Friday, October 28, 2016

अखिलेश आणि जयललिता


akhilesh jayalalitha के लिए चित्र परिणाम
उत्तरप्रदेशात जुंपलेली पितपुत्रांची लढाई अनेक राजकीय अभ्यासकांना बुचकळ्यात टाकणारी ठरत चालली आहे. कारण आजवर मुख्यमंत्रीपदी बसलेल्या अखिलेश यादवला सर्वांनी पित्याच्या गडद छायेतला मुलगा म्हणूनच बघितलेले आहे. पण जी संधी मिळाली, त्यात टक्केटोणपे खात आणि शिकत त्याने केलेली वाटचाल कोणाला बघावीशी वाटलेली नाही. म्हणून तो पित्याच्याच पुण्याईवर जगणारा वारस, अशी त्याची अभ्यासकांसाठी प्रतिमा राहिलेली आहे. पण वास्तवात त्याने सत्तेवर आल्यापासून लाथाबुक्के खात अनुभवाची शिदोरी गोळा करत, राजकारणात स्वतंत्रपणे आपला जम बसवला आहे. हे जसे अभ्यासकांच्या नजरेत आलेले नाही, तसेच यादव कुटुंबियांच्याही नजरेत आलेले नाही. काही वर्षापुर्वी एका नव्या सनदी (दुर्गालक्ष्मी) अधिकारी महिलेच्या निलंबनापासून अखिलेशच्या वेगळेपणाची प्रचिती येऊ लागली होती. त्याने सत्ता हाती घेतल्याच्या पहिल्या दिवसापासून गुंडगिरी व माफ़ियागिरीचे अनेक आरोप समाजवादी पक्षावर होत राहिले आणि त्याला सरकार संभाळता येत नाही, अशीच समजून होत गेली. त्यात पुन्हा आझमखान, शिवपाल यादव आणि पिता अशा तीन ज्येष्ठांच्या छायेत सत्तेचा अनुभव घेणार्‍या अखिलेशची ‘अर्धा मुख्यमंत्री’ अशीच टिंगल होत राहिली. गमतीने साडेतीन मुख्यमंत्री उत्तरप्रदेशात सत्तेवर असल्याचे म्हटले जात होते. त्यातला अर्धा अशी अखिलेशची संभावना होत राहिली. पण त्याच काळात त्याने नव्या पिढीच्या कार्यकर्ते व दुय्यम नेत्यांना आपल्या पंखाखाली आणत, आपला वेगळा गट व समर्थक पक्षात उभे करण्याला प्राधान्य दिले होते. आज पित्याला आव्हान देणारा अखिलेश असा सज्ज झालेला आहे. जे घडताना कोणी बघू शकलेला नाही. पण त्याच्यातली धमक व इर्षा जयललितांच्या पुर्वकाळाशी जुळणारी आहे. नेमक्या अशाच स्थितीतून तीन दशकांपुर्वी जयललितांना जावे लागले होते.

द्रमुकमध्ये दोन तुकडे पडले, तेव्हा प्रसिद्ध तामिळी अभिनेता एम. जी. रामचंद्रन यांनी वेगळी चुल मांडून अण्णा द्रमुक पक्ष स्थापन केला होता. मुलायम जनता दलाला सोडून स्वबळावर समाजवादी पक्ष काढून उभे राहिले; तसेच तेव्हा तामिळनाडून घडले होते. त्यात यशस्वी होण्यासाठी रामचंद्रन यांनी आरंभी कॉग्रेसची मदत घेतली, तर मुलायमनी कांशीरामची मदत घेतली. पण नंतर विभक्त होऊनही सपा-बसपा हेच प्रतिस्पर्धी होऊन बसले. अण्णा द्रमुक सत्तेत आल्यावर रामचंद्रन यांच्याभोवती द्रमुकचे जाणते गोळा झाले, तरी त्यांनी त्यापैकी कोणाला आपला वारस नेमले नव्हते. चित्रपटातली आपली लाडकी नायिका जयललिता ह्यांना वारस म्हणून वाजतगाजत पक्षात आणले आणि त्यांनाच वारस केले होते. पण रामचंद्रन आजारी पडले आणि त्यांच्या भोवताली असलेल्या जुन्याजाणत्या दरबारी लोकांनी जयललियाना खड्यासारखे दूर केले. रुग्णशय्येवर पडलेल्या नेत्याची पत्नी जानकी अम्मा, यांना हाताशी धरून पक्षाचा व सत्तेचा कब्जा दरबारी लोकांनी घेतला. जयललिता पुर्णपणे एकाकी पडल्या. काही तरूण व दुय्यम नेत्यांनी त्यांना साथ दिली होती. त्यामुळे अण्णा द्रमुकमध्ये फ़ुट पडली आणि पुढल्या विधानसभेत दोन्ही गटांचा दारूण पराभव झाला. जानकी अम्मा त्यानंतर विस्मृतीत गेल्या आणि कंबर कसून राजकारणी लढाईत उतरलेल्या जयललिता टिकून राहिल्या. त्यांनीच द्रमुकशी खरा लढा दिला. रामचंद्रन यांच्या अंत्ययात्रेत त्यांना हाकलून लावण्यात आले होते आणि विधानसभेत जयललितांना द्रमुकने कपडे फ़ाटेस्तवर विटंबना केली. तेव्हा मुख्यमंत्री होऊनच विधानसभेत परतु, असा इशारा देऊन जयललिता बाहेर पडल्या. पाच वर्षात त्यांनी आपला निर्धार पुर्ण केला होता. प्रतिकुल परिस्थितीत स्वयंभू माणसे टिकून रहातात आणि आश्रयाने जगाणारे वाहून जातात, हेच त्यातून सिद्ध झाले. अखिलेश काय वेगळे करतो आहे?

जयललितांनी रामचंद्रन यांच्या निधनानंतर त्यांचा वारसा मिळवण्यासाठी झुंज दिली. अखिलेश पित्याच्या हयातीतच मुलायमच्या आश्रितांना आव्हान द्यायला उभा ठाकला आहे. पिताही आश्रितांच्या बाजूने उभा राहिला असल्याने, ही लढाई पितापुत्र अशी दिसते आहे. पण प्रत्यक्षात ही लढाई मुलायमचा राजकीय वारसा आश्रितांकडे की कर्तबगार मुलाकडे, अशी होऊ घातली आहे. त्यात खंबीरपणे कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची जिद्द अखिलेशने दाखवली आहे. जी त्याच्या विरोधातल्या शिवपालपाशी नाही, की खुद्द मुलायममध्येही आज दिसलेली नाही. आपल्या निर्णयांना पुत्रच झुगारत असताना तडकाफ़डकी मुलायमनी त्याला सत्तेतून हाकलण्याची हिंमत अजून तरी दाखवलेली नाही. पण अखिलेशने मात्र आपल्या अधिकाराचा वापर करून शिवपाल-मुलायमच्या गोटातील अनेकांना दणका दिलेला आहे. सत्तेच्या जुगारात मोठी बाजी लावणार्‍याला यश मिळत असते. तर बाजी लावायलाच बिचकणार्‍यांना जिंकता येत नसते. तेव्हा जानकी अम्मा वा दरबारी नेत्यांना शरण जाण्यापेक्षा त्यांना शिंगावर घेण्याचे धाडस जयललितांनी दाखवले. आज उत्तरप्रदेशात अखिलेश यादव तेच धडे गिरवतो आहे. आपली कुवत व शक्ती जितकी असेल, तितका त्याचा पुरेपुर वापर करण्याचे धाडस त्याने दाखवले आहे. पण शिवपाल आदी मंडळी मात्र मुलायमच्या धोतराआड लपून कारवाया करीत आहेत. मुख्यमंत्री पदावरून अखिलेशला धडाक्यात खाली ओढण्याची हिंमत त्यांना झालेली नाही. पण त्याने मात्र यांच्या चार म्होरक्यांना सत्तेतून हाकलून लावण्याचे पाऊल विनाविलंब उचलले आहे. उद्या त्याच्या हाती सत्ता नसेल, पण भविष्यात टिकणारा तो बाजीगर असल्याची खुणगाठ प्रत्येकाने आतापासून बांधायला हरकत नाही. त्याचे विरोधक आजच्या सत्तेत गुंतून पडले आहेत आणि अखिलेश भविष्याच्या समिकरणाची मांडणी करतो आहे.

तामिळनाडूची सत्ता गेली आणि जानकी अम्माच्या पदराआड लपलेल्या दरबार्‍यांची हैसियत संपली. पण सत्तेसाठी शरणागत झाली नाही, ती जयललिता राजकारणात टिकून राहिली होती. कारण तिच्यापाशी धाडस होते आणि कर्तबगारी होती. मार्च महिन्यात होऊ घातलेल्या निवडणूकीत समाजवादी पक्षाची सत्ता संपुष्टात येईल. तेव्हा शिवपाल वा अन्य आश्रितांची स्थिती दयनीय असेल. तर मुलायमही धावपळ करण्याच्या वयापलिकडे गेलेले आहेत. अशावेळी त्यांच्या राजकारणाचा वारसा पुढे घेऊन जाण्याची कुवत असलेला कोणीही आश्रितांमध्ये नाही. ती हिंमत व इच्छाशक्ती अखिलेशपाशी आहे. त्यामुळे पित्याच्या हयातीमध्ये या आश्रितांची नांगी ठेचुन त्यांना आपल्या पायाशी आणण्याचा डाव त्याने आरंभला आहे. २०१९ ची लोकसभा किंवा २०२३ ची विधानसभा लढताना, अखिलेशच्या बाजूने त्याचे वय असेल. उलट मुलायम वा शिवपाल वगैरे उताराला लागलेले असतील. त्यांच्यामध्ये झुंजण्याची शक्तीही शिल्लक राहिलेली नसेल. त्या लढाईत ही लोढणी आपल्या गळ्यात नसावीत. पण पित्याचा वारसा व पुण्याईचे एकाधिकारी व्हावे, असे हिशोब मांडूनच अखिलेश आखाड्यात उतरला आहे. त्यात आश्रितांना खच्ची केले आणि तरूण पिढीला आपल्याच सोबत ठेवले; तर पित्यालाही उतारवयात पुत्राचाच आसरा घ्यावा लागणार, अशी अखिलेशला पुर्ण खात्री आहे. तेव्हा दिवाळखोर कॉग्रेस वा दुबळ्या अजितसिंग इत्यादींच्या कुबड्या भाजपा व मायावतींशी लढताना मदतीला येतील, असाही अखिलेशचा होरा आहे. तामिळनाडूतल्या जयललितांचा १९९० सालचा कित्ता, हा मुलायमपुत्र नव्याने गिरवतो आहे. त्याला पंख फ़ुटले असून पिता, चुलते किंवा राजकीय अभ्यासक मात्र, अजून त्याला घरट्यातले पिल्लू समजून स्वत:चीच फ़सगत करून घेत आहेत. चार वर्षातल्या राजकारणातून हा मुलगा खुप काही शिकला व तावून सुलाखून निघाला आहे.

(२६/१०/२०१६)

2 comments:

  1. Atiuttam bhau, samanya janana na disnari baju tumhi agadi sahajgatya ulagadun dakhavta ani tehi itihasatil samarpak dakhle deun.

    ReplyDelete