच्या निमीत्ताने काही आकर्षक घोषणा समोर आल्या आहेत. त्यात ‘एक मराठा लाख मराठा’ ही अतिशय प्रभावी शब्दावली आहे. मराठा हा शब्दच मुळात भारावून टाकणारा इतिहास आहे. म्हणून मग अशा शब्दांना वजन येत असते. एक एक मराठा म्हणजे ताकदीने लढणारा योद्धा, अशीच त्यामागची गर्भित संकल्पना आहे. आजही मराठा हा शब्द लढण्याची शर्थ करणारा, असाच ओळखला जातो. म्हणून मग अशा शब्दावलीवर विचार करणे भाग पडते. मोर्चाची संख्या कौतुकाचा विषय झाल्याने मोर्चात सहभागी होणारे भलतेच खुश आहेत. आपण लढाई जिंकली असेही अनेकांना वाटणे स्वाभाविक आहे. त्यात सहभागी होणार्‍यांना, लोटणार्‍या गर्दीचे मोठमोठे आकडे सांगताना भारावून जायला होते. मात्र त्यापैकी कितीजणांना त्या लाखमोलाच्या मराठ्याची जाणिव आहे, याची शंका येते. कारण त्या लाख मराठ्याचा आशय गर्दीच्या आकड्यात हरवून गेल्यासारखे भासू लागले आहे.

कुलभूषण जाधव नावाचा एक मराठा आज पाकिस्तानी तुरूंगात खितपत पडलेला आहे. नावावरून तरी तो मराठा असणार अशी खात्री वाटते. सहा महिने होऊन गेले या मराठ्याला तिथे कसल्या यातनांना सामोरे जावे लागते आहे, त्याची दादफ़िर्याद कोणी घेतलेली नाही. पाकिस्तानने मागल्या मार्च महिन्यात त्याला आपल्या प्रदेशात पकडल्याचा दावा केलेला आहे. मात्र त्याविषयी समोर आलेली माहिती परस्परविरोधी आहे. बलुचिस्तानच्या गृहमंत्र्याने कुलभूषणला चमन या अफ़गाण सीमेवर अटक केल्याचे सांगितले आणि नंतर लष्कराने त्याची माहिती पत्रकारांना देताना कुलभूषण जाधवला इराण सीमेतून पाकिस्तानात येताना अटक केल्याची माहिती दिली आहे. अशा कितीतरी विरोधाभासी गोष्टी पाकिस्तानी माध्यमातून झळकत असतात. प्रामुख्याने हा जाधव नावाचा मराठा भारतीय हेरखात्याचा असून त्याने पाकिस्तानात उच्छाद मांडण्याचे कारस्थान शिजवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. भारत सरकारने त्याविषयी केलेला खुलासा पाकिस्तानने फ़ेटाळून लावलेला आहे. कुलभूषण भारतीय नौदलात अधिकारी होता आणि नंतरच्या काळात त्याने निवृत्ती पत्करून आपला व्यवसाय सुरू केला. इराणच्या बंदर अब्बास येथे भंगार जहाजांचा व्यापारात कुलभुषण गुंतला होता. पण पाकिस्तानी हस्तकांनी त्याला आमिष दाखवून अकारण खोट्या आरोपात गुंतवले असल्याचा भारत सरकारचा दावा आहे. आरोप कुठलाही असो, अशा एका मराठ्याला पाकिस्तानी नरकातून सोडवून आणण्यासाठी कोणी काय हालचाली केल्या? भारत सरकार, महाराष्ट्र सरकार किंवा कुठली मराठा संघटना? कोणालाही कुलभूषणची फ़िकीर नसावी, याचे वैषम्य वाटते. ‘एक मराठा लाख मराठा’ ही घोषणा कानावर पडली आणि आठवला, तो कुलभूषण जाधव! सरकार आपल्या मंदगतीने काम करीत असते. पण कुणा मराठ्याला हा लाखमोल मराठा स्मरू नये?

आज मराठा समाजाच्या विविध मागण्या व वेदना घेऊन मोर्चे निघत असताना, कुठेही कुलभूषण जाधवचा उल्लेखही आलेला नाही. कुणाला त्याचे स्मरणही झाले नाही. सरकार आपल्या परीने काम करतेच आहे. सरकारने आपल्या राजदूताला तुरूंगात जाऊन या नागरिकाला भेटण्याची मागणी केली आहे आणि पाकिस्तानने ती मान्य केलेली नाही. मग अन्य मार्गाने काही गोष्टी चालू आहेत. पण बाकी सामान्य नागरिकांकडून कुठलाही दबाव किंवा आग्रह झालेला नाही. काही वर्षापुर्वी पंजाबातून एक शेतकरी चुकून सीमापार पाकिस्तानात पोहोचला. सर्बजीत सिंग पकडला गेल्यावर त्यालाही भारताच हेर ठरवून पाकिस्तानी तुरूंगात डांबले गेले. त्याच्यासाठी कुटुंबिय धडपडत होते. मग त्याचा आवाज उठवायला अवघा पंजाब एकजुट झाला. भारत सरकारला त्याची दखल घेऊन वेगाने हालचाली कराव्या लागल्या. सर्बजीतसाठी पंजाब एकजुट होतो आणि कुलभूषण जाधवसाठी महाराष्ट्रात कोणी आवाजही उठवत नाही, ही सुखावणारी बाब आहे काय? हा माणूस कसा पाकच्या जाळ्यात फ़सला ते बाजूला ठेवा. पण पाकिस्तान जे आरोप करतो, ते खरे असतील, तर कुलभूषणच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. शत्रूच्या भूमीत घुसून हेरगिरी करणे म्हणजे प्रत्यक्ष मरणालाच हुलकावण्या देणे असते. अशी जोखीम पत्करणारा लाखात नव्हेतर दहा लाखात एखादा असतो. म्हणून कुलभूषण जाधव हा ‘एकच मराठा’ लाखमोलाचा मराठा आहे. पण त्याचे आम्हाला स्मरणही नाही. आज मराठा शौर्यगाथा गाण्यासाठी लाखाच्या संख्येने रस्त्यावर येणार्‍यांना आपल्यातला लाखमोलाचा मराठा कशाला आठवत नाही? त्याच्या सुखरूप सुटकेची मागणी करण्याची गरज कशाला वाटत नाही? त्यामुळे कुलभूषण उद्याच मुक्त होऊ शकेल असे अजिबात नाही. पण निदान आजच्या काळातील या लाखमोलाच्या मराठ्याची नोंद तर घेतली जावी?

ज्यांनी देशातल्या शेकडो निरपराधांचे हकनाक बळी घेतले, अशा याकुब मेमन किंवा अफ़जल गुरू यांची फ़ाशी रद्द व्हावी म्हणून काही लोकांनी कोर्टात खेटे घातले किंवा आपापल्या लेखण्या झिजवल्या. त्यांची या देशात कमतरता नाही. पण सहा महिने पाकिस्तानी तुरूंगात कुलभूषण जाधव नावाचा लाखमोलाचा मराठा नरकवास भोगतो आहे, त्याला सोडवून आणण्यासाठी कुठल्या न्यायालयाचे दार ठोठावण्याची इच्छा कुणाला झाली नाही. किंबहूना त्याच्यासाठी कुठे आवाजही उठवला गेला नाही. मराठ्यांनी तरी आपल्या मोर्चात त्याच्यासाठी एक मागणी करून हा विषय ऐरणीवर आणावा ना? केरळच्या पन्नास नर्सेस इसिसच्या तावडीत सापडल्या, त्यांना सोडवण्यासाठी भारत सरकारवर किती बाजूंनी दबाव आणला गेला? एका ख्रिश्चन धर्मोपदेशकालाही असेच इराकमधून सोडवून आणण्यासाठी चर्च व केरळचे सरकार उभे राहिले. मात्र महाराष्ट्रा्चा सुपुत्र देशासाठी जीव धोक्यात घालण्याचे शौर्य दाखवतो, त्याची दखल कोणीही घ्यायला तयार नसते. तेव्हा ‘एक मराठा, लाख मराठा’ ही घोषणा बोचकारे काढते. जगाने सोडा आम्ही मराठे तरी आमच्या एका ‘कुलभूषण’ मराठ्यासाठी आवाज उठवणार की नाही? कोणाला त्याचे भूषणही कशाला वाटत नाही? आपणच असे लाखमोलाच्या कुलभूषणाला विसरणार असू; तर मोर्चातली शक्ती दाखवून काय साध्य होणार? सेनापती बापट म्हणतात, ‘मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले’. कुलभूषणची ती महत्ता आहे. इतर सर्व मागण्या जरूर असू देत. पण त्यात एक कुलभूषण जाधव नावाच्या मराठ्याच्या सुटकेचीही मागणी असायला काही हरकत आहे काय? एका कर्तबगार, धाडसी मराठ्याच्या यातना वेदनांना आवाज दिला, तर ‘एक मराठा लाख मराठा’ ही शब्दावली सार्थ ठरू शकेल. ही अपेक्षा जास्त आहे काय? मराठेच नव्हेतर प्रत्येकाने डोळस मनाने याचा विचार करावा.

4 comments:

 1. भाऊ तुम्हीसुद्धा मराठा मोर्चामधील ऊणीवाच शोधल्या........

  ReplyDelete
 2. तुम्ही स्वतः महाराष्ट्रियन मराठी माणूस कुलभूषण जाधव ला सोडावन्यासाठी काय केले..?

  ReplyDelete
 3. भाऊ
  एनफिल्ड आणि स्कॉर्पिओवाल्या मराठा मोर्चाचा मागण्या अप्पलपोट्या & दुटप्पी आहेत. आंदोलन भरकटले आहे. आपला "हार्दिक पटेल " होऊ नये म्हणून हे आंदोलन फेसलेस केले गेले आहे. पण काही काळातच "आपणच कसे आंदोलनाच्या मागे होतो" हे सांगायची चढाओढ लागेल. कुलभूषण जाधव समजण्याची यांची कुवत नाही कारण मराठा तरुणाला इतिहासाचे ओझे झेपत नाहीये तरीही ते ओझे सोडवत नाहीये आणि भविष्यातला अंधकार बघवत नाहीये.- Nishant.

  ReplyDelete