Monday, December 5, 2016

जयललिता हाजीर हो॓ऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता या दिर्घकाळ चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या प्रकृतीविषयी तितकाच काळ गोपनीयता राखली गेलेली आहे. त्यांच्या आतल्या गोटातील विश्वासू मुठभर लोक वगळता कोणलाही त्यांना भेटू देण्यात आले नाही. शेवटी खुप गाजावाजा होऊ लागला आणि शंका घेतल्या गेल्या, तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सर्वाधिक विश्वासू असलेल्या पनीरसेल्व्हम यांना तात्पुरते सरकारचे नेतृत्व करण्याची व्यवस्था लावण्यात आली. पण अम्मा खरेच हयात व शुद्धीत आहेत किंवा कसे; याविषयी कुठलाही ठाम खुलासा होऊ शकला नव्हता. पण नव्या नेमणूकीमुळे वादावर तात्पुरता पडदा पडू शकला होता. मग गेल्याच आठवड्यात अम्मा श्वासाच्छवास करू लागल्या असून, त्यांची प्रकृती आता ठिक झाल्याची ग्वाही देण्यात आली होती. इतक्यात रविवारी संध्याकाळी अकस्मात त्यांची प्रकृती ढासळल्याचे वृत्त आले आणि धावपळ सुरू झाली. मुंबईत असलेले तामिळनाडूचे राज्यपाल सर्व कार्यक्रम रद्द करून चेन्नईला धावले; तर राज्याचे पोलिस संचालक मदुराईहून चेन्नईकडे आले. तिथून नव्या अफ़वांचा बाजार गरम झाला. एका स्थानिक वृत्तवाहिनीने तर अम्मांचा अवतार आटोपल्याचीही बातमी देऊन टाकली आणि सोशल मीडियात वावड्या उडू लागल्या. त्यामुळे खवळलेल्या अम्मांच्या भक्तांनी त्या वाहिनीच्या कार्यालयावरही हल्ला केला. पण रुग्णालयाकडून अम्मा हयात असून त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती देण्यात आली. सध्या अम्मा लाईफ़ सपोर्ट यंत्रणेवर आहेत असेही सांगण्यात आले. ही आरोग्यविषय वा वैद्यकीय माहिती झाली. पण लोकांना त्यापेक्षाही राजकीय बातमीत स्वारस्य असते. म्हणून अम्मानंतर कोण, हा विषय महत्वाचा होता आणि त्यासाठी नवे मुख्यमंत्री म्हणून पनीरसेल्व्हम यांचे नाव पुढे आले. तिथेच सगळी गोम असल्याचे दिसते.

यापुर्वी अम्मा तुरूंगात असताना दोनदा पनीरसेल्व्हम हेच त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्याचा कारभार हाकत होते. आताही अम्माच्या आजारपणात मंत्रीमंडळ बैठकीची अध्यक्षता तेच करीत होते आणि राज्यपालांकडून तशी व्यवस्था करण्यात आली होती. पण अम्माच्या मृत्यूच्या अफ़वानंतर त्याची पुढली पायरी गाठली गेली आहे. अम्मा शुद्धीतही नसल्याच्या बातम्या आहेत आणि तेव्हाच अण्णा द्रमुकच्या तमाम आमदारांना रुग्णालयात बोलावून त्यांची प्रतिज्ञापत्रे घेतली गेली असल्याची बातमी गंभीर आहे. पनीरसेल्व्हम ह्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करत असल्याची ही प्रतिज्ञापत्रे आहेत आणि त्याची आताच गरज काय आहे? पर्यायच निवडायचा असेल तर सभा घेऊनही त्या आमदारांना नवा मुख्यमंत्री निवडणे शक्य आहे. पण तसे करण्यापुर्वी विद्यमान मुख्यमंत्र्याने राजिनामा द्यायला हवा, किंवा त्याच्यावर विधानसभेत अविश्वास व्यक्त व्हायला हवा. तरच मुख्यमंत्र्याचे पद मोकळे होऊ शकते. तसे काहीही घडले नसताना नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाची सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी निवड कशाला करायची? शिवाय अशी निवड करण्याऐवजी निवडणूक निकाल लागल्यासारखी प्रक्रिया कशाला सुरू झालेली आहे? निकालानंतर आपल्याच पाठीशी बहुसंख्य आमदार असल्याचा दावा एखादा नेता करतो आणि त्याची छाननी केल्यावरच राज्यपाल त्याला नवा मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करत असतात. त्याप्रकारेच आताही काम चालू आहे. पन्नीरसेल्व्हम हे बहुमताचा दावा करण्यासाठी ह्या सह्या घेत आहेत काय? आणि तसे असेल तर मुख्यमंत्रीपद मोकळे झाल्याचे त्यांना कोणी सांगितले आहे? असाही प्रश्न निर्माण होतो. त्याविषयी कुठलेही स्पष्टीकरण समोर आलेले नाही. ते पद मोकळे होण्याची आणखी दोन कारणे असू शकतात. खुद्द राज्यपालांनी मुख्यमंत्र्याला बडतर्फ़ केलेले असायला हवे, किंवा त्याचा मृत्यू तरी झालेला असायला हवा.

यापुर्वी अशी स्थिती एकदाच आलेली आहे. इंदिराजींवर गोळ्या झाडल्या गेल्यावर तात्काळ त्यांचा मृत्यू झाल्याच्या अफ़वा उठलेल्या होत्या. रेडिओ व दुरदर्शनवर तशा शोकाकुल धुनी वाजाल्या जात होत्या. पण अधिकृतपणे कोणी त्यावर शिक्कामोर्तब करत नव्हते. तेव्हा राजीव गांधी बंगालच्या दौर्‍यावर गेलेले होते. माहिती मिळताच त्यांना तातडीने दिल्लीला आणले गेले. ते इस्पितळात जाऊन थेट राष्ट्रपती भवनात पोहोचले होते. तिथे ग्यानी झैलसिंग यांनी नवे पंतप्रधान म्हणून राजीव गांधींचा शपथविधी उरकला होता. मग त्यांनीच दुरदर्शनवर आपल्या मातेचा व पंतप्रधानपदी असताना इंदिराजींची हत्या व मृत्यू झाल्याची घोषणा केलेली होती. यापुर्वी असा पंतप्रधानाचा आकस्मिक मृत्यू झाल्यावर हंगामी पंतप्रधानाची निवड व्हायची आणि मगच रितसर पंतप्रधान लोकसभेचे खासदार निवडायचे. इंदिराहत्येनंतर अपवाद करण्यात आला होता. थेट नव्या पंतप्रधानाचीच नेमणूक झालेली होती. तामिळनाडूचा इतिहासही तसाच आहे. पहिले द्रमुक मुख्यमंत्री अण्णा दुराई यांचे निधन झाल्यावर नेंदूसेझियन यांची हंगामी मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी नेमणुक केलेली होती. नंतर आमदारांची बैठक होऊन त्यात करुणानिधींना पक्षाने अण्णांचे वारस म्हणुन निवडलेले होते. आताही पन्नीरसेल्व्हम यांची नाहीतरी अम्मानेच दोनदा प्रतिनिधी म्हणून नेमणूकच केलेली होती. मग आताच इतक्या घाईने प्रतिज्ञापत्रे घेऊन त्यांच्या नावावर आमदारांचे शिक्कामोर्तब कशाला करून घेतले जात आहे? नंतर बैठकीत पन्नीरसेल्व्हम यांना कोणी प्रतिस्पर्धी उभा राहू नये, म्हणून चाललेला हा दरबारी डाव आहे काय? अम्मा अजून हयात असतील तर नव्या मुख्यमंत्र्याच्या नावावर सह्या व प्रतिज्ञापत्रांची गरजच काय? ही खरी गडबड आहे. राजीव गांधी यांच्याप्रमाणेच शपथविधी उरकून नंतर अम्मांचा अवतार आटोपल्याची घोषणा नव्या मुख्यमंत्र्याकरवी करण्याचा खेळ तर चालू झालेला नाही ना?

ज्यांचा वारसा सांगत अम्मा अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा झाल्या. त्यांचाही शेवट असाच वादग्रस्त होता. अम्मांना रामचंद्रन यांनी आपल्या वारस म्हणुन वाजतगाजत सादर केलेले होते. पण प्रत्यक्षात रामचंद्रन यांची प्रकृती ढासळत गेल्यावर, अम्मांना दरबारी लोकांनी रुग्णालयाच्या जवळपासही फ़िरकू दिलेले नव्हते. त्यांचा अवतार आटोपला तेव्हा अंत्ययात्रेतही अम्मांना हुसकून लावण्यात आलेले होते. नव्या मुख्यमंत्री म्हणून रामचंद्रन यांच्या पत्नी जानकी अम्मा यांना दरबारी लोकांनी सत्तेवर बसवले होते. जया अम्मांना पक्षातून हाकून लावलेले होते. पण त्यांनी मोजक्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून वेगळा गट केला आणि निवडणूकात थोडे यश मिळवले. मग जानकी अम्मांनी राजकारण सोडून मुळचा पक्षही जयललितांच्या हवाली करीत राजकारणातून निर्वाण केलेले होते. आताही तसेच काही दरबारी राजकारण, कटकारस्थान अपोलो रुग्णालयाच्या आवारात शिजते आहे काय, अशी शंका येते. अम्मांच्या अनुपस्थितीत वा बेशुद्धीत, त्यांच्या नावाने काही ठराविक लोक आपले हेतू साध्य करण्यासाठी आमदारांना प्रतिज्ञापत्रावर सह्या घेऊन भलतेच डाव खेळत असावेत काय? कुछ तो गोलमाल है भाई! कारण रुग्णालयाचे डॉक्टर्स व अण्णा द्रमुकच्या गोटातून सतत दाखवली जाणारी गोपनीयता, आता संशयास्पद होत चालली आहे. अन्यथा एका बाजूला अम्माची प्रकृती स्थिर असल्याचे हवाले दिले जात आहेत आणि दुसरीकडे अकस्मात त्यांच्या जागी दुसर्‍या नेत्याचे नाव मुख्यमंत्री पदासाठी आमदारांकडून सक्तीने मान्य करून घेतले जात आहे. दोन बातम्यांमध्ये कुठलेही साधर्म्य नाही की सुसुत्रता आढळून येत नाही. यातून नको तितका घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ शकतो. कारण एकाच सत्ताधारी पक्षाचा एक मुख्यमंत्री हयात असताना, दुसरा नेता आमदार कसे निवडू शकतात? त्याला कुठली घटना मान्यता देऊ शकते?

1 comment: