Wednesday, October 5, 2016

सेनादलाचे काम झाले! तुमचे काय?

JNU protest के लिए चित्र परिणाम

शत्रूला संपवण्याचा मार्ग म्हणजे त्याच्याशी लढाई, युद्ध इतकाच नसतो. त्यापेक्षा स्वस्तातला व कमी हानीचा मार्ग म्हणजे शत्रूची लढण्याची क्षमता व इच्छाच मारून टाकणे. शेवटी माणूस कशासाठी लढत असतो? एक भाऊ वा पिता आपल्या बहिण मुलगी वा पत्नी यांच्या इज्जतीसाठी कुठल्याही थराला जाताना आपण बघतो. कारण त्याला आपल्या घराणे, खानदान वा प्रतिष्ठेची किंमत आपल्या जीवापेक्षाही मोलाची वाटत असते. पण जर तशी मुलगी महिला देहविक्रयाचा उद्योगात असेल तर त्या कारणासाठी तो लढू शकणार नाही. अर्थात दरवेळी असे कुठल्याही महिलेसाठीच युद्ध वा लढण्याचा प्रसंग येतो असे नाही. कुठल्याही माणसाला कशाचा तरी अभिमान असतो आणि तो जपण्यासाठी तो सर्वस्व पणाला लावायला सिद्ध होत असतो. पण जर तसा कुठला अभिमान वा प्रतिष्ठाच त्याच्यापाशी नसेल, तर लढण्याचा वा प्रतिकार करण्याचा विचारही त्याच्या मनाला शिवत नाही. ह्या सगळ्या मानवी कल्पना व विकार आहेत. अन्य पशूमात्रांमध्ये तसे काही घडताना दिसणार नाही. कारण त्यांच्यात अशा धारणा, भावना वा प्रतिष्ठा वगैरे नसतात. बळी तोच कान पिळी हा निसर्गाचा नियम, त्यांनी निमूटपणे मानलेला आहे. पण माणसाची कहाणी वेगळी आहे. त्याने निसर्गाला झुगारून आपले काही नियम व संकल्पना विकसित केलेल्या आहेत. त्यात बळी तो कान पिळी, याला रानटीपणा संबोधले जाते. दुबळा असला तरी त्याच्यावर कोणी बलदंड माणुस अन्याय अत्याचार करताना दिसला, तर त्याचा प्रतिकार करण्याची मानवीवृत्ती, हीच त्याच्या संस्कृतीची साक्ष मानली जाते. त्यामुळे अन्य पशू केवळ अन्नासाठी वा माजावर आलेल्या माद्यांसाठी एकमेकांशी लढतात. तर आपल्या प्रतिष्ठेसाठी लढणार्‍याला, प्रतिकार करणार्‍याला माणूस म्हणतात. सहाजिकच लढाई युद्ध म्हणजे काय, ते लक्षात येऊ शकते.

मुद्दा युद्ध कोणाशी वा कशासाठी असा असतो. जो तुमच्या प्रतिष्ठेला वा अभिमानावर हल्ला करतो, तेव्हा त्यालाही तुम्हाला ठार मारायचे वा हिंसा करायची नसते, तर तुमच्यातली स्वयंभूवृत्ती वा स्वातंत्र्याची आकांक्षा खच्ची करायची असते. तुमची प्रतिकाराची वा लढण्याची इच्छाच मारून टाकायची असते. एकदा ते सिद्ध झाले मग युद्धाची गरज उरत नाही. तुम्ही प्रतिकारालाच सज्ज नसाल, तर येईल त्या दुर्दशेला सहज शरण जाता. म्हणून तुमच्यातल्या प्रतिकाराच्या इच्छेला मारून टाकणे अगत्याचे असते. त्यासाठी फ़क्त शस्त्र वा भेदक अस्त्राची गरज नसते. तुमच्यातला पुरूषार्थ वा खच्ची केला, तरी तुम्हाला गुलामागत वागवता येते. जेव्हा तुम्हाला गुलाम वा परावलंबी असण्याची शरम वाटेनाशी होते, तेव्हा तुमच्यातली लढण्याची क्षमता नष्ट होत असते. मागल्या कित्येक वर्षात पाकिस्तानने भारतातल्या अनेकांना हाताशी धरून तेच अस्त्र आपल्या विरोधात वापरलेले आहे. भारताला युद्ध परवडणारे नाही. युद्धाने जगाचा नाश होईल. अहिंसा हाच आपला धर्म आहे. युद्धापेक्षा वाटाघाटी व चर्चेनेही प्रश्न सुटतात. ही भाषा ऐकायला खुप चांगली वाटते. पण मग तीच भाषा अन्य बाबतीतही वापरता येईल की. नव्हे तीच भाषा अन्यत्र वापरली जाते आणि त्यातून आपल्याला उठताबसता दह्शत घालणारे गुंड, आसपास तयार होत असतात. आपण गुंड नाही, आपण सभ्य सुसंस्कृत माणसे आहोत. असल्या पांडित्यानेच गुंड सोकावत असतो. कारण त्याला समोरचे लोक सभ्यता म्हणून उलट शिवीगाळ हाणामारी करू शकत नाही, याची खात्री पटलेली असते. मग तो कुठलीही मनमानी करू लागतो. त्याचे बळ आपल्यातल्या दुबळेपणातून आलेले असते. आपल्याला सतत सभ्यतेचे पाठ पढवून प्रतिकारातची इच्छा मारून टाकणारेच त्यातले त्याचे मदतनीस असतात. ते आप्तस्वकीय असतात. पण व्यवहारात तेच आपल्या शत्रूचे खरे हस्तक असतात.

घरातून अवेळी मुलींनी बाहेर जाऊ नये. उशिरा घराबाहेर राहू नये. कुठल्याही मुलांमध्ये मिसळू नये, अशी सावधानतेची भाषा सतत बोलल्याने मुली महिलांना आपणच अबला बनवत असतो. ती स्वत:चे संरक्षण करू शकत नाही, हे तिच्या मनात बालपणापासून बिंबवले जाते आणि त्याच्या पुढली गोष्ट म्हणजे, तसे काही विपरीत घडले तर आम्हीही तुझ्यासाठी काहीही करू शकणार नाही, हे तिच्या मनावर ठसवणारे कोणी परके नसतात. त्यातून मुलीला भित्री बनवणे ही एक बाजू झाली, पण दुसरी बाजू तितकीच मोलाची आहे. अशा भित्र्या महिला मुली घडवून आपणच गुन्हेगार गुंडांचे बळ वाढवत असतो. घराघरात घडणारी हीच गोष्ट सामुदायिक व सार्वत्रिक बाबतीत केली गेल्यास, समाजच बुळा होऊन प्रतिकाराला घाबरू लागतो. हळुहळू त्याला प्रतिकार करणे वा तसा विचार करणेही भितीदायक वाटू लागते. दाऊद अथवा छोटा राजन कुठे बसलाय, ते आपल्या ठाऊक नसते. त्याचा आवाजही आपण कधी ऐकलेला नसतो. पण माध्यमातून त्यांच्या क्रौर्याच्या इतक्या कहाण्या आपल्याला कथन केल्या गेल्या आहेत, की नुसता फ़ोन आला व पलिकडल्या माणसाने दाऊद वा शकील बोलतो म्हटले, तरी आपल्या पोटात धडकी भरते. विनाविलंब लोक त्यांनी मागणी केलेली खंडणी द्यायला राजी होतात. पोलिसात जाण्याचेही बळ लोक गमावून बसले आहेत. आज पाक कलाकारांच्या बाजूने वकिली करणारा सलमान किंवा शाहरुख शकील समोर इतल्या हिंमतीने बोलू शकतील काय? कारण त्या गुंडांनी धमकी दिली तर तितकी हिंसा करण्याची त्यांची क्षमता प्रत्येकाला ठाऊक आहे. पोलिसही त्यांची हिंसा रोखू शकत नाहीत, म्हणून त्यांचा दबदबा आहे. पण त्याहीपेक्षा आपापल्या मनातली त्या नावांविषयी असलेली भितीच अधिक प्रभावी आहे. मग आपल्या मनात अशी भिती निर्माण करणारेच त्या गुंड माफ़ियांचे खरे सहकारी नाहीत काय?

ही भिती आपल्या मनात ठसवणारे हाताशी असले व काम करीत असले, मग गुंड गुन्हेगार दाऊद वा शकील यांना हत्यार वापरण्याची गरज भासत नाही. मग त्या  पाकिस्तानने तरी हत्यारे कशाला खरेदी करावीत किंवा वापरावी? पाकिस्तानने सगळी गुंतवणूक मागल्या कित्येक वर्षात भारतात असा भयगंड निर्माण करू शकणार्‍या लोकांमध्ये केलेली आहे. त्यांचे वेगवेगळे चेहरे आहेत. कधी ते भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा करतात. कधी ते भारतीय सेनेला बलात्कारी अत्याचारी ठरवण्यासाठी आपले बुद्धीसामर्थ्य पणाला लावतात. पाकिस्तानात जिहादी व घातपाती घडवल्याचा आरोप नेहमीच होत आला. पण पाकिस्तानने तितकेच केलेले नाही. घातपात्यांना त्यांनी त्यांच्या भूमीत प्रशिक्षण व आश्रय दिला असेल. पण भारतातही पाकिस्तानने मोठी गुंतवणूक केलेली आहे. विद्यापीठे, तिथले प्राध्यापक, कलावंत, माध्यमे अशा अनेक क्षेत्रात पाकिस्तानने कसोटीच्या प्रसंगी त्यांच्या बाजूने उभे रहाणारी फ़ौज भारतात निर्माण केलेली आहे. लोकमत बदलू शकणारी व जनमानसाला कुठल्या कुठे वळवून घेऊन जाऊ शकणारी, पाकिस्तानी फ़ौज आज भारतात तैनात आहे. इशरत, याकुब, अजफ़ल गुरू यांच्यासाठी दिवसरात्र एक करणारे आपण बघितले. तेच लोक कालपरवा पाकिस्तानवर हल्ला झाल्यापासून कसे विव्हळत आहेत ना? हे आजच होते असेही समजण्याचे कारण नाही. एका बाजूला ह्या लोकांनी भारतीयांची युद्ध व प्रतिकाराची शक्ती खच्ची करण्याचे काम केलेले आहेच. पण अतिशय कुशलतेने व चतुराईने भारतीय सेनेचे मनोधैर्यही खचवण्याचे डाव अनेकदा खेळलेले आहेत. त्यांची जंत्री मांडली तर पाकिस्तानची सेना सीमापार नसून आपल्याच देशात व आपल्याच आसपास वावरते आहे; हे लक्षात येईल. मात्र त्यांचा बंदोबस्त भारतीय सेना वा पोलिस-कायदा करू शकणार नाही. ते काम आपल्याला सामान्य भारतीयाला करावे लागणार आहे. बघायचेत असे गद्दार चेहरे? तपासायची आहेत त्यांची पापकृत्ये?

1 comment:

  1. भाऊ,लवकरातलवकर सदन सफाई मोहिम घडवायला हवी

    ReplyDelete