Saturday, October 29, 2016

सुरक्षेच्या कडेलोटावर

blasts RDX के लिए चित्र परिणाम

सगळीकडे भारत पाक सीमेवरील गोळीबार हिंसेच्या बातम्या येत असताना पालघर जवळील एका खेड्यात मिळालेला १५ किलो आरडीएसचा छुपा साठा, ही मोठी गंभीर बातमी आहे. कारण हा साठा तिथे कधी आला व कसा लपवला गेला, त्याचा थांगपथा पोलिसांना लागला नव्हता. अन्य कुठल्या गुन्ह्यातील आरोपींची चौकशी चालू असताना त्याची खबर लागली आणि तपास केला असता ओसाड जागी खड्डे खोदून लपवलेला हा साठा हाती लागला आहे. याचा एक अर्थ असा, की त्या गुन्हेगारांनी पोलिसांना अन्य चौकशीच माहिती दिली म्हणून हे प्रकरण उघडकीस आले. अन्यथा तो साठा तिथे तसाच पडून राहिला असता आणि सवडीने कधीतरी वापरला गेला असता. असे आणखी किती साठे लपवलेले असू शकतील आणि आपल्याला त्याची कल्पना नसेल, ही बाब अंगावर शहारे आणणारी आहे. पालघर जवळच्या ओसाड जागी हा साठा पोहोचला कसा, हा खरा प्रश्न आहे. पोलिसांच्या खबर्‍यांचे जाळे तल्लख असते तर हे काम सोपे झाले नसते. पण ते होऊ शकले, म्हणजेच पोलिस यंत्रणा अपेक्षेइतक्या जागरूक राहिलेल्या नाहीत. किंवा त्यांना टेहळणी करून गुन्हे हाणून पाडण्याचे मुख्य काम करायला सवड मिळत नसावी. पोलिसांच्या अशा ढिसाळपणाचा लाभ गुन्हेगार नेहमीच उठवत असतात आणि दहशतवाद हा तर अतिशय चतुराईने होणारा संघटित गुन्हा असतो. यासाठी सरकारवर ठपका ठेवणे ही आता फ़ॅशन झाली आहे. पण सामान्य जनता वा जागरुक नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे किंवा नाही, याचाही विचार व्हायला हवा. कारण पोलिस प्रत्येक ठिकाणी पहारे देत उभे राहू शकत नाहीत. सामान्य माणसाने जागरुक रहायचे ठरवले, तर पोलिस यंत्रणा समाजाला अधिक उपयुक्त रितीने वापरता येऊ शकते. पण आजकाल तसे होत नाही. कारण एकूण समाजच निष्काळजी झालेला आहे.

ज्या परिसरात हे आरडीएक्स लपवलेले होते, तो ओसाड असला तरी त्या परिसरात अनेक बेकायदा गोदामे उभारलेली आहेत. म्हणजेच तिथे वाहनांची येजा चालू असते. त्यापैकी कोणालाही याप्रकारच्या हालचाली दिसल्याच नसतील, असे ठामपणे म्हणता येणार नाही. काही हालचाली शंकास्पद असतात आणि काही लोकांचे वागणे संशयास्पद असते. त्याविषयी सामान्य माणूस थोडा चिकित्सक झाला, तरी सुरक्षा अधिक चोख राखली जाऊ शकते. जिथे ही स्फ़ोटके मिळाली, तिथे अनेक जागी खड्डे मारून ती गाडून ठेवलेली होती. हे खड्डे मारण्याचे काम सहजासहजी वा झटपट उरकणारे नाही. त्यासाठी अंगमेहनत आवश्यक असते. म्हणजेच तिथे अशी स्फ़ोटके आणुन लपवण्याच्या पुर्वीच असे खड्डे मारून घेतलेले असणे शक्य आहे. ओसाड जागी असे काम कोणी करीत असेल, तर शंकास्पद नक्कीच असते. पालघर मुंबईच्या नजिकचा भाग असल्याने इथे जमिनीच्या किंमती आकाशाला भिडलेल्या आहेत. सहाजिकच इथे कुठल्याही जमिनीच्या तुकड्यावर कोणी काही करीत असेल, तर नजरेत भरणारी बाब आहे. मग असे खड्डे मारण्याचे काम लपून कसे राहिले? पोलिसांच्या खबर्‍यांचे नेटवर्क सज्ज असेल, तर अशा बातम्या लपून रहात नाहीत. आणखी एक गोष्ट अशी की पैशासाठी वाटेल ते करणारा एक वर्ग, वाढत्या शहरांच्या भणंग वस्त्यांमधून निर्माण झाला आहे. झटपट मोठी कमाई करण्यासाठी अशी हजारो माणसे कुठल्याही मोठ्या शहरात रांग लावून उभी असतात. त्यांचा अशा बाबतीत सहज वापर करता येतो. त्यांना कोण कशासाठी पैसे देतो, याच्याही कर्तव्य नसते, की त्याच्या परिणामांशी घेणेदेणे नसते. त्याचाच फ़ायदा देशाचे शत्रू उठवू शकत असतात. शहरातील चमचमत्या झगमगणार्‍या दुनियेने लोकांना अशी भुरळ घातली आहे, की पैसा जादूची कांडी बनला आहे. त्याचा हा परिणाम आहे.

यापुर्वी मुंबईत दोनदा मोठ्या बॉम्बस्फ़ोट मालिका झालेल्या आहेत. कसाब टोळीने येऊन शेकड्यांनी नागरिकांना किडामुंगीप्रमाणे ठार मारले आहे. त्यानंतर तरी मुंबई वा तत्सम शहरातील लोकांनी जागरुकता दाखवण्याची गरज आहे. ही जागरुकता फ़क्त गुन्हेगारी व दहशतवादाच्या पुरती असायचे कारण नाही. अशा महानगरातील तुटपूंज्या सुविधा व यंत्रणांचा वापर पुरेपुर करता यावा, याचीही काळजी तिथेच पोटपाणी शोधाणार्‍यांनी घ्यायला हवी. दिडकोटी लोकसंख्येच्या घरात गेलेले मुंबई शहर किंवा दोन सव्वा दोन कोटी लोकसंख्या झालेला मुंबईचा परिसर; आता कडेलोटावर उभा आहे. तो एक सुप्त ज्वालामुखीच आहे. त्याचा भडका कधी उडेल त्याची कोणी हमी देऊ शकत नाही. म्हणूनच मुंबईकर म्हणवणार्‍या प्रत्येकाने हे शहर सुरक्षित होण्याची जबाबदारी आपल्यावरच असल्याप्रमाणे वागण्याची जगण्याची गरज आहे. त्यात मग तिथल्या सुविधा व यंत्रणांचा किंचीतही गैरवापर होऊ नये, ही जबाबदारी सर्वात मोठी आहे. त्यात मोर्चे निदर्शने वा अन्य कुठल्या गर्दीचा विषय आला; मग पोलिसांना बाकी सर्व गोष्टी सोडून अधिक लक्ष घालावे लागते. जेव्हा आपल्या नेहमीच्या कामातून पोलिस अशा अन्य कामात गुंतून पडतात, तेव्हाच गुन्हेगारांना व समाजकंटकांना आपले हातपाय हलवण्याचे मोकाट रान मिळत असते. त्यांना रोखणारा वा जाब विचारणाराच जागेवर नसला, मग अंमलीपदार्थ काय किंवा स्फ़ोटकांचा साठा काय, कुठूनही कुठेही हलवणे लपवणे सोपे होऊन जाते. जेव्हा अशा घातक पदार्थाचा प्रयोग होतो, तेव्हा तोच नागरिक भयभीत होऊन जातो आणि सुरक्षेसाठी त्याच पोलिस यंत्रणेकडून अपेक्षा बाळगू लागतो. पण पोलिसांना अन्य कामात गुंतवले नाही, तर ही मुलभूत कामे त्यांच्याकडून अधिक चोखपणे पार पाडली जातील व सामान्य नागरी जीवन अधिक सुरक्षित होऊ शकेल ना?

अन्य कुठल्या गुन्ह्यात हाती लागलेल्या गुन्हेगारांकडून माहिती वा खबर मिळाल्यावर पोलिस नेमक्या जागी पोहोचले. तरीही वरकरणी स्फ़ोटके मिळू शकलेली नव्हती. खास प्रशिक्षण दिलेल्या पोलिसी श्वान पथकाने हुंगून त्याचा वास काढला आणि मगच खड्डे उकरल्यावर या स्फ़ोटकांचा साठा हाती लागलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा साठा अशा ओसाड जागी लपवून ठेवला असेल आणि तिथे पहाराही देण्याची संबंधितांना गरज वाटलेली नसेल, तर असे किती साठे कुठे कुठे असतील, याची कल्पनाच भयावह आहे. आज देशात वातावरण तापलेले असताना पाकिस्तानचे हस्तक वा जिहादी मानसिकतेने बिघडलेल्या लोकांची संख्या कमी नाही. त्यांना अशाच घातक वस्तुंचा पुरवठा पाकिस्तान करू शकला, तर सीमेवरचे सैनिक देशाचे संरक्षण कसे करू शकणार? देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी नागरी सरकारप्रमाणेच सामान्य नागरिकांची असते. त्यात पुढाकार पोलिस यंत्रणेचाच असला पाहिजे. पण ती यंत्रणा जागरुक नागरिक अधिक प्रभावीपणे वापरू शकतो, हे विसरता कामा नये. दुर्दैवाने आपण तितके जागरुक नागरिक होऊ शकलेलो नाही. म्हणूनच धरणी, निदर्शने वा मेळावे आणि समारंभात पोलिसांना गुंतवून ठेवण्याचे पाप आपणच करत असतो. अधिक आसपास काय घडते याविषयी गाफ़ील रहाण्याला आपण मूलभूत हक्क समजतो. त्यातूनच आपण अतिरेक्यांना प्रोत्साहन देत असतो, याची जाणिव जर निर्माण झाली, तर आपल्याला अशा धोक्यातून वाट काढता येईल. अन्यथा थकलेले व कामाच्या बोजाखाली वाकलेले पोलिस, आपली सुरक्षा करू शकणार नाहीत. थोडे जवळपास व परिसरात काय घडते आहे, त्याचे भान ठेवून आपण नागरी कर्तव्य पार पाडण्यात पुढे येण्याची गरज आहे. पोलिसांवरचा भार कमी होईल, इतका संयम राखायला शिकलो पाहिजे. अन्यथा इतके आरडीएक्स अवघ्या महानगराला उध्वस्त करायला पुरेसे आहे.

1 comment:

  1. भाऊ,गेल्या कित्येक वर्षांत सर्वधर्म समभाव निधर्मि अंधश्रद्धा निर्मूलन हिंदू दहशतवाद अहिंसा arms act अशा बोगस गोष्टी वापरुन लोकांना विशेषकरुन हिंदूना षंढ बनवण्याचे काम यशस्वी करण्यात शत्रु यशस्वी झालेत परंतु गेल्या काही दिवसांत थोडाथोडा बदल लोकांत होतोय व शत्रु हस्तक उघडे पडायला लागलेत

    ReplyDelete