Tuesday, December 13, 2016

न्या. काटजू शुद्धीवर आले

justice katju के लिए चित्र परिणाम

आपणच जगातले सर्व शहाणपण अवगत केले असल्याचा एकदा भ्रम झाला, मग अवघे जग मुर्ख भासू लागते. इथपर्यंतही ठिक असते. पण आपले शहाणपण सिद्ध करण्याची वारंवर उबळ येऊ लागली; मग समस्या निर्माण होऊ लागतात. सुप्रिम कोर्टाचे माजी न्यायमुर्ती मार्कंडेय काटजू यांची निवृत्तीनंतर काहीशी तशीच अवस्था झालेली आहे. म्हणूनच त्यांनी जगातल्या प्रत्येक घटनेवर आपले मतप्रदर्शन वा ताशेरे मारण्याचा सरसकट उद्योग सुरू केला. तसा तोही नवा प्रकार अजिबात नव्हता. न्यायालयात असतानाही त्यांच्या अशा वागण्याबोलण्याने वाद निर्माण झालेले होते. एका खटल्यात त्यांनी मुस्लिम अशील व वकील यांच्यावर असलेच काही बोललेले होते. त्यावरून काहूर माजल्यानंतर त्यांना भर कोर्टातच आपले शब्द मागे घेण्य़ाची नामूष्की आलेली होती. पण अशा लोकांना काही शिकता येत नाही. कारण जगातले सर्व काही शिकून झाले आहे; यावर त्यांची अगाध श्रद्धा असते. म्हणूनच पदावर असताना केलेल्या चुकांमधून काटजू काही शिकले नाहीत. उलट तिथून निवृत्त झाले आणि ते गृहस्थ अधिकच बेताल वागू व बोलू लागले होते. कदाचित दुसर्‍या कुणाही निवृत्त न्यायमुर्तीने इतकी वारंवार वक्तव्ये प्रत्येक बाबतीत केलेली नसतील. काटजू त्याला अपवाद आहेत. ते कुठल्याही विषयावर बेताल वक्तव्ये करीत असतात. मग माजी न्यायमुर्ती म्हणून त्यांना वारेमाप प्रसिद्धी मिळते. त्यातून वादविवाद निर्माण होतात. प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठीच ते असे करतात, हे आता कोणालाही समजू शकते. पण त्यालाही एक मर्यादा असते. निदान हे देशाच्या सर्वोच्च न्यायालयात विराजमान झालेल्या व्यक्तीला कळायला हवे होते. नसेल तर मग त्या लक्ष्मणरेषेची देखभाल करणार्‍यांना त्याची दखल घ्यावीच लागते. झालेही तसेच आणि काटजूंना आता त्याच न्यायालयापुढे शरणागती पत्करावी लागली आहे.

स्वत: ज्या संस्थेत काम केले आहे तिथे न्यायालयाचा अवमान नावाची एक मर्यादा असते, हे काटजूंना अन्य कोणी समजावण्याची गरज नव्हती. तेवढी समजूत असती, तर त्यांनी आपल्या बेतालपणाच्या गुंत्यात सुप्रिम कोर्टाला ओढले नसते. पण बारीकसारीक गुन्हे पचले, मग गुन्हेगार सवकतो, तशीच त्यांचीही स्थिती झाली. मध्यंतरी पाकिस्तानी कलाकारांचा विषय आला तेव्हा, किंवा अशाच कुठल्या विषयावरून मुंबईत मनसेने गोंधळ घातला होता. तेव्हा मनसेची गुंडगिरी म्हणून बातम्या झळकल्या. त्यावर मतप्रदर्शन करताना न्या. काटजू यांनी राज ठाकरे यांना अलाहाबादला येण्याचे आव्हान दिले. ‘तु मुंबईचा गुंडा असशील, तर मीही अलाहाबादचा गुंडा आहे’ अशी भाषा त्यांनी वापरली होती. सर्वोच्च न्यायालया्चा न्यायमुर्ती म्हणून निवृत्त झालेल्या व्यक्तीकडून कायदा व न्यायविषयक काही तारतम्याने लिहीलेले अनुभवाचे बोल म्हणून लोक वाचायला उत्सुक असतात. त्यांच्यासमोर काटजूंनी अशी भाषा वापरायची असेल, तर त्यांना बुद्धीमान असण्याची काय गरज उरते? कुठल्याही महानगरात वा शहर गल्लीतला दबंग असली भाषा बोलू शकतो आणि आव्हाने देऊ शकतो. एकदा तशी भाषा तुम्ही बोलू लागलात, मग आपण माजी न्यायमुर्ती आहोत असा आडोसा घेण्याचा हक्क तुम्ही गमावत असता. लोढा समिती सध्या क्रिकेट मंडळाविषयी काही निर्णय घेते आहे. त्यानिमीत्ताने अनेक वादविवाद व उलटसुलट मुद्दे समोर येत असतात. त्यावर मतप्रदर्शन करताना न्या. लोढा किती मर्यादा पाळून भाष्य करतात? त्याकडे बघितले तर काटजूंचे डोके ठिकाणावर नसल्याचे लक्षात येऊ शकते. कोणीही कितीही चिथावणीखोर शब्द वापरले, तरी न्या. लोढा हसून त्याकडे दुर्लक्ष करतात. कुठलेही दुरूत्तर करीत नाहीत. स्वत: त्या व्यवहारात समाविष्ट असून, त्यांची भाषा सौम्य व शब्द मोजून मापून वापरलेले असतात.

काटजू यांना याचे कुठलेही भान उरलेले नाही. आपल्या कुठल्याही भडक विधानाने धमाल उडते वा त्याला प्रसिद्धी मिळते म्हटल्यावर; काटजू इतके उत्तेजित झालेले आहेत, की त्यांना आपल्या प्रतिष्ठेची वा आपण काम केलेल्या संस्थांच्या प्रतिष्ठेचीही मर्यादा लक्षात राहिलेली नाही. म्हणूनच मग एका क्षणी त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्यापर्यंत मजल गेली. सहाजिकच त्यांना त्यांची जागा वा मर्यादा दाखवून देण्याची जबाबदारी, त्याच न्यायपीठाला घ्यावी लागली. काटजूंच्या तथाकथित लिखाणाची थेट दखल घेऊन त्यांना आपली बाजू मांडण्य़ासाठी न्यायालयाला पाचारण करावे लागले. अशावेळी मात्र काटजूंना आपण निवृत्त ज्येष्ठ न्यायमुर्ती असल्याचे स्मरण झाले. झिंग ही अशीच गोष्ट असते. ती वास्तवाचे भान राहू देत नाही. गेल्या काही वर्षात त्यांनी जो बेतालपणा केला आणि माध्यमानी तो उचलून धरला, त्यामुळे काटजूंना ते भान उरलेले नाही. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर आपली पाजू मांडायला पोहोचलेल्या काटजूंनी, तिथेही मर्यादाभंग केलाच. त्यामुळे स्थिती अधिकच बिघडून गेली. त्यांचा इतिहास विसरून त्यांच्यावर सामान्य माणसाप्रमाणे नियमांचा बडगा उचलणे न्यायपीठाला अपरिहार्य होऊन गेले. परंतु त्यानंतर आलेल्या प्रतिक्रीया व माध्यमातून बसलेले फ़टके; काटजूंना शुद्धीवर आणण्यास उपयुक्त ठरलेले असावेत. कारण त्यांच्यावर अवमानाचा खटला भरला जाणार हे उघड झाल्यावर, त्यांनी नव्याने आपणच लिहीलेले शब्द व मतप्रदर्शन वाचून बघितले असावे. आपण कायद्यात व नियमात फ़सत असल्याचे भान आल्यावरच, त्यांना उपरती झालेली असावी. म्हणूनच आता पुढील सुनावणी होण्यापुर्वीच त्यांनी नांगी टाकली आहे. आपला प्रतिवाद मागे घेत त्यांनी न्यायपीठाची क्षमायाचना करीत, तोच आपला महान लेख मागे घेतला आहे.

ही स्थिती कशामुळे आली वा कोणामुळे आली, याचा आता या निवृत्त न्यायमुर्तींनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. आजवर जगाला आपल्या न्यायालयीन ज्ञान व अनुभवाचे डोस पाजणार्‍यांना न्यायालयाने कडू औषध देण्याची पाळी आली. ही त्यांच्यासाठीच नव्हेतर न्यायपालिकेसाठी सुद्धा लज्जास्पद गोष्ट आहे. पण काटजूंचे वागणेच असे होते, की त्यांना रोखण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा होता. तो अन्य कुणी घेत नसेल तर आपणच घेतला पाहिजे; याची जागरुकता न्यायालयाने दाखवली, हे महत्वाचे! कारण काटजू नुसते आपलीच बेअब्रु करून घेत नव्हते. तर त्यांच्या अशा बेताल बोलण्याने व वागण्याचे एकूणच सर्वोच्च न्यायालय आणि तिथले न्यायमुर्ती यांच्या बुद्धी व प्रगल्भतेवर प्रश्नचिन्ह लावले जात होते. मोठ्या पदावर विराजमान होणार्‍या व्यक्तीला आपली वैयक्तीक मते व भावनांसोबतच आपल्यावर असलेली जबाबदारी संभाळूनच वागावे व बोलावे लागत असते. पदावरून खाली उतरले म्हणजे नागरिक झाला, तरी त्याला त्या पदाचा मान आपल्यातूनच बघितला जातो, याचे भान सोडून चालत नाही. थोडक्यात मोठ्या सन्मानित पदावर काम करण्याची तीच तर मोठी किंमत असते. जी आयुष्यभर मोजावी लागत असते. तसल्या पदावर असा किंवा नसा; तुमच्याकडे त्याच आदराने बघितले जात असते आणि त्या आदराला पात्र ठरण्य़ाची कसरत करावीच लागत असते. अन्यथा तुम्ही व्यक्तीगत बदनामी ओढवून आणत नसता, तर उपभोगलेल्या पदालाही अपमानित करीत असता. ही किंमत वा हीच मर्यादा, गेल्या दोनचार वर्षात न्या. काटजू विसरून गेले होते. अन्यथा त्यांनी माध्यमातल्या भुरट्यांच्या तालावर नाचत पोरकटपणा केला नसता आणि सर्वोच्च न्यायालयालाच त्यांचे कान उपटण्याची नामुष्की त्यांच्यावरही आली नसती. अर्थात यानंतर ते कितपत शहाणे झाले तेही बघावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment