Friday, October 28, 2016

द्रविडी राजकारणाची शोकांतिका

jaya MGR के लिए चित्र परिणाम

विसाव्या शतकात भारताची स्वातंत्र्य चळवळ जोरात असतानाच अनेक सामाजिक सुधारणेच्या चळवळीही सुरू झाल्या होत्या. त्यामध्ये दक्षिणेतील द्रविड कझागम ही मुख्य चळवळ होती. तिचा रोख प्रामुख्याने धार्मिक जातियवादी जोखडाखालून समाजाला मुक्त करण्याकडे होता. रामस्वामी पेरियार हे त्याचे म्होरके विचारवंत होते. तर सी. अण्णादुराई हे त्यांचे कल्याणशिष्य़ म्हणावेत, असे तरूण सहकारी होते. ह्या चळवळीचे मुख्य सुत्र ब्राह्मणविरोधी वा ब्राह्मणेतर चळवळीसारखे होते. सहाजिकच त्यात देवधर्म वा पौरोहित्यावर सतत आघात केले जात होते. किंबहूना मुर्तीभंजकांची चळवळ असेही तिच्याकडे बघितले जात होते. पण पुढल्या काळात रामस्वामी यांनी उतारवयात कोवळ्य़ा वयातच्या तरुणीशी लग्न केले म्हणून गुरूशिष्यांमध्ये मतभेद निर्माण झाले. पण दुसरीकडे त्याला राजकीय झालरही होती. या संघटनेतला एक गट राजकीय निवडणूका लढवायला उत्सुक होता, तर पेरियार यांचा त्याला विरोध होता. निवडणूका व सत्तापदांमुळे वैचारिक मुद्दे बाजूला पडून, सत्तासंपादन हेच मुख्य उद्दीष्ट बनून जाण्याचा धोका त्यांना वाटत होता. म्हणूनच त्यांनी निवडणूका लढवण्यास विरोध दर्शवला होता. त्यामुळे चळवळीचे व संघटनेचे गट पडले आणि अण्णादुराई यांनी वेगळ्या राजकीय संघटनेची चुल मांडली. विचार पेरियार यांचे, पण नेतृत्व अण्णादुराई यांचे, अशी मग द्रविड मुन्नेत्र कझागम पक्षाची सुरूवात झाली. अवघ्या चार वर्षांनी लोकप्रिय अभिनेता एमजीआर म्हणजे रामचंद्रन त्यात सहभागी झाले. त्यांच्यामुळेच त्या पक्षाला लोकप्रियता मिळत गेली. अण्णादुराई पटकथा लेखक होते आणि रामचंद्रन अभिनेता. करूणानिधी हा त्याचा निकटचा सहकारीही उत्तम पटकथा लेखकच होता. आज त्याच चळवळीची काय स्थिती आहे? जयललिता नावाच्या मुख्यमंत्र्याची व्यक्तीपूजा हे त्यांचे कार्य होऊन राहिले आहे.

आरंभी निवडणूकीपासून दुर असलेल्या द्रमुकने १९५७ सालात निवडणूकीच्या राजकारणात प्रवेश केला आणि अवघ्या दहा वर्षात त्यांनी सत्तेपर्यंत मजल मारली. तेव्हा वेगळे द्रविडीस्थान अशी त्यांची मागणी होती. शिवाय हिंदी ही राष्ट्रभाषा करण्यालाही त्यांचा कडाडून विरोध होता. मात्र आज त्याच्या कुठल्याही खाणाखुणा तामिळनाडूत दिसत नाहीत. पेरीयार वा अण्णादुराईंच्या विचारांचे नामोनिशाण तिथे उरलेले नाही. १९६७ सालात सार्वत्रिक निवडणूकीत द्रमुकने कॉग्रेसला संपवले आणि आजपर्यंत पुन्हा कधी कॉग्रेस तिथे सत्तेपर्यंत पोहोचू शकलेली नाही. पक्षाला सत्तेपर्यंत घेऊन गेलेले अण्णादुराई, १९६७ सालात पहिले मुख्यमंत्री झाले. पण फ़ारकाळ जगले नाहीत. अल्पावधीतच त्यांचा देहांत झाला आणि करुणानिधी यांच्या हाती पक्षाची सुत्रे गेली. येत्या वर्षी त्याला अर्धशतक पुर्ण होईल. पण गमतीचा भाग असा, की ज्या ब्राह्मणविरोधी द्रविडी अस्मितेचा झेंडा घेऊन हा पक्ष व चळवळ उभी राहिली; तिची सुत्रे आज कन्नड ब्राह्मण असलेल्या जयललितांच्या हाती गेली आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे आणि त्यांना लौकरात लौकर बरे करण्यासाठी मंदिरात पुजाअर्चा चालल्या आहेत. होमहवन चालू आहे. ज्या विचारांनी त्या राजकीय पक्षाचा आरंभ झाला, त्याचीच होळी या व्यक्तीस्तोमामुळे होऊन गेली आहे. स्थिती इथपर्यंत कशामुळे आली? तर करूणानिधी यांनी सत्ता हाती घेतल्यावर आपल्या पुत्राला चित्रपटात सुपरहिरो बनवण्याचा घाट घातला आणि रामचंद्रन अस्वस्थ झाले. समकालीन दोन मित्रांमध्ये धुमश्चक्री सुरू झाली. त्यामुळे एमजीआर बाजूला झाले आणि त्यांनीच अण्णाद्रमुक नावाचा वेगळा पक्ष स्थापन केला. पुढल्या निवडणूकांमध्ये कॉग्रेसला हाताशी धरून त्यांनी बहूमत व सत्ता मिळवली. खरे तर ती करुणानिधींचीच चुक होती. विचारांपेक्षा निवडणूकींच्या यशाच्या मागे धावत सुटल्याचा तो परिणाम होता.

अण्णादुराई यांच्याइतके करुणानिधींचे व्यक्तीमत्व प्रभावी नव्हते. त्यामुळेच १९७० च्या दशकात त्यांनी पक्षाच्या प्रचारात रामचंद्रन यांचा मुक्त वापर केला आणि पक्षाला आपणच यश मिळवून देतो, असे जाणवल्याने रामचंद्रन शिरजोर होऊ लागले. करुणानिधींनी त्यांना पक्षाबाहेर काढले खरे पण तीच मोठी चुक होती. तामि्ळनाडूत प्रत्येक चित्रपट अभिनेत्याच्या चहात्यांची गावोगावी मंडळे असतात आणि अशा मंडळांचे महासंघ असतात. पक्षतून हाकालपट्टी झाल्यावर रामचंद्रन यांनी रातोरात अशा चहाते मंडळांचे आपल्या नव्या पक्षाच्या शाखेत रुपांतर केले. त्यातून द्रमुकला मोठे आव्हान उभे राहिले. त्या दणक्यातून करूणानिधी सावरू शकले नाहीत. १९७७ सालात या नव्या पक्षाने कॉग्रेसच्या मदतीने द्रमुकला पराभूत केले आणि करुणानिधी दिर्घकाळ वनवासात गेले. लागोपाठ दोनदा रामचंद्रन यांनी विधानसभा जिंकली. मग त्यांनी आपली पडद्यावरची लोकप्रिय नायिका जयललिता यांना वाजतगाजत पक्षात आणले. तो समारंभच असा योजला होता, की ही नायिकाच आपली वारस असल्याचे त्यांनी घोषित केले होते. जयललितांना राज्यसभेत पाठवण्यात आले व प्रचारप्रमुखाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर रामचंद्रन यांची प्रकृती खालावत गेली. एक वेळ अशी आली, की ते जिवंत आहेत की नाही, अशी शंका घेतली जात होती. योगायोगाने तशी शंका घेऊन प्रश्न विचारणारे करुणानिधीच होते. कारण याच अपोलो इस्पितळात रामचंद्रन यांना उपचारार्थ दाखल केलेले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीविषयी कमालीची गोपनीयता पाळली जात होती. अगदी त्यांनी वारस ठरवलेल्या त्यांच्या लाडक्या नायिकेलाही इस्पितळात फ़िरकू दिले जात नव्हते. त्यांची पत्नी जानकी व आतल्या वर्तुळातील दरबारी, यांची तटबंदी भोवताली उभी करण्यात आलेली होती. ती भेदण्याचा प्रयास केला म्हणून जयललितांवर हल्लाही झालेला होता.

१९८८ सालात देशातले राजकारण बदलत असतानाच रामचंद्रन यांचा अवतार संपलेला होता आणि दरबार्‍यांनी जयललितांना बाजूला फ़ेकून सत्तेची सुत्रे आपल्याच हाती घेतली होती. मुख्यमंत्र्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी जानकी अम्माला वारस बनवून दरबारी मंडळींनी मुख्यमंत्रीपदी बसवले आणि काहीकाळ कारभार चालवला. पण १९८९ सालात निवडणूका समोर आल्या. अण्णा द्रमुकही दुभंगला होता. महानायकाची नायिका विरुद्ध पत्नी अशी नवी लढाई पक्षात उभी राहिली. हा वाद इतक्या टोकाचा होता ,की रामचंद्रन यांच्या अंत्ययात्रेत मृतदेहाच्या जवळही जयललितांना फ़िरकू देण्यात आले नव्हते. त्यांनी त्सा प्रयत्न केल्यावर त्यांना धक्के मारून पिटाळण्यात आले होते. तेव्हा त्यांनी वेगळ्या गटाची चुल मांडली आणि काही नेते त्यांच्यासोबत आलेही. मात्र विधानसभा निवडणूकीत दुभंगलेल्या अण्णा द्रमुकाला संपवून पुन्हा करूणानिधी सत्तेत आले. तर राजकारणातला पिंड नसल्याने दरबार्‍यांना झुगारून जानकी अम्मांनी उरलासुरला पक्ष जयललितांच्या हाती सोपवला. तिथपासून रामचंद्रन यांचा संपुर्ण वारसाच जया अम्माकडे आला. आज त्याच अपोलो इस्पितळात दाखल आहेत आणि तीस वर्षापुर्वीचा घटनाक्रम जसाच्या तसा उलडताना दिसतो आहे. कोण त्यांच्या वतीने कारभार करतो आहे आणि खरेच जया अम्मा कामकाज करण्याइतक्या हयात आहेत काय, इथपर्यंत शंका घेतल्या जात आहेत. ज्याप्रकारे देशभरच्या विविध मोठ्या नेत्यांनी त्यांच्या दर्शनासाठी इस्पितळाकडे मोर्चा वळवला, त्यावरून त्या शंका अधिकच गडद झाल्या आहेत. १० आक्टोबरपासून त्यांच्या प्रकृतीची कुठलीही माहिती समोर आलेली नाही आणि त्याविषयी शंका घेणार्‍यांवर अफ़वा फ़ैलावल्याचे आरोप लावून पोलिस कारवाईही होत आहे. खरेच अम्मा धडधाकट आहेत, तर त्यांच्या प्रकृतीविषयी इतके गुपित पाळण्याची काय गरज आहे?

चार वर्षापुर्वी अशाच दिवाळीच्या कालखंडात देशभरचे नेते व मान्यवर मुंबईतल्या मातोश्री बंगल्याकडे येत जात होते. अखंड लोकांची रीघ लागलेली होती. आत जाऊन येणार्‍यांचे चेहरे उत्साहवर्धक नव्हते की खुललेले दिसत नव्हते. पण बाहेर येणारा प्रत्येकजण बाळासाहेब ठाकरे चांगल्या स्थितीत असल्याचे हवाले देत होता. डॉक्टरही नेमके काही सांगत नव्हते. पण प्रकृती चिंताजनक होती हे कोणी नाकारू शकत नव्हता. दिवाळीचे तीन दिवस उलटले आणि मुंबईतल्या बहुतेक घरासमोरचे आकाशदिवे विझलेले होते. मातोश्रीमध्ये जाऊन बाहेर येणारे तमाम मान्यवर खोटे बोलत नव्हते. पण खरेही बोलत नव्हते. साहेबांची प्रकृती खुप खालावलेली होती आणि डॉक्टर्स काळाशी झुंजत पराकाष्टेचा प्रयास करीत होते. पण डॉक्टर्स कितीही हुशार व कुशल असले, तरी रुग्णाच्या देहाकडूनही उपचारांना प्रतिसाद मिळण्याची अतिशय गरज असते. तरच अशा कुशल डॉक्टरांचा उपयोग असतो. बाळासाहेबांच्या बाबतीत कितीही हवाले दिले गेले, तरी कोणी त्यांचे चित्रण वा छायाचित्र समोर आणलेले नव्हते. अर्थात आज तशी मागणी करुणानिधी करीत आहेत, तशी तेव्हा कोणी करीत नव्हते. कारण प्रत्येकाच्या मनात पाल चुकचुकत होती. पण सदिच्छा म्हणूनच तसे होऊ नये, अशी प्रत्येकजण मनोमन प्रार्थना करत होता. त्यात कुठलेही राजकारण नव्हते. उलट जयललितांच्या बाबतीत मात्र गलिच्छ राजकारण चालू आहे. अर्थात त्याला त्यांच्या भोवतालचे दरबारी वातावरण जबाबदार आहे. आपली प्रकृती नाजूक होते असे वाटल्यावर त्यांनी कोणाला तरी तात्पुरता वारस म्हणून घोषित केले असते; तर असे राजकारण करायची कोणाला संधी मिळाली नसती. पण जिथे कारभार एकखांबी असतो, तिथे असेच होत असते. इंदिराजींच्या हत्येनंतर काही तास देशाला कोणी पंतप्रधान नव्हता. कारण त्यांच्या मृत्यूची घोषणा कोणी करायची त्याचाही कोणाला पत्ता नव्हता.

सकाळी अकराच्या सुमारास त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या गेल्याने घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झालेला होता. पण तसे झाल्याचा निर्णय कोणी घ्यायचा? इंदिरा गांधींचा पक्ष व राजकारण एकखांबी होते. म्हणूनच बंगालच्या दौर्‍यावर असलेले त्यांचे राजकीय वारस राजीव गांधी दिल्लीत येईपर्यंत कोणी मृत्यूची वाच्यता केलेली नव्हती. दिवस मावळताना राजीव दिल्ली पोहोचले आणि राष्ट्रपती झैलसिंग यांनी त्यांना थेट पंतप्रधान पदाची शपथ दिल्यावर इंदिराजींच्या निधनाची वार्ता जगजाहिर झाली होती. जेव्हा असे टोकाचे सत्ताकेंद्री राजकारण गुंतलेले असते, तेव्हा दरबारी लोक आपापले स्वार्थ व मतलब लक्षात घेऊनच खेळी करत असतात. ज्याच्या नावाने कारभार चालतो, त्यालाही अनेकदा अंधारात ठेवून काही निर्णय घ्यायला भाग पाडले जात असते. जयललितांचे राजकारण काहीसे तसेच राहिले आहे. पक्षातल्या कुणाही सहकार्‍यालाही त्यांच्या मनाचा कधी थांग लागलेला नाही. यापुर्वी दोनदा तुरूंगात जावे लागले तेव्हा त्यांनी पनीरसेल्वम नावाच्या सहकार्‍याला मुख्यमंत्री नेमलेले होते. इतके असूनही त्याच नेत्याने आज परस्पर अम्माच्या वतीने कारभार हाकण्याची हिंमत केलेली नव्हती. सतत अम्माची प्रकृती व येणारे निर्णय त्यांनी शुद्धीतच घेतलेले आहेत काय; अशी विचारणा झाल्यावर तोडगा म्हणून पनीरसेल्वम यांच्याकडे राज्यपालांनी कारभार सोपवला आहे. ह्या निर्णयाचा अर्थच स्पष्ट आहे, की दिर्घकाळ जयललिता स्वत:च्या बुद्धीने व देहाने सरकारचा कारभार हाकण्यास असमर्थ आहेत. तसे नसते तर दोनचार दिवसात बर्‍या होणार्‍या व्यक्तीसाठी आपला वारस नेमण्याची गरज भासली नसती. पण कुठेतरी गडबड आहे. तिचा खुलासा करण्यापेक्षा ते औत्सुक्य दडपल्याने लोकांच्या मनात शंकांचे संशयांचे काहूर दाटले आहे. किंबहूना सगळीकडून पिकणार्‍या अफ़वांची विश्वासार्हता वाढत चालली आहे.

खरेतर आरंभापासूनच तात्काळ डॉक्टरांनी जया अम्माला कल्पना दिली असती आणि दिर्घकालीन उपचाराची गरज सांगून सावध केले असते; तर अशी विचित्र स्थितीच निर्माण झाली नसती. पण एकूणच जया अम्माचे आयुष्य व त्यांचा जीवनक्रम गोपनीय व रहस्यमय असल्याने ही स्थिती अपरिहार्य होऊन गेली आहे. सतत बंदिस्त किल्ल्यात रहाणार्‍या अम्मा निवडणूक प्रचारात बंदिस्त गाडीतून लोकांना दर्शन देत वा जाहिर सभेत व्यासपीठावरून भाषण देत आल्या आहेत. मागल्या २५ वर्षात त्यांनी असा एकाकीपणा पत्करला आहे. अगदी निवडणूका जिंकल्यानंतरही आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत येऊन विजयाची खुण करण्यापलिकडे त्या लोकांमध्ये मिसळत नाहीत, की सभासंमेलनात त्यांनी कुणाची गळाभेट केल्याचे कोणी बघितले नाही. सहाजिकच पडद्यावरून अंतर्धान पावलेल्या पात्राप्रमाणे त्यांच्याविषयी संशय शंकांचे रान पिकले आहे. त्यात पुन्हा प्रकृतीच्या बाबतीत दरबारी मंडळींनी कमालीची गोपनीयता पाळत प्रत्येक शंकेचा पुराव्याशिवायच इन्कार केल्याने गावगप्पांना तेजी आली. आताही खरे कोण बोलतो अशीच लोकांना शंका आहे. बहुतेक राजकीय पक्षांचे नेते त्यांना भेटल्याचे सांगितले जाते आणि त्यांनीही प्रकृती बर्‍यापैकी असल्याची ग्वाही दिली आहे. पण तामिळनाडूतील विरोधकांनी तिथे जाऊनही त्यांना भेटू दिले जात नाही, अशा तक्रारी केल्या आहेत. म्हणून ह्या अफ़वा थांबलेल्या नाहीत. त्याचवेळी त्यांचे चहाते व अनुयायी नेत्यनेमाने होमहवन, पूजाअर्चा व नवस करीत आहेत. हे प्रकृती ठणठणीत असल्याचे लक्षण मानता येत नाही. पण त्यापेक्षाही मुर्तीभंजक अशा चळवळीचा झेंडा हाती असलेल्या व्यक्तीची प्रतिकात्मक पूजा व अंगारेधुपारे, एका चळवळीची शोकांतिकाच सांगत नाहीत काय? निवडणुका व सत्तापदांची लालसा चळवळीला व विचारांना नेस्तनाबूत करतील, ही पेरियार यांची भविष्यवाणीच त्यातून खरी ठरलेली नाही काय?

(२३/१०/२०१६)

1 comment:

  1. भाऊ,हे मूर्तिभंजकच देव असल्याची साक्ष देत आहेत बाकी माननीय बाळासाहेब ठाकरेंची बरोबरी कोणीच करुशकणार नाही

    ReplyDelete