Friday, October 28, 2016

केक आणि पावाची गोष्ट

शिना बोरा प्रकरणात सीबीआयने जोड आरोपपत्र सादर केले आहे. त्यात इंद्राणी मुखर्जीचा पती पीटर मुखर्जी अधिकच फ़सला आहे. आरंभी त्याने यातले आपल्याला काहीच ठाऊक नसल्याचा बहाणा केला होता. पण तपास सुरू झाला आणि त्याचाही हात त्यात असल्याचे उघडकीस येऊ लागल्याने त्यालाही पोलिसांनी अटक केली होती. आता अधिक बारकाईने तपास केल्यावर एकूण प्रकरणात पीटर पहिल्यापासून सहभागी होता आणि शिना बेपत्ता नव्हेतर मेलेली असल्याचे त्याला पक्के ठाऊक असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र ज्या कारणासाठी हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्यात आले, त्या दिशेने एकही पाऊल पडलेले दिसत नाही. शिनाची हत्या तिच्या आईने व अन्य काही लोकांनी इतके कुटील कारस्थान रचून कशाला केली, त्याचे रहस्य उलगडलेले नाही. आपल्या पहिल्या विवाहापासून जन्मलेल्या मुलीने नव्या पतीच्या मुलाशी लग्न करून आपलीच सून होणे इंद्राणी मुखर्जीला मान्य नव्हते, असे वरकरणी दिसते. कारण शिना ज्याच्या प्रेमात पडलेली होती, तो राहुल मुखर्जी इंद्राणीचा तिसरा पती पीटरचा मुलगा होता. पण तेवढ्यासाठी शिनाची हत्या आईने करणे मनाला पटणारे नाही. हे काम सुपारी देऊनही संपवता आले असते. कुठलाही पैसेवाला अतिश्रीमंत अशी घाणेरडी कामे, पैसे मोजून करून घेत असतो. काही हजार रुपयात खुन करणारे सुपारीबाज मुंबईत उपलब्ध असताना पीटर वा इंद्राणी यांनी स्वत:च हे काम उरकावे, हेच खरे रहस्य आहे. कारण ते व्यवसायिक मारेकरी वा खुनी नाहीत. याचा अर्थच असा, की शिनाला फ़क्त मारायचे नव्हते, तर ती तिचा मृतदेह गायब करून तिच्या नावाने काही व्यवहारही उरकायचे होते. म्हणूनच तिला गायब करण्याला महत्व होते. ते रहस्य अजून उलगडलेले नाही. कारण तेच मोठे कारस्थान आहे.

इंद्राणी मुखर्जी व पीटर मुखर्जी ही माध्यम क्षेत्रातील मोठी नावे आहेत. आज माध्यमात वा कलाक्षेत्रात वावरणारे अनेकजण त्यांचेच चेले आहेत. कोट्यवधी रुपयांची उलाढाल करायची आणि त्यात कोणी आडवा आला तर त्याचा खेळही खतम करायचा; अशा पद्धतीने काम करणार्‍यांची ही टोळी आहे. भारतात सुरू झालेल्या पहिल्या टिव्ही नेटवर्कचा पीटर प्रमुख होता आणि त्यात इंद्राणी सहभागी होती. प्रणय रॉय वा शेखर गुप्ता, वीर संघवी अशा लोकांना मोहरे प्यादे समजून खेळाणारी ही जोडी आहे. त्यातून अशा विविध माध्यमात वा कलाक्षेत्रात नावाजलेल्यांचा खरा चेहरा लक्षात यायला हरकत नाही. आम्ही संस्कृती निर्माण करतो असा त्यांचा दावा असतो. त्यासाठीच आज असे बहुतांश लोक मोठ्या उजळमाथ्याने करण जोहरच्या पाठीशी उभे राहिले आहेत. पण वास्तवात त्यांची संस्कृती कोणती व चारित्र्य कोणते, त्याची साक्ष शिना बोरा हत्याकांडातून समोर आले्ली आहे. स्टार नेटवर्क पीटरने सोडल्यावर त्याला अन्य कुठल्या माध्यम कंपनीत जायला प्रतिबंध होता. म्हणून त्याने इंद्राणीला पुढे करून एक स्वतंत्र माध्यम कंपनी स्थापन केली. त्यात न्युयॉर्क शेअरबाजारात घोटाळा करणार्‍या रजत गुप्ताने कोट्यवधी डॉलर्स गुंतवले होते. यातून ह्या प्रतिष्ठीत सुसंस्कृतांचे खरे चरित्र लक्षात यावे. असे उजळमाथ्याने मिरवण्यासाठी इंद्राणी आपल्या पोटच्या पोरांना भावंडे म्हणून दाखवत होती. अशा खोटारड्या लोकांच्या हातचे खेळणे झालो, म्हणून आजच्या करण जोहर समर्थकापैकी कोणी लाजेने मान खाली घातली आहे काय? किती बेशरमपणे तेच लोक आज आपण कलाकार आहोत आणि प्रेमाचा संदेश देत असतो, असे सांगत आहेत ना? देशप्रेम सोडा, साध्या सभ्यपणासाठी व सहानुभूतीसाठी त्यांना पाक कलाकारांचा निषेध करता आलेला नाही. त्यांची संस्कृती कुठली?

आपली एक सहकारी पोटच्या पोरीचा पैशासाठी गळा घोटून खुन करते आणि पुन्हा काही वर्षे उजळमाथ्याने प्रतिष्ठीत म्हणून वावरते, याची त्यापैकी कोणाला शरम वाटलेली नाही. अशा लोकांनी सीमेवर सैनिक मारला गेला किंवा हुतात्मा झाला, म्हणून चार अश्रू ढाळण्यात काही अर्थ असू शकतो काय? भावना किंवा लाजलज्जा ह्या गोष्टी प्रामाणिकपणाशी संबंधित असतात. चारित्र्याशी संबंधित असतात. ज्यांना कुठले चारित्र्य नाही आणि त्यांची प्रतिष्ठा पैशाच्या खनखणाटावर थुईथुई नाचते, त्यांनी कुणाच्या हौतात्म्यावर अश्रू ढाळणेही अपमानास्पद असते. त्यांना अर्धशतकापुर्वी कुणा नथुराम गोडसेने गांधींची हत्या केली म्हणून आजही शरम वाटते. पण आपल्यातली एक असलेल्या इंद्राणीने आपल्याच पोटच्या पोरीचा गळा दाबल्याची अजिबात लाज वाटत नाही. कारण त्यांचे गांधीप्रेम खोटे असते आणि देशप्रेमही तितकेच दांभिक असते. त्यांची सगळी प्रतिष्ठा, तत्वज्ञान पैशाचा दौलतजादा फ़ेकणार्‍यासाठी असते. त्यांची घरगुती व भावनिक नाती खरी नसतात. परस्परांचे संबंध सुद्धा दिखावू असतात. त्यांची लाज खोटी असते आणि सभ्यताही दिखावू असते. देखाव्याच्या जगात जगताना त्यांच्या आयुष्याचाही एक देखावा बनून गेला आहे. म्हणून करण जोहरने यापुढे कुणा पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात घेणार नाही असे मान्य केले. पण पहिल्या दिवशी त्याची प्रतिक्रीया काय होती? कलेला सीमा नसतात. राजकारण दहशतवाद आणि कलेचा संबंध नाही. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शन फ़सले, तेव्हा पैशाचा विषय आला होता. तेव्हा कलेच्या स्वातंत्र्याला चुलीत घालून त्याने पाक कलाकारांना नाकारण्यापर्यंत मजल मारली. त्याचा चित्रपट बंद पाडायची भाषा बोलणार्‍यांना गुंड दंगेखोर ठरवणे सोपे आहे. पण ते दंगेखोर अशा मान्यवरांपेक्षा अधिक प्रामाणिक आहेत. हुल्लडबाजी केल्यावर होणारी शिक्षा झेलायला सज्ज असतात.

म्हणूनच संस्कृती सभ्यता हे थोतांड बनून जाते आणि त्याच्या आहारी गेलेला समाज रसातळाला जात असतो. दारात कर्जाची वसुली करायला कोणी खेटे घालू लागला, मग अर्धपोटी जगणारा व शेती बुडालेला शेतकरी यांच्या लेखी फ़ालतू सामान्य माणूस असतो. पण कर्ज फ़ेडता येत नाही म्हणून लाजेखातर असा फ़ालतू माणूस फ़ास लावून आत्महत्या करतो. त्याला अब्रुदार म्हणतात, याचाही अशा सभ्य लोकांना विसर पडला आहे. हजारो कोटी रुपयांचे कर्ज उधळून चैन केलेला विजय मल्या परदेशी पळून गेला आहे, तोही अशाच प्रतिष्ठीतांच्या वर्गातला आहे. यातल्या अनेकांनी त्याच्याच फ़ेकलेल्या तुकड्यावर मौजमजा केलेली आहे. यापैकी कितीतरी अभिनेत्री व कलाकार मल्याच्या पैशाखातर त्याच्या आमंत्रणाला हजर राहिलेले आहेत. पण तोच दरोडेखोरासारखा फ़रारी झाल्यावर एकाची तरी मान शरमेने खाली गेली आहे काय? प्रतिष्ठेची ही आजची व्याख्या आहे. जितके म्हणून बेशरम व्हाल, तितके तुम्ही अब्रुदार होता. जितके तुम्ही लाजलज्जा बाळगाल तितके तुम्ही फ़ालतू मानले जाता, अशी आजची संस्कृती झाली आहे. ही सगळी जमातच इंद्राणी व पीटर मुखर्जीच्या वर्गातली आहे. त्यांच्या असल्या बेशरमपणाचे चोचले होत रहातील, तोवर हाच तमाशा चालाणार आहे. कायदाही त्यांना पाठीशी घालील. पण एक वेळ अशी येते, जिथे लोक कायदा व सभ्यता झुगारून देतात आणि कायदाच हाती घेतात. तेव्हा यांना कोण वाचवणार आहे? फ़्रेंच राज्यक्रांतीची गोष्ट विसरून जगणार्‍यांना तिचेच परिणाम भोगावे लागत असतात. ‘पाव मिळत नसेल तर केक खा’, असे शहाणपण शिकवणार्‍यांच्या सार्वत्रिक हत्याकांडाने आधुनिक युगाला आरंभ झाला. आज जगभरचा समाज त्याच वळणावर येऊन उभा राहिला आहे. कारण आजचाही नवाश्रीमंत व बुद्धीवादी वर्ग फ़्रेंच अमिरउमराव असल्यासारखा वागतो आहे. त्याला केक व पाव यातला फ़रक समजावण्याची वेळ जवळ येत चालली आहे.

(२२/१०/२०१६)

2 comments:

  1. आपला हा लेख नीतिविषयक विचाराचा अर्क आहे.जोपर्यंत आपल्यासारखे विचारवंत भले संख्येने कमी असतील पण निश्चितपणे प्रभावी लेखन करून समाजात बदल घडवून आणू शकतात.आपल्याला दीपावलीच्या शुभेच्छा.

    ReplyDelete
  2. भाऊ;यामागचे राजकारणी बाहेर यायला हवेत

    ReplyDelete