Friday, October 14, 2016

कॉग्रेस आणि पाकिस्तान


pakistani generals के लिए चित्र परिणाम
किती चमत्कारीक गोष्ट आहे ना? भारतात सर्जिकल स्ट्राईक या विषयावरून रणकंदन माजले आहे आणि तिकडे पाकिस्तान तर असा काही हल्ला पाकच्या हद्दीत झाल्याचाच इन्कार करतो आहे. पाकिस्तानचा दावा मान्य करायचा तर आजवर कधीही पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय सेनेने प्रतिहल्ला केलेला असू शकत नाही. मग तसा दावा कॉग्रेस युपीएने करावा किंवा आजचे सत्ताधारी भाजपाने करावा. भारतातले दोन्हीही प्रमुख पक्ष धडधडीत खोटे बोलतात, असे पाकिस्तानला म्हणायचे आहे. मात्र तो पाकचा दावा खरा मानायचा तर पाकिस्तानची इतकी तारांबळ कशाला उडालेली आहे, त्याचाही खुलासा पाकिस्तानला करावा लागेल. तो कुठेही होत नाही. उदाहरणार्थ पाकिस्तान त्यांच्या हद्दीत भारतीय कमांडो घुसल्याचा तावातावाने इन्कार करतो. म्हणजेच पाकला कुठेही कसलीही हानी झालेली नाही. तसेच असेल तर पाक अमेरिकेपासून जगभरात सहानुभूतीचा वाडगा घेऊन कशाला फ़िरतो आहे? भारतावर उलटे दहशतवादाचे आरोप कशाला करतो आहे? डॉन नावाच्या प्रमुख वर्तमानपत्रानेच पाकिस्तानच्या सत्ताधार्‍यांमध्ये कशी बेबंदशाही माजली आहे, त्याचे वृत्त प्रसिद्ध केले. त्याच्यावर पाक सरकारने बडगा कशाला उचलला आहे? भारतीय सेनेने प्रतिहल्ला केलेला नसेल, तर कुठल्या जखमेसाठी पाकिस्तान इतका विव्हळतो आहे? मुंबई वा पठाणकोटसह अनेक घातपाती हल्ल्यानंतर पाकिस्तान असा कधी गर्भगळित झाला नव्हता, की त्याने इतकी रडारड केलेली नव्हती. पण आज पाकसेना व पाक सरकार सतत रडगाणे गाते आहे. म्हणजेच कुठेतरी दुखते आहे. काहीतरी खुपते आहे. युद्धाची स्थिती टाळली पाहिजे म्हणून जणू पाक गयावया करायला लागला आहे. ही कसली घबराट आहे? सर्जिकल हल्ला खोटा असता, तर इतके घाबरून जाण्याचे काहीच कारण असू शकत नाही. पण हल्ला नेमका दुखण्यावर झाल्याचाच हा पुरावा आहे.

पाकचे दुखणे भारताने केलेला सर्जिकल हल्ला नाही. दुखणे पाकच्या हद्दीत जाण्यातही नाही. जिहादी वा पाक सैनिक मारण्याचेही दु:ख नाही. दुखणे वेगळे आहे आणि ते भारताने खुलेआम सीमा ओलांडल्याचा दावा करणे, हेच दुखणे आहे. जागतिक पातळीवर ज्या मर्यादा आजवर भारताने पाळल्या, त्यालाच कवचकुंडले बनवून पाकिस्तान मस्ती करीत होता. त्याला तडा गेला आहे. भारत कधीही आता पाक हद्दीत घुसून बंदोबस्त करू शकतो, याची ती ग्वाही आहे. म्हणूनच आपण आजवर लढाई ज्यांच्या कंत्राटावर सोपवली होती, ती जिहादी फ़ौज कामाची राहिली नाही, हे पाकिस्तानचे खरे दुखणे आहे. त्याचे श्रेय अर्थातच भारतीय सेनेला वा तिने केला त्या सर्जिकल स्ट्राईकला नाही, तर त्यामागच्या भारतीय राजनैतिक धोरणाला आहे. मोदी सरकारने आजवरच्या मर्यादा सोडण्याची जाहिर भूमिका घेऊन, जगाचा त्याकरिता पाठींबा मिळवला, त्यामुळे पाकिस्तान विव्हळतो आहे. कारण आता पाकिस्तानपाशी लढायची हिंमत वा कुवत राहिलेली नाही. मागल्या तीन दशकात पाकसेनेने जिहादी संस्था संघटनांकडून जी कामे करून घेतली, ती होताना पाकसेना शस्त्रसज्ज वा युद्धसज्ज रहाण्याचेच विसरून गेली आहे. म्हणूनच भारताच्या व्यावसायिक सज्ज सेनेसमोर आपला प्रत्यक्ष युद्धात टिकाव लागू शकत नाही, अशा भयाने पाकिस्तानला पछाडले आहे. हा प्रकार समजून घ्यायचा तर लोकसभा निवडणूकीतला कॉग्रेसचा दारूण पराभव समजून घ्यावा लागेल. कॉग्रेस त्या लढतीमध्ये नामोहरम झाली, कारण मागल्या चाळीस वर्षात त्या पक्षाने कधी संघटना बांधली नाही किंवा ध्येयधोरणावर राजकीय विजय संपादन केले नाहीत. विरोधकांचा दुबळेपणा आणि माध्यमांनी रंगवलेल्या नेहरू-गांधी घराण्याच्या आभासावर कॉग्रेस टिकून राहिली. सत्ता टिकवून राहिली होती. पण मोदी नावाचा झंजावात आला आणि कॉग्रेसचा पालापाचोळा होऊन गेला.

कॉग्रेसने देशात विविध पक्षातले गुणी कर्तबगार नेते अधिकारपदे व सत्तापदे देऊन आपल्यात ओढून घेतले. अधिक माध्यमातून व अभिजन वर्गातून नेहरू खानदानाचे मोठे भव्य चित्र उभे केले. दुसरीकडे विरोधी पक्ष दुबळे राहातील, अशीही तरतुद केलेली होती. त्यात माध्यमांचा मोठा हात होता. किंबहूना गेल्या दिडदोन दशकात माध्यमे व पत्रकार विश्लेषक, हेच कॉग्रेसचे बिनीचे शिपाई होऊन गेले होते. त्यांना कंत्राट दिल्याप्रमाणे कॉग्रेस माध्यमांवर विसंबून राहिली. कॉग्रेसला राजकारण किंवा पक्ष संघटना, लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज वाटेनाशी झाली. परिणामी लोकांमध्ये जातील व जनमतावर प्रभाव टाकतील अशा नेत्यांना कॉग्रेस पक्षामध्ये स्थान उरले नाही. आजच्या कॉग्रेस नेतृत्वाकडे बघितले, तर त्यात जनतेमध्ये स्थान असलेला वा जनमत फ़िरवू शकणारा कोणी नेता उरलेला नाही. त्याची गरज नव्हती. कारण ते काम माध्यमे व विचारवंत नावाची टोळी कंत्राट घेतल्यासारखी पार पाडत होती. मोदींनी राष्ट्रीय राजकारणात येण्यापुर्वी याच माध्यमे व पत्रकारांच्या विरुद्ध मोहिम आखली आणि कॉग्रेसच्या अशा छुप्या सैन्याला नामोहरम करून टाकले. त्यामुळे प्रत्यक्ष राष्ट्रीय राजकारणात पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मोदी अवतरले, तेव्हा कॉग्रेसपाशी लढण्याची क्षमता नव्हती. त्यांचे तोयबा होयबा मोदींसमोर निकामी होऊन गेले होते. मग नुसत्या भाषणांनी व देशव्यापी दौर्‍यांनी मोदी कॉग्रेस पक्षाला धुळ चारू शकले. कॉग्रेसपाशी कार्यकर्ते व दुय्यम नेत्यांची भक्कम फ़ळी असती, तर मोदींना इतक्या सहज बहूमत वा सत्ता मिळवणे शक्य झाले नसते. माध्यमे, पत्रकार व तथाकथित अभ्यासकांवर विसंबून रहाण्यात कॉग्रेस पक्षाचा घात झाला होता. म्हणूनच कसोटीची वेळ आल्यावर कॉग्रेसचा बंगला पत्त्यांप्रमाणे ढासळत गेला. आज पाकिस्तानची अवस्था अजिबात वेगळी नाही.

मागल्या तीन दशकात क्रमाक्रमाने पाकिस्तानने दहशतवाद किंवा जिहादी घातपात; ही आपली भारत विरोधी रणनिती बनवून टाकली. त्यातून पाकसेना व तिचे अधिकारी सुखासीन होत गेले आणि लढायची सज्जता त्यांना आवश्यक वाटली नाही. अणुयुद्ध वा शांतताभंग असे बागुलबुवा करून भारताला लढाईपासुन परावृत्त ठेवणे, हा पाकिस्तानी युद्धनितीचा गाभा बनून गेला. भारत आपल्यावर हल्ला करणार नाही आणि सीमारेषा भारतीय सेनेला राज्यकर्ते ओलांडू देणार नाहीत; हा पाकिस्तानचा आत्मविश्वास बनून गेला. सर्जिकल स्ट्राईक करून आणि त्याची जागतिक जाहिरात करून, मोदींनी त्या भ्रमालाच उध्वस्त करून टाकले आहे. आमनेसामने युद्धप्रसंग आला, तर त्यात घातपाती जिहादी टिकू शकत नाहीत. त्यासाठी प्रशिक्षित सेना व तिची सज्जता आवश्यक असते. पण पाकसेनेची आज कॉग्रेससारखी दुर्दशा होऊन गेलेली आहे. तिथे जनरल्स आणि सेनाधिकारी भरपूर आहेत. तावातावाने बोलणारे गमजा वल्गना करणार्‍यांची कमी नाही. पण प्रत्यक्ष लढायची त्यांच्यात हिंमत वा इच्छा उरलेली नाही. अशावेळी मोदींनी त्यांना लढण्याचे आव्हान दिलेले आहे. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे लढाईचे दिलेले खुले आव्हान आहे. त्यामुळे पाकसेना भयभीत झाली आहे. गेल्या लोकसभेत चिदंबरम, मनिष  तिवारी अशा बोलघेवड्या कॉग्रेसी नेत्यांनी उमेदवारी नाकारली होती ना? कारण ते पराभवाला घाबरले होते. आज पाक सेनाधिकार्‍यांची नेमकी तशीच मानसिक स्थिती झाली आहे. त्यामुळे एका बाजूला सर्जिकल स्ट्राईक नाकारला जातो आहे आणि दुसरीकडे जगभर सहानुभूतीचा वाडगा घेऊन पाक राज्यकर्ते फ़िरत आहेत. सीमेवरचा सर्जिकल स्ट्राईक भारतीय सेनेने केला. पण पाकच्या वर्मावर राजकीय व कुटनितीचा घाव घालण्याची कामगिरी, खुद्द पंतप्रधान मोदींनी बजावली आहे. अर्थात या गुढ गोष्टी समजून घेण्य़ाची बुद्धी असली तर साम्य लक्षात येऊ शकेल.

5 comments:

  1. भाऊ, आपण नियंत्रण रेषा ओलांडत नसल्याने प्रत्यक्षात लढाया/चकमकी नेहमी आपल्या भूमीवर होत असत. अशा लढाया/चकमकी जरी आपण जिंकत असलो तरी युद्धशास्त्राच्या नियमानुसार आपले नुकसान होत असेच. त्यामुळे पाकीस्तानचा कमीम कमी भांडवलात जास्तीत जास्त नुकसान करण्याचा धंदा निर्वेधपणे सुरु होता. पण या वेळी आपण दाखवून दिले आहे की यापुढे लढाई झाली तर भूमी पाकीस्तानची असेल. अर्थातच होणारे नुकसान त्यांचेच असेल.

    ReplyDelete
  2. मस्तच निरीक्षण भाऊ

    ReplyDelete
  3. एकदम सटीक विश्लेषन केलंत आपण.
    �� आपल्या लिखाणाची धार अशीच वाढवा

    विष्णू शिंदे

    ReplyDelete
  4. भाऊ, मनोज तिवारी नसून मनीष तिवारी असा उल्लेख करावा. धन्यवाद.

    ReplyDelete
  5. भाऊ वाजपेयी सरकारच्या काळात कारगील कंदहार आणि संसदेवरचा हल्ला अशा घटना घडल्या होत्या पण सीमेच्या पलीकडे जाऊन उत्तर दिले गेले नव्हते आता सारखे उत्तर दिले गेले असते तर कदाचित युपीएचे सरकार आलेच नसते पण पाकीस्तानला धडा शिकवायची संधी वाजपेयी अडवाणींनी गमावली हे मात्र नक्की

    ReplyDelete