Thursday, October 20, 2016

रिटा बहुगुणा जोशी

rita bahuguna rahul के लिए चित्र परिणाम

राहुल गांधी यांनी अलिकडेच तीन आठवड्यांची किसान यात्रा संपवली आणि अवघा उत्तरप्रदेश पिंजून काढला असे सांगितले जाते. त्यातून नेमके काय साध्य केले माहित नाही. पण ही यात्रा संपली नाही, इतक्यात आता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या रिटा बहुगुणा जोशी कॉग्रेसला रामराम ठोकणार असल्याची बातमी आली आहे. राहुल यांना त्या राज्यातला पक्ष नव्याने उभा करण्यासाठी यात्रेला धाडण्यात आले होते. त्याच्या परिणामी पक्षाचा माजी प्रदेशाध्यक्षच पक्ष सोडत असेल, तर राहुलचा प्रभाव ‘मजबूत’ मानायला हवा. दोन वर्षापुर्वी काहीशी अशीच स्थिती आसाममध्ये उदभवली होती. लोकसभेत कॉग्रेसने दणकून मार खाल्ला, म्हणून तिथले एक ज्येष्ठ नेते हेमंत बिस्वाल यांनी दिल्लीला येऊन राहुलची भेट घेतली होती. आसाममध्ये पक्ष टिकवायचा तर काही महत्वाचे बदल तडकाफ़डकी करावे लागतील, असा आग्रह त्यांनी धरला होता. पण सहकार्‍यांच्या उपस्थितीत बिस्वल आपले दुखणे सांगत असताना, राहुल आपल्या लाडक्या कुत्र्याशी खेळत असल्याचे नंतर बिस्वल यांनी जाहिर केले. कंटाळून त्यांनी कॉग्रेस सोडली आणि ते भाजपात दाखल झाले. खरे तर त्यांची तशी इच्छा नव्हती. त्यांना कॉग्रेसच नव्याने आसाममध्ये उभी करावी असे वाटत होते. पण राहुलचा एकूण प्रतिसाद लक्षात आल्यावर त्यांना आसाम कॉग्रेसमुक्त करण्याची अनिवार इच्छा झाली. म्हणून ते भाजपात सामील झाले आणि दोन वर्षांनी आलेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी आसाममध्ये भाजपाचे सरकार आणून बसवले. आज तीच काहीशी कहाणी रिटा बहुगुणांची दिसते. त्यांचे बंधू व उत्तराखंडाचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा कधीच कॉग्रेस सोडून भाजपात दाखल झालेले आहेत. या बहुगुणा भावंडांनी आपल्या पित्याचा एक गुण नेमका घेतलेला दिसतो. येऊ घातलेल्या वादळाची चाहुल त्यांना आधी लागते., जशी पित्याला लागायची.

हेमवतीनंदन बहुगुणा हे दोघा भावंडांचे पिता. हेमवतीनंदन बहुगुणा हे उत्तरप्रदेशी राजकारणातले एक मोठे नाव आहे. इंदिराजींच्या काळात त्यांनी अनेक राजकीय कसरती केलेल्या होत्या. तेव्हा अर्थातच कॉग्रेस हा देशातील एक्मेव बलदंड पक्ष होता. कमलापति त्रिपाठी आणि बहुगुणा, यांच्यात उत्तरप्रदेशमध्ये सापमुंगूसाचे राजकारण चालत असे. त्यामुळे दिर्घकाळ विधानसभा स्थगीत ठेवून राष्ट्रपती राजवटही लावण्याची पाळी इंदिराजींवर आलेली होती. मग त्यांनी एकाला दिल्लीत व दुसर्‍याला लखनौ येथे सत्तेत बसवून तिढा सोडवलेला होता. आज कॉग्रेसने ब्राह्मण मुख्यमंत्र्याची कल्पना काढली आहे, त्याचा वारसा तिकडेच जातो. एकामागून एक ब्राहमणच कायम तिथल्या कॉग्रेसचे नेतॄत्व करत आलेले होते. राजकीय संघर्षही ब्राह्मण नेत्यांमध्येच व्हायचे. १९७३ सालात इंदिराजींनी कमलापति त्रिपाठींना केंद्रात मंत्री करून बहुगुणांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री केले. तिथून मग त्यांचा दबदबा सुरू झाला. मात्र आणिबाणी आली आणि सगळेच राजकारण बदलून गेले. आणिबाणीने कॉग्रेसी राजकारणाला घराणेशाहीचा शाप लागला आणि त्यात अशा स्थानिक नेत्यांचा जमाना संपत गेला. सहाजिकच पुढल्या काळात बहुगुणांनाही स्थान राहिले नाही. म्हणूनच त्यांनी आणिबाणी उठण्य़ाच्या काळात ज्येष्ठ कॉग्रेसनेते जगजीवनराम यांच्या बरोबरीने बंड पुकारले आणि ते इंदिराविरोधी राजकारणात सहभागी झाले. जनता पक्षात येऊन केंद्रात मंत्रीही झाले. पुढे जनता पक्ष अस्तंगत होत असताना हेच बहुगुणा पुन्हा इंदिराजींच्या आश्रयाला कॉग्रेसमध्येही दाखल झाले. योगायोग असा, की त्यांनी प्रत्येकवेळी सत्तांतर करताना नजिकच्या काळात जिंकणार्‍या पक्षाचीच निवड केली होती. आज त्यांची दोन्ही मुले राजकारणात तोच वारसा चालवताना दिसत आहेत. विजय बहुगुणा आधीच भाजपात आले आहेत आणि रिटाजींना नुकतेच पक्षांतराचे वेध लागले आहेत.

तशी रिटाजींच्य़ा पक्षांतराची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी अनेकदा पक्ष सोडले आहेत आणि नव्या नव्या पक्षात जाऊन सत्तापदे उपभोगली आहेत. समाजवादी पक्षातून त्यांनी लखनौचे महापौरपद मिळवले व भूषवलेले आहे. मग जेव्हा देशात कॉग्रेस सत्तेत येण्याची चिन्हे दिसू लागली, तेव्हा त्यांनी त्या पक्षात जाऊन आमदारकी मिळवली. लोकसभाही लढवली. गेल्या खेपेस त्या लोकसभेलाही कॉग्रेस उमेदवार म्हणून लढल्या होत्या. आता त्यांना भाजपात दाखल होण्याचे वेध लागले आहेत. त्यात नवल नाही. कालपरवाच भाजपाला बहुमत व सत्ता मिळण्याचे भाकित पहिल्याच मतचाचणीने केलेले आहे. शिवाय त्यातून राहुल गांधी यांच्या उत्तरप्रदेशात पडलेला प्रभावही समोर आला आहे. बहुधा येत्या निवडणूकीत कॉग्रेस उत्तरप्रदेशातून नामशेष होण्याची शक्यता आहे. मग तिथे राहून रिटा बहुगुणा देशाची सेवा कशी करू शकतील? त्यांना सेवेसाठी नवा पक्ष वा नव्या संधी शोधणे भाग आहे ना? हा आता कॉग्रेससाठी उपचार होत चालला आहे. कालपर्यंत राहुल सोनियांचे गुणगान करताना हुरळून जाणार्‍यांनीच त्याच नेतृत्वावर आरोप करून पक्षाला रामराम ठोकणे; ही प्रथा होऊ घातली आहे. दोन वर्षापुर्वी तामिळनाडूतील पिढीजात कॉग्रेसी जयंती नटराजन यांनीही अशीच तक्रार करून कॉग्रेसची कास सोडली होती. ज्यांनी पक्ष सोडल्याशिवाय राहुल यांच्या पोरकटपणावर टिका केली, त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. रिटा बहुगुणा तोच मार्ग चोखाळताना दिसत आहेत. याकडे निव्वळ कॉग्रेसमुक्त भारत म्हणून बघायचे काय? की देशातील पर्यायी पक्षाचा अंत म्हणून बघायचे, असा प्रश्न आहे. कारण लोकशाहीत दुसरा म्हणजे पर्यायी पक्ष आवश्यक असतो. त्यात नेतृत्व दुय्यम आणि पक्ष महत्वाचा असतो. राहुल वा सोनियासाठी पक्ष संपुष्टात येऊ देणे, हा पक्षापुरता विषय नसून लोकशाहीशी निगडीत सवाल आहे.

अशा रितीने कॉग्रेस नामशेष होण्याने भाजपा वाढतो, किंवा बलवान ठरतो; म्हणून त्या पक्षाचे नेते खुश असणे समजू शकते. पण कॉग्रेसच्या जागी एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपाचा उदय, ही लोकशाही असू शकत नाही. क्रमाक्रमाने त्याचीही कॉग्रेस होत जाणार आहे. कारण त्याला पर्याय उरणार नाही. आज आपण कॉग्रेसची दुर्दशा बघतो, त्याला एकमेव राष्ट्रीय पक्ष असण्याची मस्ती कारणीभूत झालेली आहे. आपल्याला कोणी हरवू शकत नाही आणि देशासमोर आपल्याखेरीज पर्याय नाही, अशा मस्तीतून कॉग्रेस बेपर्वा होत गेली आणि तिला पर्याय म्हणुन भाजपा ती जागा व्यापत गेला. जिथे ते शक्य झाले नाही, तिथे प्रादेशिक पक्ष उदयास येत गेले. पण त्यामुळेच राष्ट्रीय राजकारणात एकतर्फ़ीपणा किंवा अराजकाची स्थिती आलेली आहे. प्रादेशिक पक्ष कॉग्रेसला पर्याय म्हणून उदयास आले आणि आता त्यांनाच संसदेतही प्रतिनिधीत्व मिळत असल्याने राष्ट्रीय हिताचे निर्णय घेताना अडचणी होत आहेत. राष्ट्रीय भूमिकेचा संकोच होत चालला आहे. भाजपाने स्वत:ला राष्ट्रीय पर्याय म्हणून पुढे आणले, हे योग्यच होते. पण तो पर्याय उभा रहात असताना मुळचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉग्रेसचा अस्त, प्रत्यक्षात लोकशाहीला बाधक आहे. कॉग्रेसला त्यातून सावरणे शक्य नसेल, तर अन्य कुठल्या पक्षाने भाजपाला पर्याय म्हणून राष्ट्रीय पातळीवर पुढे येण्याची गरज आहे. अन्यथा भाजपाचीच कॉग्रेस होऊन जाण्याचा धोका आहे. दहा प्रादेशिक पक्षांची खिचडी आघाडी हा राष्ट्रीय पर्याय असू शकत नाही. म्हणूनच कॉग्रेस टिकली पाहिजे आणि ते राहुल सोनियांमुळे अशक्य आहे. कुणा नेत्याने पुढाकार घेऊन कॉग्रेसचा जिर्णोद्धार करायला हवा, किंवा अन्य कुठल्या पक्षाने राष्ट्रीय पातळीवर आपला विस्तार करण्यास पुढे येण्याची गरज आहे. समाजवादी डावे ह्यांच्याकडून ती अपेक्षा असताना, तेच राहुलच्या आश्रयाला गेल्यास रिटा बहुगुणांसारख्यांना कुठला मार्ग शिल्लक उरतो?

4 comments:

  1. जर का भाजपा ची काँग्रेस झाली तर संघच त्याला पर्याय उभा करेल. काळजी नसावी.
    पण आजच्या घडीला काँग्रेस संपण ही काळाची गरज आहे. काँग्रेस हा पक्ष उरला नसून ती एक "मानसिकता" झाली आहे. ती घातक मानसिकता आहे. म्हणून ती संपवली पाहिजे.
    काँग्रेस जर पक्षच राहिला असता तर आज इतकी वाईट दशा झालीच नसती. कदाचित मोदीचा उदयही झाला नसता.
    बाक़ी कोणी काँग्रेस सोडली याला तितकस महत्व नाही. ममता वा हेमंत बिस्वाल सारखे मोजकेच काँग्रेसला आव्हान देऊ शकले. तितकी झेप घेण शरद पवारांनाही जमल नाही. उलट काँग्रेसच्याच वळचणीला आयुष्य काढाव लागल.

    ReplyDelete
  2. शेवटचा परिच्छेद अप्रतिम ! भाजपने प्रादेशिक पक्षांशी समजूतदारपणे युती टिकवावी आणि आपल्या संगतीने त्यांना राष्ट्रीय भूमिकेतून विचार करायला लागेल असे सौहार्द निर्माण करावे ,त्यासाठी आपल्या दादागिरीला आवर घालावा . विशेषतः दुसऱ्या फळीतील दोन्ही पक्षातील नेत्यांनी वाचाळपणा न करता थंड पाणी प्यावे आणि सोयरीक टिकवून ठेवण्यास जास्त मदत करावी यातच त्यांचे हित आहे. वाहिन्यांवर मुलाखती देताना वाहत जाण्यात तात्पुरती आणि वैयक्तिक प्रसिद्धी मिळत असेल पण स्वतःला ,पक्षाला आणि देशाला त्यातून काहीच दीर्घकालीन लाभ होत नाही हे समजून घ्यावे हे बरे !

    ReplyDelete