Sunday, December 25, 2016

अमुर्त्यांचे देव्हारे

Image result for trump hillary

गेल्या महिन्याच्या आरंभी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी काळा पैसा खणून काढण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घोषित करीत होते, तेव्हा तिकडे दूर अमेरिकेत भावी राष्ट्राध्यक्षाला निवडण्यासाठी तिथले नागरिक मतदान करीत होते. अर्थातच तिथल्या विचारवंत, जाणकार. संपादक, राजकीय विश्लेषकांनी आधीच निकाल लावून टाकलेला होता. त्यात डेमॉक्रेटीक पक्षाच्या महिला उमेदवार हिलरी क्लिंटन निवडूनच आलेल्या होत्या. त्यामुळे मतदान हा निव्वळ उपचार होता. इथे भारतात त्या रात्री नव्या नोटा मिळवण्यासाठी झुंबड उडाली आणि तिकडे अमेरिकेत मतमोजणी सुरू होऊन हिलरीचे तारू डळमळू लागले होते. भारतातल्या मस्तवाल पाचशे हजाराच्या नोटा जशा ९ नोव्हेंबरला निकामी होऊन गेल्या; तसाच अमेरिकेत तमाम डाव्या बुद्धीमंत इत्यादींचा धुव्वा उडाला होता. त्या मोजणीत डोनाल्ड ट्रंप यांचा विजय झाला होता. कारण त्यांना सर्वाधिक लोकप्रतिनिधींची मते मिळाली होती. तिथल्या नियमानुसार सर्वाधिक लोकप्रतिनिधी जिंकतील, त्याच उमेदवारची अध्यक्ष म्हणून निवड होत असते. तोपर्यंत त्याची खरी निवड पुर्ण होत नाही. तशी गेल्या आठवड्यात या लोकप्रतिनिधींनी ट्रंप यांची रितसर निवड केली आणि आता ट्रंप हे अधिकृतपणे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. ह्या निवडीत आपल्यासारखा तमाशा होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडे जसे निवडून आलेले खासदार आमदार वा नगरसेवक फ़ोडून सत्ता बळकावता येते; तसा उद्योग अमेरिकेत होत नाही. म्हणूनच हे शक्य झालेले आहे. १९९६ सालात लोकसभेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाच निवडून आला होता. पण नंतर परस्परांच्या विरोधात निवडून आलेल्या पुरोगामी लोकप्रतिनिधींची बेरीज करून देवेगौडा सरकार बनलेले आपल्याला आठवते ना? त्याला सेक्युलर बुद्धीवाद म्हणतात. तो अमेरिकेत चालत नाही. पण यंदा तेही करण्याचा तिथल्या पुरोगाम्यांनी प्रयत्न करून बघितला.

अशा रितीने अध्यक्षाला निवडणार्‍या प्रतिनिधींमध्ये फ़ाटाफ़ूट होत नाही वा केली जात नाही. म्हणूनच पराभूत उमेदवार प्रत्यक्ष निवड होण्यापुर्वीच पराभव मान्य करून नव्या विजेत्याचे अभिनंदन करीत असतो. तसेच हिलरी क्लिंटन यांनी केलेले होते. पण निकालाचे दोन दिवस उलटल्यावर तिथल्या पुरोगामी वा सेक्युलर शहाण्यांनी लोकप्रतिनिधी फ़ोडण्याचा ‘पुरोगामी’ पवित्रा घेतला. त्यासाठी अशा निवडल्या गेलेल्या प्रतिनिधींनी आपल्या विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे, असे आवाहन सुरू केले होते. त्यात इथल्याप्रमाणेच चित्रपटतारे, कलावंत, लेखक, संपादक व विचारवंताचा पुढा्कार होता. गेल्या मंगळवारी महाराष्ट्र टाईम्सचे मजी संपादक गोविंद तळवलकर यांनी त्यावर सविस्तर लेख लिहीला असून, तो मटामध्ये प्रसिद्धही झाला आहे. त्यातून जगभरचे तथाकथित पुरोगामी कसे विधीनिषेध सोडून सध्या वागत आहेत व आपल्या पराभवाला सामोरे जाण्याची हिंमत कशी गमावून बसले आहेत; त्याचे विवेचन गोविंदरावांनी केलेले आहे. अर्थात ही अमेरिकेपुरती गोष्ट नाही. जगभरात आणि प्रामुख्याने युरोपात सध्या उदारमतवादी डावे पुरोगामी कसे भरकटले आहेत, त्याचेच पोस्टमार्टेम त्यांनी केलेले आहे. मजेची गोष्ट अशी, की प्रत्येक पुरोगाम्याला आपण विचारवंत आहोत आणि आपण विचारस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहोत, असे ठामपणे वाटत असते. पण आपले विचारस्वातंत्र्य म्हणजे आपल्यापेक्षा कुठल्याही भिन्न विचार वा भूमिकेची गळचेपी, असे त्यांना वाटत असते. किंबहूना ज्या कुणावर ते फ़ॅसिस्ट म्हणून गळचेपीचा आरोप करत असतात, त्याच्या अनेकपटीने क्रुर व असभ्य रितीने आजचे पुरोगामी इतरांची गळचेपी करीत असतात. त्यांच्या त्याच भोंदूपणाला कंटाळून लोक अन्य पर्याय शोधू लागले आहेत. पण आपल्या चुका शोधून सुधारण्यापेक्षा सक्तीने आपल्या भूमिका लादण्यासाठी, आता पुरोगामी अतिरेकी होऊ लागले आहेत. क्लिंटन पराभवाने तेच सत्य समोर आणले आहे.

हेनरिख हायने नावाचा जर्मन कवी विचारवंत म्हणतो, ‘जेव्हा कोणाला आपल्याला सत्य गवसल्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा ते सत्य सिद्ध करण्यासाठी धडधडीत खोटे बोलण्यापर्यंत त्याची मजल जाते’. आजच्या पुरोगाम्यांची तशीच स्थिती झाली आहे. आपण कुठे व का चुकलो, ते त्यांना शोधण्याची इच्छाही राहिलेली नाही. म्हणून मग त्याच चुका नसल्याचे सिद्ध करण्यासाठी ते आपली बुद्धी व शक्ती पणाला लावत चालले आहेत. पण म्हणूनच सामान्य माणसाच्या मनातून अधिक उतरतही चालले आहेत. भारतात जसे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला विरोध करण्यासाठी तमाम पुरोगामी शहाणे एकवटले होते, तशीच त्यांची अमेरिकेतही टोळी तयार झाली होती. तिथेही ट्रंप निवडला गेल्यास देश सोडून पळून जाण्याची वेळ येईल, अशी हास्यास्पद विधाने करण्यात आलेली होती. आपल्या अमर्त्य सेन यांच्याप्रमाणे अमेरिकेतही नोबेल विजेते पॉल क्रुगमन नावाचे गृहस्थ आहेत. त्यांनीही ट्रंप जिंकल्यास जागतिक मंदी येण्याचे भाकित केलेले होते. पण ट्रंप यांच्या विजयानंतर अमेरिकेन आर्थिक उलाढाल वाढली. आता तेच क्रुगमन म्हणतात, ट्रंप आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी ९/११ सारखा हल्ला मुद्दाम घडवून आणतील. एकूणच अशा लोकांचे डोके किती फ़िरले आहे, त्याचा अंदाज यातून येऊ शकतो. अमर्त्य सेन फ़क्त भारताच्याच वाट्याला आलेत म्हणून कपाळावर हात मारून घेण्याचे कारण नाही. जगातल्या प्रत्येक देशात व समाजात असे दिवाळखोर असताता आणि भामटे सत्ताधीश प्रस्थापित लोक, आपला जम बसवण्यासाठी अशा अमुर्त्यांचे देव्हारे माजवतच असतात. तळवलकर यांनी ताज्या लेखात तिकडेच वाचकांचे लक्ष वेधलेले आहे. पण अर्थात त्यामुळे पुरोगाम्यांमध्ये काही सुधारणा होण्याची बिलकुल शक्यता नाही. कारण विचार न करणे, हा पुरोगाम्यांना सर्वात मोठा पवित्र अधिकार वाटतो. मग चुका सुधारणार तरी कशा?

ट्रंप यांचा विजय झाल्यावर त्याला शह देण्यासाठी नव्याने काही राज्यात फ़ेरमोजणी करण्याचेही नाटक रंगवले गेले होते. एका कोट्याधीशाच्या पैशावर मोठमोठ्या शहरात ‘ट्रंप माझा अध्यक्ष नाही’ असे फ़लक घेऊन शेकडो लोकांचे मोर्चेही काढण्यात आले. दिडदोन महिने अशा सत्याग्रहींना पोसण्याइतका पैसा हाताशी नसल्यामुळे बहुधा ते आंदोलन संपुष्टात आले. मग फ़ेरमोजणीसाठी कोट्यवधी डॉलर्सचा निधी जमा करण्यात आला. तेही साध्य झाले नाही, तेव्हा मग अध्यक्ष निवडणार्‍या प्रतिनिधींना दगाबाजी करून ट्रंपला पाडण्याचे आवाहन करण्यापर्यंत मजल गेली. हा आजच्या पुरोगामीत्वाचा चेहरा व मुखवटा दोन्ही आहे. त्यांना कसल्याही खोटेपणाची लाज वाटेनाशी झाली आहे. मोदींनी लोकसभा जिंकल्यावर भाजपा ३१ टक्के मते मिळाली, तेव्हा ६९ टक्के मते मोदी विरोधात असल्याचे बुद्धीवादी युक्तिवाद आपणही ऐकलेले होते. पण भारताच्या इतिहासात नेहरू, इंदिराजी वा कॉग्रेसला कधीही ५० टक्केहून अधिक मते मिळाली नव्हती, असे त्यापैकी एकही विद्वान बोलताना, आपण ऐकलेले नाही. सोनियांचे कौतुक २००४ व २००९ सालात कॉग्रेसला सत्तेवर आणण्य़ासाठी झाले, तेव्हा कॉग्रेसला २७ टक्केहून अधिक मते मिळालेली नव्हती. पण सोनिया कॉग्रेसला ७३ टक्के लोकांनी नाकारले, असल्याचे सिद्धांत आपण कधी ऐकला होता काय? आपण काहीही थापा माराव्यात आणि लोकांनी तेच पुरोगामी सत्य असल्याचे निमूट मान्य करावे; अशा समजूतीत भ्रमिष्ट झाल्याने आजच्या पुरोगाम्यांची अशी दुर्दशा झालेली आहे. थोडे आत्मपरिक्षण केले तरी त्यांना आपल्याच चुका शोधत येतील आणि त्या शोधल्या तर सुधारताही येईल. पण त्यासाठी प्रामाणिकपणा हवा आणि कष्टाची तयारी हवी. त्याचाच सध्या जगभरच्या पुरोगामी प्रदेशामध्ये भयंकर दुष्काळ पडलेला आहे. मग त्यातून त्यांना कुठला पुरोगामी इश्वर वाचवू शकणार आहे?

http://maharashtratimes.indiatimes.com/cold-wave/article/donald-trump-wins-us-presidential-elections/articleshow/56091630.cms

6 comments:

 1. छान विश्लेषण भाऊ

  आपण माझा ब्लॉग वाचावा व मार्ग दर्शन करावे ही विनम्र विनंती

  My blog
  sangnaremana.blogspot.com

  ReplyDelete
 2. पुरोगाम्यांचाही ईश्वर असतो? हाय रे दैवा.😃

  ReplyDelete
 3. छान मुखवटा दुर केलात व Ground reality figures दिल्यात, धन्यवाद भाऊ सर

  ReplyDelete
 4. भाऊ स्वतः च्या चूका हुडकतील ते पुरोगामी कसले ??

  ReplyDelete
 5. शिर्षक मुर्तीपुजा न माननार्या पुरोगाम्यासाठी तंतोतंत लागु पडते.

  ReplyDelete
 6. These are pseudo secular & useless people. Who spend there most of time in their studies unware of field realities.

  ReplyDelete