Saturday, October 22, 2016

पाकिस्तानी साक्षीदार

modi sharif के लिए चित्र परिणाम

सर्जिकल स्ट्राईक खरोखर झाला किंवा नाही? यापुर्वी असे प्रतिहल्ले आधीच्या शासनकाळात झाले किंवा नाही? सर्जिकल स्ट्राईक झालाच असेल, तर त्याचा पाकिस्तानला हादरा बसला की नाही? असे अनेक प्रश्न भारतात उपस्थित करण्यात आले. सहाजिकच भारतीय शहाण्यांची दोन गटात विभागणी झाली. ज्यांना मोदींचा विरोध करायचा असतो, त्यांना असा हल्ला खोटा वाटणे स्वाभाविक होते आणि मोदी कर्तबगारच आहेत अशीच ज्यांची ठाम समजूत आहे, त्यांना असा हल्ला अपुर्व वाटणेही स्वाभाविक आहे. पण यापैकी कोणाला सर्जिकल स्ट्राईकचा परिणाम तपासून घेण्याची इच्छा झाली नाही. कारण त्यांना राष्ट्रहित वा सुरक्षेशी कुठलेही कर्तव्य नाही. त्यांना आपापले राजकीय मुद्दे पुढे करण्यात मतलब असतो. त्यामुळे हल्ला वा प्रतिहल्ला दुय्यम होऊन जातो. यावरून खुप राजकारण झाले. कुठल्याही कृतीतल्या परिणामांमा महत्व असते. हल्ला किती मोठा यापेक्षा किती परिणामकारक, याला महत्व असते. त्याची साक्ष कोणीच काढली नाही की कोणी साक्ष देण्याचा विचारही केला नाही. ही बाब अर्थातच पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारी होती. कारण असा हल्ला झाला व जखमा झालेल्या असल्या तरी पाकिस्तानला ते कबुल करायचे नाही. भले नुकसान झाले तरी बेहत्तर, पण जखमी झाल्याचे वा मार खाल्ल्याचे कबुल करणे पाकला नामुष्कीचे आहे. म्हणूनच त्यांनी अशा हल्ल्याचा पहिल्यापासून इन्कार केला आणि भारतातल्या राजकीय वादळाने पाकसेना व सरकारच नव्हे; तर जिहादीही सुखावले तर नवल नाही. पण आपल्या जखम चाटत बसलेला पाकिस्तान जगाला दिसतो आहे आणि तिथलेही काही पत्रकार जाणकार त्याची साक्ष देऊ लागले आहेत. मोदी सरकारच्या काळातील सर्जिकल स्ट्राईक वा प्रतिहल्ल्याची भेदकता एका पाकिस्तानी राजकीय विश्लेषकानेच विदीत केली आहे. ती समजून घेण्यासारखी आहे.

मुनीर सामी नावाचे हे पाक पत्रकार विश्लेषक म्हणतात, सेनेने मार खाल्ला हे आपल्याच जनतेला सांगणे वा कबुल करणे पाकसेनेला वा सरकारला परवडणारे नाही. कारण ती जनता त्यांच्यावर उलटण्याचा धोका आहे. म्हणूनच पाकने अशा सर्जिकल स्ट्राईकचा साफ़ इन्कार करणे स्वाभाविक आहे. पण असे हल्ले भारत वारंवार करू लागला, तर मात्र पाकिस्तान नेस्तनाबुत होऊन जाईल. जिहादी कारवायांनी भारताला जखमी व रक्तबंबाळ करण्याची रणनिती खुप झाली आणि आता त्याचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे भारताचा संयम संपला आहे. शिवाय यापुर्वीचा भारत आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचा भारत; यामध्ये प्रचंड फ़रक आहे. आधीचे भारतीय नेतृत्व युद्ध टाळण्यासाठी कसरती करत होते आणि पाकिस्तानला युद्धाची खुमखुमी असल्यासारखा खेळ चालला होता. त्यामुळे सीमेवरच्या चकमकी नेहमीच्या असल्या तरी युद्धापर्यंत वेळ येऊ नये, अशी चिंता भारतच करीत होता. आज सर्जिकल स्ट्राईकमधून भारताने जो संदेश दिला आहे, तो युद्धाला सज्ज असण्याचा आहे. असा प्रतिहल्ला वा आक्रमकता राजकीय नेतृत्वाने यापुर्वी दाखवलेली नव्हती. म्हणूनच हा सर्जिकल स्ट्राईक अभूतपुर्व आहे. जिहादींच्या मदतीने पाकिस्तान भारतात जे घातपात घडवून आणतो, त्याच पद्धतीने भारतीय सेनेने असे सर्जिकल स्ट्राईक नित्यनेमाने करायचे म्हटल्यास, पाकिस्तानचे कंबरडे मोडून जाईल. कारण पाकिस्तानला युद्ध परवडणारे नाही. पाक मोठा संपन्न देश नाही. त्याला युद्धासाठी युद्धसाहित्यासाठी कर्ज काढावे लागते. परिणामी भारताने आक्रमक पवित्रा घेतला तर युद्धाशिवाय नुसत्या सर्जिकल स्ट्राईकनेच पाकिस्तानला बेजार करून टाकणे भारताला शक्य आहे. म्हणूनच जिहादी घातपाताच्या कारवाया थांबवणे व भारताशी गुण्यागोविंदाने नांदणे, पाकिस्तानच्या भल्याची गोष्ट असेल.

प्रत्येक युद्धात भारताने पाकिस्तानला मात दिलेली आहे आणि पाकिस्तानचेच नुकसान झाले आहे. असा इतिहास सांगून मुनीर सामी म्हणतात, आजवरची परिस्थिती वेगळी होती. पाकिस्तान जिहादी दहशतवादाच्या कारवाया करीत होता आणि भारतातून सतत शांतता व वाटाघाटीची भाषा बोलली जात होती. भारताचे नेतृत्व लढाई टाळण्याची भाषा बोलत राहिले, तोवरच दहशतवादाला वरचढ असणे शक्य होते. पण नरेंद्र मोदींच्या हाती भारताची राजकीय सुत्रे आली आणि भारतामध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. हा नेता राष्ट्रीय अस्मितेसाठी लढाईला घाबरत नाही आणि त्याच्या मागे शंभर सव्वाशे कोटी जनता ठामपणे उभी आहे. त्यामुळेच आता भारताने वाटाघाटी वा संवादातून विवाद सोडवण्याची भाषा सोडून दिली आहे. अशावेळी काश्मिरच्या कुरापती काढून संघर्षाचा पवित्रा पाकिस्तानच्या आवाक्याबाहेरचा आहे. हिंसेच्या मार्गाने काश्मिरचा वाद सोडवायला भारत तयार नव्हता, तेव्हा जिहाद हा प्रभावी मार्ग होता. पण आता मोदी युद्धाच्या पावित्र्यात आहेत आणि पाकिस्तानला जगाकडे मदतीची झोळी घेऊन फ़िरावे लागते आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाशी बरोबरी करणे चुक आहे आणि त्याला अंगावर घेण्याची भाषाही आत्मघातकी आहे. पाकिस्तानने त्यातून बाहेर पडायला हवे. अन्यथा लढाईचीही गरज नाही. नुसत्या सर्जिकल स्ट्राईकचा सातत्याने वापर करूनही मोदी वा त्यांच्या नेतृत्वाखालचा भारत पाकिस्तानला जेरीस आणू शकतो. आता काश्मिरपेक्षा पाकिस्तानच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागलेले आहे. अशावेळी वाटाघाटीतून वाद संपवण्य़ाला पाकने प्राधान्य द्यायला हवे. तोवर तरी काश्मिरचा विषय मध्ये आणून बोलणी फ़िसकटणार नाहीत, अशी काळजी घ्यायला हवीत. असा सल्ला मुनीर सामी यांनी दिला आहे. त्यातून सर्जिकल स्ट्राईकने काय साध्य केले, त्याचा अर्थ उलगडू शकतो. त्यामागच हेतू उमजू शकतो.

कुठलाही गुन्हेगार वृत्तीचा माणूस तुमच्यातल्या चांगुलपणाचा गैरफ़ायदा घेऊनच तुम्हाला सतावत असतो. कितीही झाले तरी तुम्ही आपला सभ्यपणा सोडणार नाही, ही त्याची खरी ताकद असते. एखाद्या क्षणी तुम्ही चांगुलपणा व सभ्यतेला तिलांजली देऊन प्रतिकाराला उतरलात, की गुंडाची गाळण उडते. कारण त्याने तुमच्याकडून एवढीच अपेक्षा केलेली नसते. मागल्या तीन दशकात पाकिस्तानने जिहादी दहशतवादाची रणनिती वापरली, तेव्हा भारताने कधीही सीमा ओलांडण्याचा किंवा पाक हद्दीत घुसून प्रतिकार करण्याचा विचारही केला नव्हता. उलट आपण तसे करत नाही, याचाच वृथा अभिमान भारत जगाला सांगत होता. पाकने कितीही कुरापती कराव्यात आणि कशीही हिंसा करावी. आम्ही हिंसा अत्याचार सहन करू, पण प्रतिहल्ला करणार नाही, ही भारताची जगजाहिर भूमिका असल्यानेच पाकिस्तान शेफ़ारला होता. भारताच्या अशा चांगुलपणाला त्याने दुबळेपणा मानला होता. मोदींच्या हाती नेतृत्व आल्यावर चांगुलपणातला नेभळटपणा काढून टाकला गेला. सभ्यपणाने समोर आलात तर सभ्य आणि वाह्यातपणा करायचा असेल, तर तुमच्यापेक्षा हिंसक प्रतिसाद मिळेल, हे दाखवले गेले. तेही लपूनछपून नाही, तर उघडपणे! इथे पाकिस्तानला धडकी भरली आहे. मुनीर सामी ते़च सांगत आहेत. भारतीय सेनेची कारवाई नवी नसली तरी भारत सरकारचा जबाबदारी घेण्य़ाचा पवित्रा नवा आहे. सर्जिकल स्ट्राईक सैनिकी कृती नाही तर राजकीय आहे, असेच त्यांना म्हणायचे आहे. जो अर्थ भारतीय शहाण्यांना, पत्रकारांना वा राजकारण्यांना उलगडला नाही, तो मुनीर सामी सांगत आहेत. म्हणून त्यांना सर्जिकल स्ट्राईकचे पाकिस्तानी साक्षीदार म्हणायला हरकत नसावी. कारवाई नवी नाही, तिला चालना देणारे राजकीय धोरण नवे आहे. त्यामागचा खंबीर नेता नवा आहे. डोळे उघडूनही उपयोग नसतो. बघायची इच्छा असल्याशिवाय ते दिसणार नाही.

6 comments:

 1. मुनीर सामी, भारताचा deep asset?

  भारतानी युद्ध टाळाव हिच भाषा पाकिस्तानी deep assets म्हणजेच भाडोत्री बुद्धिजीवी काल पर्यंत बोलत होते ना?

  ReplyDelete
 2. छानच भाऊ मस्तच

  ReplyDelete
 3. एकाच्या बदल्यात आठ , पुन्हा एकदा मोदीनीति अधोरेखित झाली आहे.

  ReplyDelete
 4. भाऊ,सेनेने सांगितलय सगळ संपल ज्यांचा विश्वास नाही त्यांना त्यांच्याच कायद्याप्रमाणे उंटावर उलट बसवुन विचित्र कपडे घालुन डोक्यावर लाकडी टोपी घालुन धिंड काढुन दगड मारुन संपवायला हवे

  ReplyDelete
 5. भाऊ... अगदी अचुक विश्लेषण.. ग्रेट

  ReplyDelete
 6. भाऊ सध्या जागतिक राजकारणात एक बातमी आली ती म्हणजे अशी की UNHRC (united nations human rights council) मधून रशिया ला बाहेर काढलं आहे आणि सौदी अरेबिया ला घेतलं आहे...तसं बघायला गेलं तर मध्य पूर्वेतील देशांवर सध्या सौदी बोंब हल्ले करत आहे. आणि या परिषदेमध्ये त्यांना जागा असण्याची काही गरज नाही.
  या बद्दल आपण लेख लिहावात हि विनंती

  ReplyDelete