Friday, October 14, 2016

मोदींचा राजकीय स्वार्थ

नेहरू विद्यापीठात कॉग्रेसच्या विद्यार्थी संघटनेने मोदींना रावण ठरवून पुतळ्याचे दहन केले. त्यातून सर्जिकल स्ट्राईक कोणाला झोंबलाय त्याचीच रचिती येते ना?

JNU modi ravan के लिए चित्र परिणाम

राजकारणातले लोक आपापल्या पक्षाचे राजकीय स्वार्थ साधण्याच्या संधीच शोधतच असतात. किंबहूना अशा संधी निर्माण होण्यासाठी दबा धरून बसलेले असतात. मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्षातले असोत. पंतप्रधानपदी असले तरी नरेंद्र मोदी हे राजकारणी आहेत आणि पक्के चतुर राजकारणी आहेत. सहाजिकच एका बाजूला देशाचा कारभार संभाळताना त्यांना आपल्या पक्षाचे स्वार्थ विसरून चालत नाही. म्हणूनच सध्या जे पाकविरोधी वातावरण देशात निर्माण झाले आहे, त्याचा राजकीय फ़ायदा उठवण्याचा त्यांनी प्रयत्नच करता कामा नये, ही अपेक्षा गैरलागू मानावी लागेल. पण त्यांच्या विरोधकांची तशी अपेक्षा आहे आणि ती पुर्ण करायला मोदी बांधील नाहीत. विजयादशमीच्या निमीत्ताने देशभर सोहळे होत असतात आणि त्यात राजकीय मान्यवरांनाही आमंत्रित केले जात असते. यावर्षी लखनौ येथील एका रामलिला सोहळ्याच्या अंतिमदिनी पंतप्रधानांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले होते आणि मोदींनी ते स्विकारले. त्यामागे त्यांचा हेतू आगामी विधानसभा निवडणूका आहेत, हे नाकारण्यात अर्थ नाही. त्यांची उपस्थिती आणि पाकला शिकवलेला धडा; या दोन गोष्टी मतदानात भाजपाला लाभदायक ठरतील, हे विरोधकांनाही कळते. म्हणूनच विरोधकांनी त्याविषयी आदळआपट चालविली आहे. कारण यातला फ़टाक्याचा भव्य रावण पाकिस्तानच्य रुपाने रंगवला आहे आणि त्या प्रतिकात्मक रावण दहनातून मोदी मते मागणार, असा आक्षेप आहे. ते खरेही आहे. त्याला राजकीय पाभ उठवणेच म्हटले पाहिजे. पण त्यांच्या विरोधकांनी त्यापेक्षा वेगळे असे आजवर काय केले आहे? ‘खुनकी दलाली’ विरोधकांनी केलेली नाही काय? मागल्या बारातेरा वर्षात गुजरात दंगलीचे राजकीय भांडवल करणार्‍यांनी कसला व्यापार किंवा दलाली केली आहे? देशभर त्याच दलालीचा वाडगा घेऊन विरोधक फ़िरत राहिले नव्हते काय?

पाक हद्दीत केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय लाभ मोदी वा भाजपा उठवतात, असा आक्षेप आहे. कारवाई सैन्याने केली. लाभ भाजपाने कशाला घ्यावा, असाही त्याचा युक्तीवाद आहे. पण सैन्याच्या याच कारवाईचे श्रेय भाजपाने घेऊ नये, अशी अपेक्षा कशाला? आजवर सैन्याने अनेक कारवाया केलेलया आहेत आणि काश्मिरात सैन्याच्या कारवाया मोदी पंतप्रधान होण्याच्याही आधीपासून चालू आहेत. तेव्हा त्या सैन्याच्या कारवाईची जबाबदारी कुठल्या पक्षाने घेतली आहे? प्रत्येकवेळी कारवाईत काही गफ़लत झाली वा थोडाफ़ार अतिरेक झाला, तर कुठला राजकीय पक्ष सेनेच्या समर्थनाला उभा राहिला होता? मरणार्‍या सैनिकांसाठी दोन अश्रु ढाळायला कुठला पक्ष पुढे आला होता? मरणार्‍या जवानांसाठी ज्यांना आस्था कधी वाटली नाही, त्यांनाच आज सैनिकांच्या कर्तबगारीचा उमाळा आलेला आहे. पण जेव्हा काश्मिरात याच भारतीय सेनेवर बलात्कार वा अत्याचाराचे आरोप झाले, तेव्हा मात्र त्याची जबाबदारी कोणी घेतली नाही. एकाही पक्षाने त्यांची वकिली करण्यासाठी दोन शब्द उच्चारले नाहीत. अशावेळी मोदी सरकारवर खापर फ़ोडले गेले ना? पेलेटगनचा वापर झाला म्हणून संसदेत कोणाला जाब विचारला होता? पेलेटगनच्या वापराने काही मृत्यू झाले वा शेदोनशे लोकांना इजा झाली, तेव्हा त्यातला आरोपी कोण होता? राहुल गांधी किंवा मायावती-मुलायम अंगावर आरोप घ्यायला पुढे सरसावले नव्हते. सैन्याकडून चुक झाली, तर ते खापर मोदींनी आपल्या माथी फ़ोडून घ्यायचे. तेव्हा आरोपी भाजपा असणार. कारण भाजपा राज्यकर्ता पक्ष आहे. मात्र त्याच सेनेने चांगली कारवाई केली, मग त्याचे श्रेय भाजपा किंवा मोदींनी घेता कामा नये. किती विरोधाभास आहे ना? लाभ घेतला मग पाप असते आणि तोटा सोसायची वेळ आली, मग मात्र मोदी पुढे असतात. कुठली हिशोबाची पद्धत आहे ही?

आज ज्यांना भारतीय सेनेच्या गुणवत्तेचा कळवळा आलेला आहे, त्यांनी नेहरू विद्यापीठातल्या कन्हैया नामक विद्यार्थी नेत्याच्या गळ्यात गळे कशाला घातलेले होते? त्याने काश्मिरातली भारतीय सेना हटवा. तिथे भारतीय सैनिक बलात्कार करतात, असा आरोप केला. तेव्हा त्याला हारतुरे देऊन सत्कार करायला कोण धावले होते? राहुल गांधी, केजरीवाल किंवा सीताराम येच्युरीच त्यात पुढे होते ना? तेव्हा यापैकी कोणाला भारतीय जवानाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली जाते आहे, त्याची आठवण तरी झाली होती काय? तेव्हा त्या जवान भारतीय सैनिकांच्या पाठीशी जो ठाम उभा राहिला, त्यालाच आज भारतीय सेनेच्या सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेण्याचा नैतिक अधिकार आपोआप पोहोचत असतो. त्यासाठी संसदेची वा कुणा विरोधी पक्षाची संमती घेण्याची तिळमात्र गरज नसते. उलट त्याला आक्षेप घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार विरोधकांना उरलेला नसतो. राजकारण बाजूला ठेवले, तरी तो अधिकार नरेंद्र मोदींना नक्कीच आहे. कारण याचवेळी नाही, इशरत जहान चकमकीच्या प्रसंगी वा गुजरात दंगलीच्या प्रसंगी आपल्या पोलिसांच्या मागे ठामपणे उभे रहाण्याची हिंमत त्याच नेत्याने दाखवलेली आहे. ‘खुनकी दलाली’ म्हणायची तर मोदी विरोधकांनी नेहमी तोच धंदा केलेला आहे. गुजरातच्या दंगलीची छायाचित्रे आपापल्या राज्यात व प्रचार मोहिमांमध्ये ठळकपणे प्रदर्शित करून मृतदेहाचे राजकीय भांडवल मोदींनी वा भाजपाने केलेले नाही. आज ज्यांना सर्जिकल स्ट्राईकनंतर पुळका आला आहे, त्यांनीच नेहमी अशा मृतांचे राजकीय लाभ उठवलेले आहेत. मग मोदींनी राजकीय लाभ घेण्यात गैर ते काय असू शकते? फ़ार कशाला तसा खोटा प्रचार करूनही रक्ताची दलाली केल्याचे शेवटी सुप्रिम कोर्टातही सिद्ध झालेच ना? मग आज मोदींच्या विरोधातला आक्रोश काय साधणार आहे?

संजीव भट नावाच्या एका पोलिस अधिकार्‍याने अफ़वा पिकवली, की गोध्रा येथील घटना घडल्यावर दंगल उसळली, तर पोलिसांनी कुणला रोखू नये असे मुख्यमंत्री मोदींचे आदेश होते. हा दावा नंतर प्रतिज्ञापत्रातून कोर्टातही केला गेलेला होता. पण कोर्टानेच नेमलेल्या खास तपास पथकाने कसून तपासणी केल्यावर संजीव भटने ही निव्वळ अफ़वा पसरवली, हेच सिद्ध केले. म्हणजे जो आरोप मोदींवर बारा वर्षे होत राहिला, तोच सुप्रिम कोर्टात पुराव्यानिशी खोटा पडला. पण त्याच अफ़वेचा आधार घेऊन बारा वर्षे मोदी विरोधात ‘खुनकी दलाली’ कोणी केलेली होती? त्या दंगली हकनाक मारल्या गेलेल्या लोकांच्या हत्येवर किती लोकांनी उदरनिर्वाह केला होता? आज तेच लोक लखनौ येथील रामलिला समारंभात मोदी सहभागी होणार म्हणून कशाला गळा काढत आहेत? सेनादलाच्या आजीमाजी अधिकार्‍यांनीही सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय विद्यामान सरकारच्या राजकीय निर्णयशक्तीला दिलेले आहे. तेव्हा अकस्मात ज्यांना सेनाप्रेमाचा उमाळा आला आहे, त्यांचे दुखणे समजू शकते. त्यांना सेनेचे वा तिच्या कारवाईचे कुठलेही कौतुक नाही. तर त्याचा लाभ मोदींना मिळणार या पोटदुखीने पछाडले आहे. गेल्या तीन दशकात काश्मिरात शेकड्यांनी भारतीय जवान मारले गेले आहेत. त्यांच्या बाजूने यापैकी किती लोक उभे राहिले? उलट त्याच जवानांचा बळी घेणार्‍या जिहादी बुर्‍हान वाणीच्या हत्येनंतर उफ़ाळलेल्या दंगलीचे समर्थन करायला यातले बहुतांश लोक पुढे आले होते. तेव्हा भारतीय सेनेचा बचाव मोदी सरकारला करावा लागला होता. मग आज त्याच भारतीय सेनेच्या कर्तबगारीचा लाभ भाजपाने घेतला तर गैर ते काय? राजकारण हे राजकीय लाभ उठवण्यासाठीच असते आणि आपले राजकीय स्वार्थ विसरून भरकटलेल्या मोदीविरोधकांना त्याचे भान केव्हाच ठेवता आले नाही. म्हणूनच मोदी या सर्वांना एकहाती पराभूत करू शकले आहेत.

1 comment:

  1. भाऊ,चांगला बनिया लहान दुकान व्यवस्थित चालवतो;बाजुचे गाळेघेऊन दुकानाच्या सीमा वाढवतो दुकानातील माल वाढवतो विकतो हे करत असताना पोट भरण्यासाठी नफा मिळवायला हवा ना??? पोट भरले असेल तरच उद्या व्यापार करु शकेल तरच उद्याही दुकान व्यवस्थीत चालेल,ही गोष्ट कळली असती तर यांनी घर जाळुन कोळसे विकले नसते आता घर नाही म्हणून बोंबलतायत

    ReplyDelete